Friday, 24 September 2021

अग्नी ५ चाचणी बुद्धिबळाच्या पटलावरची एक चाल... विनीत वर्तक ©

 अग्नी ५ चाचणी बुद्धिबळाच्या पटलावरची एक चाल... विनीत वर्तक © 

२३ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर साठी ३००० किलोमीटर पेक्षा जास्ती अंतरासाठी नोटॅम प्रसिद्ध केल्यानंतर भारत या दिवशी अग्नी ५ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी करणार हे उघड गुपित होतं. पण काल संध्याकाळ पर्यंत अशी कोणतीही चाचणी न झाल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं. भारत अशी कोणती चाचणी करणार नव्हता पासून भारत अमेरिका आणि चीन ला घाबरला, ५६ इंचाची छाती कुठे गेली आणि फुकटची हवा केली वगरे. पण प्रत्यक्षात भारताने एक चाल खेळली होती. ज्याचा अपेक्षित परिणाम भारताने साधला असं सध्यातरी दिसून येते आहे. आपण विचार करतो आणि बघतो त्या पलीकडे खेळलेल्या चालीत अनेक रहस्य दडलेली असतात. ती आपल्याला बघता यायला हवीत. जेव्हा आपण त्याचा विचार करू तेव्हा यामागचं गणित लक्षात येईल. 

साधारण १२-१३ सप्टेंबर रोजी भारताने नोटॅम प्रसिद्ध केला. त्यात २३ आणि २४ सप्टेंबर ही तारीख मुद्दामून प्रसिद्ध केली. याच दिवशी भारताचे पंतप्रधान हे अमेरिकेत असणार हे माहित असताना भारताने हीच तारीख का निवडली? याचा आपण विचार करायला हवा. आजवर ज्या वेळेस भारत क्षेपणास्त्र चाचणी करतो तेव्हा चाचणी झाल्यावर त्याची बातमी होते. पण यावेळेस चाचणी च्या आगोदर बातमी झाली असं का? याचा विचार केला तर अनेक न उलगडलेल्या चाली आपल्या समोर येतील. भारताच्या पंतप्रधानांचा विदेश दौरा अनेक महिने आधी ठरतो. त्यामुळे २३ आणि २४ सप्टेंबर ला ते अमेरिकेत असणार हे स्पष्ट होतं. तसेच या दौऱ्यात क्वार्ड सोबत युनायटेड नेशन च्या जनरल असेम्ब्ली मधे संबोधन करणार हे स्पष्ट होतं. मग असं असताना भारताने हेच दिवस का निवडले होते? 

भारत चाचणी करणार नव्हता तर जेव्हा १२-१३ सप्टेंबर ला ही बातमी प्रसिद्ध झाली त्यावेळी भारत सरकार, डी.आर.डी.ओ. किंवा संरक्षण मंत्रालयाने याबद्दल प्रसिद्धी पत्रक काढून स्पष्टीकरण दिलं असतं. बातमी खोटी असती तर चीन तिकडे बोंबलत युनायटेड नेशन मधे जाऊन पोहचला नसता. युनायटेड नेशन च्या नियमांचा दाखला देत भारत अश्या आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी करू शकत नाही म्हणत चीन ने थयथयाट केला. अर्थात चीन बद्दल सहानभूती असणाऱ्या काही भारतीयांनी याचा दाखला देत भारत चीन पुढे झुकला किंवा घाबरला असे आपल्या अकलेचे दिवे लावण्यास उशीर केला नाही. मुळात युनायटेड नेशन च आजच्या काळात महत्व इतकं आहे की सगळेच देश त्याचा सोयीस्कररीत्या वापर करतात. त्यामुळे आपला थयथयाट हा जगाचं लक्ष वेधून घेऊ शकतो पण भारताला चाचणी करण्यापासून रोखू शकत नाही हे चीन ला चांगलच माहित आहे. भारत या आधी मग ते अणुस्फोट असो वा अग्नी ५ ते इतर आण्विक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेताना कोणाच्या परवानगी आणि कोण काय म्हणते याचा विचार न करता पुढे जाऊ शकतो तर मग आता चाचणी घेण्यासाठी भारत  कशाला चीन काय म्हणतो किंवा युनायटेड नेशन काय म्हणते याचा विचार कशासाठी करणार आहे? 

काल संध्याकाळी डी.आर.डी.ओ. ने आपण घेणार असलेली अग्नी ५ ची चाचणी २० दिवस पुढे ढकलल्याचं स्पष्ट केलं. अर्थात असं करण्यामागे कारण त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. ते तांत्रिक असण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण अग्नी ५ ची या आधी अनेकवेळा चाचणी १००% यशस्वी झालेली आहे. भारत ज्या  एम.आय.आर.व्ही. तंत्रज्ञानाची चाचणी घेणार होता ते खरं तर आधीच तपासलेले आहे. फक्त जगाच्या नकाशावर त्याच शिक्कामोर्तब करायचं बाकी होतं. अर्थात ते भारत कधीपण करू शकतो. पंतप्रधान अमेरिकेत असताना मुद्दामून भारताने या चाचणीचं पिल्लू सोडलं असावं असा एक मतप्रवाह आहे. अमेरिका एकीकडे मैत्रीचा धागा जोडून गुणगान करत असताना हे बंध किती मजबूत आहेत याची चाचणी ही या निमित्ताने केली असावी. भारत त्याच्या सगळ्यात दूरवर मारा करणाऱ्या आणि आण्विक क्षमता असणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी भारताचे पंतप्रधान अमेरिकेत असताना करण्याची योजना करतो हा योगायोग नक्कीच नव्हता तर बुद्धिबळाच्या पटावरची एक चाल होती. अमेरिका,ऑस्ट्रेलिया, जपान या सोबत युनायटेड नेशन ची याबाबत काय भुमीका असेल हे या निमित्ताने स्पष्ट झालं असेल. या सगळ्या भूमिका समोर येतील असं नाही. अनेक गोष्टी पडद्यामागे घडल्या असतील ज्याची कल्पना आपल्याला कधीच येणार नाही. 

आपला मिडिया ज्याप्रमाणे माकडाच्या हातात कोलीत दिल्याप्रमाणे अनेक गोष्टी अतिग्लोरीफाय करून सांगत असते. चीनकडे भारतापेक्षा लांब जाणारी क्षेपणास्त्र आहेत. त्यामुळे तो घाबरला वगरे सांगणं हे फुसके बाण आहेत. चीन विरोध यासाठीच करतो की भारता सारखं राष्ट्र समर्थ होणं त्यांच्या जगावर अधिराज्य करणाच्या स्वप्नांच्या आड येते. त्यांनी केली म्हणून आपण पण १०,००० ते १२,००० किलोमीटर लांब जाणारी क्षेपणास्त्र बनवू शकतो. पण भारताचे सगळे शत्रू ५००० किलोमीटर च्या टप्यात असताना भारताला आपली ताकद नको तिकडे खर्च करण्याची गरज नाही. त्यामुळे या गोष्टींकडे डोळसपणे बघता यायला हवं. काही असलं तरी अग्नी ५ ची चाचणी येत्या काळात होणार हे स्पष्ट आहे. ती होईल तेव्हा भारताने जागतिक पटलावर एम.आय.आर.व्ही. तंत्रज्ञान असणारा देश म्हणून स्थान पक्के केलं असेल. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




No comments:

Post a Comment