Wednesday 8 September 2021

पगडीने जीव वाचवणारा सरदार... विनीत वर्तक ©

पगडीने जीव वाचवणारा सरदार... विनीत वर्तक ©
शीख लोकांसाठी पगडी ही एखाद्या राजमुकुटासारखी असते. एकवेळ जीव गेला तरी बेहत्तर पण त्यांच्या पगडीवर ते कोणतीही आच येऊ देत नाहीत. शीख धर्मात पगडीची परंपरा जवळपास ४००० वर्षं जुनी असली तरी १६६९ मध्ये शीखांचे १० वे गुरू गोविंद सिंग यांनी पाच श्रद्धेच्या वस्तूंची दैनंदिन आयुष्यात जपणूक करायला सांगितली, त्यांतील एक म्हणजे 'केस'. त्यांचं संरक्षण करण्यासाठी शीख लोक पगडी बांधू लागले. आज त्यांची ती ओळख बनली आहे, पगडीचं महत्व सरदार (शीख) लोकांमध्ये म्हणूनच अनन्य साधारण आहे. 'पगडी' हा पण संदेश देते की शीख लोकांसाठी सगळे मानव हे समान, स्वतंत्र आहेत.
३ एप्रिल २०२१ चा दिवस होता, जेव्हा छत्तीसगडमधल्या सुकमा-बीजापूर बॉर्डरवर नक्षल लोकांनी सी.आर.पी.एफ. च्या Commando Battalion for resolute Action (CoBRA) युनिटवर अचानक हमला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने अफरातफरी झाली. २२ सैनिक वीरगतीस प्राप्त झाले तर ३१ सैनिक जखमी झाले होते. पण अश्या परिस्थितीसाठी सज्ज असणाऱ्या कोब्रा युनिट मधील सैनिकांनी नक्षल लोकांचा हल्ला परतवून लावण्यासाठी त्यांच्यावर उलट हल्ला केला. दोन्ही बाजूने गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. यात होते कोब्रा युनिटमधील कॉन्स्टेबल बलराज सिंग. त्यांनी नेटाने या हल्ल्याचा प्रतिकार सुरू केला. या धुमश्चक्रीत त्यांच्या जवळच UBGLs (under-barrel grenade launchers)मधील एक ग्रेनेड येऊन फुटला. या स्फोटात त्यांच्या उजव्या बाजूला असणारे सब इन्स्पेक्टर अभिषेक पांडे गंभीररीत्या जखमी झाले. या स्फोटात ग्रेनेड मधून उडालेल्या तुकड्यांनी त्यांच्या पायाला रक्तबंबाळ केलं होतं.
कॉन्स्टेबल बलराज सिंग यांनी त्यांना प्राथमिक वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडे असलेली मदत इतर घायाळ झालेल्या सैनिकांना वापरली जात होती. सब इन्स्पेक्टर अभिषेक पांडे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पायातून सतत रक्तस्त्राव सुरू होता. जर का रक्त थांबवलं नाही तर त्यांचा जीव जाणार हे स्पष्ट होतं. वेळ बिकट होती आणि प्रसंग बाका होता. समोरून गोळ्यांचा वर्षाव सुरू होता. आपल्या ऑफिसरचा जीव आपल्या समोर जातो आहे, हे त्या सरदार सैनिकाला कुठेतरी अस्वस्थ करत होतं. त्याने क्षणाचाही वेळ न दवडता असा निर्णय घेतला की ज्याने तिथे असणाऱ्या प्रत्येकाला स्तब्ध केलं. मागचा पुढचा विचार न करता सरदार बलराज सिंगने आपली पगडी उघडली. आपल्या पगडीने त्याने अभिषेक पांडे यांच्या जखमेला पट्टी बांधून रक्तस्त्राव बंद केला.
आपली आन, बान, शान असलेली पगडी सरदारने पायाला बांधली. रक्तस्त्राव थांबल्यामुळे सब इन्स्पेक्टर अभिषेक पांडे पुन्हा एकदा लढाईसाठी तयार झाले. ते आणि त्यांचा जीव वाचवणारा कॉन्स्टेबल बलराज सिंग नक्षलांवर तुटून पडले. कित्येक नक्षलांचा त्यांनी खात्मा केला. कॉन्स्टेबल बलराज सिंग त्यानंतर गोळ्यांच्या वर्षावात नक्षलांवर चाल करून गेले. लढता लढता त्यांनी नक्षलांना पीटाळून लावलं पण त्याचवेळी त्यांची एक गोळी त्यांच्या पोटात घुसली. हा हल्ला परतवल्यानंतर जखमी झालेल्या कोब्रा सैनिकांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. सब इन्स्पेक्टर अभिषेक पांडे यांचा जीव त्या पगडीमुळे वाचला होता. ही गोष्ट स्पेशल डायरेक्टर ऑफ पोलीस राजेंद्र कुमार वीज यांच्या कानावर जखमी झालेल्या सैनिकांनी कॉन्स्टेबल बलराज सिंगने आपल्या पगडीने वाचलेल्या जीवाची गोष्ट सांगितली.
स्पेशल डायरेक्टर ऑफ पोलीस राजेंद्र कुमार वीज यांनी तात्काळ कॉन्स्टेबल बलराज सिंग यांची इस्पितळात भेट घेऊन त्यांना आपल्या फोर्सतर्फे स्पेशल पगडी भेट दिली. आपल्या जीवापेक्षा जास्ती मोल असणाऱ्या पगडीला आपल्या सहकाऱ्याच्या पायाला बांधून त्याचा जीव वाचविणाऱ्या या सरदाराने शीख लोकांच्या पगडीचा सन्मान अजून वाढवला आहे यात शंका नाही. अश्या पराक्रमी सरदार कॉन्स्टेबल बलराज सिंग यांना माझा कडक सॅल्यूट आणि लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा देशसेवेसाठी दाखल होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
जय हिंद!!!
फोटो स्त्रोत :- गुगल (स्पेशल डायरेक्टर ऑफ पोलीस राजेंद्र कुमार वीज हे कॉन्स्टेबल बलराज सिंग यांना हॉस्पिटलमधे पगडी भेट देताना)
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



1 comment: