Wednesday 15 September 2021

खारे_वारे_मतलई_वारे ( भाग १४ )... विनीत वर्तक ©

 खारे_वारे_मतलई_वारे ( भाग १४ )... विनीत वर्तक ©

“what the United States of America grievously experienced on September 11th is something that we, in India, have been going through for the last 20 years or thereabouts. In the region, we know clearly who is perpetuating these acts, what lies at the heart of it, and how it is to be dealt with.”

जसवंत सिंग, परराष्ट्रमंत्री, भारत सरकार ऑक्टोबर २००१. 

अमेरिकेवर झालेल्या ९/११ च्या दशहतवादी हल्यानंतर भारताचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री यांनी वरील विधान भारताची अमेरिकेवरील दशहतवादी हल्याची प्रतिक्रिया म्हणून केलं होतं. ९/११ होई पर्यंत संपूर्ण जगासाठी दशतवाद किंवा जेहाद आणि एकूणच आतंकवाद हा भारताची समस्या वाटत होती. आतंकवादाला धर्म नसतो हे जागतिक पातळीवर सिद्ध करणारे अनेक लोक भारतात आणि जगात ते चित्र योग्य तर्हेने रंगवण्यात यशस्वी ठरले होते. पण ९/११ च्या हल्याने बऱ्याच गोष्टी अमेरिकेला जश्या स्पष्ट केल्या तसा आतंकवादाचा धर्म निरपेक्षतेचा बुरखा ही फाडला. माणूस अनुभवातून शहाणा होतो असं म्हणतात पण गेल्या २० वर्षातल्या या घटनेनंतरच्या गोष्टी बघितल्या तर अमेरिका यातून तितकी शिकली नाही असच म्हणावं लागेल. 

तालिबान ने पुन्हा एकदा ज्या सफाईने अफगाणिस्तानात आपलं वर्चस्व स्थापन केलं ते बघितल्यावर अमेरिका पुन्हा एकदा तोंडघाशी तर पडलीच पण भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जे सूचक विधान केलं होतं त्याची जाणीव पुन्हा एकदा अमेरिकेला झाली असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. ज्या पद्धतीने जागतिक पटलावर गेल्या काही दिवसात बदलाचे वारे वहात आहेत त्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण जगाला एका कडेलोटासाठी डोंगराच्या कड्यावर आणून उभं केलं आहे. पुढे काय होणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. फरक इतकाच आहे की आपण कश्या पद्धतीने यातून स्वतःला वाचवू किंवा कश्या पद्धतीने त्याचे चटके कमी करता येतील या सगळ्यासाठी आटापिटा सुरु झालेला आहे. 

अफगाणिस्तान मधे प्रस्थापित झालेल्या तालिबान चे चटके सगळ्यात जास्ती अमेरिका आणि त्यांची मित्र राष्ट्रे यांना बसणार हे उघड आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेतील अनेक अधिकाऱ्यांनी अगदी उघडपणे स्पष्ट केलं आहे की येत्या १-२ वर्षात अमेरिकेत पुन्हा ९/११ किंवा त्यापेक्षा भयंकर दशहतवादी हल्ला होऊ शकतो तसेच अनेक हल्ले त्यांच्या मित्र राष्ट्रात होण्याच्या शक्यतेत खूप वाढ झाल्याचं म्हंटलेलं आहे. या सगळ्यात जास्ती महत्व कोणाला प्राप्त झालं असेल तर अश्या दशहतवादाशी खंबीरपणे लढा देणाऱ्या भारताला. 

काही दिवसांपूर्वी रिचर्ड मूर ब्रिटिश स्पाय एजन्सीचे अध्यक्ष ज्याला एम.आय.६ म्हणतात ते त्यानंतर अमेरिकेच्या सी.आय.ए. चे डायरेक्टर विलियम बर्न्स, रशियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार निकोलव पात्रुशेव या सर्वानी भारतात पाऊल ठेवलं आहे. या पलीकडे जगातील सगळ्यात प्रतिथयश गुप्तचर संघटना इस्राईल च्या मोसाद मधील अधिकाऱ्यांनी याच वेळी भारतात गुप्तपणे भेट दिल्याच्या बातम्या आहेत. हे सर्व अधिकारी आणि त्यांच्या सोबत येणार शिष्टमंडळ हे काय हवाबदलासाठी भारतात दाखल झालेलं नव्हतं हे शेंबड मुलं पण सांगेल. महत्वाचं हे आहे की बदललेल्या वाऱ्यांचे केंद्र आता येत्या काळात भारत असणार हे स्पष्ट होते आहे. वाऱ्यांच रूपांतर कोणत्या प्रकारच्या वादळात होणार हे जसं ठामपणे सांगता येत नाही तसं या भेटीतून जागतिक पातळीवर काय घडणार आहे याचा अंदाज आपण लावू शकत नाही. फक्त वादळ येणार आहे असं सांगू शकतो. 

२० वर्षापूर्वी जेव्हा तालिबान सत्तेत आली होती त्यावेळचं जग आणि त्यावेळचा भारत या दोघात आता जमीन आस्मानाचा फरक आहे. त्यावेळी जगाला दशतवाद नवीन होता आणि त्यावेळचा भारत 'हम इस बात की कड़ी निंदा करते हैं' म्हणून गप्प बसायचा. आज जग दशहतवादाने पोळलेलं आहे तर आजचा नवीन भारत 'घर मैं घुसके मार सकता हैं' या नवीन भारताच्या रुपाला अनेक आयाम आहेत. आर्थिक क्षेत्रात भारताची स्थिती प्रचंड मजबूत झालेली आहे. आज भारताची आर्थिक ताकद पाकिस्तान च्या दहा पट आहे. आर्थिक महासत्तेच एक टोक जर चीन असेल तर दुसऱ्या बाजूला भारत वेगाने पुढे येतो आहे. अफगाणिस्तानातील  बदलेल्या समीकरणांमुळे भारताचं महत्व अनेक बाजूने वाढलेलं आहे. भारत एकीकडे ब्रिक सारख्या समूहाचा भाग आहे त्याचवेळी इंडो पॅसिफिक भागात चीन ला शह देण्यासाठी एकत्र झालेल्या क्वाड समूहाचा ही महत्वाचा घटक आहे. अफगाणिस्तानात सत्ताबदल झाल्यावर तालिबान, पाकिस्तान आणि चीन  युती झाली आहे आणि ती येत्या काळात घट्ट होणार आहे. रशिया या बाबतीत सावध आहे तर तिकडे इराण ला या युतीची चिंता भासवते आहे. 

अमेरिका आणि रशिया यांचे संबंध ताणलेले आहेत. इराण आणि अमेरिका एकमेकांना पाण्यात बघतात. अमेरिका आणि चीन संपूर्णतः एकमेकांचे शत्रू होण्याकडे वाटचाल करत आहेत. अमेरिका आणि युरोपातील सर्व देश या सोबत इस्राईल ला दशहतवादाचा धोका आहे. अमेरिकेला, फ्रांस, इस्राईल सारख्या देशांना मुस्लिम राष्ट्र आपला धर्मविरोधी मानतात. तर अफगाणिस्तानातील जनमत संपूर्णतः पश्चिमी राष्ट्रांच्या विरोधात आहे. या सगळ्या गोंधळात एकच समान दुवा जो की तालिबान, चीन, पाकिस्तान च्या धोरणांना शह देण्याची ताकद ठेवतो तो म्हणजे भारत. भारत आणि रशिया बेस्ट फ्रेंड आहेत. भारत आणि अमेरिका यांचे संबंध कधी नव्हे इतके अतिशय मजबूत झालेले आहेत. भारत इस्राईल ची मैत्री जगमान्य आहे. भारत आणि इराणचे संबंध अतिशय घनिष्ठ आहेत. भारत आणि मुस्लिम राष्ट्र ( सौदी अरेबिया, यु. ए. ई. , ओमान, तजाकिस्तान, इराक) यांच्याशी संबंध अतिशय सौजन्याचे आणि जिव्हाळ्याचे राहिलेले आहेत आणि त्यात गेल्या काही वर्षात मजबुती आलेली आहे. भारताचे युरोपियन देशांशी संबंध अतिशय घनिष्ठ आहेत. युनायटेड किंगडम, फ्रांस, जर्मनी अश्या सगळ्या राष्ट्रांचा भारत जवळचा मित्र आहे. त्या पलीकडे भारताला अफगाणिस्तान मधील जनमत आपला मित्र आणि तालिबान च्या जुलमी राजवटीतून मुक्तता करू शकेल असा तारणहार म्हणून बघते. या सगळ्याचा विचार जर आपण केला तर जागतिक मंचावर भारताची काय भूमिका असणार आहे याचा अंदाज आपण लावू शकतो. 

अफगाणिस्तानात पाकिस्तान पुरस्कृत दशहतवाद्यांना मोकळं रान मिळणार हे उघड आहे. चीन अफगाणिस्तानातील आपल्या 'वन बेल्ट वन रोड' आणि तिथल्या नैसर्गिक संपत्तीवर कब्जा करण्यासाठी प्रयत्न करणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. अश्या परिस्थितीमधे आज जग किंवा प्रगत राष्ट्र घाबरत आहेत ती अफगाणीस्तानात पोसल्या जाणाऱ्या दशहतवादामुळे. त्याची झळ आता नुसती भारताला बसणार नसून संपूर्ण जगाला त्याचा फटका बसणार आहे. गेल्या ५० वर्षाहून अधिक काळ भारत जी खिंड लढवत होता आता त्याला त्या लढाईत जागतिक बळ मिळालं असल्याचे सध्या तरी बदललेले वारे दाखवत आहेत. पण यातून नक्की काय निष्पन्न होणार आहे आणि या खाऱ्या आणि मतलई वाऱ्यांनी कोणतं वादळ येणार आहे हे येणारा काळच स्पष्ट करेल. 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.   



No comments:

Post a Comment