Sunday, 5 April 2020

एका लढणाऱ्या बाबाची कहाणी... विनीत वर्तक ©

एका लढणाऱ्या बाबाची कहाणी... विनीत वर्तक ©

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती
देव, देश आणि धर्मा पायी प्राण घेतला हाती.

 आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीती.
लाख संकटं झेलून घेईल अशी पहाडी छाती
देव, देश आणि धर्मा पायी प्राण घेतला हाती.

जिंकावेवा वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं
 लढून मरावं मारून जगावं हेच आम्हाला ठावं.
देशापायी सारी विसरू माया ममता नाती.
देव, देश आणि धर्मा पायी प्राण घेतला हाती.

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती!!

 देशासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता लढणारा तो सैनिकपण माणूस असतो हेच आपण अनेकदा विसरून जातो. लोकलच्या गर्दीत धक्के खात, घामाच्या धारा पुसत, दिवसभर बॉस च्या इशाऱ्यांवर नाचत डेडलाईन पूर्ण करणारा तुमच्या आमच्या सारखा बाबा जेव्हा घरी येतो तेव्हा 'बाबा' ह्या एका हाकेत आणि त्या प्रेमाच्या मिठीत सगळं काही विसरवण्याची ताकद असते. दमून, भागून घरी आलेल्या बाबाच्या कुशीत त्याच पिल्लू शिरते आणि लाडाने म्हणते कसे आहात? तेव्हा त्या दोन शब्दांच समाधान हे अमृतापेक्षा गोड असते. रोज सकाळी घर सोडलेला बाबा परत संध्याकाळी घरी येणार ह्याची खात्री असताना पण संध्याकाळची ती मिठी इतकं समाधान देते. पण देशाच्या सिमांच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या बापाच्या भावना मात्र तश्याच आतमध्ये गोठलेल्या राहतात.

 आजचा क्षण आपला... पुढच्या कोणत्या क्षणाला शत्रू ची गोळी डोक्यावरच्या हेल्मेट ला चिरून आरपार जाईल ह्याची काहीच कल्पना त्या बापाला नसते. डोंगर दऱ्यात, जंगलात, बर्फात, वाळवंटात ते सियाचीन ग्लेशिअर वर उणे ५० डिग्री सेल्सिअस मध्ये राहणारा बाबा कुठे असतो ह्याची काहीच कल्पना न त्याच्या घरातल्याना असते न त्याच्या पिल्लाला. फक्त पाय पसरता येईल इतकं घर ते हातभार लांबीच बंकर हाच त्याचा पत्ता. घर सोडताना परत घरी येणार की नाही हे घरच्यांना कसं सांगावं ह्या द्विधा मनस्थितीत असलेलं त्याच मन जेव्हा आपल्या पिल्लाला बघते तेव्हा डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूंना पण रडायला येतं. बाबा, तू  परत घरी कधी येणार? ह्या प्रश्नाचं उत्तर ना त्याच्या घरच्यांजवळ असते ना त्याच्याजवळ. कुठे जाणार हे माहित नाही? कधी येणार हे माहित नाही? परत येणार की नाही ह्याचा भरवसा नाही. मग त्या निरागस मनाची समजूत घालणं हे तो सैनिकच जाणे.

 कधीतरी येणाऱ्या पत्रात लिहलेले ते चार शब्द जेव्हा काळजाचा ठाव घेतात तेव्हा हातात असलेल्या बंदुकीतुन निघणारी गोळी पण काही क्षण थांबत असेल. त्या निरागस अक्षरांमध्ये दगड झालेल्या मनाला पण पाझर फोडण्याची क्षमता असते. कारण त्यात शब्दांपेक्षा त्या निरागस मनाच्या भावना काळजाला भिडत असतात. हे सगळं कशासाठी? कोणासाठी? फक्त आणि फक्त आपल्या देशासाठी. आपल्या पिल्लाच्या वाढदिवसाला त्याला शुभेच्छा न देता डोळ्यात तेल घालून सरहद्दीच रक्षण करताना काहीच वाटत नसेल का? कधीतरी आजारी असताना, धडपडलेलं असताना, लागलेल्या पिल्लाला आपल्या कुशीत न घेता येणं ह्याच शल्य त्या मनालाच ठाऊक.

 दमलेल्या बाबाची कहाणी सगळ्यांना माहीत आहे पण लढणाऱ्या बाबाची कहाणी मात्र जो देशासाठी लढतो त्यालाच ठाऊक असते. पुढल्या वेळेस जेव्हा कधी दमलेल्या बाबाचा विचार कराल तेव्हा त्या लढणाऱ्या बाबाची एकदा आठवण ठेवा कारण तो तिकडे लढतो तेव्हा हा दमलेला बाबा आपल्या पिल्लांना बघू शकतो.

 ही पोस्ट भारतीय सेनेच्या सर्व जवानांना समर्पित. तुमच्या सोबत तुमच्या कुटुंबियांना ही माझ्याकडून कडक सॅल्यूट..

 जय हिंद...!

 फोटो स्रोत :- गुगल


सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment