भारताचा 'रॅम्बो' मेजर सुधीर कुमार वालिया... विनीत वर्तक ©
'रॅम्बो' हे नाव उच्चारताच समोर येतो तो पिळदार शरीरयष्टी असलेला, दुष्मनांच्या चारी मुंड्या चीत करणारा, कोणत्याही परीस्थितीत आपलं मिशन यशस्वी करणारा, पराक्रम, शुरता, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची ताकद असलेला, समयसुचूक असलेला एक निष्ठावान सैनिक. हा सैनिक पडद्यावर सिल्वेस्टर स्टॅलोन ने उभा केला असला तरी खऱ्या आयुष्यात आपल्या पराक्रमाने भारतातच नव्हे तर अमेरीकेच्या पेंटॉगॉन ला आपल्या कामगिरीची दखल घ्यायला लावणारा एक सैनिक भारतीय सैन्यात होता ज्याला भारतीय सैन्याचा 'रॅम्बो' म्हणून ओळखलं जायचं तो सैनिक म्हणजेच मेजर सुधीर कुमार वालिया.
२४ मे १९७१ ला हिमाचल प्रदेशाच्या कांगडा जिल्ह्यातील पानुरी गावात एका सैनिकी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील भारतीय सैन्यात सुभेदार असल्याने सैनिक होण्याचं आपलं स्वप्न त्यांनी लहानपणीच ठरवून टाकलं होतं. सैनिकी शाळेतून आपलं शिक्षण पूर्ण करताना पहिल्याच प्रयत्नात त्यांनी प्रतिष्ठेच्या नॅशनल डिफेन्स एकेडमी पुणे आणि इंडियन मिलट्री एकेडमी डेहराडून मधून आपलं भारतीय सैन्यात ऑफिसर बनण्याचं ट्रेनिंग पूर्ण करत १९८८ ला ४ जट रेजिमेंट मधून भारतीय सेनेत प्रवेश केला. भारतीय सेनेच्या श्रीलंकेच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या मिशनसाठी त्यांना श्रीलंकेत पाठवण्यात आलं. श्रीलंकेत (तमिळी टायगर) लिट्टे च्या अतिरेक्यांना मात देताना त्यांनी आपल्या अंगभूत पराक्रमाने आपल्यात असलेल्या गुणांची चुणूक दाखवली.
श्रीलंकेतून परत आल्यावर त्यांची नियुक्ती ९ पॅराशूट कमांडो रेजिमेंट स्पेशल फोर्सेस मध्ये करण्यात आली. भारतीय सेनेचं हे युनिट घातक समजलं जाते. डोंगर युद्धात अतिशय चपळाईने शत्रूचा शोध घेऊन त्यांना नेस्तनाबूत करण्यात ह्यांची जगात तोड नाही. ह्या रेजिमेंट चा भाग असलेले सगळेच सैनिक अतिशय कणखर समजले जातात. ह्या रेजिमेंट चा इतिहास कायम ठेवताना त्यांनी व त्यांच्या टीम ने जम्मू आणि काश्मीर च्या जंगलात अनेक मिशन हाती घेताना आतंकवाद्यांना नेस्तनाबूत केलं. दोन वेळा त्यांची नियुक्ती जगातील सगळ्यात कठीण, उंच आणि प्रतिकूल समजल्या जाणाऱ्या सियाचीन ग्लेशिअर वर झाली. त्यावेळी लेफ्टनंट असणाऱ्या सुधीर वालिया ह्यांना दोन वेळा दोन वेगवेगळ्या मिशनसाठी सेना मेडल ने गौरवण्यात आलं. हा सन्मान मिळवणाऱ्या थोड्या अधिकाऱ्यांपैकी ते एक होते.
भारतीय सेनेने त्यांना एका खास ट्रेनिंगसाठी अमेरीकेला पाठवलं. जगातील ८० देशांचे सैनिक असणाऱ्या ह्या ट्रेनिंग मध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या ह्या पराक्रमाची नोंद घेताना अमेरीकेच्या पेंटागॉन ने त्यांना बोलण्याची संधी दिली. जगात सैनिकी क्षेत्रात प्रथम क्रमांकावर असलेल्या अमेरीकेच्या सुरक्षा क्षेत्रातील अनेक मातब्बरांपुढे बोलण्याची संधी मिळणं ते ही खुद्द अमेरीकेच्या रक्षा मुख्यालयात हा खूप मोठा सन्मान त्यांना दिला गेला. त्या ट्रेनिंग मधील इतर देशांचे सगळेच सैनिक त्यांना 'कर्नल' म्हणून मान दयायचे इतका पराक्रम त्यांनी आपल्या सैनिकी क्षेत्रातील प्रावीण्याने गाजवला होता. त्यांची नियुक्ती ह्या नंतर एड-डी-कॅम्प (पर्सनल असिस्टन्स) म्हणून भारतीय आर्मीचे तत्कालीन आर्मी चीफ जनरल वेद प्रकाश मलिक ह्यांच्या हाताखाली झाली. १९९९ ला कारगिल युद्धाची सुरवात झाली. लहानपणापासून अंगभूत सैनिक असलेल्या मेजर सुधीर कुमार वालिया ह्यांच मन ऑफिस मध्ये बसून रमत नव्हतं. त्यांनी ह्या युद्धात सीमेवर जाण्यासाठी जनरल मलिक ह्यांच्याकडे अर्ज केला. त्यांच्यातील त्या सैनिकाला आपलं शौर्य दाखवण्याची संधी जनरल मलिक ह्यांनी दिली. मेजर सुधीर कुमार वालिया पुन्हा एकदा आपल्या युनिट सोबत कारगिल च्या रणभूमीवर दाखल झाले. दिल्ली वरून निघून अवघ्या १० दिवसात त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने ५२०० मीटर (१७,००० फूट ) उंचीवर असणाऱ्या झुलू टॉपवर तिरंगा फडकावला. इतक्या कमी दिवसात १७,००० फुटावर युद्ध कसे केलं असं विचारलं असताना त्यांनी म्हंटल होतं,.
'सर, तुम्हाला माहित आहे का? मी पहाडी (उंच प्रदेशात राहणारा )आहे, मला उंचीवर रुळायला वेळ लागत नाही'.
त्यांच्या ह्या निर्भय बाण्याने त्यांनी अनेक मिशन यशस्वी केले होते. कारगिल युद्ध संपल्यावर भारतीय सेनेने काश्मीर मध्ये अतिरेक्यांच्या विरुद्ध मोहीम उघडली होती. २९ ऑगस्ट १९९९ ला मेजर सुधीर कुमार वालिया आपल्या पाच साथीदारांसह अश्याच एका शोधा आणि बिमोड करा अश्या मिशन वर निघाले होते. जम्मू आणि काश्मीर मधील कुपवारा जिल्ह्याच्या हाफूर्द जंगलात त्यांनी आपलं मिशन सुरु केलं. एका न कळणाऱ्या जागेवर साधारण २० अतिरेकी लपून बसले होते. आपल्या जीवाची पर्वा न करता एका क्षणाचा ही विलंब न करता त्या अतिरेक्यांवर मेजर सुधीर कुमार वालिया तुटून पडले. त्यांनी एकट्यांनी ४ अतिरेक्यांचा खात्मा केला पण ह्यात ते जखमी झाले. अतिरेक्यांच्या गोळ्यांनी त्यांच्या चेहऱ्याचा, खांद्याचा आणि पोटाचा वेध घेतला होता. अंगातून रक्त वहात असताना आणि जागेवरून हलता येतं नसताना वैद्यकीय मदत घेण्यास त्यांनी नकार दिला. 'बचेंगे तो ओर भी लढेंगे' ह्या वाक्याप्रमाणे आपलं लक्ष्य पूर्ण होई पर्यंत त्यांनी जागेवरून हलण्यास मनाई केली. त्या नंतर रेडिओ वरून आपल्या साथीदारांना अतिरेक्यांच्या हालचालींची माहिती आणि त्यांना धीर तसेच हे मिशन पूर्ण करण्यासाठी सूचना देतं राहिले. सर्वच्या सर्व २० अतिरेक्यांना कंठस्थान घातल्यावर जवळपास ३५ मिनिटांनी भारतीय सेनेच्या हेलिकॉप्टर ने त्यांना वैद्यकीय मदतीसाठी नेलं. पण तोवर इतक्या प्रचंड प्रमाणात रक्त वाहून गेलं होतं की भारताने आपला रॅम्बो गमावला. त्यांच्या ह्या बहादुरी आणि पराक्रमासाठी त्यांना शांतता काळात देण्यात येणाऱ्या सर्वोच्च अश्या 'अशोकचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
निधड्या छातीवर गोळ्या झेलत आपल्या आयुष्याची पर्वा न करता आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या जीवाचं बलिदान देणारा भारताचा रॅम्बो मेजर सुधीर कुमार वालिया हे अवघे ३० वर्षाचे होते. ज्या काळात मुलं लग्नाची, संसाराची स्वप्न बघतात त्या काळात त्यांनी देशाला आपलसं केलं. चीफ ऑफ आर्मी स्टाफ च्या सोबत काम करत असताना ते सोडून युद्धभूमीवर जाऊन शत्रूशी दोन हात करण्याचं वेड काय असेल? अवघ्या एका दशकाच्या त्यांच्या सैन्यातील काळात त्यांना अशोकचक्र, दोन वेळा सेना मेडल मिळालं.
आज चित्रपटातील रॅम्बो लक्षात ठेवणाऱ्या भारतीयाला आपल्याच खऱ्या रॅम्बो ची ओळख नाही. त्यांचा पराक्रम, त्यांची माहिती तर सोडाच पण त्यांच साधं नावं आज भारतीयांना माहिती नाही. आपल्या हक्कावर आवाज फाटेल इतक्या आवाजात भांडणाऱ्या, सोशल मिडियावर अतिशय हलक्या भाषेत एकमेकांवर चिखलफेक करून संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याची पोचपावती देणाऱ्या सगळ्यांना भारताचा रॅम्बो माहिती नाही हीच त्या लोकशाहीची आणि संविधानाची शोकांतिका आहे. कारण आपण आज ज्या हक्काने बोलू शकतो तो हक्क शाबूत ठेवण्यासाठी अश्या अनेक रॅम्बोनी आपलं रक्त सांडलं आहे आणि आपल्या जीवाचं बलिदान दिलं आहे. पण डोळे बंद करून दूध पिणारे आम्ही गेंड्याची कातडी घेऊन वावरणार आहोत.अश्या कातडीत मला तरी राहण्याची इच्छा नाही.
भारताच्या ह्या पराक्रमी रॅम्बो मेजर सुधीर कुमार वालिया ह्यांना माझा कडक सॅल्यूट आणि त्यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन.
जय हिंद!...
फोटो स्रोत :- विकास मंहास
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment