Friday, 24 April 2020

एका विस्मरणात गेलेल्या गुप्तहेराची गोष्ट ... विनीत वर्तक ©

एका विस्मरणात गेलेल्या गुप्तहेराची गोष्ट ... विनीत वर्तक ©

आज यंगून, म्यानमार इकडे बसून ही गोष्ट लिहताना खरे तर माझ्याच अंगात लिहिता लिहिता विरश्री संचारली आहे. गोष्ट आहे जवळपास ८३ वर्षा पूर्वीची जेव्हा भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी त्याकाळी प्रसिद्ध आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान असणाऱ्या एका भारतीय कुटुंबियांच्या घरी ते पाहुणे म्हणून गेले होते. स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व म्हणून महात्मा गांधीच नाव आणि व्यक्तिमत्व सगळ्यांना आकर्षित करेल असं होतं. त्यांच्या भेटीसाठी त्या घरात लगबग चालू होती. सगळे त्यांना भेटीसाठी आतुर असताना एक १० वर्षाची चिमुरडी मात्र घरातुन गायब होती. महात्मा गांधी आले असताना तिचा थांगपत्ता लागत नसताना तिचा शोध सगळीकडे सुरु झाला. खुद्द महात्मा गांधी ह्या शोधकार्यात जुंपले. थोड्या वेळाने ती मुलगी घराच्या मागच्या बाजूला बंदुकीने आपलं लक्ष्य वेधण्याचा सराव करत असताना आढळली. महात्मा गांधी नी तिला जाऊन सांगितलं की,

'तू इतकी लहान असताना हिंसेच्या रस्त्यावर का जात आहेस? आपण अहिंसेने ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा देतं आहोत. तेव्हा बंदुकीची गरज नाही. तू सुद्धा अहिंसेच्या मार्गाने त्यांच्या विरुद्ध लढा दे. '

त्यांच बोलून संपत नाही तोच खुद्द महात्मा गांधी ना त्या १० वर्षाच्या मुली नी उत्तर दिलं,

'आपण चोरांना आणि लूट करणाऱ्या लोकांना मारतो. नाही का? मग ब्रिटिश चोर आहेत लुटेरे आहेत. त्यांनी भारताला लुटलं आहे. भारतात चोरी केली आहे.  मी मोठी झाल्यावर एका तरी  ब्रिटिशाचा माझ्या बंदुकीने नक्की वेध घेईन'.

न घाबरता भारताच्या आणि पूर्ण जगाच्या अहिंसेच्या सगळ्यात मोठ्या व्यक्तिमत्वाला अवघ्या १० व्या वर्षी आपल्या शब्दांनी उत्तर देणारी ती मुलगी म्हणजेच भारताची आजपर्यंतची सगळ्यात तरुण गुप्तहेर ज्यांच नाव आहे 'सरस्वती राजामणी'

१९२७ साली सरस्वती राजामणी ह्यांचा जन्म रंगून, ब्रह्मदेश (यंगून, म्यानमार) इकडे झाला. त्यांच कुटुंब मुळचं भारतातल्या त्रिची इथलं. अतिशय श्रीमंत आणि स्वातंत्र्य लढ्याशी निगडित असणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. लहानपणापासून भारताला ब्रिटिशांपासून स्वतंत्र करण्याचं वेड त्यांना होतं. 'लोहा लोहे को काटता हैं' हा बाणा त्यांच्या अंगात लहानपणापासून होता. मोठं झाल्यावर त्यांचा कल ह्याच बाण्याचं नेतृत्व करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्याकडे वळला. दुसऱ्या महायुद्धाची सुरवात झाल्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस हे रंगून, ब्रह्मदेश (यंगून, म्यानमार) इकडे आपल्या सेनेत लोकांना समाविष्ट करण्यासाठी आणि लागणाऱ्या पैश्याची तजवीज करण्यासाठी आले होते. त्यांच्या रंगून मधल्या भाषणांनी प्रेरीत होऊन सरस्वती राजामणी ह्यांनी आपले सगळे दागिने आणि पैसे आझाद हिंद सेनेला दान केले.

एक १६ वर्षाची तरुणी इतके दागिने आणि पैसे दान करते हे नेताजींच्या नजरेतून निसटलं नाही. त्यांना ते योग्य न वाटल्याने ते सरस्वती राजामणी ह्यांच्या घरी आले. त्यांच्या वडिलांना नेताजी दागिने परत करत असताना खुद्द नेताजींना सरस्वती राजामणी ह्यांनी उत्तर दिल,

' ते दागिने, पैसे माझे आहेत. त्यांच काय करायचं ते ठरवण्याचा अधिकार माझा आहे. मी ते तुम्हाला दिले आहेत. ते मी परत घेणार नाही'

एका १६ वर्षाच्या मुलीच्या शब्दांची धार खुद्द नेताजींना निशब्द करून गेली. नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांनी त्यावर तिला सांगितलं होतं,

'लक्ष्मी येईल आणि जाईल. पण सरस्वती तशीच रहाते. तिचा वरदहस्त तुझ्यावर आहे. म्हणून तुझं नाव आजपासून 'सरस्वती'.

सरस्वती राजामणी ह्यांनी नेताजींना त्यांच्या आझाद हिंद सेनेत घेण्याची विनंती केली. अश्या तऱ्हेने त्यांची नियुक्ती आझाद हिंद सेनेच्या गुप्तहेर खात्यात झाली. ह्या खात्याकडे मुख्य जबाबदारी ही ब्रिटिश सेनेतील गुप्त संदेशांना आझाद हिंद सेनेकडे देणं ही होती. सरस्वती राजामणी सोबत अजून ४ सहकारी गुप्तहेर म्हणून रुजू झाल्या. त्या सगळ्यांना आपला पेहराव बदलताना पुरुषी रूप धारण करावं लागलं. सरस्वती राजामणी आता १६ वर्षाचा मिसरूड फुटलेला 'मणी' झाल्या होत्या. मुलगा बनून ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या घरात त्यांनी काम करायला सुरवात केली. काम करता करता त्यांच्याकडे  संदेश, सैन्याच्या हालचालींची माहिती गुप्तपणे आझाद हिंद सेनेकडे देण्याचं काम होतं. हे काम करताना त्यांच्या एका मैत्रिणीचं बिंग फुटलं आणि ब्रिटिशांनी तिला कैदेत टाकलं. आपल्या साथीदाराला ब्रिटिशांच्या कैदेतून सोडवण्यासाठी त्यांनी एक धाडसी पाऊल उचललं. पकडले गेल्यावर आपली काय हालत होईल हे माहित असताना त्यांनी एका नर्तकी चा वेष करून त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्याला दारू पाजून आपल्या साथीदारांसह तिकडून पोबारा केला.

ब्रिटिश सैनिकांना ह्याची माहिती मिळाल्यावर त्या दोघींचा ब्रिटिश सेनेने पाठलाग केला. ब्रिटिश सैनिकांनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात एक गोळी सरस्वती राजामणी ह्यांच्या उजव्या पायाला लागली. गोळी लागलेल्या पायाने धावता येत नसताना ब्रिटिश सैनिकांना चकवा देण्यासाठी ह्या दोघी चक्क झाडावर चढल्या. तब्बल तीन दिवस जोवर ब्रिटिश सैनिकांची शोध मोहीम संपत नाही तोवर झाडावरच बसून होत्या. गोळी लागलेला पाय घेऊन अन्न, पाण्याशिवाय तीन दिवस झाडावर बसून राहणं काय असेल ह्याची कल्पना पण आपण करू शकत नाही. त्या गोळीमुळे आजही त्यांच्या उजव्या पायात बळ नाही. पण सरस्वती राजामणी ह्यांना त्याचा अभिमान आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांचं कुटुंब मद्रास (चेन्नई) ला स्थलांतरीत झालं. एकेकाळी गडगंज श्रीमंत असणाऱ्या सरस्वती राजामणी जवळपास ७० वर्ष एका छोट्या खोलीत रहात होत्या. शासनाची दखल त्यांच्याकडे जायला स्वातंत्र्य भारताची ७ दशक जावी लागली. तामिळनाडू सरकारने त्यांना घराची व्यवस्था केली. फाटके कपडे जमवून ते शिवून पुन्हा गरीब लोकांना दान करण्याचं काम त्या आयुष्याच्या शेवटा पर्यंत करत होत्या. २००६ सालच्या त्सुनामीच्या प्रकोपात नाममात्र मिळणारं सरकारी पेंशन सुद्धा त्यांनी मदत कार्याला दान केलं होतं. अश्या ह्या सरस्वतीने १३ जानेवारी २०१८ ला शेवटचा श्वास घेतला.

आम्ही भारतीय करंटे आहोत. आम्हाला खऱ्या इतिहासाची जाणीव ना कोणी करून दिली न आम्ही ती करून घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला कोणत्याही त्रासाशिवाय मिळालेले संविधानाचे हक्क, लोकशाही, सार्वभौमत्व हे फक्त आणि फक्त राजकारण आणि स्वतःच्या फायद्यासाठी मग ते शिक्षण, नोकरी अथवा पैसा किंवा आता सोशल मिडिया सगळ्यांसाठी वापरण्याचा करंटेपणा आजतागायत करत आलेले आहोत. त्याचा आम्हाला माज आहे कारण देशभक्ती काय असते हेच आम्हाला कळलेले नाही. १५ चित्रपट करणाऱ्याला आम्ही देशाचा हिरो मानतो, १० सामने खेळलेला भारताचा स्टार होतो पण अंगावर गोळी झेलून त्याच्या होणाऱ्या यातनांना आपला अभिमान मानणाऱ्या सरस्वती राजामणी ह्यांच्या कर्तृत्वाचं न आम्हाला काही पडलेल असते न ते कोणत्या पद्म सन्मानाच्या  कक्षेत येते. कारण आमच्या हिरो बनवण्याच्या व्याख्याच वेगळ्या आहेत. आम्ही इतिहासावर फक्त आणि फक्त नाव ठेवायला तयार असतो इतिहास घडवायला नाही. इतिहास घडवणारी सरस्वती देवींसारखी माणसे वेगळ्याच रक्ताची होती. जरी देशाने त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवली नाही तरी देशासाठी रक्त सांडल्याचा आणि त्या इतिहासात सहभाग देण्याचा तसेच आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत देशासाठी योगदान देण्याचा त्यांना अभिमान होता.

सरस्वती राजामणी नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले होते तश्या तुम्ही खरच 'सरस्वती' आहात. आज यंगून, म्यानमार इकडे बसून हा लेख लिहताना एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात त्या भूमीवर असल्याचा मला अभिमान आहे. तुमच्या जाज्वल्य देशप्रेमाला एका भारतीयाचा कडक सॅल्यूट आणि तुमच्या स्मृतीस माझा साष्टांग नमस्कार....           

जय हिंद!!!...

माहिती स्रोत :- गुगल, स्कुपवहूप, बेटर इंडिया, विकिपीडिया

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 

2 comments:

  1. फारच छान !! . आपल्या बरोबर इ-मेल संपर्क करायला आवडेल. माझा आहे. limayeji@gmail.com

    ReplyDelete
  2. Really it is unknown to most of us. Salute to Rajamaniji

    ReplyDelete