ते ८ किलोमीटर... विनीत वर्तक ©
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
१९९४ साली हॉलिवूड मध्ये 'The Shawshank Redemption' नावाचा एक चित्रपट आला होता. सार्वकालिक सर्वोत्तम चित्रपटांच्या यादीमध्ये आजही हा चित्रपट (IMDB) (Internet Movie Database) वर प्रथम क्रमांकाचा चित्रपट आहे. जवळपास २५ वर्षानंतर ही ह्या चित्रपटाचं गारुड चाहत्यांवर कायम आहे. ह्या चित्रपटाचं कथानक ज्या पद्धतीने वळण घेते ते आजही बघताना रोमांच उभे राहतात. ह्या कथानकात असलेला हिरो आपली सुटका जेलमधून ज्या पद्धतीने करतो ते बघून आपण थक्क होतो. पण असच कथानक खऱ्या आयुष्यात कोणी घडवलं असेल तर. ते ही एका दुसऱ्या देशात तर ती गोष्ट किती मोठी असायला हवी. एका दुसऱ्या देशात युद्ध कैदी नाकावर टिच्चून बाहेर पळतात. सुटकेच्या समीप असताना फक्त जुन्या बातमीमुळे पकडले जातात. ही सर्व घटना घडते पाकीस्तान सारख्या शत्रू देशात आणि ह्या कथानकाला साकार करणारे हिरो असतात भारतीय वायू दलाचे पराक्रमी, शूरवीर सैनिक.
“We fight deep inside enemy territory, and one bullet can cripple an aircraft. If I ever become a prisoner of war, I will escape.”
हे शब्द होते फ्लाईट लेफ्टनंट दिलीप परुळेकर ह्यांचे. आपले कमांडिंग ऑफिसर एम. एस. बावा ह्यांना त्यांनी १९६५ मध्ये हे म्हंटल होतं. ह्या शब्दाला त्यांनी अक्षरशः खरं करून दाखवलं.
१९७१ चं भारत - पाकीस्तान युद्ध सुरु झालं. पाकीस्तान मधल्या एका रेडीओ टॉवर ला नष्ट करण्याची जबाबदारी फ्लाईट लेफ्टनंट दिलीप परुळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देण्यात आली. आपल्या सुखोई ७ विमानातून आपली कामगिरी फत्ते करताना शत्रुच्या बंदुकीने त्यांच्या विमानाचा वेध घेतला. विमानातून आपत्कालीन सुटका तर त्यांनी केली पण ते बेशुद्ध अवस्थेत पाकीस्तानात पॅराशूट च्या साह्याने उतरले. पाकिस्तान सैनिकांनी त्यांना युद्धबंदी बनवलं आणि त्यांची रवानगी रावळपिंडी च्या युद्धबंदी कैद्यांच्या तुरुंगात करण्यात आली. इकडे त्यांची भेट भारतीय सेनेच्या इतर ११ युद्धबंदी झालेल्या सैनिकांशी झाली. ह्या तुरुंगाची जबाबदारी उस्मान अमीन ह्या पाकिस्तानी स्क्वाड्रन लिडरकडे होती. फ्लाईट लेफ्टनंट दिलीप परुळेकर ह्यांनी त्याच्याशी मैत्रीपूर्ण संबंध वाढवले. हिंदी चित्रपट, संगीत ह्याच्यातून सुरु झालेला संवादातून त्यांनी त्याचा विश्वास संपादन करताना जेल मध्ये काही सुट मिळवल्या.
फ्लाईट लेफ्टनंट दिलीप परुळेकर ह्यांनी अमीन ने बोलावलेल्या एका पार्टीत आपल्या डोक्यात असलेली योजना त्या ११ सैनिकांना सांगितला. पण रावळपिंडी च्या जेल मधून पळून जाण्याचा प्रयत्न म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण. पकडले गेल्यावर साक्षात मृत्यू. बाहेर आल्यावर ही भारतात परतण्यासाठी कसं जायचं ह्या सर्वाची अनिश्चितता होती. पण फ्लाईट लेफ्टनंट दिलीप परुळेकर आपल्या योजनेवर कायम होते. फ्लाईट लेफ्टनंट एम.एस. गरेवाल आणि फ्लाईट लेफ्टनंट हरीश सिंजी ह्यांनी ह्या योजनेमध्ये आपण सोबत करत असल्याचं सांगितलं आणि मग सुरु झाला एक असा अविश्वसनीय असा ग्रेट इंडियन एस्केप प्लॅन.
जेल च्या आजूबाजूच्या परिसराचा त्यांनी सखोल अभ्यास केला. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी शोधून काढल्या. बाहेर पडल्यावर लोकात कसं मिसळायचं? आणि कुठे? कश्या पद्धतीने जायचं? ह्याचा सखोल अभ्यास हे तिघे करत होते. बाहेर पडल्यावर युद्ध क्षेत्रात म्हणजेच लाहोर ला जाण्यात काहीच अर्थ नव्हता आणि तिकडे त्यांच अस्तित्व पाकिस्तानी सैनिकांच्या लक्षात लगेच आलं असतं. मग त्यांनी ठरवलं की आपण भारतात न जाता अफगाणिस्तान च्या दिशेने कूच करायचं. पाकिस्तानी सैनिकांच पूर्ण लक्ष हे भारतीय सरहद्दीवर असताना अफगाणिस्तानात शिरणं अतिशय सोपे जाईल. नंतर अफगाणिस्तानातून भारतात आपण सहज परत जाऊ ही योजना ठरली. ते सर्वच जण एका नवीन प्रदेशात होते त्यामुळे लोकांमध्ये मिसळून जाण आणि गर्दीचा भाग होणं अतिशय गरजेचं होतं. त्यासाठी त्यांनी पठाणी सूट सुद्धा शिवून घेतले.
रावळपिंडी जेल मधील एका सेल मधील भिंतीच्या मागच्या बाजूला असलेल्या तारा कापून त्यातून मुख्य रस्त्यावर येणं सोप्प असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पण प्रश्न होता त्या सेल मध्ये तिघांनी एकत्र राहायचं कसं? ह्यासाठी जिनिव्हा करारा प्रमाणे आपल्याला मिळालेल्या पैश्याची लाच त्यांनी तिकडे असलेल्या सैनिकांना देऊन आपली रवानगी त्या सेल मध्ये करून घेतली. आता सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे १८ इंच जाड असलेल्या भिंतीत भगदाड बनवणं आणि कोणालाही ह्याचा थांगपत्ता लागू न देता. कातर आणि काटा चमचा (फोर्क) चा वापर करत सुरु झाला एका सुटकेचा प्रवास. दोन विटांमधील सिमेंट ला ह्या तिघांपैकी एक पोखरून ह्या विटा सुट्या करायचा तर इतर दोघे पहारा द्यायचे. जमा झालेल सिमेंट जेलच्या मातीत शिताफीतीने असं मिसळून द्यायचं की कोणाला काहीच लक्षात येऊ नये. एकेक विट मोकळी करत ह्या तिघांनी पळता येईल इतकं भगदाड त्या १८ इंच जाड भिंतीत तयार केलं होतं. आता फक्त वाट बघायची होती योग्य वेळेची.
१३ ऑगस्ट १९७२ ची रात्र तशी नेहमीसारखी नव्हती. पाकिस्तान च्या आकाशात वादळ घोंगावत होतं. विजेचा कडकडाट चालू होता. पाकिस्तान चे सैनिक उद्या साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र दिवसाच्या मस्तीत होते पण तीन भारतीय एका वेगळ्याच योजनेला मूर्त स्वरूप देतं होते. विजेच्या आवाजात त्यांनी भिंतीला भगदाड पाडून बाहेरच्या कुंपणावरून मुख्य रस्त्यावर प्रवेश केला. कोणाला काही कळायच्या आत ते ३ भारतीय सैनिक पाकिस्तानी नागरिकात मिसळून गेले होते. खैबर खिंडीत ट्रेक साठी जातो आहे असं सांगत ह्या तिघांनी पेशावर च्या बस मध्ये आपला प्रवास सुरु केला. पेशावर इकडून मग त्यांनी पायी खैबर खिंडीतून अफगाणिस्तान च्या दिशेने आपली पावलं टाकायला सुरवात केली. जमृद इकडे पोचल्यावर त्यांनी लंडी खाना ह्या पाकिस्तान अफगाणिस्तान सिमारेषेवरील रेल्वे स्टेशन ला जाण्यासाठी चौकशी केली. त्यांच्या माहितीप्रमाणे हे स्टेशन ओलांडल्यावर त्यांनी अफगाणिस्तानात प्रवेश केला असता.
त्यांच वर्तन आणि चौकशी संशयास्पद वाटल्याने तिथल्या लोकांनी त्यांना पकडून तहसीलदाराच्या स्वाधीन केलं. ज्या स्टेशन ची ते चौकशी करत होते ते १९३२ मधेच बंद झालं होतं त्याची काहीच माहिती कोणाला नव्हती. जेव्हा ते पकडले गेले तेव्हा पाकिस्तान - अफगाणिस्तान सिमेपासून फक्त ८ किलोमीटर अंतरावर होते. तहसीलदार आपल्याला मारणार असं लक्षात आल्यावर पुन्हा एकदा फ्लाईट लेफ्टनंट दिलीप परुळेकर ह्यांनी शक्कल लढवत एक फोन करण्याची विनंती केली. त्यांनी सरळ फोन पाकिस्तानी जेल चा कमांडर अमीन ला फोन केला. इकडे त्यांच्या यशस्वी पलायना नंतर अमीन ला आपली खुर्ची गमवावी लागली होती. पण अमीन ने तहसीलदाराला ते आपले कैदी असल्याचं सांगत त्यांना हात न लावण्याचा आदेश दिला. पुन्हा ह्या तिघांची रवानगी जेल मध्ये करण्यात आली.
१ डिसेंबर १९७२ ला पाकिस्तान ने भारतीय सैनिकांची मुक्तता केली. वाघा सिमेजवळ ह्या सैनिकांचं हिरो म्हणून स्वागत करण्यात आलं. पण म्हणतात तसं नको त्या लोकांना हिरो म्हणून लक्षात ठेवणारे भारतीय काळाच्या ओघात ह्या भारतीय सैनिकांचा पराक्रम विसरून गेले. फ्लाईट लेफ्टनंट दिलीप परुळेकर ह्यांनी आपली सेवा पूर्ण झाल्यावर पुण्यात राहण्याचा निर्णय घेतला. आज जवळपास ४०-४५ वर्षाचा काळ लोटल्यावर त्यांची कथा एका चित्रपटाद्वारे भारतीयांसमोर
आली. पण खान कंपनीचा उदो करणाऱ्या आणि तैमूर ला शिंक आली ह्याची बातमी देणाऱ्या मिडीयाला अश्या चित्रपटाची दखल घेण्यात कुठे वेळ असणार? हे सर्वश्रुत होतं. फ्लाईट लेफ्टनंट दिलीप परुळेकर ह्यांचा पराक्रम हा शब्दांपलीकडचा आहे. ते ८ किलोमीटर जर त्यांनी पार केलं असतं तर आज इतिहास वेगळा असता फ्लाईट लेफ्टनंट दिलीप परुळेकर, फ्लाईट लेफ्टनंट एम.एस. गरेवाल आणि फ्लाईट लेफ्टनंट हरीश सिंजी ह्या तिघांना माझा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार.
जय हिंद!!!...
फोटो स्रोत :- गुगल
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
A great salute.......
ReplyDeleteAwesome story.
ReplyDeleteReally great.!!!!
ReplyDeleteAnybody has their contact numbers.?