Sunday 26 April 2020

हिंदू मंदिरे शोधणाऱ्या एका मुस्लिम संशोधकाची गोष्ट... विनीत वर्तक ©

हिंदू मंदिरे शोधणाऱ्या एका मुस्लिम संशोधकाची गोष्ट... विनीत वर्तक ©

१९७६ चा तो काळ होता. एक विशीमधला एक मुस्लिम तरुण डॉक्टर बी. बी. बाल ह्या पुरातत्वशास्त्रज्ञांच्या नेतृत्ताखाली विवादित अश्या बाबरी मशिदीच्या जागेवर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्या मार्फत संशोधन करत होता. तिकडे सर्वेक्षण करत असताना बाबरी मशिदीच्या आधीच्या गोष्टींच्या अवशेषांचे नमुने त्या तरुणाला आणि त्याच्या टीम ला मिळाले. ह्या अवशेषांचा अभ्यास करून त्या तरुणाने १९७६-७७ साली एक अहवाल मांडला होता. ज्यात असं स्पष्ट म्हंटल होतं की ह्या जागेवर आधी एक वेगळं मंदिर उभं होतं. पण त्या काळी डाव्या विचारसरणीच्या लोकांनी आणि डाव्या विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या वृत्तपत्रांनी त्या संशोधनाला मान्यता दिली नाही. त्या अहवालाला केराची टोपली दाखवली. देशाच्या आधी धर्म, जात विचारणाऱ्या देशात एका मुस्लिम पुरातत्वशास्त्रज्ञाने बाबरी मशिदीच्या जागेवर हिंदू मंदिराचा केलेला दावा फेटाळण्यात आला.

तरीही हा पुरातत्वशास्त्रज्ञ मागे हटला नाही. त्याने नेटाने आपलं संशोधन देशासाठी सुरु ठेवलं. २००५ साली त्याच पुरातत्वशास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याने एका वेगळ्या उपक्रमाचा श्रीगणेशा केला. हा उपक्रमात काम करणाऱ्या सगळयांना जिवाचा धोका होता. कारण ज्या भागात काम करायचं होतं तो सगळा भाग भारतात डाकूंचं साम्राज्य असणारा असा होता. त्या भागात नुसतं जाणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण पण तरीही ह्या शास्त्रज्ञाने हार मानली नाही. ह्या भागात काम करण्यासाठी त्याने चक्क ह्या भागातील डाकूंच्या सरदाराची भेट घेतली. एक मुस्लिम पुरातत्वशास्त्रज्ञ एका हिंदू डाकूला भेट देऊन त्याच्या पूर्वजांच्या ठेव्याला पुन्हा त्याच सौंदर्याने उभं करण्यासाठी मदत मागतो हे कुठेतरी वेगळं होतं. डाकूंच्या सरदाराने त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवताना त्यांना काम करायला परवानगी दिली. जेव्हा कामाला सुरवात केली तेव्हा समोर अस्ताव्यस्त पडलेल्या दगड, मुर्त्या, दगडाचे खांब ह्यांचा ढीग होता. ह्यातील प्रत्येक गोष्टीला वेगळं काढत, प्रत्येक दगडाच्या कोड्याला संशोधनाने सोडवत ह्या पुरातत्वशास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली ६० जणांच्या टीम ने एक, दोन नाही तर तब्बल २०० मंदिरांना पुन्हा एकदा उभं करताना त्या मंदिरांना त्याचं १२०० वर्षपूर्वी च वैभव पुन्हा प्राप्त करून दिलं. आज बटेश्वर, मध्य प्रदेश इकडे असलेल्या २०० मंदिरांचं सौंदर्य बघताना आपण स्तब्ध होतो. ह्या मंदिरांना तसेच ४३ वर्षापूर्वी बाबरी मशिदीच्या जागेवर हिंदू मंदिर असण्याचा अहवाल देणारे ते पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणजेच 'के. के. मोहम्मद'. 

९ नोव्हेंबर २०१९ ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनेक वर्ष प्रलंबित आणि भारतातील करोडो हिंदू धर्मियांसाठी आस्थेचा प्रश्न असणाऱ्या रामजन्मभूमी खटल्यात निर्णय देताना के. के. मोहम्मद तसेच इतर पुरातत्व शास्त्रज्ञानी  केलेल्या संशोधनाला आपल्या निर्णयामागे आधार मानलं होतं. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने केलेल्या संशोधनात बाबरी मशिदीच्या खाली मगर प्रणाला (अभषेकानंतर पाणी, तेल, दूध बाहेर जाण्याचा मार्ग ) तसेच २५३ भांडी, साप, प्राणी ह्यांचे रेखीव काम तसेच विष्णू हरी शिळा तसेच इतर हिंदू मंदिरांशी संदर्भ असणाऱ्या गोष्टी सापडलेल्या होत्या. ह्या गोष्टी कोणत्याही मुस्लिम मशिदीत आढळून येत नाही. ह्याच संशोधनाला ह्या विवादावर तोडगा काढण्यासाठी निर्णायक मानलं गेलं. ह्या सगळ्या संशोधनात के. के. मोहम्मद ह्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी उघडपणे हिंदू मंदिराची बाजू घेतल्याने अनेक मुस्लिम लोक आणि त्यांच्या समाजातील लोकं नाराज ही झाले. पण विज्ञान सत्य सांगते आणि सत्यावर विश्वास असल्याने ते आपल्या संशोधनावर कायम राहिले. कोण जिंकलं कोण हरलं ह्यापेक्षा भारत जिंकला हे त्यांच्यासाठी सगळ्यात जास्ती महत्वाचं होतं. त्यांच्या मते,

We must strive for united India rather than fight about it’

We (Hindus and Muslims) have been fighting often. We want India to become a great country. That was the underlying principle behind me coming out in the open to tell the truth,”

भारतात मुस्लिम शासकांनी अनेक हिंदू देवळांची आणि संस्कृतीची नासधूस केली ह्यावर सांगताना के.के. मोहम्मदांनी साकी मुस्ताद खान ह्यांनी लिहलेल्या मासिरी- इ- आलमगीरी ह्या त्याकाळातल्या पुस्तकाचा दाखला देताना म्हंटल की राजस्थानात औरंगजेब जाताना एका फटक्यात त्याने १७५ देवळं नष्ट केली होती. हे झालं फक्त औरंगजेबाच्या एका यात्रेत बाकी अफगाणिस्तान मधून आलेल्या मोहम्मद घोरी सारख्या शासकांनी भारतात किती देवळं नष्ट केली ह्याची मोजदाद नाहीच. त्यांनी भारताच्या सोनेरी इतिहासाला समोर आणण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी भारत सरकारने २०१९ साली पद्मश्री सन्मानाने त्यांचा गौरव केलेला आहे.

भारत हा देश म्हणून सगळ्यात पुढे आहे म्हणताना मी कोणत्या धर्माचा ह्यापेक्षा जे सत्य आहे ते मी जगासमोर मांडलं. आपल्या संशोधक वृत्तीने भारताच्या शेकडो वर्षांच्या संस्कृतीला, सार्वभौमत्वाला के. के. मोहम्मद ह्यांनी जगापुढे आणलं. आपल्याच धर्मातील होणाऱ्या विरोधाला न जुमानता सत्याची बाजू घेत भारताच्या सगळ्यात मोठ्या न्यायालयीन लढाईत माननीय न्यायालयासमोर निष्पक्ष भुमीका ठेवणाऱ्या के. के. मोहम्मद ह्यांना माझा सॅल्यूट. आपण हिंदू का मुस्लिम? ह्या पेक्षा आपण पहिल्यांदा भारतीय आहोत हे आपल्या व्यक्तिमत्त्वातून, कर्तृत्वातून दाखवून देणाऱ्या के. के. मोहम्मद ह्यांनी हिंदू- मुस्लिम सौख्याच एक जिवंत उदाहरण आपल्यासमोर ठेवलं आहे. धर्म जिंकत किंवा हरत नसतो, जिंकतो किंवा हरतो तो देश. सर तुमच्यासारख्या शास्त्रज्ञांचा एक भारतीय म्हणून खूप खूप अभिमान आहे. तुमच्या पुढल्या कार्यास शुभेच्छा आणि तुमचं व्यक्तिमत्व हिंदू- मुस्लिम सलोखा राखण्यात एक निर्णायक भूमिका निभावेल ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही.

जय हिंद!!!

ता. क. :- ह्या पोस्ट मधील गोष्टी ह्या के. के. मोहम्मद ह्यांच्या कार्याशी निगडित आहे. ह्या गोष्टींचा संदर्भ कोणत्याही धार्मिक विचारांशी जोडू नये तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर चर्चा अथवा त्यावर मत प्रकट करण्याचा कोणताही उद्देश ह्या पोस्ट चा नाही. ह्या पोस्टचा संदर्भ कोणत्याही राजकीय लढाईतील विचारांशी तसेच कोणत्याही प्रकारे राजकीय क्षेत्राशी जोडू नये. ह्या पोस्ट चा उद्देश फक्त आणि फक्त भारत देशाशी निगडित आहे. 

माहिती स्रोत :- रेडीफ ला दिलेल्या मुलाखतीतील सारांश, विकिपिडिया, टाइम्स ऑफ इंडिया

फोटो स्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


1 comment:

  1. खूप छान कार्य खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष कार्य हिच आपल्या भारताची ओळख

    ReplyDelete