Thursday 2 April 2020

एक छोटीसी लव्ह स्टोरी... विनीत वर्तक ©


एक छोटीसी लव्ह स्टोरी... विनीत वर्तक ©


अंतर कधीच खऱ्या प्रेमाच्या आड येत नाही. जेव्हा आपण कोणाला मनापासून आपलं मानतो तेव्हा त्याच कुठेतरी असणं सुद्धा आपल्याला सुखावणारं असते. कधी व्यक्त तर कधी अव्यक्त प्रेमाच्या ह्या भावना जपून ठेवायला लागत नाहीत त्या चिरकाळ तश्याच आपल्या मनात टिकून राहतात. आयुष्याच्या एखाद्या वळणावर भेटलेली ती किंवा तो आपल्या मनात कधी घर करून जातो आपल्याला पण कळत नाही. आयुष्य सुरु रहाते. आयुष्यात घटना घडत जातात. आयुष्याचे संदर्भ बदलून जातात पण त्या आठवणी आणि ते क्षण अगदी मोरपिसासारखे मनाच्या एका कोपऱ्यात जपून राहतात. त्या एका क्षणाला मनाला जाणवलेल्या भावना जर आपल्याच मनात बंदिस्त असतील तर कधी तरी त्या व्यक्तीसमोर व्यक्त करण्याची संधी आयुष्याच्या प्रवासात एकदा तरी मिळावी असं वाटते. पण ती संधी जर ६२ वर्षानंतर आली आणि तेव्हा ही आपल्याला त्या व्यक्तीबद्दल तेच वाटलं तर म्हणतात ना,

जो दूरियों में भी, कायम रहा;
वो इश्क ही, कुछ और था!...

होवार्ड अट्टेबेरी आणि सिंथिया रिग्स ह्यांची एक छोटीसी लव्ह स्टोरी अशीच खूप मोठी आहे. १९५० चा काळ होता. १८ वर्षाची  सिंथिया कॉलेज मध्ये शिकता शिकता मरीन जिऑलॉजी, कॅलिफोर्निया इकडे उन्हाळाच्या सुट्टीत जॉब करत होती. तिकडे काम करणाऱ्या २८ वर्षाच्या होवार्ड सोबत तिची मैत्री झाली. तिकडे असणाऱ्या सर्व मुलांमध्ये होवार्ड वेगळाच होता. सिंथिया ला त्रास देणाऱ्या, चिडवणाऱ्या सगळ्या मुलांमध्ये वेगळा असणारा होवार्ड तिची काळजी घ्यायचा. त्याच्या ह्या वेगळ्या व्यक्तिमत्वाने तिला प्रभावित केलं. दोघांमध्ये चांगली ओळख झाली. वेळ मिळेल तेव्हा दोघेही आपल्या आवडी निवडी विषयी एकमकांशी बोलत असतं. त्यांच हे छान फुलणार नात्याला कोणाची नजर लागू नये म्हणून सिंथिया आणि होवार्ड एकमेकांशी सांकेतिक भाषेत बोलत असत. आपल्या मायक्रोस्कोप च्या बाजूला असलेल्या टिश्यू पेपरवर सिंथिया सांकेतिक भाषेत होवार्ड ला लिहत असे. सिंथिया ही भाषा दुसऱ्या महायुद्धात आपल्या वडिलांकडून शिकली होती. तिने ती भाषा होवार्ड ला शिकवली आणि कोणाला  कळणाऱ्या भाषेत दोघांचा संवाद सुरु झाला. पण जशी सुट्टी संपली तशी दोघे आपापल्या दिशेने निघाले.

आयुष्याची चाक आणि काळ पुढे जात राहिला. सिंथिया एकीकडे विज्ञानाची पत्रकार, लेखक आणि पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर पाय ठेवणारी जगातली  वी महिला ठरली. सिंथिया पत्रकारिकेतून रहस्य कथा लेखनाकडे वळली आणि तिची जवळपास  पुस्तके प्रकाशित झाली. तर तिकडे होवार्ड एक डेंटिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, फोटोग्राफर झाला. सिंथिया चं लग्न होऊन तिला  मुलं झाली. एका दशका आधीच तिचा घटस्फोट होऊन ती आपलं लिखाण करत होती. इकडे होवार्ड ने दोन लग्न केली. त्याच्या पहिल्या बायकोचा घटस्फोट झाला तर दुसरी चं निधन झालं. होवार्ड ला ही तीन मुलं होती. काळाच्या ह्या चक्रात जवळपास ६२ वर्षाचा कालावधी निघून गेला होता. ६२ वर्षानंतर एक दिवस सिंथिया च्या दारावर एक पार्सल आलं. त्या पार्सल मध्ये पिवळे झालेले टिश्यू पेपर होते. त्या टिश्यू पेपरवर सांकेतिक भाषेत पेन्सिल ने काहीतरी लिहलेलं होतं. सिंथियाचं मन एका क्षणात ६२ वर्ष मागे गेलं. हे तेच टिश्यू पेपर होते जे तिने होवार्ड ला लिहलेले होते. त्या सगळ्या टिश्यू पेपर सोबत हे बॉक्स जिकडून आलं त्याचे अक्षांश आणि रेखांश लिहलेले होते आणि एक नव्याने लिहलेला सांकेतिक भाषेतील एक संदेश ही होता. त्यात लिहीलं होतं,

"मी तुझ्यावर आजतागायत प्रेम करतो आहे."

जेव्हा सिंथिया ला पहिल्यांदा होवार्ड ने पहिल्यांदा बघितलं तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला होता. लहानपणी वडील गेल्यावर त्याच आयुष्य शांत असं होतं. पण सिंथिया ला बघितल्यावर, तिच्याशी बोलल्यावर त्याच्या आयुष्यात तिच्या असण्याने वेगळेच रंग भरले. तिने त्याच्या मनात घर केलं ते कायमचं. सिंथियाशी त्या काळात बोलताना त्याला कळलं होतं की तिच्या आयुष्यात आधीच कोणीतरी आहे. त्याला आपल्या भावना मोकळ्या करून तिच्या आयुष्यात गोंधळ त्याला निर्माण करायचा नव्हता. पण तिला सोडायला जाताना त्याला जाणवलं की ती गेल्यावर ही त्याच्या सोबतच होती. ती शरीराने नसली तरी तिचं अस्तित्व त्याला पदोपदी जाणवत होतं. आयुष्य संपायच्या अगोदर एकदा तरी त्याला आपल्या भावना तिच्या पर्यंत पोचवायच्या होत्या. तो आता ९१ वर्षाचा होता तर ती ८१ वर्षाची पण ते अव्यक्त प्रेम तसच होतं त्याला ६२ वर्षापूर्वी जाणवलेलं.

त्या दोघांनी आता पत्राचा सिलसिला सुरु केला. आपल्या घराचे, कुटुंबाचे फोटो शेअर केले. आपला स्वतःचा फोटो पाठवताना सिंथिया ने त्याला सांगितलं की. 'मी आता ८१ वर्षाची आहे. माझं शरीर, रंग, रूप आता त्या १८ वर्षाच्या सिंथिया सारखं नाही. जिच्यावर तुझं प्रेम होतं." ह्यावर होवार्ड ने तिचा फोटो बघून तिला  सांगितलं, 'तु  आजही तितकीच सुंदर आहेस जशी तू ६२ वर्षापूर्वी होतीस. तुझ्या सौंदर्यावर आजही मी तितकचं प्रेम करतो.' 

९१ वर्षाच्या होवार्ड ला शरीर साथ देत नसल्यामुळे सिंथियाला भेटायला जाता येतं नव्हतं. सिंथिया त्याला भेटण्यासाठी मे २०१२ मध्ये त्याच्या इकडे आली. ट्रेन स्टेशन वर दोघे एकमेकांना ६२ वर्षांनी भेटले. लाल गुलाब हातात घेऊन त्याने तिला मिठी मारली आणि किस केलं. त्यांच्या सांकेतिक भाषेत तिच्यासाठी गाणं म्हंटल  तिला लग्नाची मागणी घातली. तिने लगेच हो म्हंटल. तब्बल ६२ वर्षांनी दोघांनी एकमेकांच्या भावनांचा स्विकार केला. मे २०१३ मध्ये ते दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. मधुचंद्राला गेले. व्हॅलेंटाईन डे ला त्याने तिच्या ड्रॉवर मध्ये खूप सारे बदाम ठेवले होते. अगदी प्रत्येक दिवस त्याने आपल्या प्रेमाचा वर्षाव  तिच्यावर केला वाढणार वय पण त्यांच प्रेम थांबवू शकलं नाही. त्या दोघांनाही चांगलं माहित होतं की आपल्या हातात दिवस कमी आहेत. म्हणून येणारा प्रत्येक दिवस त्यांनी प्रत्येक वर्षासारखा जगला. फेब्रुवारी २०१७ ला वयाच्या ९४ वर्षी होवार्ड ने जगाचा निरोप घेतला पण होवार्ड आणि सिंथिया च्या प्रेमाची एक छोटीसी लव्ह स्टोरी मात्र ह्या जगात अजरामर झाली.

फोटो स्रोत :- गुगल 

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment