भारताच्या एडीसन ची गोष्ट... विनीत वर्तक ©
२९ एप्रिल १८६७ ह्या दिवशी म्हणजेच आजपासून जवळपास १५३ वर्षापूर्वी त्या काळाच्या बॉम्बे, ब्रिटिश इंडिया (आजच्या मुंबईत) एका मुलाचा जन्म झाला. जात्याच तो मुलगा खूप हुशार होता. लहानपणापासून त्याला काहीतरी नवीन शोधण्याचं वेड लागलं. तो काळ ब्रिटिश राजवटीचा होता. भारतासारख्या मागासलेल्या देशात इंग्रजांनी कारकून तयार करण्याची पद्धत अवलंबिली होती. त्यामुळे भारतातून कोणी संशोधक तयार होतील अशी अपेक्षा न ब्रिटिशांना होती न भारतीयांना (खेदाची गोष्ट अशी की आज १५० वर्षानंतर ही आपण कारकून बनण्याचं शिक्षण देतो आहोत आणि १००% मिळवणारे कारकून घडवत आहोत.) पण तरीही तो मुलगा मात्र काहीतरी वेगळं करण्याची आपली स्वप्न जगत होता. ह्या मुलाने त्या काळात मुंबईमध्ये आपल्याच सारख्याच संशोधनाची आवड असणाऱ्या लोकांचा एक गट स्थापन केला. ब्रिटिशांसाठी असणाऱ्या स्पर्धेत भाग घेऊन सातासमुद्रापार जाण्याचं आपलं स्वप्न त्याने पूर्ण केलं. तिकडे जाऊन आपल्या वेगळ्याच संशोधनाने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक त्याने जगाला दाखवली आणि जगाने त्यांचं नामकरण 'भारताचा एडीसन' असं केलं. ह्या संशोधकाने आपल्या हयातीत २०० पेक्षा जास्त शोध लावले त्यापेकी ४० शोधांचं पेटंट ( स्वामित्व हक्क ) त्यांच्याकडे होते. नेहमीप्रमाणे ज्याला जगाने भारताचा एडीसन म्हंटल त्याला आपलेच भारतीय विसरून गेले. पूर्ण जगात भारताचे झेंडे अटकेपार रोवणारे ते भारतीय एडीसन आणि मराठी संशोधक म्हणजेच 'शंकर आबाजी भिसे'.
लहानपणीच त्यांना अमेरीकेहुन येणारी मासिक वाचायचं वेड लागलं. ह्या सगळ्या मासिकात अमेरीकेत चालू असणाऱ्या तांत्रिक प्रगतीचा परामर्श घेतला जात असे. ह्या मासिकातील माहिती वाचून त्यांनी मुंबई मधेच आपलं संशोधन करायला आणि लहान कामासाठी उपयोगी पडणारी यंत्र बनवायला सुरवात केली. अश्या बॉटल्स ज्यांच्यात छेडछाड करता येणार नाही. ह्याशिवाय इलेक्ट्रीक वर चालणाऱ्या सायकल चे गिअर, तसेच मुंबई च्या लोकल ट्रेन साठी स्टेशन इंडीकेटर अश्या वेगेवेगळ्या गोष्टी शंकर आबाजी भिसे ह्यांनी वयाच्या २० वर्षापर्यंत तयार केल्या होत्या. त्यांना आपलं संशोधन पुढे सुरु ठेवायला पैश्याची गरज होती त्यासाठी त्यांना लंडन ला आपलं संशोधन न्यायचं होतं. अशी एक संधी त्यांना १८९० साली चालून आली. संशोधना संबंधित असणाऱ्या एका नियतकालिकाने एक स्पर्धा आयोजित केली होती. सामानाचे वजन मोजण्याचं यंत्र बनवण्याची ती स्पर्धा होती. सर्व ब्रिटिश संशोधकांना मागे टाकत शंकर आबाजी भिसे ह्यांनी तयार केलेल्या मॉडेल ने स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकल्याने त्यांना युरोपचे दरवाजे खुले झाले.
शंकर आबाजी भिसे लंडन ला आले ते दिनशा वाचा ह्यांचं पत्र सोबत घेऊन. त्यांनी ते पत्र लंडन मध्ये त्याकाळी औद्योगिक क्षेत्रात मोठं नावं कमावलेल्या दादाभाई नौरोजी ह्यांना दिलं. पत्र वाचल्यावर दादाभाई नौरोजींना शंकर आबाजी भिसेंच्या अंगी असलेली चुणूक लक्षात आली होती. त्यांनी लगेच भिसेंना आपल्यासोबत घेऊन त्यांना संशोधन करायला सांगितलं. भारताच्या एडीसन चा प्रवास इकडून सुरु झाला. भिसेंनी इलेक्ट्रॉनिक साइन बोर्ड तयार केले जे युरोपात लगेच लोकप्रिय झाले. त्यांनी स्वयंपाक घरासाठी वेगवेगळी यंत्रे बनवली. दुखणार डोकं थांबवणारे यंत्र बनवलं होतं. अपोआप फ्लश होणारं टॉयलेट ते अगदी पुश अप ब्रा सारखे अविष्कार त्यांनी केले. पण भिसेंचा सगळ्यात मोठा अविष्कार ठरला 'भिसोटाइप'. प्रिंटिंग तंत्रज्ञानाला एका वेगळ्या पातळीवर नेणारा हा अविष्कार होता. जेव्हा प्रिंटिंग मध्ये काही शे अक्षर प्रिंट करायला जगातले शास्त्रज्ञ धडपडत होते त्याकाळी भिसेंनी एका मिनिटात १२०० अक्षर प्रिंट करणारं यंत्र तयार केलं. त्यांच्या ह्या संशोधनाला आजही प्रिंटिंग क्षेत्रात एक मैलाचा दगड मानण्यात येते. पण आपल्या संशोधनाला बिझनेस मॉडेल मध्ये परावर्तीत करण्यात ते कुठेतरी कमी पडले. काळाच्या ओघात त्यांच्या संशोधनाला पैसा पुरवणारा उद्योजक उरला नाही. नाईलाजाने त्यांना पुन्हा एकदा भारताची वाट पकडावी लागली.
भारतात परत येताना त्यांची गाठ गोपाळ कृष्ण गोखल्यांशी झाली. त्यांना भिसेंनी आपलं संशोधन दाखवलं. त्यांच्या संशोधनाने प्रभावित झालेल्या गोखल्यांनी त्यांची ओळख रतनजी टाटा ह्यांच्याशी करून दिली. ( आत्ताचे टाटा समूहाचे रतन टाटा नाहीत.) भिसे आणि टाटांनी एकत्र येऊन काम करायचं ठरवलं पण ती बोलणी मधेच फिस्कटली. पण ह्या भागिदारीने भिसे ह्यांना अमेरीकेचे दरवाजे उघडे झाले. त्यांनी सरळ अमेरीका गाठली. तिकडे आपलं संशोधन करायला सुरवात केली. अमेरीकेत शंकर आबाजी भिसे हे नावं प्रसिद्ध झालं ते त्यांनी लावलेल्या आयोडीन उपायामुळे. हे उपाय केल्याने माणसाची मानसिक शक्ती वाढते असा दावा त्यांनी केला. ह्या दाव्याला त्या काळचा अमेरीकेचा प्रसिद्ध गूढ आणि मानसिक तत्ववेत्ता एडगर कायसे ने उघड पाठिंबा दिला. पण ह्या सगळ्यात भिसेंच लक्ष संशोधनकडून जादूटोणा आणि गूढ गोष्टींकडे वळलं ज्याने त्यांच्या प्रतिमेला तडा गेला. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात त्यांनी स्पिरीट टाईपरायटर यंत्र बनवलं पण तोवर त्यांची तब्येत खालावली होती. भारताचा एडीसन १९३५ ला इतिहासाच्या पानात लुप्त झाला.
आजही मोठ्या अभिमानाने एडीसन ची गोष्ट सांगणारे अनेक भारतीय आपल्याच एडीसन ला विसरून गेले आहेत. शंकर आबाजी भिसे ह्यांचं संशोधन आणि कार्य इतिहासाच्या त्या काळात लुप्त झालं. आजही अनेक भारतीयांना हे नाव अपरीचीत आहे. एडीसन भारताचा असला किंवा अमेरीकेचा तो प्रसिद्ध झाला आपल्या अंगभूत वेगळा विचार करण्याच्या शैलीमुळे. जिकडे शाळेत मुलांना कारकून बनवण्यासाठी जुंपलं जाते. जिकडे १००% मिळवणे म्हणजे हुशारी असते तिकडे असे एडीसन पुन्हा तयार होण्याची शक्यता दुर्मिळच असते. भारताच्या त्या काळात आपल्या स्वतःच्या संशोधनाने भारताच नाव मोठं करणाऱ्या भारताचे एडीसन 'शंकर आबाजी भिसे' ह्यांच्या स्मृतीला माझा कडक सॅल्यूट. आज भारतीय तुम्हाला विसरले असतील तरी ह्या पोस्ट च्या निमित्ताने तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुमची आठवण नक्की काढतील अशी माझी अपेक्षा आहे. पुन्हा एकदा तुमच्या स्मृतीस माझं वंदन.
जय हिंद!!!
माहिती स्रोत :- बी.बी.सी., गुगल, विकिपिडीया
फोटो स्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment