Tuesday, 31 August 2021

(Nothing Is Impossible) काहीच अशक्य नाही... विनीत वर्तक

(Nothing Is Impossible) काहीच अशक्य नाही... विनीत वर्तक ©

आयुष्यात अश्या काही घटना घडतात की आपलं संपूर्ण आयुष्य त्या वादळांच्या तडाख्यामुळे कोलमडून जाते. अनेकांसाठी ही वादळं नोकरी, व्यवसाय, शिक्षण, पैसा, पद- प्रतिष्ठा, मान- सन्मान अश्या भौतिक घटनांशी निगडित असतात. अश्या छोट्या वादळांच्या तडाख्यामुळे निराश होऊन अनेकदा व्यक्ती आपलं आयुष्य संपूर्ण संपवतात अथवा तसं करण्याचा प्रयत्न करतात. पण खरच या भौतिक गोष्टी इतक्या महत्वाच्या असतात?. आयुष्यात काही वादळं अशी येतात की सगळं होत्याचं नव्हतं करतात. जेव्हा जगाला वाटत असते की संपलं सगळं तेव्हाच काही व्यक्ती त्या अपयशातून असं काही करून दाखवतात की संपूर्ण जगाला त्याची दखल घ्यावी लागते. 

असं म्हणतात जिंकणं किंवा हरणं हा खेळाचा एक भाग आहे. महत्वाचा आहे की तुम्ही खेळणं. टोकियो मधे सुरु असलेल्या पॅराऑलम्पिक स्पर्धेमधील प्रत्येक स्पर्धक आयुष्यातील अश्या एका वादळाला सामोरं गेलं आहे ज्याने त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्याची दिशा बदलवून टाकली. त्या संकटातून, अपयशातून हे सर्व खेळाडू पुन्हा उभे राहिले आहेत. प्रत्येकाने आपल्या परीने जगाला दाखवून दिलेलं आहे की (Nothing Is Impossible) "काहीच अशक्य नाही"...    

या सर्व खेळाडूंमधे असा एक खेळाडू आहे ज्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. तो म्हणजे इजिप्त चा 'इब्राहिम हमदतु'. १० वर्षाचा असताना एका ट्रेन च्या अपघातात इब्राहिम चे दोन्ही हात खांद्यापासून तुटले. आयुष्य सुरु होण्याआधीच त्याच्या आयुष्यात एक असं वादळ आलं ज्याने सर्व काही हिरावून नेलं होतं. दोन्ही हात नसताना जिकडे आयुष्य जगणं म्हणजेच एक शिवधनुष्य पेलणं तिकडे खेळ वगरे तर गोष्टी कोसो लांब होत्या. व्यंगत्व आलेल्या व्यक्तीला समाजाकडून ज्या पद्धतीची वागणूक दिली जाते त्याचा अनुभव इब्राहिम ला पण आला. पण म्हणतात न, काही लोक वेगळ्या मातीचे बनलेले असतात. एकीकडे व्यंगत्व म्हणून टोचणारे शब्द जिकडे आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतात तिकडेच त्यात शब्दात आयुष्य बदलण्याची पण शक्ती असते. 

इब्राहिम आपल्या मित्रांसोबत एका क्लब मधे टेबल टेनिस च्या मॅच मधे अंपायर ची भूमिका बजावत होता. एका गुणांवरून त्याच्या टेबल टेनिस खेळणाऱ्या दोन मित्रांमध्ये शाब्दिक वाद झाले. साहजिक अंपायर च्या भूमिकेत असलेल्या इब्राहिम ने आपली भूमिका बजावताना योग्य रीतीने मूल्यमापन करून त्या गुणाचं माप एका मित्राच्या बाजूने दिलं. चिडलेल्या दुसऱ्या मित्राने त्याला स्पष्ट सांगितलं की, 'तू आमच्या मधे मध्यस्ती करू नकोस. जो खेळ तू खेळू शकत नाही त्यावर बोलण्याचा तुला अधिकार नाही'. हे शब्द इब्राहिम च्या मनात खोलवर रुतले. आपल्या व्यंगत्वावर केलेली बोचरी टीका त्याला अस्वस्थ करून गेली. दुसरं कोणी त्याच्या जागेवर असतं तर त्याला वाईट वाटलं असतं त्याने आपल्या नशिबाला कोसलं असतं, कोणालातरी दोष दिला असता. पण इब्राहिम वेगळ्या मातीचा होता त्याने ठरवलं की ज्या खेळावरून मला हे ऐकावं लागलं तो खेळ मी खेळणार.टेबल टेनिस सारखा खेळ हा हाताशिवाय खेळता येत नाही. इब्राहिम ला फुटबॉल ची आवड होती आणि तो ते खेळत ही होता कारण फुटबॉल मधे हातांची गरज नसते. पण त्याला टोचलेले ते शब्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. दोन्ही हात नसताना टेबल टेनिस खेळणार कसं?  

इब्राहिम ने कोणत्याही परिस्थितीत टेबल टेनिस शिकण्याचा निश्चय केला. हात नाही म्हणून काय झालं? टेबल टेनिस ची रॅकेट तोंडात आणि त्याचा बॉल उजव्या पायाने पकडून त्याने टेबल टेनिस खेळण्याची अशी एक पद्धत शोधून काढली. तब्बल ३ वर्ष रोज ३-४ तास टेबल टेनिस खेळून त्याने खेळात अशी एक उंची गाठली की त्याने २०११ आणि २०१३ मधे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रोप्य पदक जिंकल. २०१६ च्या रीओ पॅराऑलम्पिक स्पर्धेत वयाच्या ४३ व्या वर्षी त्याने आपल्या देशाचा प्रतिनिधी म्हणून टेबल टेनिस कोर्टावर आपल्या जिद्दीचा नजराणा पेश केला आणि सर्व जग अवाक झालं. त्याने त्या स्पर्धेत ११ वा क्रमांक पटकावला तर टीम स्पर्धेत त्याने ९ स्थान पटकावलं. टोकियो पॅराऑलम्पिक स्पर्धेत त्याने वयाच्या ४८ व्या वर्षी भाग घेतला आणि पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं की, 

 (Nothing Is Impossible) काहीच अशक्य नाही..... 

संपूर्ण जग ज्याच्या खेळाचं कौतुक करते असा जगातील क्रमांक १ चा टेनिस खेळाडू नोव्हाक जोकोविच हा इब्राहिम च्या खेळाने इतका प्रभावित झाला आणि त्याने ट्विट केलं,  

“Amazing… I am in awe of this @ibrahim_hamadto.” 

आयुष्यात अपयश, टीका सगळ्यांच्या वाटेला येते. नशिबाचे फेरे सगळ्यांचे फिरतात पण आपल्या हातात असते की त्यातून आपण स्वतःला कसं सावरतो. निराशेच्या त्या खोल गर्तेत जातो की फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून पुन्हा उडी घेतो आणि अशी उंची गाठतो की जिकडे संपूर्ण जग अवाक होऊन बघत रहाते. असं म्हणतात की, 

ख़ुदी को कर बुलंद इतना कि हर तक़दीर से पहले,  ख़ुदा बंदे से ख़ुद पूछे बता तेरी रज़ा क्या है.....

इब्राहिम हमदतु टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत पराभवाला सामोरा गेला असेल पण त्याने सर्व जगातील लोकांची मन जिंकली आहेत. कित्येक लोकांना अपयशाचा सामना करण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे. आपल्या खिलाडूवृत्ती ने त्याने पॅराऑलम्पिक सारख्या जागतिक स्पर्धेचा दर्जा उंचावला आहे. इब्राहिम हमदतुसाठी तिकडे जिंकणं किंवा हरणं महत्वाचं नाही. तिकडे मी दोन्ही हात नसताना टेबल टेनिस खेळू शकतो हे दाखवणं महत्वाचं होतं. 

इब्राहिम हमदतु च्या आयुष्यात त्या क्लब मधे घडलेली घटना त्याचा कायापालट करणारी ठरली. अश्या छोट्याच घटनांमध्ये मनाला प्रज्वलित करण्याचं सामर्थ्य असते. पण ते दुधारी असते. एक रस्ता रसातळाला नेतो तर दुसरा उत्कर्षाकडे. संपूर्ण जगाला आणि मला स्वतःला प्रोत्साहन देणाऱ्या इब्राहिम हमदतु ला माझा कडक सॅल्यूट आणि त्याच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा... 

फोटो स्त्रोत :-  गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



Monday, 30 August 2021

एक लक्ष्यभेद... विनीत वर्तक ©

 एक लक्ष्यभेद... विनीत वर्तक ©

आजपासून ९ वर्षपूर्वी २०१२ साली एक कुटुंब जोधपूर, राजस्थान इकडे आपल्या कारमधून निघालं होतं. त्यात १० वर्षाची एक मुलगी जोधपूर ला आपण जातो आहोत म्हणून अतिशय आनंदात होती. तिच्या शाळेचा नृत्याचा एक कार्यक्रम होता ज्यात तिने भाग घेतला होता. लहानपणापासून संगीताच्या तालावर तिचे पाय थिरकत होते आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्या कुटुंबा समोर ते थिरकणार म्हणून ती खूप आनंदात होती. गाडीत तिचे आई, बाबा, भाऊ आणि चुलत भावंड ही होती. प्रवासात त्याच नृत्याची स्वप्न बघता बघता तिचा डोळा लागला. अचानक त्या स्वप्नातुन ती काहीतरी आदळण्याने अर्धवट जागी झाली. तिला काही कळेपर्यंत गाडी रस्त्यावरून २-३ वेळा उलटी पलटी होऊन बाजूच्या शेतात घुसली होती. ती भानावर आली तोवर त्या कोवळ्या मुलीला काय घडलं आहे याचा अंदाज येत नव्हता. तिच्या पाठीतून कळा येत होत्या. तिने पाय हलवण्याचा प्रयत्न केला पण ती हलवू शकली नाही. आपले संगीताच्या तालावर थिरकणारे पाय आज तिला सापडत नव्हते. हे एक वाईट स्वप्न आहे असा विचार ती करायला लागली. हॉस्पिटल मधे जाताना कदाचित काही वेळाने आपण स्वतः उठून उभं राहू असंच तिला वाटत होतं. 

दिवसांमागुन दिवस गेले, महिने गेले पण तिचे पाय कायमचे हरवले. सहा महिने हॉस्पिटल मधे राहिल्यानंतर तिला हॉस्पिटल मधून सुट्टी मिळाली पण ती आता स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नव्हती. एकेकाळी नाचण्याचे स्वप्न बघून जोधपूर ला जाणारी ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नव्हती हा धक्का तिच्यासाठी खूप मोठा होता. या घटनेने त्या १० वर्षाच्या चिमुरडीच्या आयुष्य संपूर्णपणे बदलून गेलं होतं. सगळ्यात रमणारी, हसणारी ती आता सर्वांपासून लांब झाली. गप्प राहयला लागली. तीच संपूर्ण विश्व कुठेतरी उध्वस्थ झालं होतं. तिच्या वडिलांनी तिला मित्र- मैत्रिणी बनवण्याचा सल्ला दिला. पुन्हा एकदा मोकळ्या आकाशाशी नातं जोडायला सांगितलं पण हे सगळं स्विकारणं तिच्यासाठी खूप कठीण गेलं. 

२०१५ साली ९ वी च्या सुट्टींमध्ये तिच्या वडिलांनी तीच मन बाहेरच्या जगात गुंतवण्यासाठी धनुर्विद्या या खेळाशी ओळख करून दिली. पण तिला हे शिवधनुष्य पेलणं जमलं नाही. मग त्यांनी तिला शूटिंग रेंज वर नेलं. तिची ओळख बंदुकीशी करून दिली. ती साधारण ५ किलो ची बंदूक उचलून १० मीटर वर निशाणा लावणं तिला जड गेलं पण तिने आयुष्यात पहिल्यांदा फायर केलेले १० च्या १० शॉट समोरच्या काळ्या वर्तुळात लागले होते. तिकडेच त्या मुलीला आपलं लक्ष्य सापडलं होतं. त्या लक्ष्याला तिने आजच्या ३० ऑगस्ट २०२१ या दिवशी वयाच्या फक्त १९ व्या वर्षी पॅराऑलम्पिक स्पर्धेत जागतिक विक्रमाशी बरोबरी करत सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू होण्याचा मान मिळवताना पूर्ण केलं आहे. ती आहे भारताची पॅरा नेमबाज 'अवनी लेखरा'. 

२०१२ साली झालेल्या घटनेने अवनी च संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. तिची ओळख अश्या एका आयुष्याशी झाली ज्याची कधी तिने कल्पना केली नव्हती. हे नवीन आयुष्य स्वीकारणं तिला खूप कठीण गेलं. अगदी बसण्यापासून ते रोजच्या रोज सगळी कार्य करताना तिला आयुष्याची परीक्षा द्यावी लागत होती. हे सोप्प नव्हतं. तिच्या मते आपण दिव्यांग झालो आहोत हे स्वीकारणं सगळ्यात मोठी गोष्ट होती. आपल्या बाजूचं जे जग बदललेलं आहे ते एकदा का स्वीकारलं की पुढचा प्रवास काय असणार आहे याची कल्पना येऊन त्यावर मार्गक्रमण करणं हा भाग सोपा होता. २०१५ ला शूटिंग रेंज वर नेमबाजी करणं एक टाईमपास म्हणून तिने स्वीकारलं होतं. पण तिचे वडील नेमबाजी या खेळासाठी गंभीर होते. त्यांनी तिला भारताचा ऑलम्पिक सुवर्ण पदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा च आत्मवृत्त आणून दिलं. ते वाचल्या नंतर अवनी च्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. ज्या पद्धतीने त्याने भारतासाठी पहिलं ऑलम्पिक मधलं सुवर्ण पदक जिंकलं तसा सन्मान मिळवण्याचं ध्येय तिने निश्चित केलं. 

आधी शाळेतून तर नंतर राज्य स्तरीय स्पर्धेतून तिने आपल्या नेमबाजीची झलक दाखवायला सुरवात केली. काही स्पर्धेत धडधाकट असणाऱ्या स्पर्धकांना मागे टाकत अवनी ने सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. बंदुकीची नेमबाजी हा खेळ तसा खर्चिक आहे. अवनी आत्तापर्यंत बंदुकी आणि लागणार साहित्य हे दुसऱ्याचं वापरत होती. शालेय किंवा राज्य स्तरीय ज्युनिअर पातळीवर त्याने काम भागत होतं पण ऑलम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी लागणाऱ्या  साहित्याचा खर्च महाग होता. २०२१ साली होणाऱ्या पॅराऑलम्पिक स्पर्धेसाठीच्या तयारीसाठी भारत सरकारच्या स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया ने Target Olympic Podium Scheme (TOPS) ची योजना काही वर्ष आधी आणली होती. अवनी ने भारत सरकारकडे मदत मागितली. त्या नंतर अवनीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं साहित्य या योजनेखाली उपलब्ध करून देण्यात आलं. पण ही सुरवात होती तिला अनेक अडथळ्यांवर मात करायची होती. तिच्या मते, 

“I believe it is harder for us because we have to have mental strength. When you are a para-athlete, people start judging you. To live with a disability is a victory in itself.”

दिव्यांग म्हणून समाजाची बघण्याची मानसिकता वेगळी झालेली असते. स्वतःच्या आयुष्याशी झगडणाऱ्या त्या खेळाडूला खेळाशिवाय या अडथळ्यांवर मात करून आपलं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध करायचं असते. आज अवनी लेखरा त्या सगळ्या अडथळ्यांवर मात करत लक्ष्यभेद करताना आपलं नाव खेळाच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरताना भारताची महिला ऑलम्पिक सुवर्ण पदक मिळवण्याचा मान पटकावला आहे. तिचा हा प्रवास राखेतून उडी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्यासारखा आहे. जो अनेक भारतीय खेळाडूंना तर प्रेरणादायक आहेच पण आयुष्यात छोट्या छोट्या अपयशांनी खचून जाणाऱ्या प्रत्येकाला अपयशावर कश्या रीतीने मात करता येऊ शकते हे दाखवणारा आहे. 

अवनी लेखरा च तिच्या उत्तुंग यशासाठी खूप खूप अभिनंदन. आज प्रत्येक भारतीयाला मग तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असू दे तुझा अभिमान आहे. तुझ्या पुढील प्रवासासाठी सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :-  गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Friday, 27 August 2021

कोटीच्या कोटी उड्डाणे... विनीत वर्तक ©

 कोटीच्या कोटी उड्डाणे... विनीत वर्तक ©

काल भारतात तब्बल १ कोटी लोकांना कोरोना लस देण्यात आली. हा आकडा नक्कीच भुवया उंचावणारा आहे. २४ तासात इतक्या प्रचंड प्रमाणात लसी देणं हे सरकारी यंत्रणांचे यश आहे त्याचसोबत लसी बनवणाऱ्या औषधी कंपन्या, लस देणारे वैद्यकीय कर्मचारी, लसींचा पुरवठा सुरळीत करणारी यंत्रणा आणि डॉक्टर सगळ्यांच अभिनंदन. भारतात सध्या कोविशील्ड, कोवॅक्सीन आणि स्पुटनिक फाय अश्या लसी दिल्या जात असून त्यात येत्या काळात ZyCoV-D या झायडस कॅडीला लसीची भर पडेल.  

भारतातील ४८ कोटी लोकांनी कोरोना लसीचा एक डोस तरी घेतलेला आहे तर १३ कोटी पेक्षा जास्त लोकांचे दोन्ही डोस झालेले आहेत. भारतातील जवळपास ३७% लोकांना एक डोस मिळालेला आहे तर १०% लोकांच संपूर्ण लसीकरण झालेलं आहे. टिका करणारे भारताच्या लोकसंख्येच तुलनात्मक वर्गीकरण करतील. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की १३० कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशाच संपूर्ण लसीकरण किंवा निदान अर्ध्या लोकसंख्येचं लसीकरण करण्यासाठी वेळ लागणार हे लक्षात घेतलं पाहिजे. १३ कोटी लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस मिळाले म्हणजे २६ कोटी लस दिल्या गेल्या आहेत. या सर्व लसींच उत्पादन, त्यांचा पुरवठा आणि त्या पलीकडे हे लसीकरण स्वेच्छेने आहे. त्यामुळे लोकांकडून होणारी दिरंगाई, उदासीनता आणि इतर गोष्टी धान्यात घेतल्या तर हा आकडा खूप मोठा आहे. 

घरातल्या ४ लोकांना आवरू न शकणारे आपण भारताच्या टक्केवारीवर टिका करून मोकळं होतो पण प्रत्यक्षात इतक्या प्रभावीपणे लसीकरण भारताचा आवाका लक्षात घेता त्याच्या काना कोपऱ्यात पोहचवणे हे खूप मोठं शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. त्यातही हे लसीकरण ऐच्छिक आहे. अतिशहाणे राजकारणी, काही अडाणी लोकं आणि लसींचा खोटा प्रचार करणारे यांनी लोकांच्या मनात लसींविषयी संभ्रम निर्माण केला. पण हळूहळू लोकांच्या मधे लसीविषयी जागृती झाल्यावर आज हा वेग शक्य झाला आहे. कोरोना च्या दुसऱ्या लाटेत ज्या पद्धतीने लोकांचे जीव गेले त्यानंतर लसी किती उपयुक्त आहेत याची जाणीव भारतीयांना झाली. याशिवाय सरकारी पातळीवर काही राज्यांच्या सरकारांनी अवलंबिलेलं अडवणुकीचं धोरण आणि त्यातही स्वतःचा खिसा गरम करण्यासाठी केलेल्या गोंधळांमुळे लसीकरण अभियान यशस्वी होऊ शकलेलं नव्हतं. लसींचा पुरवठा हा पण एक महत्वाचा मुद्दा होता. लसीकरण अभियानाच्या काही सुरवातीच्या महिन्यात गोंधळ सरकारी पातळीवरून झाला हे स्पष्ट आहे. पण नक्कीच त्यावर आता योग्य नियंत्रण मिळवलं गेलं आहे. आज भारताच्या अनेक राज्यामध्ये लसी शिल्लक आहेत. 

भारतातल्या कोटीच्या कोटी उड्डाणाची व्याप्ती किती प्रचंड आहे याचा अंदाज आपण दुसऱ्या देशातून लावू शकतो. आज म्यानमार सारख्या देशात कोवॅक्सीन आणि कोविशील्ड च्या एका लसीची चोर बाजारातील किंमत तब्बल ४०० अमेरीकन डॉलर आहे. (जवळपास २८,००० रुपये). आज इकडे भारतीय लसीसाठी लोकं वणवण फिरत आहेत. ३००-४०० डॉलर मोजून सुद्धा मिळालेली भारतीय लस खरी आहे की नाही याबद्दल काही खात्रीने सांगू शकत नाहीत. चोर बाजारात सुद्धा या लसीसाठी वेटिंग आहे. चीन मधून आयात केलेल्या लसीला म्यानमार मधील लोकांनी केराची टोपली दाखवली आहे. चीन ची लस फुकट सुद्धा ही लोकं टोचून घ्यायला तयार नाहीत. पण भारताच्या लसीसाठी ४०० डॉलर मोजायला तयार आहेत. हे कसं  शक्य आहे तर भारतीय लसींन बद्दल असलेला विश्वास. आज प्रत्येक भारतीयाला सगळ्या लसी या फुकट दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला त्याची किंमत जाणवत नाही. भारताच्या दोन्ही लसींच्या झालेल्या चाचण्या आणि त्या लसींची परिणामकारकता यावर इथल्या लोकांना विश्वास आहे. चीन च्या एकाही गोष्टीवर या लोकांचा विश्वास नाही. त्यामुळे आज आपल्याला भारतीयांनी भारतात बनवलेल्या लसी फुकट मिळत आहे त्याबद्दल आपण नक्कीच याचा अभिमान बाळगला पाहिजे. 

जगात सगळ्यात जास्ती लस चीन नंतर भारताने दिलेल्या आहेत. चीन च्या आकड्यांवर आणि एकूणच तिथल्या सगळ्या गोष्टींवर विश्वास कितपत ठेवायचा हे प्रत्येकाने ठरवायचं. नक्कीच आपण संपूर्ण लोकसंख्येच्या बाबतीत १०% लोकांपर्यंत पोहचलो असलो तरी हा आकडा खूप मोठा आहे. ज्या वेगाने आता लसीकरण पुढे जाते आहे त्या वेगाने आपण प्रत्येक महिन्यात २०- २२ कोटी लोकांना लस देऊ शकणार आहोत. नक्कीच तो दिवस दूर नाही जेव्हा आपण १०० कोटी लोकांपर्यंत पुढल्या ६ महिन्यात पोहचू. हा कालावधी लागणार आहेच. संपूर्ण भारतातील लोकांना लसी पोहचवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठीच या अभियानाशी संबंधित असलेला प्रत्येकजण अभिनंदनास पात्र आहे. 

सर्व डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, राज्य आणि केंद्र सरकार त्यांचे अधिकारी, कर्मचारी, दळणवळण यंत्रणा, लसी बनवणाऱ्या कंपन्या आणि त्यांचे कर्मचारी यांचे पुन्हा एकदा आभार आणि त्यांना कडक सॅल्यूट.  

जय हिंद!!!

तळटीप :- या पोस्टचा वापर राजकीय चिखलफेक किंवा चढाओढीसाठी करू नये. पोस्टचा उद्देश भारताच्या लसीकरण कार्यक्रमाशी संबंधित आहे. 

फोटो स्त्रोत :-  गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Sunday, 22 August 2021

द रेस्क्यू... विनीत वर्तक ©

 द रेस्क्यू... विनीत वर्तक ©

एकीकडे लोक विमानाच्या चाकावर चढून अफगाणिस्तानातून आपल्या जीवाची पर्वा न करता पळ काढत आहेत. जिकडे विमानतळावर विमान उतरवणं अमेरिका सारख्या २० वर्ष वास्तव्य करणाऱ्या देशाला भारी जाते आहे. तिकडे भारताने गेल्या आठवड्याभरात तब्बल ५९० लोकांना सुखरूप भारतात परत आणलं आहे. ज्यात भारताच्या नागरिकांसोबत इतर देशांच्या नागरिकांचा ही समावेश आहे.

भारताने आपल संपूर्ण राजनैतिक वजन मग ते अफगाणिस्तान सोबत असो किंवा अमेरिका, तजाकिस्तान, ओमान सारखे देश त्यांना समजते ती सर्व भाषा मग ती साम, दाम, दंड, भेद कशीही असो वापरून आपल्या लोकांची सुटका भारताने केली आहे.

राजनैतिक पातळीवर अनेक बाजूने भारताचे अधिकारी या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत. ज्या काबुल विमानतळावर अफरातफरी माजलेली आहे, गोळीबार होतो आहे. ज्या विमानतळाला तालिबानी सैनिकांनी वेढा घातलेला आहे. अश्या ठिकाणी आपलं सैनिकी विमान असो अथवा व्यावसायिक विमान असो भारताने सुखरूप उतरवून त्यात जाणारी सगळी लोक सुखरूप विमानतळावर पोहचून सुरक्षिततेने उड्डाण भरतील. यासाठी अनेक गोष्टी पडद्यामागे केलेल्या आहेत.

एकीकडे जिकडे इतर देश आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी अडचणीत सापडले आहेत तिकडे भारतीय लोक तालिबानी गोळीचे लक्ष्य झालेले नाही? भारतीय विमानांना उतरण्यासाठी परवानगी कशी काय देण्यात आली? इंधन कसं काय देण्यात आलं? तसेच भारतीय लोकांना विमानतळावर जाण्याची तसेच लागणाऱ्या कागदपत्रांची व्यवस्था कशी काय झाली? या प्रश्नांची कोडी अजून अनेक देश सोडवत आहेत.

काल जवळपास ४०० लोकांना मृत्यूच्या खाईतून भारताने बाहेर काढलं असून भारताच्या या कामगिरीमुळे अनेक देशांनी भारताला त्यांच्या नागरिकांना बाहेर काढण्याची विनंती केली आहे.
सर्व भारतीयांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणारं भारत सरकार, विदेश मंत्री आणि पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार तसेच सगळे राजनैतिक अधिकारी, भारतीय वायू दल, एअर इंडिया, इंडिगो आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांच अभिनंदन. पुन्हा एकदा भारताने दाखवून दिलं आहे की भारताच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भारत नेहमीच सर्वात पुढे असतो.

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Saturday, 21 August 2021

प्रतिभेची प्रतिमा... विनीत वर्तक ©

प्रतिभेची प्रतिमा... विनीत वर्तक ©
२०१४ च्या ऑक्टोबर महिन्यात मी नासाच्या केनेडी स्पेस सेंटर, अमेरिका इकडे भेट दिली होती. तिकडे अनेक अमेरिकन पालक आपल्या ५ ते १२ वर्षाच्या मुलांना घेऊन आले होते. तिकडे तुम्हाला अंतराळात राहून आलेल्या अवकाशयात्रींची भेट घेता येते, त्यांच्याशी संवाद साधता येतो, त्यांना प्रश्न विचारता येतात, त्यांच्या सोबत जेवण घेता येते. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे त्या कोवळ्या मनांवर पडणारा 'प्रतिमेचा प्रभाव'. आपण अश्या एका माणसासोबत हात मिळवतो आहोत, अश्या माणसाशी संवाद करण्याची संधी मिळते आहे, ज्याने पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्या आहेत; ज्याला रॉकेटमधून जाण्याचा अनुभव आहे, ज्याने अंतराळात काही दिवस, महिने व्यतीत केलेले आहेत; हे सगळं कुठेतरी त्या कोवळ्या मनांना प्रज्वलित करत होतं. कुठेतरी प्रेरणा देत होतं की आपणसुद्धा स्वप्नं बघितली पाहिजेत, आपण ती पूर्ण करण्याचा ध्यास धरला पाहिजे. त्या वेळेला मला स्वतःला जाणवत होतं की अश्या प्रसंगांतून उद्याचे नागरिक बनत असतात. उद्या हीच मुलं अमेरिकेचा झेंडा मंगळावर रोवताना दिसली तर आश्चर्य वाटणार नाही.
प्रतिभेची प्रतिमा ही कळत नकळत आपल्या मनात तयार होत असते. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती 'मिसाईल मॅन डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम' यांनी आपल्या प्रज्वलित मने या पुस्तकातून नेमकं हेच मांडलं आहे. देशातील प्रगतीचा आढावा घेताना त्याचा प्रभाव कसा या कोवळ्या मनांवर पडेल आणि त्यातून कसे उद्याचे जबाबदार नागरिक तयार होतील हे त्यांनी आपल्या शब्दातून मांडलं आहे. जेव्हा देशाच्या सर्वोच्च पदावरील माणसं अश्या पद्धतीने आपला प्रभाव पाडतात, तेव्हा त्याचे परिणाम खूप दूरगामी होतात. भारतात अनेक वर्षांपासून खेळाला दुय्यम महत्व दिलं गेलं आहे. भारतात आयुष्यात ध्येय हे फक्त आणि फक्त मार्कांच्या शर्यतीत शिरून १००% मिळवणारे कारकून अभियंते आणि डॉक्टर बनण्याचं शिकवलं जातं. एकवेळ आपल्या मातृभाषेत बोलता आलं नाही तरी चालेल पण कोडिंग आलं पाहिजे. वयाच्या ५-७ व्या वर्षी कोडिंग शिकलं नाही तर आयुष्याला काय अर्थ? अशी प्रतिभा निर्माण करणारा समाज असल्यावर त्यातून आपण कोणत्या प्रतिमेची अपेक्षा करणार आहोत?
अभ्यासापलीकडे कला, खेळ आणि इतर अनेक अश्या छटा आहेत ज्यातून आपण आपलं आयुष्य घडवू शकतो. खेळातसुद्धा क्रिकेटपलीकडे इतरही खेळ आहेत जे आपला मान-सन्मान आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा समाजात निर्माण करू शकतात. १३० कोटी लोकसंख्येच्या देशातून दोन आकडी सुद्धा स्पर्धक ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत आपली चमक दाखवू शकत नाहीत, हे चित्र गेली अनेक वर्षं आपण बघत आलो आहोत. पण ते बदलण्यासाठी काय केलं गेलं इतक्या वर्षांत याचा विचार आपण कधी केला नाही!! आपण 'प्रतिभेची प्रतिमा' नवीन पिढीमध्ये घडवण्यात कमी पडत होतो त्यामुळेच ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत आपली पदकांची संख्या मर्यादित राहिली होती. पण या वर्षी अशी एक घटना माझ्या बघण्यात आली, की जिच्यात हे चित्र बदलण्याची शक्यता दिसते आहे.
ऑलिम्पिक स्पर्धा संपल्यानंतर पंतप्रधानांनी सर्व खेळाडूंची भेट घेतली. त्यात त्यांनी खेळाडूंकडून काही गोष्टी करण्याचा आग्रह करताना वचन घेतलं. एक म्हणजे प्रत्येक खेळाडूने ७५ शाळांना भेट देऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा आहे. ते करत असताना त्यांना योग्य आहाराचं महत्व एक उत्कृष्ट खेळाडू होण्यासाठी किती महत्वाचं आहे हे समजावणं. आज जिकडे एक पिढी जंक फूडच्या आहारी जात आहे, त्यावेळी सकस आहाराचं महत्व पुढल्या पिढीला सांगणं खूप महत्वाचं आहे. खेळासोबत आपलं सकस अन्नही तितकंच महत्वाचं आहे. एखाद्या ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू जेव्हा या गोष्टीचं महत्व सांगेल, तेव्हा नवीन पिढीमध्ये प्रतिभेची प्रतिमा आपोआप तयार होईल. नक्कीच याचे चांगले परिणाम बघायला मिळतील.
दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक खेळाडूने १०-१५ मिनिटं त्या शाळेतील मुलांसोबत कोणताही मैदानी खेळ खेळणं. ही गोष्ट त्या मुलांच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट ठरेल असं मला मनापासून वाटतं. जेव्हा मी नासामध्ये आलेल्या अमेरिकेतील मुलांशी अंतराळवीरांची भेट झाल्यावर सहज संवाद केला होता तेव्हा ते संपूर्णपणे भारावलेले होते. एक अवकाशात राहून आलेला माणूस माझ्यासोबत जेवण करतो, हात मिळवतो माझ्या शंकांना उत्तरं देतो किंवा माझ्यासोबत फोटो काढतो हे क्षण त्यांच्या आयुष्यात त्यांना नेहमीच लक्षात राहतील असे होते. मी असं म्हणत नाही की, त्यापैकी प्रत्येकजण नासा-मध्ये काम करेल किंवा अवकाश क्षेत्राशी त्याचा संबंध पुढे जाऊन असेल, पण हे क्षण त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी नक्की प्रोत्साहन देणारे होते.
अवकाशयात्रींच्या 'प्रतिभेची प्रतिमा' त्या कोवळ्या मनांत निर्माण झाली होती. मला वाटते जर ऑलिम्पिकमधील प्रत्येक खेळाडूने ती १५ मिनिटं त्या मुलांना दिली तर नक्कीच कुठेतरी त्या सर्वांच्या मनात खेळाविषयी आणि ऑलिम्पिकविषयी एक कुतूहल निर्माण होईल. त्यातूनच भारतात पुढचे ऑलिम्पिक जिंकणारे खेळाडू तयार होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान सगळं फोटोसाठी करतात, राजकीय फायद्यासाठी करतात अथवा स्वतःचं नाव मोठं होण्यासाठी करतात वगैरे मुद्यांमध्ये मला जायचं नाही, तो वेगळा मुद्दा आहे. त्याच्यावर प्रत्येकाची मते असू शकतील. पण अश्या प्रकारची ज्याला 'आउट ऑफ द बॉक्स' विचार करण्याची क्षमता आणि तो विचार सगळ्या खेळाडूंपर्यंत पोहचवणं हे नक्कीच भारताच्या किंवा निदान मी बघितलेल्या काळातील भारताच्या इतिहासात पहिल्यांदा होताना दिसत आहे. याचे राजकीय, पक्षीय आणि पर्सनल भाग बाजूला ठेवला तर ऑलिम्पिक पदक जिंकलेल्या, त्या संघाचा भाग असलेल्या किंवा एकूणच ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंसोबतचे हे क्षण नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारे असतील.
समाज अश्याच छोट्या छोट्या गोष्टींतून प्रगल्भ होत असतो. वास्तविक ही खूप छोटी गोष्ट असेल पण नासासारख्या संस्थेत अवकाशयात्रींना भेटून किंवा उद्या ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना भेटून एका नवीन प्रतिमेची प्रतिभा त्या कोवळ्या मनांमध्ये रुजत असते असं मला मनापासून वाटतं. भारताचे सगळे ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरलेले खेळाडू पुढल्या १.५ - २ वर्षांत शाळांना भेट देऊन अश्या अनेक कोवळ्या मनांना प्रज्वलित करतील, ज्याची स्वप्नं डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी बघितली होती. भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणाऱ्या आणि भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या सर्व खेळाडूंच्या पुढच्या प्रवासासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.
जय हिंद!!!
तळटीप :- पोस्टचा उद्देश राजकीय नाही न कोणत्या एका व्यक्तीशी निगडित आहे. पोस्ट चा उद्देश निर्माण होणाऱ्या भावनेशी संबंधित आहे. तरी या पोस्ट चा वापर कोणत्याही राजकीय हेतूसाठी, राजकीय चिखलफेकीसाठी करू नये अशी नम्र विनंती.
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Friday, 20 August 2021

ZyCoV-D आत्मनिर्भर भारताचं एक पाऊल पुढे... विनीत वर्तक ©

 ZyCoV-D आत्मनिर्भर भारताचं एक पाऊल पुढे... विनीत वर्तक  ©

भारताच्या झायडस कॅडीला कंपनीच्या जगातील पहिल्या डी.एन.ए. कोरोना लसीला Central Drugs Standard Control Organisation (CDSO) आणि Drug Controller General of India (DCGI) ने आणीबाणी च्या वापरासाठी मान्यता दिली आहे. झायडस कॅडीला कंपनीने ZyCoV-D ही डी.एन.ए. लस तयार केली आहे. तिसऱ्या पातळीच्या चाचणीत २८,००० कोरोना झालेल्या लोकांना ही लस दिली गेली. यात ६६.६% लोकांमध्ये याची परिणामकारता दिसून आली आहे. 

झायडस कंपनीची ही लस अनेक अर्थाने वेगळी आहे. डी.एन.ए. वर आधारित ही जगातील पहिली लस आहे. अश्या पद्धतीच्या तंत्रज्ञानावर आधारित लस जगात पहिल्यांदा वापरात येत आहे. ही लस घेतल्या नंतर आपल्या शरीरात SARS-CoV-2 या विषाणूशी संबंधित प्रोटीन डी.एन.ए. मधून निर्माण करण्याचा आदेश शरीराला दिला जातो. सहाजिक अश्या अनोळखी पद्धतीच्या प्रोटीन ची निर्मिती शरीरात सुरु झाल्यावर आपलं शरीर त्या विरुद्ध तात्काळ इम्यून सिस्टीम तयार करते. लसी मधे विषाणू नसल्याने शरीराला इजा होत नाही. पण कोरोनाचा संसर्ग पुढे कधी झाल्यास आणि अश्या पद्धतीचं प्रोटीन शरीरात पुन्हा शिरल्यावर कोणती उपाय योजना करायची हे इम्यून सिस्टीमला माहिती होते. त्यामुळे कोणताही वेळ न दवडता शरीर कोरोनाच्या विषाणूंचा खात्मा करते. त्यामुळे कोरोनाची लागण झाल्यावर त्याची गंभीरता ही मृत्यू पर्यंत जात नाही किंवा लक्षणे ही प्राथमिक स्वरूपा पुरती मर्यादित राहतात. या लसीच्या चाचण्यांमध्ये लस दिल्यानंतर कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. 

झायडस कंपनीची ही लस अजून काही कारणांसाठी वेगळी आहे. ही लस १२ वर्षानंतर कोणालाही घेता येणार आहे. या लसीच्या चाचण्या १००० मुलांवर ( १२ ते १८ वर्ष वयोगट) झाल्या असून या वयोगटात ही लस योग्य रीतीने काम करत असल्याचं चाचण्यांमधून स्पष्ट झालं आहे. तसेच ही लस इंजेक्शन शिवाय घेता येणार आहे. इंजेक्शन मधून कोणतीही लस शरीरात टोचताना ते देणारे हेल्थ वर्कर आणि ते टोचून घेणारा व्यक्ती हे अनेक प्रकारच्या इतर आजारांसाठी उघडे पडत असतात. ज्यात एड्स सारख्या आजारांचा समावेश आहे. अमेरिका सारख्या देशात सुई टोचल्यामुळे होणाऱ्या इन्फेक्शनमुळे ६ ते ८ लाख प्रत्येक वर्षी आजारी पडतात. त्यामुळे भारतासारख्या देशात ही संख्या किती प्रचंड असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. झायडस कंपनीची लस ही इंजेक्शन शिवाय शरीरात सोडण्यात येते. यासाठी फार्माजेट सारख्या कंपन्यांनी बनवलेल्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. लसीचा एक खूप छोटा प्रवाह एका सेकंदाच्या १० व्या भाग इतक्या वेगाने शरीराच्या त्वचेतून आत सोडण्यात येतो. यासाठी शरीरात कोणतीही सुई प्रवेश करत नाही. यामुळे इंजेक्शनमुळे होणारं इन्फेक्शन हे होत नाही. 

झायडस कंपनीची लस कोरोना च्या वेगवेगळ्या प्रकारावर ही परिणामकारक असल्याचं चाचण्यांमध्ये स्पष्ट झालं आहे. ही लस सुरक्षित ठेवण्यासाठी २ ते ८ डिग्री  सेल्सिअस हे तपमान गरजेचं असलं तरी २५ डिग्री सेल्सिअस तापमानात ही लस तब्बल ३ महिने व्यवस्थित रहात असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. भारतासारख्या प्रचंड मोठ्या देशात अनेक दुर्गम भागात लसी पोहचवणं यामुळे शक्य होणार आहे. ही लस ०-१८-५६ अश्या दिवसांच्या अंतराने तीन वेळा घ्यायची असून याच्या दोन डोसने काय परिणामकारकता दिसते यावर चाचण्या सुरु असून त्याचे निष्कर्ष ही काही दिवसात स्पष्ट होणार आहेत.

मोठा गाजावाजा करत जगात दाखल झालेल्या आणि भांडवलशाही करत भारत सरकारवर पैश्याच्या मस्तीवर दबाव टाकणाऱ्या फायझर च्या लसीची डेल्टा प्रकारात परिणामकारता  ६०% वर येऊन पोहचली असताना त्याचवेळी भारतातील वैज्ञानिकांनी भारतात तयार केलेल्या झायडस कॅडीला कंपनीच्या ZyCoV-D या जगातील पहिल्या डी.एन.ए. बेस लसीची परिणामकारकता याच प्रकारात ६७% च्या आसपास आहे. हे भारतीय संशोधनाचं आणि भारतीय तंत्रज्ञानाचं यश आहे. त्या शिवाय ही लस १२ ते १८ वर्ष वयोगटात ही सुरक्षित म्हणून सिद्ध झाली आहे. तसेच त्याची साठवणूक आणि वहन ही भारतीय प्रदेशाशी अनुकूल आहे.     भारताने फायझर सारख्या भांडवलशाही आणि मस्तवाल कंपनींना बाहेरचा रस्ता दाखवून त्याचवेळी आपल्या वैज्ञानिकांवर विश्वास ठेवत आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलं आहे. 

 झायडस कॅडीला च्या मते प्रत्येक वर्षाला १० ते १२ कोटी लस बनवण्याची त्यांची क्षमता असून त्यांनी या लसीची निर्मिती आधीच सुरु केली आहे. त्यासाठी जवळपास ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या लसीची किंमत तूर्तास स्पष्ट नसली तरी भारतीयांची गरज आणि इतर लसींच्या किमतीएवढीच ती असेल असा अंदाज आहे. 

कोरोना च्या लढाईत भारताला आत्मनिर्भरतेत एक पाऊल पुढे घेऊन जाणाऱ्या झायडस कॅडीला टीम च अभिनंदन आणि पुढल्या वाटचालीस शुभेच्छा.

जय हिंद!!! 

फोटो स्रोत :-  गुगल (पहिल्या फोटोत झायडस कॅडीला कंपनीची ZyCoV-D लस, दुसऱ्या फोटोत फार्माजेट तंत्रज्ञान पद्धतीने लस शरीरात जाताना ) 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 

 



Thursday, 19 August 2021

चाळीशीतील प्रेम... विनीत वर्तक ©

चाळीशीतील प्रेम... विनीत वर्तक ©

प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. पण आयुष्याचे काही टप्पे असे असतात की जिकडे पुन्हा एकदा एक नवीन सुरवात करावी असं मनापासून वाटत असते. शाळा- कॉलेज च्या त्या मयूरपंखी दिवसातच प्रेम या शब्दाशी आपली पहिली ओळख होते. खरतर ओळख झाल्यावर ही ती समजून घ्यायला अनेकदा कित्येक वर्ष सुद्धा जातात. कधी ते कळते, कधी ते उमजते तर अनेकदा उमेजून कोमेजते. कधी ते व्यक्त होते तर कधी अव्यक्त रहाते, कधी आपलसं होते तर अनेकदा आपलसं  होऊन पण अर्ध्यावर सोडून जाते. पण काही असलं तरी ते प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग मात्र असते. 

आयुष्य वळणं घेतं पुढे जात रहाते त्या नदी प्रमाणे जी समोर येईल त्याला ओलांडून अथवा त्याला वळसा घालून पुढे जात रहाते. आयुष्यच जोडीदार आपलं प्रेम बनते किंवा अनेकदा जोडीदाराच्या प्रेमात स्वतःला बांधून घ्यावं लागते. त्या प्रवासात भूमिका बदलत राहतात. प्रेयसी ची बायको आणि प्रियकराचा नवरा होतो. त्यात एक किंवा अनेक पूर्ण मिलनाच्या जीवांची भर पडते. आयुष्य कसं रंगीबेरंगी होऊन जाते. आपण त्या प्रवासात नकळत स्वतःला बंदिस्त करून घेतो. मधल्या काळात अनेक गोष्टी मिळत जातात तर अनेक सुटत जातात. आयुष्याच्या त्या वेगात उसंत मिळत नाही. आधी जोडीदार मग मुलं या सगळ्यात आपण स्वतःकडे बघायला विसरायला लागतो. आयुष्य एकसुरी बनत जाते आणि मग ते अश्या टप्यावर येतं की जिकडे पुन्हा एकदा प्रेमात पडावं असं वाटू लागते. हेच ते चाळीशीच प्रेम. 

आयुष्याच्या या टप्यावर प्रेम या शब्दाचे अर्थ बदललेले असतात. जर आपण गेल्या २०-२५ वर्षात बदललेले असू तर २०-२५ वर्षापूर्वी असलेली ओढ आता सुद्धा सारखी कशी असेल. त्याकाळचं ते मयूरपंखी प्रेम आणि चाळिशीतील परीपक्व प्रेम यात फरक असतोच. त्या काळात वाटणारी ओढ मग ती शारिरीक असेल किंवा मानसिक आयुष्याच्या या टप्यावर ती अनुभवलेली असते. खरे तर आपल्या जोडीदारा सोबत आपण त्याचा अनुभव आजही तितक्याच उत्कठतेने घेत असतो. मग या टप्यावर नक्की काय हवं असते? आयुष्याच्या या टप्यावर आपल्यासोबत अनेक नाती असतात मग ते मित्र- मैत्रीण असतील. तसेच आपल्याला जवळचे मानणारे असतील किंवा आपण ज्यांना जवळचे मानू असे असतील. जोडीदार, मुलं आणि कुटुंब सगळेच तर असते मग नक्की काय कमी असते? खरच कमी असते का? 

चाळिशीतील प्रेम म्हणूनच वेगळं असते. त्याचे संदर्भ वेगळे असतात. आयुष्याच्या या टप्यावर असं कोणीतरी हवं असेल की जे आपल्याशी कुठेच जोडलेलं नसेल. पण त्याचवेळी आपल्याला तितकचं समजून घेईल किंवा आपण त्याच्या / तिच्या समोर जसे आहोत तसं आपल्याला व्यक्त होता येईल. आयुष्याशी जुळवून घेता घेता आपण इतकी आवरणं घालतो की आपलं स्वतःच अस्तित्व विसरून जातो. आपल्या चालण्या, बोलण्यावर इतकच काय हसण्या, रडण्यावर पण बंधन येत जातात. त्यातली काही आपसूक आलेली तर काही ओढवून घेतलेली. त्यामुळेच त्या सगळ्या आवरणाच्या आत आपण घुसमटत असतो. मनासारखं जगता आलं नाही तरी मनासारखं व्यक्त होता यावं हीच अपेक्षा चाळीशीत वाटू लागते. जर असं कोणी आपल्या आयुष्यात आलं जे या आवरणाखाली दबलेल्या आपल्याला बघू शकेल. आपल्याशी आडपडदा न ठेवता व्यक्त होऊ शकेल अथवा आपल्याला त्याच्याकडे आपण जसे आहोत तसे व्यक्त होता येईल. तर तेच चाळिशीतील प्रेम... 

चाळिशीतल्या प्रेमाला भेटीची गरज नसते किंवा कोणत्या आणाभाका घ्यायची ही गरज नसते. कोणीतरी आहे ही एक भावना पुरेशी असते. रोज उठून प्रेमाची परीक्षा किंवा आपल्या असण्याची वर्दी देण्याची पण गरज नसते. गरज असते ती फक्त जाणिवेची आणि ती समजून घेण्याची. ते असेल तर कोणत्याच शब्दांची, भेटीची अथवा मिलनाची गरज भासत नाही. चाळिशीतल्या प्रेमात हक्काची भावना असते ती समजून घेण्यासाठी अनेकदा मन मोकळं करण्यासाठी. शारिरीक जवळीक किंवा मिलन हा भाग तिकडे येतच नाही किंवा निदान तो आणू नयेच. कारण दोन प्रेमांची मिसळ अनेकदा खरे तर सगळ्याच वेळी असं स्वरूप घेते की ज्यात आपल्या सोबत आपलं कुटुंबपण भक्ष्य बनते. एकमेकांसापासून लांब राहून पण जवळ असण्याची भावना म्हणजेच चाळिशीतलं प्रेम.... 

चाळिशीतलं प्रेम जितकं सहज होते तितकं सहज लांब पण जाते. ते टिकवणं, समृद्ध करणं त्यातून आपल्या स्वतःला शोधणं खूप कमी जणांना जमते. कोणतीच बंधन नसलेलं हे निरपेक्ष प्रेम जाताना वेदना ही तितक्याच देऊन जातात. त्यामुळेच ते जितकं चांगलं तितकच वाईट पण होऊ शकते. आपण आणि ज्याच्या सोबत आपण जोडले जातो त्या दोन व्यक्तींच्या अपेक्षा या एक असतील तरच चाळिशीतील प्रेम यशस्वी ठरते. वयाच्या या टप्यावर आपण आपल्याला काय हवं आहे आणि आपल्या समोरच्या कडून काय अपेक्षा हे स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. जेव्हा हा संवाद त्या दोघांमध्ये होईल तेव्हाच त्या प्रेमाला खरा अर्थ प्राप्त होईल. आपल्या शब्दांपेक्षा आपल्या वागणुकीतून ते समोरच्या पर्यंत पोहचलं तरच ते चिरकाळ टिकणारं असेल. 

चाळीशीच्या टप्यावर कोणी असं आपल्या आयुष्यात येणं किंवा आपण कोणाच्या आयुष्याचा भाग होणं हे आपल्या स्वतःला पण खूप समृद्ध करते. अनेकदा याच प्रेमातून आपल्या जोडीदाराच्या प्रेमाला ही पुन्हा एकदा नवीन पालवी फुटते. याच प्रेमातून आपण स्वतःला पुन्हा एकदा ओळखायला लागतो. पुन्हा एकदा आत्मविश्वास आपल्याला येतो. पुन्हा एकदा एका नवीन वळणावर सुरवात करतो. लांब असून सुद्धा तितकच जवळ असणाऱ्या चाळिशीतील प्रेमात एकदातरी स्वतःला चिंब भिजवावं. 

फोटो स्रोत :-  गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



अफगाण गर्ल (शरबत गुला)... विनीत वर्तक ©

 अफगाण गर्ल (शरबत गुला)... विनीत वर्तक ©

आज नॅशनल फोटोग्राफी दिवस आहे. त्या निमित्ताने जगाचा विचार बदलवणाऱ्या एका फोटोचा हा प्रवास...

१९८४ सालच्या डिसेंबर महिन्यात नॅशनल जिओग्राफी या अंकाचा फोटोग्राफर स्टीव्ह मॅक करी पाकिस्तान मधल्या शरणार्थी कॅम्प मधे अफगाण लोकांच्या आयुष्याचे ते क्षण टिपत होता ज्याची जगाला पुसटशी कल्पना पण नव्हती. एका संध्याकाळी धुळीच्या लोटातून त्या नासिर बाघ रेफ्युजी कॅम्प मधे फिरताना त्याची नजर एका १२ वर्षाच्या मुलीवर खिळली. एक अनाथ अफगाण मुलगी आपल्या आजीसोबत आणि नातेवाईकांसोबत पाकिस्तानात अफगाणिस्तानातून चालत आली होती. त्या काळच्या सोव्हियत युनियन ने अफगाणिस्तानात कब्जा केल्यावर अनेक शरणार्थी पाकिस्तानात येऊन पोहचले होते. त्यांची अवस्था अतिशय दयनीय होती. अफगाणिस्तानच्या त्या परिस्थितीची कल्पना जगातील लोकांना नव्हती. पण त्या अफगाण मुलीच्या नजरेत ते सर्व काही होतं जे संपूर्ण जगाला अफगाणी लोकांची अवस्था सांगेल. स्टीव्ह ची नजर तिच्यावर खिळली आणि त्याने त्या डोक्यावरून घेतलेल्या लाल दुपट्टा आणि हिरव्या बाहुल्यांच्या चिरत जाणाऱ्या नजरेला आपल्या निकॉनच्या लेन्स ने फिल्म मधे बंदिस्त केलं. 

त्याकाळी डिजिटल कॅमेरे नसल्याने आपण जे टिपलं ते योग्य रीतीने बंदिस्त झालं का? याची खात्री स्टीव्ह ला नव्हती. पण त्याला एक कळून चुकलं होतं की हे डोळे आणि ती नजर काहीतरी वेगळी होती. त्याने काही दिवसांनी ती फिल्म डेव्हलप केली आणि जो फोटो समोर आला तो स्तिमित करणारा होता. स्टीव्ह ने नॅशनल जिओग्राफी च्या एडिटर ला तो दाखवला. तो पाहिल्यावर अक्षरशः तो ओरडला आणि म्हणाला, आपल्या पुढल्या अंकाचा कव्हर फोटो हाच असेल. स्टीव्ह आणि त्या एडिटर या दोघांना काहीच कल्पना नव्हती की आपण नॅशनल जिओग्राफी च्या इतिहासातला सर्वोत्तम फोटो जगाशी शेअर करतो आहोत. जून १९८५ सालच्या अंकावर अफगाण गर्ल या नावाने तो झळकला. त्या खाली लिहलेलं होत, 

 “Haunted eyes tell of an Afghan refugee's fears”

त्या फोटोने जगभर खळबळ माजवली. नॅशनल जिओग्राफी ची ती अफगाण गर्ल अफगाणी लोकांवर विशेष करून स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाचा चेहरा म्हणून संपूर्ण जगात नावाजली गेली. अफगाणी लोकांवर होणाऱ्या अत्याचाराची कल्पना आणि झळ जगातील कानाकोपऱ्यात याच फोटोमुळे पोहचली. या फोटोने संपूर्ण जगाचा अफगाणिस्तानकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवून टाकला. अफगाण गर्ल हा जगातील सगळ्यात जास्ती ओळखला आणि बघितला गेलेला फोटो ठरला. एका फोटोत बंदिस्त झालेल्या त्या नजरेने फोटोग्राफी ची ताकद जगाला दाखवून दिली. तिचे झपाटलेले डोळे अफगाणी संघर्षाचा आरसा ठरले. पण या सगळ्यात स्टीव्ह मात्र त्या मुलीचं नाव विचारायचं ही विसरून गेला होता. 

तब्बल दोन दशकं लोकांच्या मनावर या फोटोने अधिराज्य केलं. स्टीव्ह ला कुठेतरी वाटलं की ज्या डोळ्यांनी जगात बदल घडवला त्यांचा शोध घ्यायला हवा. १९९० पासून त्याने त्या डोळ्यांचा शोध घ्यायला सुरवात केली पण प्रत्येक वेळी त्याला अपयश आलं. २००२ साली स्टीव्ह ने पुन्हा एकदा नॅशनल जिओग्राफी च्या टीम सोबत अफगाणिस्तान च्या दिशेने कूच केलं. ती नक्की कोण होती? याचा शोध १७ वर्षानंतर घेणं खूप कठीण होतं. जिकडे त्याला ते डोळे दिसले तो कॅम्प कधीच बंद झाला होता. तिथल्या स्थानिक लोकांच्या साह्याने त्याने तिचा शोध घ्यायला सुरवात केली. काही गोरे लोकं एका अफगाण मुलीचा शोध घेत आहेत ही वार्ता समजल्यावर अनेक लोक पैश्याच्या आमिषाने पुढे आले. अफगाण स्त्रियांची ओळख पटवणं अवघड होतं. एकतर धार्मिक भावनांमुळे एखाद्या तिसऱ्या व्यक्तीसमोर चेहरा दाखवणं शक्य नव्हतं. अश्या वेळी स्टीव्ह च्या मदतीला आले ते डोळेच. माणसाच्या डोळ्यातील बाहुल्या या एकमेव अश्या असतात. यासाठी स्टीव्ह आणि टीम ने आयरीस रेकॉग्निशियन पद्धतीचा अवलंब केला. स्टीव्ह ने शेवटी तिचा शोध लावला. त्या अफगाण गर्ल च नाव होतं 'शरबत गुला'. 

Iris recognition is an automated method of biometric identification that uses mathematical pattern-recognition techniques on video images of one or both of the irises of an individual's eyes, whose complex patterns are unique, stable, and can be seen from some distance.

एफ.बी.आय.अनॅलिस्ट, फॉरेन्सिक अनॅलिस्ट आणि आयरीस पद्धती मधून पास होऊन अफगाण गर्ल पुन्हा एकदा नॅशनल जिओग्राफिक च्या कव्हरवर झळकली. त्या वेळेला ती तीन मुलांची आई होती. स्टीव्ह ने तिला तिचा फोटो दाखवेपर्यंत तिला आपण जगप्रसिद्ध असल्याची कोणतीच कल्पना नव्हती. ज्या डोळ्यांनी अफगाण स्त्रियांचा संघर्ष जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवला, ज्या डोळ्यांनी अफगाण नागरिकांच्या अडचणींना जगासमोर मांडल. त्या डोळ्यांना आपण काय केलं आहे याची जाणीव नव्हती. स्टीव्ह पुढे तिने एकच इच्छा व्यक्त केली की तिच्या मुलींना शिक्षण मिळून दे. जे खडतर आयुष्य तिच्या वाट्याला आलं ते तिच्या मुलींच्या वाट्याला नको यायला. 

२०१६-१७ च्या सुमारास पाकिस्तान मधे खोट्या नावाखाली राहिल्यामुळे तिला अटक करण्यात आली. शरबत गुला जन्माने अफगाणिस्तान मधली असली तरी तिने आपलं आयुष्य पाकिस्तान मधे घालवलं होतं. पाकिस्तानमधे अवैध रीतीने राहिल्यामुळे तिला १४ वर्ष कारावासाची शिक्षा झाली. ५००० अमेरिकन डॉलर चा दंड ठोठावण्यात आला. त्यावेळी ती ४ मुलांची आई होती आणि तिला 'हेपेटायटीज सी' ही कावीळ ही झाली होती. पण पुन्हा एकदा स्टीव्ह आणि नॅशनल जिओग्राफिक च्या प्रयत्नांनी तिची सुटका करून तिला अफगाणिस्तान ला सोडण्यात आलं. अफगाणीस्तान च्या सरकारने तिला स्वतःच घर ही दिलं. अफगाण लोकांची 'मोनालिसा' म्हणून तिला ओळखलं गेलं. पण आपल्या नजरेने अफगाणिस्तान चा संघर्ष जगाला सांगणारी शरबत गुला आयुष्यभर मात्र त्यात होरपळत राहिली. 

आज २०२१ मधे पुन्हा एकदा अफगाणिस्तान त्याच तालिबानी राजवटीखाली गेला आहे ज्यात येणाऱ्या अनेक पिढ्यातील स्त्रियांच्या आयुष्यात तोच संघर्ष लिहलेला असेल जो शरबत गुला ने अनुभवला होता. तिची ती नजर आजसुद्धा संपूर्ण जगाला त्या अफगाण स्त्रियांचा आक्रोश पोहचवत आहे. कदाचित शेवटपर्यंत पोहचवत राहील. पण अश्या अफगाण गर्ल पुन्हा एकदा घडू नयेत यासाठी जग काय पाऊल उचलेल त्याला महत्व आहे. अन्यथा तो फोटो आणि ते डोळे शेवटपर्यंत जगाला 

“Haunted eyes tell of an Afghan refugee's fears” सांगत राहतील. 

आज नॅशनल फोटोग्राफी दिवसाच्या निमित्ताने अफगाण गर्ल च्या त्या डोळ्यांना आणि ते टिपणाऱ्या स्टीव्ह मॅक करीला माझा साष्टांग नमस्कार. 

फोटो स्त्रोत :-  स्टीव्ह मॅक करी - नॅशनल जिओग्राफी

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




Wednesday, 18 August 2021

अपयशाचं आत्मचिंतन... विनीत वर्तक ©

 अपयशाचं आत्मचिंतन... विनीत वर्तक ©

१२ ऑगस्ट २०२१ ला इसरो च GSLV-F10 हे रॉकेट EOS-03 (GISAT-1) या उपग्रहाला त्याच्या ठरवलेल्या निश्चित अश्या कक्षेत प्रक्षेपित करण्यात अपयशी ठरलं. जी.एस.एल.व्ही. रॉकेट च्या तिसऱ्या टप्यातील क्रायोजेनिक इंजिनाचे प्रज्वलन न झाल्याने इसरो ची ही मोहीम अपयशी ठरली. या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण इसरो आणि भारतासाठी खूप महत्वाचं होतं. जवळपास १० वर्ष आयुष्य असलेल्या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाने भारताला एक डोळा अवकाशातून प्राप्त झाला असता. पण या अपयशामुळे आपण त्याला मुकलो आहोत. हे अपयश इसरोसाठी अनेक दृष्टीने आत्मचिंतन करायला लावणारं आहे. आणि त्याचवेळी पुन्हा एकदा गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची संधी देणारं आहे.

जागतिक पातळीवर इसरो च यश हे मुख्यत्वे करून पी.एस.एल.व्ही. या रॉकेटमुळे मिळालेलं आहे. पी.एस.एल.व्ही. रॉकेट च तंत्रज्ञान हे त्रुटीविरहित म्हंटल जाते. अनेक मोहिमा यशस्वी प्रक्षेपित करून त्याने आपली कार्यसिद्धता जगाला दाखवून दिली आहे. पण जी.एस.एल.व्ही.च्या बाबतीत इसरो अजूनही चाचपडते आहे. गेली अनेक वर्ष क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञानाच्या बाबतीत अपयश आल्यानंतर गेल्या काही उड्डाणात इसरो चा 'नॉटी बॉय' असणाऱ्या जी.एस.एल.व्ही. ने यशाचा झेंडा रोवायला सुरवात केली होती. पण १२ ऑगस्ट ला आलेल्या अपयशाने पुन्हा एकदा जी.एस.एल.व्ही. च्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. क्रायोजेनिक तत्रंज्ञान हे मुळातच अतिशय किचकट असं तंत्रज्ञान आहे. जगातील मोजक्या देशांकडे असं तंत्रज्ञान आहे. 

क्रायोजेनिक म्हणजे काय? तर क्रायोजेनिक चा अर्थ होतो अतिशीत तपमानामधे कोणत्याही वस्तूंचा अभ्यास. जेव्हा तपमान हे -१५० डिग्री सेल्सिअस च्या खाली जाते तेव्हा अश्या अतिशीत तपमानात गॅस हे वायू रूपातून द्रव रूपात जातात. अश्या स्थितीत त्यांचा इंधन म्हणून वापर करणाऱ्याला इंजिनाला क्रायोजेनिक इंजिन असं म्हणतात. १९६९ साली नासा चंद्रावर माणूस पाठवू शकली ती याच इंजिनामुळे. क्रायोजेनिक इंजिनाच का? तर क्रायोजेनिक इंजिन आणि इंधन हे प्रत्येक किलोग्रॅम इंधनमागे जास्ती बल निर्माण करते. कोणत्याही सॉलिड अथवा लिक्विड इंधनापेक्षा हे खूप जास्ती असते तसेच त्याची कार्यक्षमता ही खूप जास्ती असते. इंधनाचे वजन जितकं कमी तितकी जास्त जागा तुम्हाला एखादी वस्तू, उपग्रह अथवा इतर गोष्टी अवकाशात पाठवण्यासाठी उपलब्ध. कोणत्याही रॉकेट मधे अनेक स्टेज असतात. जसं जी.एस.एल.व्ही. मधे तीन स्टेज आहेत. याचा अर्थ जी.एस.एल.व्ही. च्या पहिल्या टप्यातील इंजिनाला पुढल्या दोन स्टेज च्या इंधनाचा भार उचलून पृथ्वीच्या कक्षेतून उड्डाण भरायचं असते. जर पुढल्या दोन स्टेज च्या इंधनाचं वजन जास्ती असेल तर रॉकेट च्या पहिल्या स्टेज मधील इंजिनाला सगळी शक्ती त्यांचा भार वाहून नेण्यात खर्च होणार. त्यासाठीच सगळ्यात महत्वाचं आहे ते क्रायोजेनिक इंजिन. 

क्रायोजेनिक स्टेज मधे अतिशीत तपमानात असलेला हायड्रोजन (LH2) व ऑक्सिजन (LOX) स्टोअर करून त्यांचा इंधन म्हणून वापर केला जातो. हवेतील ऑक्सिजन उणे -१९६ डिग्री सेल्सियस तर हायड्रोजन उणे -२५३ डिग्री सेल्सियस ला द्रवरुपात येतो. जेव्हा तुम्ही ही दोन्ही इंधन रॉकेट उड्डाणाच्या आधी रॉकेट मधे भरता तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते तसेच उड्डाणाच्या वेळी पहिल्या दोन स्टेज संपेपर्यंत हे तपमान अतिशीत ठेवणे अत्यावश्यक असते. एकतर ह्या दोन स्टेज मधील इंधांच्या ज्वलनातून निर्माण होणारी उर्जा त्यात रॉकेट च्या वेगामुळे उत्पन होणारे घर्षण ह्या सर्वांवर मात करून ह्या दोन्ही टाक्यांमधील तपमान अतिशीत ठेवावे लागते. एकाच वेळी दोन वेगळ्या टाक्यांमध्ये वेगवेगळे अतिशीत तापमान टिकवायचे तसेच हि दोन्ही इंधन अत्यंत ज्वालाग्रही असल्याने त्यांना वेगळ ठेवून योग्य तितकच आणि योग्य त्या वेळीच त्याचं मिश्रण करण अत्यंत गरजेच असते. सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत तसं कवच ह्या दोन्ही टाक्यांना देण. तसेच त्यांच मिश्रण योग्य त्या वेळेत आणि योग्य त्या प्रमाणात प्रज्वलित करून उपग्रहाला योग्य त्या कक्षेत पोचवणे हे अत्यंत किचकट आणि कठीण अभियांत्रिकी विज्ञान आहे. म्हणूनच खूप कमी देश अस इंजिन बनवू शकले आहेत. 

१२ ऑगस्ट च्या उड्डाणात क्रायोजेनिक स्टेज चं प्रज्वलन योग्य वेळी न झाल्याने उपग्रहाला योग्य कक्षेत नेण्यात जी.एस.एल.व्ही. ला अपयश आलं. रॉकेट आपल्या रस्त्यापासून भरकटल आणि मोहीम अयशस्वी झाली. प्रथमदर्शनी हे अपयश क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञानाचं नाही हे स्पष्ट होते आहे. कारण इंजिन प्रज्वलित झालं नाही तर इंजिनामध्ये दोष नाही. पण इंजिन चालू करणाऱ्या यंत्रणेत काहीतरी दोष उत्पन्न झाला आहे. बाईक च्या स्टार्टर मधे अनेकदा कार्बन जमल्याने बाईक सुरु होत नाही. अश्यावेळी स्टार्टर व्यवस्थित साफ केला की इंजिन व्यवस्थित काम करते. तसाच प्रकार या उड्डाणात झाला आहे. क्रायोजेनिक इंजिन प्रज्वलित करणाऱ्या यंत्रणेत कुठेतरी तांत्रिक अडचण उध्दभवल्याने इसरो ला खूप मोठं नुकसान झालं आहे. 

या मोहिमेतील अपयश हे फक्त या मोहिमेपुरती मर्यादित नाही. क्रायोजेनिक इंजिन आणि त्याची सर्व प्रणाली यावर पुढील अनेक मोहिमा आणि इसरो च भविष्य अवलंबून आहे. भारतीय अंतराळवीरांना अवकाशात घेऊन जाण्यासाठी याच रॉकेट चा वापर होणार आहे त्यामुळे हे इंजिन आणि त्याच्याशी निगडित सर्व प्रणाली प्रत्येकवेळी योग्य रीतीने काम करणं गरजेचं आहे. नासा च जे रॉकेट १९६९ मधे माणसांना चंद्रावर घेऊन गेलं त्याची क्षमता १४० टन वजन पृथ्वीच्या लो अर्थ ऑर्बिट मधे नेण्याची होती या तुलनेत जी.एस.एल.व्ही. ची क्षमता १० टन वजन वाहून नेण्याची आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे जर इसरो ला भविष्यात अंतराळ सफरी  आणि जगातील एक तुल्यबळ अवकाश संस्था म्हणून पुढे यायचं असेल तर क्रायोजेनिक तंत्रज्ञानात आपण अग्रेसर होणं गरजेचं आहे. 

मला खात्री आहे की इसरो मधील संशोधक, वैज्ञानिक १२ ऑगस्ट ला आलेल्या अपयशातून आत्मचिंतन करून भारताला क्रायोजेनिक तंत्रज्ञानात पुन्हा आत्मनिर्भर करतील. पण अश्या काळात अपयशाने खचून दोषारोप न करता झालेल्या चुका पुन्हा न होण्यासाठी काय करता येईल? तसेच आपण पुन्हा एकदा पुढे जाण्यासाठी टीम इसरो सोबत भारतीय म्हणून उभं राहायला हवं. इसरो ला पुढच्या मोहिमेसाठी शुभेच्छा आणि नक्कीच पुन्हा एकदा आपण यशस्वी होऊ या विश्वासाने सर्व टीमला सॅल्यूट. 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- विनीत वर्तक ( अमेरिकेत असताना सॅटर्न फाय या रॉकेटच्या क्रायोजेनिक टप्याचा फोटो घेता आला. तो इकडे शेअर करत आहे. हे रॉकेट आजतागायत मानवाने बनवलेलं सगळ्यात शक्तिशाली रॉकेट आहे.)

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



Tuesday, 17 August 2021

#चित्रांची_रहस्यं (मोनालिसा) भाग १... विनीत वर्तक ©

 #चित्रांची_रहस्यं (मोनालिसा) भाग १... विनीत वर्तक ©

जगातील सर्वांत सुंदर चित्र कोणतं असा प्रश्न कोणालाही विचारला तरी एका चित्रापाशी उत्तर येऊन थांबते आणि ते म्हणजे “मोनालिसा”. लिओनार्डो डा विन्सीने काढलेलं हे चित्र आजही ५०० वर्षांनंतर जगभरात कुतूहलाचा विषय आहे. साधारण १५०३ ते १५०६ च्या दशकात बनवलं गेलेलं पोर्ट्रेट पद्धतीचं चित्र ७७ X ५३ से.मी. आकाराचं असून ऑइल ऑन वूड पद्धतीने चित्रित करण्यात आलं आहे. ह्या चित्रात जिचं चित्र चित्रित करण्यात आलं आहे त्या स्त्रीचं नाव लीजा घेरादिर्नी असं मानण्यात येतं. लीजा फ्रान्सिस्को डेल जिओकोंडो ह्याची बायको होती. हे चित्र चित्रित करताना मोनालिसा गर्भवती असल्याचं अनेक संशोधनातून सिद्ध झालं आहे. ज्या वर्षी हे चित्र साकारलं गेलं, त्याच वर्षी मोनालिसा ने एका गोंडस अपत्याला जन्म दिला होता. इटलीमध्ये आदरयुक्त भाव स्त्रीला देताना “मोना” असं म्हटलं जातं. ( जसे इंग्रजी मध्ये मॅडम म्हणतात.)

'मोनालिसा' चं चित्र आजही न उलगडलेलं कोडं आहे. हे चित्र काढताना लिओनार्डोने काळाच्या पुढचा विचार केला होता. मोनालिसाच्या मागे जो निसर्ग चित्रित झाला आहे. ते चित्रित करणं काळाच्या पुढचं होतं. विमानाचा शोध तेव्हा लागला नसताना हवेतून डोंगर, नदी किंवा एकूणच निसर्ग कसा दिसत असेल ह्याचा विचार मनात करून ते रंगांनी साकारणं हे अद्भुत होतं. 'मोनालिसा'चा चेहरा आणि मागील निसर्ग ह्याचा विचार तुलनात्मक विचार केला तर तिच्या चेहऱ्यामागे बर्फाने झाकलेले डोंगर दाखवताना त्याखाली एका बाजूला नदीचा प्रवाह आणि एक छोटा पूल मानवी अस्तित्वाचं दर्शन त्या चित्रात अतिशय प्रभावीपणे दाखवून देतो. 'मोनालिसा'चे डोळे आणि क्षितिजाची रेषा एकाच पातळीवर ठेवताना 'मोनालिसा'चा चेहरा पाठीमागच्या निसर्गात मिसळून जाण्याची किमया साधली आहे. 'मोनालिसा'चा डौलदार चेहरा, चेहऱ्यावर असलेले गूढ भाव दाखवताना पण ती तितकीच शांत वाटते हे लिओनार्डोच्या कलाकारीचं यश आहे.

'मोनालिसा'च्या हाताची ठेवणही बघण्यासारखी आहे. उजवा हात डाव्या हातावर ठेवताना बोटांची रचना अतिशय उत्कृष्ट आहे, तसेच हाताच्या रंगाचा साधलेला मेळ तो हात खरा असल्याचं क्षणभर आपल्याला बघताना भासवत रहातो इतका सुंदर चित्रित केला गेला आहे. अंगावर असलेल्या वस्त्रांची रचना ते त्यावर पडलेल्या सुरकुत्या दाखवताना खूप बारकाईने त्याचा अभ्यास केला गेला आहे. केसांच्या बटा दाखवताना मोनालीजा आपल्यासमोर त्याने आपल्या कुंचल्याने उभी केली आहे. पण ह्या चित्राचं वेगळेपण आणि रहस्य ज्यात आहे त्या गोष्टी 'मोनालिसा'ला इतर चित्रांपासून एक वेगळी उंची देतात. 

'मोनालिसा'ला डोळ्यांच्या वर भुवया आणि पापण्यांना केस दाखवलेले नाहीत. काही संशोधकांच्या मते त्या काळी अशी फॅशन असावी की स्त्रियांनी भुवया आणि पापणीचे केस ठेवणं त्यांच्या सौंदर्याला बाधा आणत असावं म्हणून त्या काढल्या जात असाव्यात. २००७ साली फ्रांसच्या पास्कल कोटे नावाच्या एका अभियंत्याने केलेल्या अल्ट्रा हाय रिझोल्यूशन स्कॅनमध्ये 'मोनालिसा'ला आधी भुवया आणि पापण्यांना केस होते असं समोर आलं. काळाच्या ओघात रंग उडून गेल्याने अथवा त्यावर पुन्हा रंग दिल्याने 'मोनालिसा'ला आजचा चेहरा प्राप्त झाला असं संशोधनात समोर आलं आहे. 

मोनालिसा ओळखली जाते ते तिच्या गूढ हास्यासाठी. "मोनालिसा हास्य" म्हणून आजही आपण अनेक ठिकाणी हा शब्द प्रयोग करतो कारण 'मोनालिसा'चं हास्य आजही गूढ आहे. डोळ्यांकडे बघताना ती आनंदात वाटते तर जेव्हा आपलं लक्ष ओठांकडे जातं, तेव्हा ते वेगळं जाणवतं. 'मोनालिसा'ला बघताना अनेकांना तिच्या चेहऱ्याकडे बघून वेगवेगळे भास होतात व हेच 'मोनालिसा'ला अभिजात चित्रकलेचा एक सर्वोत्तम आविष्काराचा दर्जा देतात. 

Dutch researchers from the University of Amsterdam ran the painting's image through "emotion recognition" computer software developed in collaboration with the University of Illinois at Urbana-Champaign. The technology demonstration found the smile to be 83% happy, 9% disgusted, 6% fearful, 2% angry, less than 1% neutral, and 0% surprised.

जिकडे कॉम्प्यूटरही 'मोनालिसा'च्या हास्याचे निश्चित असे ठोकताळे बांधू शकत नाही, ह्यावरून चित्रात असलेली गूढता आपल्याला लक्षात येते. असंही म्हटलं जातं, की लिओनार्डोने आपलंच रूप ह्या चित्रात चित्रित केलं आहे. लिओनार्डो समलैंगिक असावा व त्याने आपलं स्त्री रूप चितारलं असावं. ह्याला दुजोरा देताना असं सांगतात की मोनालिसा आणि लिओनार्डोच्या चेहऱ्यात कमालीचं साम्य आहे. केस आणि दाढी काढल्यावर मोनालिसा आणि लिओनार्डोचा चेहरा एकमेकांशी तंतोतंत जुळतात. ह्या सर्व रहस्यांमुळे 'मोनालिसा'च्या चित्राभोवतीचं गूढ वलय अजूनच गडद झालं आहे.

'मोनालिसा'चं चित्र २१ ऑगस्ट १९११ ला फ्रांसमधल्या लुवरे इथल्या संग्रहालयातून चोरीला गेलं. ही चोरी करण्यामागे तत्कालीन चित्रकार पाब्लो पिकासो असावा असा कयास बांधला गेला. चौकशीसाठीही पाब्लो पिकासोला बोलवण्यात आलं. पण दोन वर्षांनंतर ही चोरी विन्सेन्झो पेरीगिगा ह्याने केली असल्याचं उघड झालं. हा विन्सेन्झो लुवरे इथल्या संग्रहालयात कामाला होता. पैसे मिळवण्यासाठी आपल्या कोटाच्या आत लपवून त्याने हे चित्र आपल्या घरात लपवून ठेवलं. दोन वर्षांनी हे चित्र विकायला काढलं असताना त्याला पकडण्यात आलं. हे चित्र इटलीचं असून इटली मध्ये राहावं ह्यासाठी आपण त्याची चोरी केली असं विन्सेन्झोने सांगितलं. पण ह्या काळात त्याच्या ६ कॉपी अमेरिकेत विकण्यासाठी बनवल्या गेल्या ह्यामागे एडूआर्डो वाल्फिरीनो याने आपल्या सहकाऱ्यामार्फत विन्सेन्झोला चोरी करण्यासाठी प्रवृत्त केलं असं सांगण्यात येतं.

ह्या चोरीपर्यंत 'मोनालिसा' जगभरात इतक प्रसिद्ध नव्हती. पण ह्या चोरीनंतर 'मोनालिसा'ला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. जरी ह्याच्या ६ प्रती अमेरिकेत गेल्या, तरी मूळ चित्र युरोपात राहिलं. ४ जानेवारी १९१४ ला मूळ चित्र पुन्हा लुवरे इथल्या संग्रहालयात विराजमान झालं. पण ह्या चित्राचे जितके चाहते होते तितकेच दुश्मनही होते. १९५६ ला ह्या चित्रावर एका माथेफिरूने एसिड फेकलं. ज्यात ह्या चित्राचं थोडं नुकसान झालं. १९७४ च्या टोकियो प्रदर्शनात हे चित्र लोकांसाठी खुलं असताना एका महिलेने त्यावर लाल रंग उडवला, पण बुलेट प्रुफ काचेत असल्याने चित्राला काही इजा नाही झाली. २००९ साली एका रशियन महिलेने ह्या चित्रावर चहाचा कप फेकला. पण बुलेट प्रुफ काचेमुळे चित्राला कोणतीही इजा नाही झाली.

ह्या सगळ्या घटनांमुळे ह्या चित्राची सुरक्षितता हा महत्वाचा प्रश्न बनला. 'मोनालिसा' हे चित्र ५०० वर्षांहून अधिक जुनं आहे. ह्याचे रंग खराब होऊ नये म्हणून त्याला अतिशय योग्य तपमानात ठेवण्यात आलेलं आहे. तसेच त्याला कोणतीही इजा होऊ नये म्हणून बुलेट प्रुफ काचेत ठेवण्यात आलेलं आहे. चित्रावर पडणाऱ्या प्रकाशाने रंग बदलू नयेत म्हणून खास करून २० वॅट क्षमतेचे एल.ई.डी. लाईट बसवण्यात आले असून ह्याचा कलर रेंडरींग इंडेक्स ९८ असून ह्यामुळे इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हॉयलेट रेडियेशनपासून चित्राच्या रंगाचे संरक्षण होते. ह्याच्या पूर्ण संवर्धनाची जबाबदारी जपानच्या निप्पोन टेलिव्हिजनकडे आहे. दरवर्षी सुमारे ९ मिलियन (९० लाख लोक) हे चित्र बघतात. १९६२-६३ ला ह्या चित्राचा १०० मिलियन यु.एस. डॉलरचा विमा काढण्यासाठी मागितले गेले. पण हा विमा घेतला गेला नाही कारण त्यापेक्षा जास्ती खर्च त्याच्या सुरक्षेवर होत होता. आज ह्या चित्राची किंमत करावयाची झाल्यास ती जवळपास ८०० मिलियन यु.एस. डॉलरच्या (८० कोटी अमेरिकन डॉलर) घरात जाते. अर्थात ह्या चित्राची किंमत होऊ शकत नाही हा भाग वेगळा. २०१४ साली फ्रांस २४ ह्या एका वाहिनीने देशाचं कर्ज चुकवण्यासाठी 'मोनालिसा'ला विकण्याची कल्पना मांडली होती. पण फ्रांसच्या कायद्याप्रमाणे एखाद्या संग्रहालयात ठेवलेली गोष्ट ही राष्ट्रातील सर्व लोकांच्या मालकीची असून त्याची विक्री होऊ शकत नाही असं त्यांना सांगण्यात आलं.

'मोनालिसा' त्यावेळी पण अद्भुत  होती आणि मोनालिसा आजही तितकीच अद्भुत आहे. 'मोनालिसा' ५०० वर्षांपूर्वी गूढ आणि रहस्य होती आणि आजही ती तितकीच गूढ आणि रहस्य आहे. 'मोनालिसा' एक चित्र नाही तर एक दंतकथा आहे. रंगांचा आविष्कार इतके वर्षं जगातील करोडो लोकांना आजही विचार करायला लावू शकतो, ह्यातच मोनालिसाचं यश आणि प्रसिद्धी दडलेली आहे. तिच्या मागे असणारा इतिहास आणि तिची झालेली चोरी ह्या चित्राला अजून वलय प्राप्त करून देत आहे. पण तरीही 'मोनालिसा'चं हास्य? ते ती कोण होती? तिच्या नसलेल्या भुवया ह्यावर अजूनही संशोधन सुरू आहे.   

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



Monday, 16 August 2021

उषःकाल होता होता काळरात्र झाली... विनीत वर्तक ©

 उषःकाल होता होता काळरात्र झाली... विनीत वर्तक ©

२००१ मधे एका काळरात्रीतुन मधून अफगाणिस्तान च्या क्षितिजावर सूर्याचा उदय झाला होता. १९९६ ते २००१ एक क्रूर आणि वेदनामयी आठवणी असणारा प्रवास सगळ्याच अफगाण नागरिकांनी विशेष करून महिलांनी केला होता. तालिबानी राजवटी ने लादलेल्या शरीया कायद्याच्या आड जो अमानुष असा खेळ सुरु होता त्याला सगळ्याच अफगाणी महिला बळी पडलेल्या होत्या. ९/११ हल्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेने तालिबानी राजवटी मधून अफगाणिस्तान ची मुक्तता केली आणि अमेरिकेच्या अधिपत्याखाली एका नवीन अफगाणिस्तान ची स्वप्न अफगाणी नागरिकांनी बघायला सुरवात केली. 

२००१ ते २०२१ या जवळपास २० वर्षाच्या कालावधीत अफगाणिस्तान हा देश म्हणून किंवा तिथल्या लोकांच्या मानसिकते मधे तितकासा बदल झाला नाही. पण बदल झाला तो मूलभूत हक्कांच्या बाबतीत. अमेरिकेने सत्तेची सूत्र हातात घेऊन एका नवीन अफगाणिस्तान ची निर्मिती करण्याची स्वप्न आणि मनसुबे आखले खरे पण ते सगळे कधी पूर्णत्वाला गेले नाहीत. उलट अमेरिकेने आपल्या धोरणांनी अफगाणिस्तान ची अवस्था अजून दयनीय केल्याचं आता स्पष्ट होते आहे. अमेरिकेने २००१ मधे तालिबान राजवट आणि त्यांचे कायदे उधळून टाकल्यानंतर एका लोकशाही राष्ट्राचा आत्मविश्वास तिथल्या जनतेला दिला. तालिबानी राजवटीचे कायदे इतके अमानुष होते की त्यांच्या ओझ्याखाली माणूस म्हणून जन्माला येणं हे एक पाप वाटत होतं. कोणत्याही अधिकारांच स्वातंत्र्य त्या राजवटीत नव्हतं आणि मानवी हक्काची पायमल्ली प्रत्येक क्षणी अनुभवायला लागत होती. जिकडे पुरुषांची अवस्था अशी होती तिकडे महिलांवर होणाऱ्या अत्याचार आणि एकूणच त्यांच्या आयुष्याबद्दल बोलायला शब्द अपुरे पडतील. 

शरिया कायदा हा मुसलमान धर्माचा धार्मिक कायदा आहे. मुस्लिम धर्माच्या पवित्र अश्या कुराणातील आदर्श जीवनपद्धतीचा अवलंब करण्यासाठी हा बनवला गेला असं त्याबद्दल म्हंटल जाते. पण आदर्श या शब्दाचे अर्थ धार्मिक लोकांनी आपल्याला हवे तसे काढून आज जे या कायद्याचं स्वरूप जगासमोर आणलं आहे ते भयंकर असेच आहे. तालिबान ने १९९६ ला जो कायदा लादला होता त्या प्रमाणे प्रत्येक पुरुषाला दाढी वाढवणं बंधनकारक होतं. त्यांना त्यांचे हुकूमशहा सांगतील तसं वागणं बंधनकारक होतं. कोणताही आदेश तोडल्यास भर चौकात दगडाने ठेचून किंवा धड, शरीराचे अवयव वेगळे करण्याची तरतूद त्यात होती. महिलांना घराबाहेर पडण्यास संपूर्णतः बंदी होती. कोणत्याही प्रकारचं शिक्षण, नोकरी अथवा पद संभाळण्यापासून त्यांना बंदी घातली गेली होती. घराबाहेर पडताना पुरुषासोबत बाहेर पडलं पाहिजे असा आदेश होता. तसेच त्यांच लग्न जबरदस्तीने लावण्याचा अधिकार आणि कोणत्याही तालिबानी सैनिकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दिलेला आदेश पाळणं बंधनकारक होतं. या शिवाय ज्या पद्धतीच्या मानसिक आणि शारीरीक त्रासातून तिला जावं लागत होत याची कल्पना पण आपण करू शकणार नाहीत. 

हे सर्व बघितलेली आणि जगलेली पिढी गेली २० वर्ष एक मोकळा श्वास घेत होती. त्याकाळी विशीमध्ये हे सगळं जवळून अनुभवलेल्या महिला आणि पुरुष आज चाळीशी मधे आहेत. आज जेव्हा अफगाणिस्तान पुन्हा एकदा तालिबानी राजवटीखाली जातो आहे तेव्हा त्या २० वर्षा पूर्वीच्या आठवणी चाळीशीत असलेल्या पिढीच्या जाग्या झाल्या आहेत. आज आयुष्याच्या २० ते २५ वर्षाच्या टप्यात असणाऱ्या तरुण पिढीला या गोष्टी ऐकून माहित होत्या. पण आता ते अनुभवावं लागणार आहे या गोष्टीचा अंदाज आल्याने अफगाणिस्तान च्या विमानतळावर जे काल प्रसंग घडले ते पुढे काय घडणार आहे ते सांगणारे होते. उषःकाल होता होता काळरात्र झाली त्या प्रमाणे अफगाणिस्तान च्या क्षितिजावर पुन्हा येणाऱ्या एका अनिश्चित अश्या ग्रहणाने त्यांच भविष्य काळवंडून टाकलं आहे. काल देशाबाहेर जाण्यासाठी जिवाच्या आकांताने जी लोकांची धावपळ सुरु होती ती त्याच भितीने जे त्यांनी २० वर्षापूर्वी अनुभवलं होतं. तालिबान पुन्हा एकदा तेच कायदे आणणार आणि आपल्यावर अमानुष अत्याचार करणार हे जवळपास प्रत्येक अफगाणी नागरिकाला स्पष्ट झालं आहे. जिकडे अमेरिके सारखी महासत्ता काही करू शकली नाही  तिकडे युनायटेड नेशन, जी ७, जी २० किंवा अजून सगळेच ग्रुप निषेध करण्याशिवाय काही करणार नाहीत हे अफगाणी जनतेला कळून चुकलं आहे. खरं तर या अफगाणी लोकांना कोणीच वाली उरलेला नाही हे स्पष्ट झालं आहे. 

अमेरिकेने अफगाणिस्तान ची अवस्था आगीतून फुफाट्यात नेली आहे. त्याचा चटका बसायला लागल्यावर तिकडून पळ काढण्याचा प्रयत्न अमेरिका आज करत आहे. पण याचे चटके अमेरिकेला सर्व स्तरावर बसणार हे स्पष्ट आहे. अल कायदा सारख्या संघटना पुन्हा एकदा सक्रिय होणार आहेत. अतिरेकी लोकांना एक सेफ हेवन मिळणार आहे. पाकिस्तान आज आनंदात आहे कारण त्यांनी अमेरिकेला दाखवून दिलं आहे की आमची साथ सोडल्यामुळे आज अफगाणिस्तानात ही परिस्थिती उदभवली आहे ज्यात अमेरिकेने गेल्या २० वर्षात कमावलेलं सगळं स्वाहा झालं आहे. दुसऱ्याला खड्यात ढकलताना आपण ही त्यात पडणार आहोत हा विचार करण्याची गरज आणि तितकी दूरदृष्टी पाकिस्तानकडे नाही. त्यामुळे आज त्यांचे नेते सुद्धा तालिबानी राजवटीला मान्यता देत आहेत. चीन, रशिया सारखे देश आपला फायदा बघत आहेत. तर भारताची अवस्था कैचीत सापडल्यासारखी झाली आहे.  

जगातील सगळ्यात मोठ लोकशाही राष्ट्र असणाऱ्या भारतामधील अनेकांना आपल्या हक्काची आणि स्वातंत्र्याची पायमल्ली होत असल्याचं वाटत होतं आणि त्यासाठी देश सोडण्याचा फुसका बार ही त्यांच्यापैकी अनेकांनी सोडलेला आहे. आज आपल्याच देशात आपल्या स्वातंत्र्यावर धाय मोकलून रडणारे मिळेल तो कोपरा बघून आपली जागा सुरक्षित करत आहेत. नक्की स्वातंत्र्यावर गदा येणं काय असते? आणि दुसऱ्याच्या भरवश्यावर आपलं आयुष्य कसं टांगणीला लागू शकते? हे तेच रडणारे लोक मूग गिळून गप्पपणे बघत आहेत. आज अश्या परिस्थितीवर मानवतेच्या पायमल्लीवर पुरस्कार परत करणारे आणि एकूणच मानवतेची आस्था असणारे लोकं बोलू शकत नाहीत. अफगाणिस्तान चा ऱ्हास जरी आपल्याशी निगडित नसला तरी त्यातून आपण खूप काही शिकण्यासारखं आहे. आज कुंपणावर असणारी अशी प्रवृत्ती कधी आपल्या घरात शिरून आपलं घर उध्वस्थ करेल हे आपल्याला कळणार पण नाही. तस व्हायला नको असेल तर या तालिबानी नामक ग्रहणाची तीव्रता आपण आजच समजून घेतली पाहिजे.   

अफगाणिस्तान च भविष्य काय? असा प्रश्न आज अनेकांच्या मनात असेल. रात्रीच्या अंधारात जे खेळ चालतात तेच त्याच भविष्य असणार आहे. तिथल्या नागरिकांना पुन्हा एकदा त्या २० वर्षा पूर्वीच्या काळरात्रीमधून प्रवास करावा लागणार आहे. या सगळ्यात माणुसकीची जी पायमल्ली होणार आहे तिचा निषेध पण करण्याइतपत आपल्याला लाज वाटेल अश्या कहाण्या पुढे येणार आहेत. हे सगळं घडत असताना ट्विट आणि सोशल मिडियावर चिव चिव करणारे सगळेच शांततेचा पुरस्कार आणि आतंकवादाला धर्म नसतो हे सांगत सुटणार आहेत. काल अफगाणिस्तान मधे आपल्या जिवाला न घाबरता विमानाच्या टायर ला पकडून आपल्या आयुष्याची मशाल पेटवण्याचा प्रयत्न करणारे सगळेच येणारी काळरात्र किती भयानक असणार आहेत हेच जगाला सांगत असावेत असं मला तो व्हिडीओ बघताना मनापासून वाटलं. या साठी कोण दोषी? यावर अनेक आरोप प्रत्यारोप होतील. यातून कोणाचा फायदा आणि कोणाचं नुकसान यावर अनेक मत येतील. पण अफगाणिस्तान च्या भविष्यात उषःकाल होता होता काळरात्र झाली हे नक्की आहे. 

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



Saturday, 14 August 2021

एका स्वातंत्र्यासाठी... विनीत वर्तक ©

 एका स्वातंत्र्यासाठी... विनीत वर्तक ©


आज संपूर्ण भारत आणि जगभर विखुरलेले भारतीय देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहेत. स्वातंत्र्यापूर्वीचा भारत बघितलेली पिढी आता हळूहळू काळाच्या पडद्याआड लुप्त होत आहे. त्यामुळे अनेक भारतीयांचा जन्म हा ब्रिटिश गुलामगिरी पासून स्वातंत्र्य मिळालेल्या भारतात झालेला आहे. मुळातच स्वातंत्र्य म्हणजे काय? हे समजण्याची पात्रता अनेक भारतीय लोकांमध्ये आजही नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते. आपले हक्क आणि आपलं स्वातंत्र्य यासाठी आग्रही असणाऱ्या प्रत्येक भारतीयाला याची आपण काय किंमत मोजलेली आहे किंवा काय मोजत आहोत याबद्दल कोणतीच जागरूकता आढळून येत नाही. 


स्वातंत्र्य लढा काय असतो? आपले हक्क आणि आपल्या स्वातंत्र्यावर गदा आणल्यानंतर काय परिस्थिती येते हे माझ्या किंवा माझ्या आधीच्या पिढीलाही कळलेलं नाही. आज जेव्हा अश्या एका देशात मी आहे जिकडे पाय ठेवताना तिथल्या लोकशाही आणि एकूणच स्वातंत्र्याची पायमल्ली झालेली होती. लोकांचे हक्क हिरावून घेतले गेले. लोकांचा आवाज बंद करण्यात आला. लोकांमध्ये बंदुकीची दहशद निर्माण करण्यात आली. त्या सगळ्या परिस्थितीमधे लोकांनी जो उठाव केला. जे मोर्चे काढले, ज्या सभा घेतल्या, जो लाठीमार अंगावर घेतला, ज्या गोळ्या अंगावर झेलल्या. ते सगळं जवळून बघण्याचा अनुभव मी घेतला आणि तेव्हा कुठेतरी जाणवलं की स्वातंत्र्य काय असते? आज आपल्या देशाचं ते स्वातंत्र्य चिरायू ठेवण्यासाठी आपण किती मोठी किंमत मोजतो आहोत. 


भारताचे तुकडे करणाऱ्या गॅंग आणि तो आवाज बुलुंद करणारी स्वतःला बुद्धीमंत समजणारी एक पिढी, अमर जवान स्मारकाला पायाने तुडवणारे आज पुन्हा मान वरून करून समाजात वावरू शकतात कारण आपल्याला स्वातंत्र्याची नसलेली जाणीव. चुकीच्या अस्मिता, चुकीचे समज, चुकीच्या गोष्टी लहानपणापासून शिकवून आपण असे कारकून तयार केले आहेत की जे पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर ही न उडणाऱ्या पोपटासारखे आहेत. ज्यांना आदेश देण्याची ताकद अश्या लोकांच्या हातात आहे ज्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी देश विकला आहे आणि विकायला काढला आहे. जे आपल्याला त्या शिकवलेल्या पोपटासारखं बोलायला लावतात जे त्यांना ऐकायचं असते. त्यामुळे आपल्या अस्मिता, धर्म, जात, प्रांत, भाषा असे अनेक विविध विषय त्यांनी आपल्याला शिकवून ठेवले आहेत. जे आपल्या स्वातंत्र्यापेक्षा आपल्याला महत्वाचे वाटतात. याचाच फायदा घेऊन आजवर देशात सर्व धर्म, सर्व प्रांत, सर्व जाती, सर्व भाषा हेच विषय घेऊन राजकारण केलं जाते. आपण त्या पोपटासारखे उडता येत असून सुद्धा याच विषयांच्या भोवती घुटमळून आपले पंख छाटून घेतो. 


आज अश्या एका देशात जिकडे राजकारणाच्या नावाखाली सर्व हक्क, स्वातंत्र्य आणि एकूणच संपूर्ण मानवी अधिकाराची पायमल्ली केली जात आहे अश्या देशात आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करणं याचं महत्व अजून मला जास्ती जाणवते आणि हे एक दिवसांपुरती नाही. ही एक जाणीव आहे जी आयुष्यभर सोबत राहील. ही कोणत्या पुस्तकातून किंवा कोणत्या चित्रपटातून होत नसते. ती व्हायला त्याचा अनुभव घ्यावा लागतो. प्रेरणा मिळवण्यासाठी पुस्तकातले शब्द प्रत्यक्ष आयुष्यात जगायला हवेत आणि चित्रपटातून दाखवलेल्या घटनांच्या ठिकाणी स्वतः एकदा जाऊन ती घटना अनुभवावी लागते. कारगिल मधे काय झालं हे समजण्यासाठी कारगिल च्या त्या पर्वत शिखरांच्या खाली उभे राहून आपण वर सरळसोट जाणाऱ्या कड्यांकडे बघू तेव्हा त्या उंचीवर तिरंगा फडकवण्यासाठी आपल्या कित्येक अनाम वीरांनी बलिदान दिलं असेल याचा आपण थोडाफार अंदाज लावू शकतो. शेरशहा ला अनुभवायचं असेल तर त्याच्या गुहेत जावं लागते. तो आपल्याला मुंबई- पुण्यात बसून अमेझॉन प्राईम वर अनुभवता नाही येत. 


आज राष्ट्रगीताला उभे न राहणं, मातृभूमीच्या सन्मानासाठी वंदे मातरम न बोलणं किंवा जय हिंद न बोलणं हे आपल्याला संविधानाने, आपल्याला भारताच्या स्वातंत्र्याने दिलेले हक्क आहेत असे मानणारे लोक आणि अश्या पिढी जोवर आपण पुढे नेत राहू तोवर येणारा प्रत्येक स्वातंत्र्य दिवस हा एक सुट्टीचा आणि झेंडा फडकावण्याचा दिवस म्हणून मर्यादित राहील. ज्या लोकांनी या स्वातंत्र्यासाठी आपलं रक्त सांडल, आपल्या आयुष्याची होळी केली, आपल्या आयुष्याच बलिदान दिलं कदाचित ते आपल्याला कळत नसेल किंवा माहित नसेल तर निदान जे स्वातंत्र्य आज आयुष्याच्या प्रत्येक बाबतीत या देशाने जन्मतः दिलेलं आहे त्याबद्दलची जाणीव निदान आपल्यात आणि आपल्यासोबत आपले कुटुंबीय, आपण ज्या समाजाचा भाग आहोत त्या समाजात निर्माण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं माझं स्पष्ट मत आहे. 


आजच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिवसाच्या सगळ्या वाचकांना, भारतीयांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. 


भारताचं स्वातंत्र्य चिरायू होवो याच आशेवर आज त्या तिरंग्याला माझा कडक सॅल्यूट... 


जय हिंद!!! 

  

फोटो स्त्रोत :- गुगल 


सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



#खारे_वारे_मतलई_वारे (भाग १३)... विनीत वर्तक ©

 #खारे_वारे_मतलई_वारे (भाग १३)... विनीत वर्तक ©

१८ जुलै २०२१ रोजी लिहीलेल्या मागच्या भागात मी म्हटलेलं होतं की आंतरराष्ट्रीय पटलावर खारे वारे आणि मतलई वारे वेगाने घोंघावत असून त्याचं एका वादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. आज ते वादळ सर्व जगासमोर उभं ठाकलं आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती अतिशय वेगाने चिघळत असून ती जवळपास हाताबाहेर गेल्याचं स्पष्ट झालं आहे. हा लेख लिहेपर्यंत तालिबानने अफगाणिस्तानमधील १७ भागातील प्रांतीय राजधान्यांवर कब्जा मिळवलेला आहे. काबूलपासून ४० किलोमीटर अंतरावर तालिबानी फौजा येऊन पोहोचलेल्या आहेत. अफगाणिस्तानचं सरकार आणि एकूणच तिथली व्यवस्था कोसळण्याच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे. काही दिवसांचा अवकाश आहे की अफगाणिस्तानवर पुन्हा एकदा तालिबानी लोकांचं राज्य येणार हे स्पष्ट झालं आहे. या सगळ्याला कोण जबाबदार आहे? याचा भारतावर होणारा परिणाम? याचे जगाच्या पटलावर होणारे परिणाम याचा मागोवा घेण्याची गरज आहे. 

आज जी अफगाणिस्तानची अवस्था झाली आहे, त्याला प्रामुख्याने अमेरिका जबाबदार आहे. तालिबानी किंवा एकूणच अफगाणिस्तानमधील जनता याला काही अंशी जबाबदार मानली तरी, अमेरिकेने केलेल्या चुकीच्या राजकारणामुळे संपूर्ण राष्ट्र आज वेठीला धरलं गेलं आहे. ९/११ ला ओसामा बिन लादेनने वर्ल्ड ट्रेड सेंटरचे दोन्ही टॉवर पाडल्यानंतर अमेरिकेने त्याला पकडण्यासाठी अफगाणिस्तानच्या राजकारणात उडी घेतली. गेली २० वर्षांपेक्षा जास्त काळ अमेरिका आणि तिचे सैनिक तालिबान नेतृत्वाला शह देण्यासाठी लढत होते. २ मे २०११ ला ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यावर जे लक्ष्य घेऊन अमेरिका अफगाणिस्तानमध्ये उतरली होती, ते पूर्ण झालं होतं. पण तरीसुद्धा अमेरिका तिथल्या राजकारणात आणि तिथल्या लोकांना युद्धाच्या खाईत लोटत राहिली. मजेची गोष्ट अशी आहे की ९/११ च्या अतिरेकी हल्ल्यात जवळपास ३००० अमेरिकी नागरिकांचा मृत्यू झाला. पण गेल्या २० वर्षांत अमेरिकेने अफगाणिस्तानात २४४० पेक्षा जास्त अमेरिकन सैनिक गमावले त्याबरोबर ११०० पेक्षा जास्ती आपल्या मैत्री राष्ट्रांचे सैनिक गमावले. त्यासोबत २० वर्षं युद्ध सुरू ठेवण्यासाठी अमेरिकेने अब्जावधी डॉलर खर्च केले आहेत ते वेगळेच. यासोबत अमेरिकेने युद्धाच्या नावाखाली ज्या निष्पाप अफगाण लोकांचा बळी घेतला आहे, त्याचा विचार केला तर अंगावर काटा येईल. २०१६ ते २०२० या चार वर्षांच्या काळात ४००० निष्पाप अफगाणी लोक अमेरिकन हल्ल्यांत मृत्युमुखी पडले. त्यातले १६०० ही लहान मुलं होती. 

अमेरिकेने ज्या चुका व्हिएतनाम युद्धाच्या वेळी केल्या, तश्याच चुका तिने अफगाणिस्तानच्या बाबतीतही केल्या आहेत. अफगाणिस्तानमधील जनतेला अमेरिकन लोक, सैनिक किंवा राज्यकर्ते कधीच आपलंसं करू शकले नाहीत. यामागे अमेरिकेचा मुसलमान धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोनही कारणीभूत आहे. अफगाणी जनतेला तालिबानी राजवट कितीही नकोशी वाटली तरी आपला देश अमेरिकन लोकांच्या अधिपत्याखाली द्यायला ते कधीच तयार झाले नाहीत. अमेरिकेने युद्धाच्या नावाखाली केलेला नरसंहार जरी जागतिक पातळीवर अमेरिका लपवत राहिली तरी तो अफगाणी जनतेच्या नजरेतून सुटला नाही. आपल्याच लोकांना अमेरिका आपल्याच घरात घुसून मारते आहे, याने उलट तालिबानच्या धार्मिक लढ्याला एकप्रकारे जनतेत समर्थन वाढत गेलं. जिकडे आपण अफगाणिस्तानमधून निघाल्यावर तालिबानला डोकं वर काढण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी लागेल, असा एक जो अमेरिकेचा अभ्यास होता तो किती चुकीचा होता हे आत्ता सुरू असलेल्या घटनांवरून दिसून येते आहे. १३ एप्रिल २०२१ ला घोषणा केल्यापासून अवघ्या काही दिवसांत तालिबानने जवळपास अफगाणिस्तान आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की तालिबानला संघर्षच करावा लागत नाही आहे. कारण अमेरिकेच्या चुकीच्या धोरणांमुळे सगळा बाजार उठला आहे.

या सगळ्यांत भारत एका धारदार सुरीवरून प्रवास करतो आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण जे काही चालू आहे त्यात कोणीही जिंकलं तरी भारताचं नुकसान झालेलं आहे आणि पुढे होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत भारतापुढे खरे तर आहे ती परिस्थिती कशी वळण घेते हे बघण्यापलीकडे जास्ती काही पर्याय शिल्लक नाहीत. भारताने जर आपलं सैन्य पाठवलं तर जे अमेरिकेला २० वर्षांत जमलं नाही ते भारताला काही महिन्यात जमणं शक्यच नाही. निदान काही वर्षं तरी ही लढाई भारताला करत बसावी लागेल. त्यातून भारत तालिबानच्या रडारवर आला तर पाकिस्तान आणि तिथल्या अतिरेकी संघटनांना हाताशी धरून भारतात आतंकवादी हल्ले होण्याची शक्यता प्रचंड प्रमाणात वाढेल. कोरोनापासून आपली अर्थव्यवस्था अजून सावरलेली नाही. पेट्रोल-डिझेलचे भाव, महागाई वाढलेली आहे. अश्या काळात युद्धात उडी घेण्याचा निर्णय अंगलट येऊ शकतो. दुसरा पर्याय म्हणजे राजनैतिक दृष्ट्या भारताने शांतपणे दोन्ही बाजूला राहणं, जो जिंकेल त्याच्या सोबत जाणं. हा सगळ्यांत सुरक्षित पर्याय नक्कीच आहे. पण जे महत्व भारताला अफगाणिस्तान आणि एकूणच त्या पटलावर प्राप्त झालं होतं. ते पूर्णपणे कमी होणार. कारण भारत बघ्याची भूमिका घेतो असा संदेश जाणार. याचा फायदा नक्कीच पाकिस्तान, चीन घेणार. त्यामुळे भारतासाठी हा पर्याय सुरक्षित असला तरी त्याचे दूरगामी परिणाम भारताच्या हिताचे नाहीत. 

भारताने नक्की काय भूमिका घ्यावी? यावर आत्ता काही भाष्य करणं तितकंसं योग्य नाही. कारण भारताच्या हातात कोणतेच पत्ते नाहीत. समोरचा काय खेळतो त्यावर आपली चाल अवलंबून असणार आहे. अनेकदा अशी परिस्थिती येते की जेव्हा आपण पत्त्यांच्या डावात कोणीतरी हुकूम करण्याची वाट बघत बसतो. कारण आपल्याकडे सगळ्याच रंगांचे पत्ते असतात. आता परिस्थिती काय समोर येते त्यावर आपली प्रतिक्रिया अवलंबून असेल असे मला तरी व्यक्तिशः वाटते. भारताने जरी तालिबानशी संपर्क करण्याचे प्रयत्न केले त्याला तितकासा प्रतिसाद तालिबानकडून मिळालेला नाही. तालिबान राजवट पाकिस्तानकडे झुकलेली आहे हे उघड वास्तव आहे. त्यामुळे भारताची डाळ तिथे कितपत शिजेल याबद्दल शंका आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानच्या सरकारकडून जमीन आणि सत्ता दोन्ही वेगाने तालिबानकडे सरकत आहे. जरी तालिबान आणि तत्कालीन सरकारमध्ये तह झाला तर तालिबान हे मेजॉरिटी मध्ये असल्याने त्यांच्या अटी स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय तत्कालीन अफगाणिस्तान सरकारकडे उरणार नाही. अर्थातच भारताने जे वर्चस्व गेल्या २० वर्षांत प्रस्थापित केलं होतं, ते कमी होणार आहे किंवा संपुष्टात येणार आहे. 

कोणी म्हणेल की भारताने इतका पैसा, मदत का अफगाणिस्तानला दिली? तर त्यामागे खूप मोठा हेतू होता. अफगाणिस्तानात मदत करून पाकिस्तानवर वचक ठेवणं भारताला सहज शक्य होतं. त्याप्रमाणे गोष्टी घडतही होत्या. भारताने कधीच धार्मिक प्रवृत्तीच्या जेहादला खतपाणी घातलं नव्हतं. त्यामुळेच आजही अफगाण लोकांच्या मनात भारताबद्दल आदरच आहे. पुढे काय होणार याचं भविष्य कोणीच आधी सांगू शकत नाही. जगातील अर्ध्यापेक्षा जास्ती युद्धांना अमेरिका कारणीभूत आहे. अमेरिकेमुळे अनेक युद्धं आजही नाहक सुरू आहेत हा इतिहास आहे. अफगाणिस्तान तर आता अमेरिकेच्या धोरणांचे सगळ्यात मोठे अपयश म्हणून पुढे येतो आहे. याचे परिणाम सर्व जगाला भोगावे लागणार आहेत. चीन आणि पाकिस्तानही यांतून सुटणार नाहीत, जे आज तालिबानला छुपी मदत करत आहेत. पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर तालिबान लोकांना लढण्यासाठी शस्त्रे पुरवली जात आहेत. चीन तालिबानला हाताशी धरून सिपेक पूर्ण करण्याचा विचार करत आहे. पण चीन हे विसरतो आहे की त्यांच्या देशात मुसलमान लोकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात तालिबान उतरणार हे निश्चित आहे. जसं वर म्हटलं की भारताचं अनेक प्रकारे नुकसान यात होणार आहे. चाबहार बंदर प्रकल्पही अडचणीत येणार आहे. सलमा धरणावर तालिबानने कब्जा केला आहे. भारताने दिलेलं लढाऊ हेलिकॉप्टर तालिबानने आपल्या ताब्यात घेतलं आहे. एक प्रकारे या सगळ्या काळात भारताने शांतपणे आपलं नुकसान बघणं यापलीकडे भारताकडे दुसरे पर्याय नाहीत. 

तालिबान राजवटीत जो नरसंहार आणि स्त्रियांवर जे अत्याचार होणार आहेत, त्याची कल्पनाच न केलेली बरी. जगातील प्रत्येक हत्याकांडावर ट्विट आणि मेणबत्ती मोर्चे काढून भारताने विरोध करावा हे सांगणारे पुरोगामी लोक आज शेपूट गुंडाळून याच नरसंहाराचं धर्माच्या नावाखाली संरक्षणासाठी समर्थन करताना दिसले तर मला आश्चर्य वाटणार नाही. अमेरिकेने जो गोंधळ माजवला त्यासाठी नक्कीच अमेरिका दोषी आहे पण जे वादळ आता सुरू झालं आहे, त्यात जो विध्वंस होणार आहे त्याची जबाबदारी स्वतःच्या डोक्यावर घेण्याची तयारीही याच लोकांनी करायची आहे. या वादळातील वाऱ्यांनी आता भारताकडे यायला सुरूवात केली आहे. ते वेळीच थोपवयाचं असेल तर संपूर्ण जगाने एकत्र येण्याची गरज आहे. पण स्वतःच्या फायद्यासाठी आपल्याच लोकांना मारणारी राष्ट्रं एकत्र येतील असं सध्यातरी मला वाटत नाही. थोडक्यात काय तर खारे वारे आणि मतलई वारे आता एका वादळात परावर्तित झालेले आहेत. समुद्राला उधाण आलेलं आहे. वादळ येणार हे ठरलेलं आहे. पण त्याची व्याप्ती किती असणार आहे हे येणारा काळच ठरवेल. 

क्रमशः 

फोटो स्त्रोत :- गुगल (पहिल्या फोटोत भारताचं हेलिकॉप्टर तालिबानी लोकांच्या हातात आणि दुसऱ्या फोटोत तालिबानी फौजा आगेकूच करताना) 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Thursday, 12 August 2021

वारसा देणाऱ्या एका आईची गोष्ट... विनीत वर्तक ©

 वारसा देणाऱ्या एका आईची गोष्ट... विनीत वर्तक ©

आपला वारसा मागे ठेवून जाणं म्हणजे काय? वारसा या शब्दाचे अनेक अर्थ आपल्यापैकी प्रत्येकजण काढतो. कोणासाठी तो पैसा, कोणासाठी जमीन-मालमत्ता असा तो असतो.पण खरा वारसा म्हणजे पुढल्या पिढीवर पडणारी आपल्या व्यक्तिमत्वाची छाप. यातील व्यक्तिमत्वाची छाप आपण कशी मागे ठेवतो याला ही अनेक कांगोरे आहेत.अनेक खेळाडूंनसाठी वारसा म्हणजे त्यांनी केलेले विक्रम किंवा मिळवलेले पुरस्कार आणि पदकं. पण या सगळ्या भाऊगर्दीत वारसा या शब्दाला एका धावपटूने एका वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. ती खेळाडू म्हणजे 'एलिसन फेलिक्स'. 

एलिसन फेलिक्स ही एक अमेरिकन धावपटू आहे. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत तिने तब्बल ११ वेळा ऑलम्पिक पदकं जिंकली आहेत. ती अमेरिकेची सर्वाधिक ऑलम्पिक पदकं जिंकणारी धावपटू आहे. तिची ऑलम्पिक मधील कामगिरी तिच्या खेळातील पराक्रमाची साक्ष देणारी आहे. पण तिच्या मते, 

"[A legacy] goes so much further than just performing and running fast times, but it's about speaking up," It's about trying to make a difference."  

एलिसन फेलिक्स... 

म्हणतात नं की, काही खेळाडू हे वेगळ्याच मातीचे बनलेले असतात. तिच्या या शब्दांचा अर्थ जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर तिच्या कारकिर्दीत आपण थोडं डोकवायला हवं तर त्या शब्दांचं महत्व आपल्याला जाणवून येईल. २०१८ साली आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर तिने आई बनण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही महिला धावपटूंसाठी मातृत्व स्विकारणं म्हणजे तिच्या कारकिर्दीचा अंत असा एक समज जगामध्ये होता. 'नायके' हा जगप्रसिद्ध खेळांच्या बुटाचा ब्रँड ज्याचं ब्रिदवाक्य आहे, 

"Just do it" 

तो याच एलिसन फेलिक्स चा मुख्य प्रायोजक होता. पण तिने आई बनण्याचा निर्णय घेतल्यावर नायके ने तिच्या करारा नुसार देण्यात येणाऱ्या रकमेत तब्ब्ल ७०% कपात केली आणि जर ती आपल्या खेळाचा दर्जा राखू शकली नाही तर तिच्यावर नुकसानीचा दावा ठोकण्याची तरतूद केली. एकीकडे आपल्या ब्रिदवाक्याने लोकांना भुरळ घालणाऱ्या नायके च्या फोलपणा विरुद्ध एलिसन फेलिक्स ने बंड केलं. नायके सारख्या प्रसिद्ध ब्रँड च्या विरुद्ध तिने शड्डू ठोकून आई बनणे हा काही गुन्हा नाही हे निक्षून सांगितलं. 

आई बनायचं की एक उत्तम धावपटू? या कचाट्यात सापडलेल्या एलिसन फेलिक्स ने दोन्ही गोष्टींना आपलसं करण्याचा निर्णय केला. तिने नायके ला बाहेरचा रस्ता दाखवला आणि स्वतःचा 'सायश' नावाचा ब्रँड तिने बाजारात उतरवला. हे करताना तिने केलेलं ट्विट तिच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी बाजू मांडते. तिच्या ट्विट मधील शब्दांचा केलेला हा स्वैर अनुवाद, 

एलिसन फेलिक्स म्हणते, 

मी आयुष्यभर धावत आहे. मी त्यात खूप चांगली आहे. मला मिळालेली पदकं माझ्याकडे असलेल्या निपुणतेची साक्ष देण्यास पुरेशी आहेत. पण मला थांबण्याची भीती वाटते. धावण्याशिवाय माझी ओळख माझी मलाच माहित नाही. बाकीच्या स्त्रियांप्रमाणे आई होणं हे माझ्या कारकिर्दीसाठी एक प्रकारची फाशीची शिक्षा असेल याचा विचार करून मला भीती वाटायची. पण तरीही मी निर्णय घेऊन मी मातृत्व स्विकारलं. माझ्या गर्भधारणेच्या वेळी मला लिंग अन्यायाचा सामना करावा लागला. माझ्या प्रयोजकाने (नायके) ने माझ्या मातृत्वाला पाठिंबा दिला नाही. त्यांनी त्या काळात माझ्यावर केलेल्या अन्यायापासून मी पळून जाऊ शकत नाही. 

मला असं सांगितलं गेलं की, 'स्वतःची जितकी प्रत आहे तसं वागावं'. धावपटू नी नुसतं धावायचं असते कारण तो एक धंदा आहे. पण मला हे रुचलं नाही. मी त्या विरुद्ध आवाज उठवला, कोणत्याही महिला धावपटूला आई बनण्याचा हक्क आहे आणि या काळात तिचं संरक्षण केलं गेलं पाहिजे. महिला धावपटूनां आपलं करिअर किंवा मातृत्व यातील एक गोष्ट स्वीकारण्याचे दडपण यायला नको. माझ्या लढ्यामुळे आता प्रयोजतकाच्या करारात अनेक महिला धावपटूंना या बाबतीत संरक्षण दिलं गेलं आहे.

माझ्या गर्भधारणे दरम्यान अडचणी उध्दभवल्याने मला जाणवले की माझ्या आवाजाचा उपयोग दुसऱ्या अन्यायाबद्दल जागरूकता आणण्यासाठी करणे ही आवश्यक आहे. अमेरिकन आरोग्य व्यवस्थेपमध्ये वांशिक अन्याय केला जात आहे. त्या संदर्भात अमेरिकन काँग्रेस शी मी बोललेली आहे. यापुढे ही अन्यायाविरुद्ध पुकारलेला माझा लढा मी सुरु ठेवणार आहे. 

माझ्या लढ्यामुळे यावर्षी ऑलम्पिकसाठी कोणीही माझं प्रायोजकत्व घेण्यासाठी पुढे आलेलं नाही. प्रायोजकत्वा मधील अटींमध्ये बदल करण्यासाठी विनवणी करून मी थकले आहे. त्यामुळे आता मीच ते तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. 

तर, मी आणि काही महिला मिळून आम्ही आमचा स्वतःचा ब्रँड सुरू केला आहे. ज्याला 'सायश' असं नाव दिलं आहे. हा ब्रँड महिलांसाठी महिलांनी तयार केला असून त्यांच्याद्वारे उत्पादनांची रचना आणि विकास केला गेला आहे. मी माझ्या धावण्याच्या शर्यतीत वापरण्यात येणाऱ्या रेसिंग स्पाइक्स वापरून त्याला सुरुवात केली आहे. आम्ही महिलांच्या जीवनशैलीचे स्नीकर्स पुढे आणत आहोत आणि ते त्या समस्त महिला वर्गाच्या मदतीने तयार करत आहोत.  

मी हे सर्व प्रत्यक्षात साकार होणाऱ्या क्षणांचा भाग होण्यासाठी वाट पाहू शकत नाही. मी ज्या बुटांमध्ये स्पर्धा करते त्यापेक्षा या ब्रँड ने उत्पादन केलेली उत्पादने माझ्यासाठी खूप जास्त महत्वाची आहेत. हा ब्रँड एका नवीन आशेची, समाजाच्या स्वीकृती आणि समाजात बदल घडवण्याच्या शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. मला आशा आहे की तुम्हालाही ते बदल जाणवतील.

जेव्हा तुम्ही मला धावताना पाहता, तेव्हा जाणून घ्या की मी फक्त पदकांसाठी आणि पुरस्कारांसाठी धावत नाही. मी बदल घडवण्यासाठी धावत आहे. मी प्रत्येक माणसाच्या समानतेसाठी धावत आहे. मी आई म्हणून धावत आहे. मी महिलांसाठी धावत आहे. कोणत्याही गोष्टीपेक्षा, मी भविष्याच्या दिशेने धावत आहे जिथे कोणत्याही महिलेला किंवा मुलीला तिचे स्थान माहित असल्याचे सांगितले जाणार नाही.

या उन्हाळ्यात भेटू,

एलिसन फेलिक्स...

आई, कार्यकर्ता, उद्योजक आणि सहा वेळा ऑलम्पिक सुवर्णपदक विजेती.

हे ट्विट तिने टोकियो ऑलम्पिक सुरु होण्यापूर्वी केलं होतं. टोकियो ऑलम्पिक संपेपर्यंत तिने सातव्यांदा ऑलम्पिक सुवर्ण पदक जिंकून आपल्या सर्व ऑलम्पिक पदकांची संख्या ११ वर नेली असून ती अमेरिकेची सगळ्यात जास्त ऑलम्पिक पदक पटकवणारी धावपटू ठरली आहे. आपण मातृत्व स्वीकारलं म्हणजे आपलं ध्येय आणि आपलं करिअर एक खेळाडू म्हणून संपत नसते हे तिने जगातील सर्व महिला खेळाडूंना दाखवून दिलं आहे. नायके सारख्या जगप्रसिद्ध ब्रँड चे दात त्यांच्यात घशात घालून आपल्या मागे आपल्या कृतीतून असा एक संपन्न वारसा ठेवला आहे. जो येणाऱ्या अनेक पिढयांना एक स्री ठरवलं तर काय करू शकते याची प्रेरणा देत राहिल. 

एलिसन फेलिक्स चा हा प्रवास प्रत्येक मातृत्व स्वीकारणाऱ्या महिलेला एक नवी ऊर्जा देणारा ठरेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. एलिसन फेलिक्स ने जो लढा दिला आहे त्यासाठी तिला कडक सॅल्यूट आणि तिच्यातील त्या खिलाडू वृत्ती, जिद्द, बाण्याला माझा साष्टांग नमस्कार. तिच्या कर्तृत्वाचा हा वारसा नक्कीच आपल्यापैकी प्रत्येकाने विचार करण्यासारखा आहे. तो नेहमीच आपल्याला कठीण परिस्थितीत मार्गदर्शक ठरेल.    

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.