Thursday, 30 January 2020

समुंदर के सिकंदर... विनीत वर्तक ©

समुंदर के सिकंदर... विनीत वर्तक ©

आपण बघतो ऐकतो त्यापेक्षा पडद्यामागे घडणाऱ्या घटना खूप वेगळ्या असतात. अनेकदा ह्या पडद्यामागच्या घटनांचा खूप मोठा प्रभाव पडद्यावर दिसणाऱ्या घटनेत सामावलेला असतो. साधारण वर्षभरापूर्वी भारत आणि पाकिस्तान दरम्यान अश्याच काही नाट्यमय घडामोडी घडल्या. ह्यातील दिसणाऱ्या घडामोडी मधील थरार अनेकांनी बघितला आणि त्यावर बरेच चिंतन पण झालं. ह्या सर्व घडामोडीं मधला पडद्यामागचा भाग मात्र अंधारात राहिला. पुलवामा मध्ये ४० सी.आर.पी.एफ. जवान अतिरेकी हल्यात शहीद झाल्यावर भारत काय उत्तर देणार ह्याकडे पूर्ण जगाचं लक्ष होतं. उरी हमल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक ने पाकिस्तान ले हे कळून चुकलं होतं की,

'ये हिंदुस्तान अब चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान हैं, ये घर मैं घुसेगा भी और मारेगा भी' 

पुलवामा हल्यानंतर पाकिस्तान ला माहित होतं की 'कुछ बडा होनेवाला हैं, बस कब, कहा, कैसे इसका पता नहीं था'. इकडे राजकीय नेतृत्व तसेच भारतातील सैन्य दलाने ह्याच उत्तर पाकिस्तान ला त्याच्याच भाषेत देण्यासाठी कंबर कसली होती. पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक कधी होणार ह्याकडे पूर्ण जगाचं लक्ष असताना भारताने आपल्या तिन्ही दलांना युद्धासाठी तयार राहण्याच कळवलं होतं. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताच्या ७५१६ किलोमीटर लांब किनाऱ्यांची तसेच हिंद महासागरातील सगळ्यात शक्तिशाली नौसेनेने आपली शक्ती भारताच्या पश्चिम किनारपट्टीकडे वळवली.

भारताची सगळ्यात शक्तिशाली विमानवाहू युद्धनौका आय.एन. एस. विक्रमादित्य ने आपल्या ताफ्यासह अरबी समुद्रात पाकिस्तान च्या दिशेने कूच केलं होतं. आय.एन. एस. विक्रमादित्य हिंद महासागरातील एक भूभाग म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. जवळपास ४५,४०० टन इतकं अवाढव्य वजनाचं पाणी बाजूला सारत ताशी ५६ किलोमीटर / तास वेगाने जवळपास २५,००० किलोमीटर च अंतर कापण्यास सक्षम असलेली तसेच ह्याची इंजिन जवळपास १८०,००० हॉर्सपॉवर ची शक्ती निर्माण करतात. इतकी मोठी युद्धनौका बराक १ आणि बराक ८ मिसाईल सोबत २६ मिग २९ के लढाऊ विमान आणि १० कामोव्ह के ३१ लढाऊ हेलिकॉप्टर घेऊन जेव्हा चाल करते. तेव्हा शत्रू काहीच करू शकत नाही. ह्या सोबत तिच्या सोबत जगातील फक्त मोजक्या देशांकडे असलेली आय.एन.एस. चक्र ही आण्विक पाणबुडी ( आय.एन.एस. चक्र पाणबुडी तब्बल ८१४० टन वजनाची असून ६०० मीटर खोल पाण्यातून प्रवास करू शकते. ही कितीही दिवस पाण्याखाली राहू शकते तसेच ही पाणबुडी स्टेल्थ प्रकारातील आहे. आण्विक ऊर्जेमुळे कोणताच आवाज ही पाणबुडी करत नाही त्यामुळे शत्रू ला हिचा ठावठिकाणा लागणं अशक्य असते. ) ह्या शिवाय भारताची अद्यावत पाणबुडी आय.एन.एस. कलावरी सह डिस्ट्रॉयर, फ्रिगेट ह्या जवळपास ६० युद्धनौकांनी अरबी समुद्रात ठाण मांडल होतं.

पाकिस्तान भारतीय नौदलाच्या युद्ध तयारीमुळे खूप घाबरला असं म्हंटल्यास वावगं ठरणारं नाही. ह्यामागे काही कारणं आहेत. पाकिस्तानी नौदलाची शक्ती भारताच्या तुलनेत कुठेच नाही. आय.एन. एस. विक्रमादित्यसह भारताचा फौजफाटा हा पूर्ण ताकदीनिशी अरबी समुद्रात उतरला होता. ज्याला उत्तर देण्याची हिंमत पाकिस्तानच्या युद्धनौकांकडे नव्हती. ह्या शिवाय ब्राह्मोस ह्या जगातील सगळ्यात वेगवान सुपर सॉनिक मिसाईल ने ह्यातील फ्रिगेट आणि डिस्ट्रॉयर सज्ज होत्या. ज्या मिसाईल चं उत्तर देण्याची ताकद अमेरीका सारख्या देशाकडे नाही तिकडे पाकिस्तान चा विचार न केलेला बरा. ही भिती इतकी होती की
पाकिस्तान ने आपली पाणबुडी पी.एन.एस. साद ला पाकिस्तान च्या पश्चिमी तटावर पाण्याखाली लपवलं. ह्यामुळे भारतीय नौदल अजून जास्ती युद्धासाठी सज्ज झालं कारण ही पाणबुडी अवघ्या ३ दिवसात गुजरात पर्यंत येऊ शकत असल्याने भारतीय नौदलाच्या प्रत्येक युद्धनौकेला अरबी समुद्र ते अगदी आंतरदेशीय सीमांमध्ये हिचा शोध घेऊन कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी तयार राहण्यास सांगितलेलं होतं.

तब्बल २१ दिवस भारताच्या ६० पेक्षा अधिक युद्ध नौका पाकिस्तान अरबी समुद्र ते पाकिस्तान च्या सगळ्या बंदरावर लक्ष ठेवून पाकिस्तान च्या पाणबुडी चा शोध घेतं होत्या. पाकिस्तान चं एक पाऊल पुढे आणि कराची बंदर ते ग्वादर बंदर जगाच्या नकाशावरून पुसलं हे नक्की होतं इतकी तयारी भारताच्या नौदलाची होती. त्यामुळे बालाकोट हल्यानंतर आण्विक हल्याची दर्पोक्ती करणाऱ्या पाकिस्तानला आपलं शेपूट गुंडाळावं लागलं होतं. कारण ह्या ६० युद्धनौका पाकिस्तान ला काही तासात घुडगे टेकवायला लावू शकतात ह्याची पूर्ण कल्पना पाकिस्तान ला पुरेपूर होती. जेव्हा पूर्ण जग बालाकोट हवाई हल्याकडे बघत होतं तेव्हा भारताचे 'समुंदर के सिकंदर' पडद्यामागून पाकिस्तान ला त्याची औकात दाखवून देतं होते. बालाकोट हवाई हल्ला, विंग कमांडर अभिनंदन वर्धमान ला बिनशर्त सोडण ह्या सगळ्या नंतर पाकिस्तान काहीच करू शकला नाही ह्याचं बरचसं श्रेय ह्या समुद्रातील सिकंदराचं आहे.

आज ह्या सगळ्या घटनांना एक वर्ष पूर्ण होतं असताना पडद्यामागचे सिकंदर आजही निळ्या पाण्यात भारताच्या किनारपट्टीची सागरी सुरक्षा करत आहेत. भारताच्या समुंदर के सिकंदरांना माझा कडक सॅल्यूट.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Monday, 27 January 2020

झेन... विनीत वर्तक ©

झेन... विनीत वर्तक ©

माझ्या कामाच्या ठिकाणी प्रत्येक आठवड्यात आग लागल्यावर, एखादी आपत्कालीन स्थिती उदभवल्यावर प्रत्येकाने कुठे जमायचे, कोणत्या पद्धतीची आपत्कालीन स्थिती आहे त्याचा विचार करून आपल्या ठरलेल्या ठिकाणी कमीत कमी वेळात सुरक्षित कसं पोहचायचं ह्याची ड्रिल केली जाते. समुद्राच्या मधोमध काम करत असताना २०० लोकांपैकी प्रत्येकाचा ठावठिकाणा लागणं अतिशय महत्वाचे असते. त्यासाठी ह्या ड्रिल केल्या जातात आणि त्या ही न सांगता कोणत्याही वेळी. ह्या मागील उद्देश एकच की अगदी गाढ झोपेतून उठल्यावर सुद्धा घाबरून न जाता आपल्यासोबत आपल्या सहकाऱ्यांना सुरक्षित स्थळी पोहचता यावं. आमच्यासाठी ह्या गोष्टी नित्याच्या असल्या तरी सामान्य लोकांना अश्या परिस्थितीत नक्की काय करायचे हे माहित नसल्याने घाबरून, गोंधळून अश्या एखाद्या आपत्कालीन स्थिती मध्ये होणाऱ्या अपघातात जास्ती बळी जातात.

ऑगस्ट २०१८ ला मुंबईच्या परळ येथील 'क्रिस्टल टॉवर' ह्या बिल्डींग च्या १२ व्या मजल्यावर सकाळी ८ वाजता आग लागली. ह्याच बिल्डींग च्या १६ व्या मजल्यावर ११ वर्षाची 'झेन सदावर्ते' रहात होती. बघता बघता आग पसरू लागली. धुराचे लोट वरच्या मजल्यावर येऊ लागले. आगीपेक्षा त्यातुन निर्माण होणाऱ्या धुरात अतिशय विषारी, घातक असे गरम वायू असल्याने ते नाकावाटे शरीरात गेल्यास ऑक्सिजन ची कमतरता आणि ह्या विषारी वायूमुळे जीव जाण्याचा धोका वरच्या मजल्यावर राहणाऱ्या सगळ्यांना होता. १६ व्या मजल्यावर झेन सदावर्ते च्या कुटुंबा सोबत इतर शेजारी घाबरून जमा झाले होते. गच्चीचा दरवाजा बंद असल्याने तिकडे जाणं शक्य नव्हतं आणि खालुन येणारे धुराच्या लोटांमुळे प्रत्येकाला श्वास घेण्यात अडचण येत होती. त्यामुळे सगळेच गोंधळात आणि घाबरलेले होते. 

११ वर्षाच्या झेन सदावर्ते ने परिस्थितीच गांभीर्य ओळखलं आधी तर सगळ्यांना शांत करताना तिने तिला शाळेत शिकवल्या गेलेल्या आगीच्या वेळेस आपत्कालीन स्थिती मध्ये घ्यायच्या सुचना सर्वांना समजावून सांगितल्या. ११ वर्षाची चिमुरडी अश्या स्थितीत शांतपणे सगळं सांगते हे पाहून बाकीच्यांना ही धीर आला. झेन सदावर्ते ने सर्वांना आपल्या तोंडावर ओला केलेला रुमाल कपडा धरून त्यातून श्वास घेण्याची सूचना केली. आपल्या शाळेत आग लागल्यास आगीच्या विषारी धुरापासून बचाव करण्यासाठी ओला केलेला कपडा एका फिल्टर चं काम करतो. त्याच सोबत आत येणारी हवा थंड होऊन आपल्या नाकातोंडा पर्यंत पोहचते. ह्यामुळे विषारी धुरापासून आपला बचाव होतो. ह्या गोष्टीची कल्पना तिला होती. तिच्या सूचनेवर अंमल करताना तिकडे असलेल्या सगळ्यांनी लागोलाग आपल्या तोंडावर ओला रुमाल घेऊन श्वास घेण्यास सुरवात केली.

झेन सदावर्ते ने सांगितल्या प्रमाणे सर्वांना ह्या गोष्टीमुळे निट श्वास घेता येऊ लागला. तिच्या सतर्कते मुळे काही तासांनी आलेल्या अग्निशामक दलाच्या मदतीपर्यंत सर्वजण व्यवस्थित राहिले. झेन सदावर्ते ने शाळेत शिकवलेल्या ट्रेनिंग ने जवळपास १७ लोकांचा जीव वाचवला. समजा ह्या लोकांनी झेन सदावर्ते चं ऐकलं नसतं तर कदाचित ह्यातलं कोणीच जिवंत राहिलं नसतं.

झेन सदावर्ते च्या शब्दात सांगायचं झालं तर,

"I remembered the first thing they had asked us was to stay calm and ask others too.That is what I told my parents. Later, I asked them to wet a cloth and cover the face and breathe through it, I had learned this technique while researching for my Class 3 project for Disaster Management. I had also learnt during the project that in such scenario one should not panic. I told everyone exactly the same".

७ वीत शिकणाऱ्या ११ वर्षाच्या झेन सदावर्ते च्या बहादुरी आणि सतर्कतेने १७ लोकांचा जीव वाचवला. ह्या गोष्टीची दखल भारत सरकारने घेताना Indian Council for Child Welfare's National Bravery Award for 2019 साठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

ह्या प्रसंगातून शिकून आपण अश्या आपत्कालीन स्थितीमध्ये काय करायचं? ह्याच प्रशिक्षण आपल्या बिल्डिंग, सोसायटी तसेच शाळा कॉलेज मधून अनिवार्य करायला हवं. झेन सदावर्ते च्या बहादुरीसाठी तिला कडक सॅल्यूट आणि पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Sunday, 26 January 2020

बेवारस प्रेतांचा देवदूत... विनीत वर्तक ©

बेवारस प्रेतांचा देवदूत... विनीत वर्तक ©

आयुष्यातील अवचित घडणाऱ्या कधी कधी पुर्ण आयुष्य बदलवून टाकतात. होत्याच नव्हतं व्हायला एक क्षण पुरेसा असतो. आपण ह्या गोष्टींना कसं सामोरं जातो ह्यावर आपला पुढला प्रवास अवलंबून असतो. असं म्हणतात की, आयुष्यात काही लक्ष्य असायला हवं असं लक्ष्य जे मिळवण्यासाठी आपण तहान भूक आणि स्वतःला त्यात विसरून जाऊ. ते लक्ष्य म्हणजेच आयुष्य असेल. अशीच एक घटना २७ वर्षांपूर्वी अयोध्या,उत्तर प्रदेश इकडे राहणाऱ्या मोहम्मद शरीफ ह्यांच्या बाबतीत घडली. त्या घटनेने मोहम्मद शरीफ ह्यांना एक लक्ष्य दिलं असं एक लक्ष्य ज्याचा विचार करताना पण आपल्या आंगावर काटा येईल. पण मोहम्मद शरीफ गेली २७ वर्ष ते पूर्ण करत आहेत आणि आज वयाच्या ८० व्या वर्षी सुद्धा त्यात खंड पडलेला नाही.

२७ वर्षापूर्वी औषध आणायला सुलतानपूर इकडे गेलेला त्यांचा मुलगा मोहम्मद रईस हा परत आलाच नाही. अनेक ठिकाणी चौकशी केल्यावर पण त्याचा कुठे थांगपत्ता लागला नाही. मित्र, नातेवाईक, दुकानदार ह्या सगळ्यांना विचारून पण त्याची काहीच माहिती मिळाली नाही. जवळपास एक महिन्यांनी त्यांना कळालं की त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. त्याचे अंतिम संस्कार बेवारस म्हणुन केले गेले. त्याच्या कपड्यावर असलेल्या टेलर च्या टॅग वरून पोलिस मोहम्मद शरीफ ह्यांच्या पर्यंत पोहचले. कपड्यावरून तो आपलाच मुलगा होता हे त्यांना कळून चुकलं. आपल्या मुलाचे अंतिम संस्कार पण आपल्या वाट्याला आले नाहीत ह्या विचाराने मोहम्मद शरीफ ह्यांना कुठेतरी आत भांडावून सोडलं. हाच एक क्षण होता जेव्हा त्यांनी आपलं लक्ष्य ठरवलं की अयोध्या च्या ह्या भूमीवर कोणाचेही अंतिम संस्कार बेवारस म्हणुन होणार नाही. भले मग ती व्यक्ती मुसलमान, हिंदू, ख्रिश्चन किंवा अजून कोणत्याही धर्माची असो. प्रत्येक व्यक्तीचे अंतिम संस्कार त्यांच्या धर्माप्रमाणे मी करेन.

मोहम्मद शरीफ बेवारस प्रेतांचे देवदूत बनले. गेल्या २७ वर्षात त्यांनी ५५०० पेक्षा जास्ती बेवारस मृतदेहांचे अंतिम संस्कार केले आहेत. ह्यात जवळपास ३००० पेक्षा जास्ती हिंदू तर २५०० पेक्षा जास्ती मुसलमान मृतदेहांचा समावेश आहे. जो ज्याचा धर्म असेल त्या प्रमाणे म्हणजेच हिंदू असेल तर विधीनुसार अग्नी देऊन आणि जर मुसलमान असेल तर विधिपूर्वक दफन त्यांनी केलं आहे. आज वयाची ८० वर्ष झाली तरी त्यांच लक्ष्य तेच आहे. हे करण्यासाठी त्यांना नगर पालिकेकडून प्रति महिना फक्त १५ रुपये मिळतात. प्रत्येक महिन्याला ७-८ मृतदेहाचं अंतिम संस्कार करताना त्यांना लोकांकडून, संस्थांकडून मिळणाऱ्या मदतीवर अवलंबून रहावं लागते. सायकल चं दुकान चालवून एका भाड्याच्या घरात राहून पण त्यांनी त्यांच देवदूताच काम सुरु ठेवलं आहे. त्यांच्या ह्या हिमालया एवढ्या उत्तुंग कार्याची दखल घेताना भारत सरकारने त्यांना २०२० च्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे.

आज मोहम्मद शरीफ ह्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यावर खरे तर पद्मश्री पुरस्काराची उंची हिमालया एवढी वाढली आहे. गेली अनेक वर्ष हे पुरस्कार म्हणजे मागे- पुढे करणाऱ्या लोकांचे आणि ओळखी असणाऱ्या लोकांचे झाले होते त्यामुळेच भारताच्या जनमानसात त्याची उंची कमी झाली होती. ते देणाच्या पद्धतीवरचा विश्वास उडाला होता. पण येत्या काही काळात मिळालेले पुरस्कार ज्यात  मुहम्मद शरीफ ह्यांचा समावेश आहे त्याने ह्या पुरस्कराच गतवैभव आणि लोकांच्या मनात विश्वास नक्कीच पुन्हा प्राप्त होईल ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही. गेली २७ वर्ष एका कठीण समयी ठरवलेल्या लक्ष्यावर कोणत्याही मदतीशिवाय काम करत राहताना ५५०० पेक्षा जास्ती बेवारस मृतदेहांच अंतिम संस्कार विधिवत करणाऱ्या देवदूतास माझा साष्टांग नमस्कार. 

मोहम्मद शरीफ चाचा तुम्ही मृत्यूलाही जिंकलं. कदाचित यम सुद्धा त्यांना म्हणत असेल, 'आपको मेरी उमर लग जाये'......

फोटो स्रोत :- गुगल 
 
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Saturday, 25 January 2020

ब्लॅक टायगर... विनीत वर्तक ©

ब्लॅक टायगर... विनीत वर्तक ©

भारताच्या सीमा सुरक्षित ठेवण्यात अनेक लोकांचं रक्त सांडलं आहे. आजही त्यांच्या बलिदानाची दखल घेतली जात नाही. काही मूठभर लोकांच्या बलिदानाचे मात्र सगळीकडेच गोडवे गायले जातात. पडद्यावरचे कलाकार तर सगळ्यांना दिसतात पण त्या पडद्यामागे असलेल्या लोकांचं आयुष्य मात्र नेहमीच अंधारात राहते. आज सगळीकडे प्रजासत्ताक दिवस साजरा होतो आहे. पण ह्या देशाच्या सीमांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या आणि शेजारच्या शत्रूच्या प्रत्येक हालचालींची माहिती भारताच्या सैन्य दलाला देणाऱ्या भारताच्या सर्वोत्तम गुप्तहेराला आज आपण सगळेच विसरलो आहोत. 'ब्लॅक टायगर' ह्या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला भारताच्या ( Indian Research and Analysis Wing (RAW) रॉ चा गुप्तहेर म्हणजेच रविंद्र कौशिक (नाबी अहमद शकिर पाकिस्तानी नाव )च्या बलिदानाची जाणीव आपण आजच्या दिवशी ठेवायला हवी. 

भारताच्या 'ब्लॅक टायगर' म्हणजेच रविंद्र कौशिक चा जन्म ११ एप्रिल १९५२ ला राजस्थान झाला. लहानपणापासुन रविंद्रला अभिनयाची प्रचंड आवड होती. त्याच्या ह्याच आवडीमुळे तो रॉ च्या अधिकारांच्या नजरेत आला. रॉ चा एजंट बनल्यावर त्याला अनेक खडतर प्रशिक्षणातुन जावं लागलं. रॉ ने त्याला पाकिस्तानात जाऊन तिथली माहिती भारताला पुरवण्याची जबाबदारी दिली. ह्यासाठी रविंद्र ला उर्दू शिकावी लागली. पाकिस्तानातील अनेक भागांचा अभ्यास करावा लागला. ह्याशिवाय कुराण आणि धार्मिक गोष्टी ही शिकाव्या लागल्या. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी रॉ चा एजंट बनुन रविंद्र कौशिक आता नाबी अहमद शकीर बनला. भारतात त्याच्या नावाचे सर्व रेकॉर्ड रॉ ने पुसून टाकले. आता नाबी अहमद शकीर ने पाकिस्तान च्या कराची विद्यापिठात प्रवेश घेऊन वकीलाची पदवी मिळवली.

ह्या नंतर नाबी अहमद शकीर पाकिस्तान सैन्यात भरती झाला. पाकिस्तान सैन्यात यशस्वीपणे मिसळुन जाताना नाबी अहमद शकीर ने पाकिस्तान सैन्यात मेजर बनण्या पर्यंत मजल मारली. पाकिस्तानात असताना त्याने अमानत नावाच्या मुलीशी लग्न केलं. त्यांना एक मुलगी पण झाली. १९७९ ते १९८३ पर्यंत पाकिस्तानी सैन्याच्या सगळ्या हालचालींची माहिती रविंद्र कौशिक उर्फ नाबी अहमद शकीर भारताच्या रॉ ला पुरवत राहिला. त्याच्या अमुल्य माहितीमुळे भारताने पाकिस्तानचे अनेक मनसुबे मोडीत काढले. त्याच्या ह्या पराक्रमासाठी भारताचे तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण ह्यांनी त्याला 'ब्लॅक टायगर' ही उपाधी दिली.

१९८३ साली इनायत मसीहा नावाचा अजुन एक रॉ एजंट पाकिस्तानात गेला असताना पाकिस्तानी सैनिकांनी त्याला पकडलं व चौकशी च्या वेळी त्याने रविंद्र कौशिक चं नाव उघड केलं. पाकिस्तानी सैनिकांनी नाबी अहमद शकीर म्हणजेच रविंद्र कौशिक ला ताब्यात घेऊन त्याचा अतोनात छळ केला. १९८५ साली त्याला फाशीची शिक्षा झाली पण नंतर त्याला आजन्म कारावासात टाकण्यात आलं. जेल मधुन रविंद्र कौशिक ह्याने आपल्या पत्नीला पत्रे पाठवली होती. एका पत्रात त्याने हताश होऊन लिहिलं होतं,

"क्या भारत जैसे बडे देश मैं कुर्बानी देने वालो को यही मिलता हैं?"

भारताचा ब्लॅक टायगर २००१ साली क्षय रोग आणि हृदयाच्या रोगाने पाकिस्तान मधल्या मुलतान जेल मध्ये शहीद झाला. आज पर्यंत रविंद्र कौशिक ह्यांच कुटुंब भारत सरकारकडे त्यांच्या ह्या कामगिरीची पोचपावती मागत आहे. पण आजही पडद्या मागचा हा ब्लॅक टायगर उपेक्षित आहे. आपण विचार करू शकतो का? वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी आपलं संपुर्ण अस्तित्व देशाच्या पटलावर पुसून टाकत भारताचा हा टायगर एकटाच पाकिस्तान च्या अंधारात भारतासाठी लढला. पण आपण आज त्याची साधी दखल घेऊ शकत नाही हे आपलं दुर्दैव आहे.

आम्ही फक्त पुतळे उभारतो आणि फोटोंना फुले वाहतो. आमच्यासाठी संघर्ष फक्त आणि फक्त दिसणारे लोकं करतात. अर्थात ते ही आमचे हिरो नसतात. चित्रपटात शर्ट काढून नाचणारे आमचे आदर्श तर कोट्यावधी रुपयांचे घोटाळे करून पांढऱ्या कपड्यात वावरणाऱ्या लोकांच्या आम्ही पाया पडतो. चित्रपट गृहात चित्रपटाच्या आधी सुरु होणाऱ्या राष्ट्रगानाला उभे राहायला आमचे पाय लटपटतात आणि साध्या सैनिकाला आम्ही सलाम करत नाही तर पडद्यामागच्या ब्लॅक टायगर चं कोणाला काय पडलं आहे. आज २६ जानेवारी ची सुट्टी रविवारी आली म्हणुन हळहळणारे आम्ही कुठे रविंद्र कौशिक च्या पराक्रमाची नोंद ठेवणार.

कोणाला काही वाटत असलं तरी भारताच्या सर्वोत्तम गुप्तहेराच बलिदान आजच्या दिवशी वाया जाऊ देणार नाही. आजच्या प्रजासत्ताक दिवशी भारताच्या ब्लॅक टायगर ला कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार. 

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Friday, 24 January 2020

दोन चाकांना संशोधनाचे पंख देणारा ह्रिदयेश्वर सिंग भाटी... विनीत वर्तक ©

दोन चाकांना संशोधनाचे पंख देणारा ह्रिदयेश्वर सिंग भाटी... विनीत वर्तक ©

'Intelligence is the ability to adapt to change' -  Stephen Hawking

प्रत्येक माणुस जन्माला येताना आपल्या नशिबाने एक निरोगी आयुष्य घेऊन जन्माला येतो पण सगळेच तसे नशिबवान नसतात. काही लोकांच्या आयुष्याची सुरवात अंधारात होते. पण त्या अंधारात आपलं आयुष्य कुढत बसून काढायचं कि व. पु. म्हणतात तसं आयुष्याचा महोत्सव करायचा हे मात्र ज्याच्या त्याच्या हातात असते. ३ सप्टेंबर २००२ साली जन्माला आलेल्या  ह्रिदयेश्वर सिंग भाटी ह्याच्या आयुष्याची सुरवात ही अशीच एका अंधारात झाली. वयाच्या चौथ्या वर्षी त्याला 'Duchenne muscular dystrophy (DMD) हा स्नायूंचा उपचार नसलेला आजार झाल्याचं निदान झालं. ह्यात स्नायूंमध्ये शक्ती नसल्याने शरीराच्या हालचालीवर मर्यादा यायला सुरवात होते. काही काळानंतर माणुस स्वतःच्या पायावर ही उभा राहु शकत नाही. ह्रिदयेश्वर सिंग भाटी मात्र ह्याने खचला नाही. त्याच ८०% शरीर खचलं तरी मनातून तो ह्या परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करत होता.

ह्रिदयेश्वर सिंग भाटीला लहानपणापासुन बुद्धिबळाची गोडी निर्माण झाली. पण हा खेळ एकाच मित्रासोबत खेळता येतं असल्याने त्याने गणिताचे शिक्षक असणाऱ्या आपल्या वडिलांकडे मोठा बुद्धिबळ पट आणण्याचा हट्ट धरला. ज्यात एकाचवेळी अनेक मित्रांसोबत बुद्धिबळ खेळता येऊ शकेल. वडिलांनी त्याला अश्या प्रकारचा बुद्धिबळ पट कुठेही नसुन हा खेळ फक्त दोघात खेळता येतो असं समजावून सांगितलं. पण त्याने ह्रिदयेश्वर सिंग भाटीच समाधान झालं नाही. एकाचवेळी अनेक लोकांसोबत बुद्धिबळ खेळता येईल असा पट तयार करण्याचं त्याने ठरवलं. आपल्या वडिलांच्या मदतीने ह्रिदयेश्वर सिंग भाटीने वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी ६ लोकांना एकत्र खेळता येईल असा बुद्धिबळ पट निर्माण केला. २०१२ साली जागतिक पटलावर (Patent) एकस्व हक्काची नोंद त्याच्या नावाने झाली. वयाच्या अवघ्या १२ व्या (Patent) एकस्व हक्क घेणारा तो सगळ्यात कमी वयाचा भारतीय ठरला तर जागतिक पटलावर सगळ्यात कमी वयाचा (Patent) एकस्व हक्क घेणारा दिव्यांग व्यक्ती ठरला.

ह्या संशोधनासाठी त्याला (CavinKare Ability Special Recognition Award) ने जागतिक पटलावर सन्मानित करण्यात आलं. ह्या नंतर ह्रिदयेश्वर सिंग भाटी थांबला नाही. आपल्या संशोधनाला पुढे नेताना एकाच वेळी १२ ते ६० व्यक्ती बुद्धिबळ खेळू शकतील अश्या बुद्धिबळ पटलाची त्याने निर्मिती केली असुन त्याची (Patent) एकस्व हक्काची प्रक्रिया सुरु आहे. सुडोकू ह्या खेळात ही त्याने १६-१६ घरांच्या खेळाच्या पटलाची निर्मिती ह्याशिवाय दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प ची निर्मिती त्याने केली आहे. ह्या रॅम्पमुळे दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर ने गाडीत प्रवेश करणे सहज सुलभ झाले आहे. ह्रिदयेश्वर सिंग भाटीने नुकतीच मारुती मोटर्स सोबत मारुती इको गाडीची निर्मिती केली असुन त्याच्या ह्या निर्मितीची (Patent) एकस्व हक्क प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. (Cheapest wheel chair accessible mobility vehicle of world.)

लहानपणी एका अंधारमय आयुष्याला सामोरे गेलेल्या ह्रिदयेश्वर सिंग भाटी वर महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग ह्यांचा खुप प्रभाव आहे. माझ्याप्रमाणे त्यांना ही अश्याच एका दुर्धर आजाराने ग्रासलं होतं पण विश्वाची कोडी सोडवण्यापासुन त्यांना त्यांचा आजार थांबवू शकला नाही. मला ही त्यांच्या प्रमाणे एक वैज्ञानिक बनायचं आहे असं तो आवर्जुन सांगतो,

"I want to be like Hawking who become a famous scientist despite suffering from motor neuron disease."

नुकतचं ह्रिदयेश्वर सिंग भाटीला भारतातील प्रतिष्ठित अश्या 'Bal Shakti Award' ने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं आहे. 

"Bal Shakti Award is given to children in the fields of innovation, social service, education, sports, arts and culture and bravery. Under this, a medal, a cash prize of Rs one lakh, a certificate and a citation are given".

आपल्या व्हीलचेअर च्या दोन चाकांना संशोधनाचे पंख लावून महान  शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग ह्यांचा वारसा पुढे नेणाऱ्या ह्रिदयेश्वर सिंग भाटी ह्याला माझा सलाम. त्याची जिद्द, चिकाटी आणि अंधकारमय आयुष्याचा महोत्सव करण्याची वृत्ती नक्कीच त्याच्या सोबत भारताचे नाव जागतिक पटलावर मोठं करेल ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 

Thursday, 23 January 2020

थोडं मनातलं... विनीत वर्तक ©

थोडं मनातलं... विनीत वर्तक ©

गेल्या आठवड्यात तीन घटनांनी मन थोडं हेलावून गेलं आहे. दोन घटना साहसी खेळातील तर एक घटना आपल्या घरात घडेल अशी आहे. तिन्ही घटनांमध्ये तीन  वेगवेगळ्या लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ह्या तिन्ही घटनांच्या पोस्ट फेसबुक आणि व्हाट्स अप वर खुप ठिकाणी शेअर झाल्या. या तिन्ही घटनांमध्ये नक्की काय घडलं ह्याचा उपापोह त्यात झाला पण आपण ह्या घटनांमधून काय शिकायला हवं हे मात्र कुठेच दिसले नाही. त्याचसाठी थोडं मनातलं लिहावसं वाटलं.

ज्या दोन घटना ट्रेकिंग ह्या साहसी खेळात घडल्या त्या नक्कीच ह्या खेळातील जोखीम दाखवणाऱ्या होत्या. ट्रेकिंग हा खेळ साहसी क्रीडाप्रकारात येतो. त्यामुळे ट्रेकिंग मध्ये जोखीम ही खुप जास्ती आहे. योग्य काळजी न घेतल्यास एक क्षण पण आपला जीव घेऊ शकतो. तुम्ही कितीही अनुभवी असला किंवा एखाद्या चढाई वर अनेक वेळा आरोहण केलं असलं तरी प्रत्येक वेळी जोखीम ही तीच असते हे कोणीच विसरता कामा नये. जेव्हा एखादा अपघात अथवा वैद्यकीय आणीबाणी चा प्रसंग उद्धभवतो तेव्हा मिळणाऱ्या मदतीवर प्रचंड मर्यादा आहेत हे आपण नेहमीच लक्षात ठेवायला हवं. जेव्हा अशी एखादी परीस्थिती येते तेव्हा मदत पोचायला अनेक तासांचा किंवा दिवसाचा ही अवधी लागु शकतो. इतका वेळ वैद्यकीय मदती शिवाय राहणं जिवावर येऊ शकते. अपुरी सुरक्षा साधने, सुरक्षा नियमांनकडे दुर्लक्ष अथवा त्यातलं गांभीर्य लक्षात न घेणं, आपल्या शारिरीक क्षमतानंबद्दल असलेली अनास्था अथवा त्या कडे दुर्लक्ष ह्या गोष्टी ट्रेकिंग सारख्या साहसी खेळात एखाद्या अपघाताला आमंत्रण देणाऱ्या आहेत.

कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे पाऊस पडला की ट्रेकिंग करणाऱ्या संस्था प्रत्येक वर्षी बाहेर येतात. अपुरी साधने, अपुरा अनुभव, आपत्कालीन स्थितीत काय करायचे ह्याचा विचार आणि त्यावर काम करणारी यंत्रणा ह्या सगळ्या गोष्टी कुठेही लक्षात न घेता शेकडोच्या संख्येने ट्रेक आयोजित करणाऱ्या ह्या संस्थेनी साधा फर्स्ट एड बॉक्स ही तपासलेला नसतो. शेकडोंनी तरुण मुलांच्या सह्याद्री मध्ये भरलेल्या जत्रेचे फोटो आपण प्रत्येकांनी पाहिले असतील पण ह्यापैकी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या संस्था सोडल्या तर बाकीच्यांनी ह्या गोष्टींचा कधी विचार केलेला नसतो. ह्यातील अनेक संस्था आणि ग्रुप हे ट्रेकिंग आयोजित करण्यासाठी रजिस्टर पण झालेले नसतात. तेव्हा कोणत्या संस्थेसोबत आपण जातो आहोत त्या संस्थेची माहिती तसेच आपत्कालीन यंत्रणेची माहिती आपण जाणुन घेणं गरजेचं आहे.

आजकाल मॅरेथॉन च वेड आहे. ५,१०, २१ किंवा ४२ किलोमीटर धावण्याच्या अनेक स्पर्धा होतं असतात. अनेकदा मागचा पुढचा विचार न करता सकाळी उठुन लोक २१ किलोमीटर धावतात. इकडे एक लक्षात ठेवायला हवं की धावणं आरोग्यासाठी अतिशय गरजेचं आणि उपयुक्त असलं तरी योग्य तो सराव न करता आपल्या शारीरिक क्षमतांचा अंदाज न घेता फेसबुक पोस्ट च्या फोटोसाठी धावणं जिवावर बेतू शकते. ट्रेकिंग, सायकल चालवणं, धावणं ह्या गोष्टी सरावाच्या आहेत. एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या अथवा मोहिमेच्या आधी काही दिवस, महिने त्याची तयारी गरजेची आहे. ह्याशिवाय प्रत्येक ६ महिने ते वर्षातुन आपली वैद्यकीय चाचणीमुळे आपल्या शरीराच्या आत घडणाऱ्या अनेक सुप्त गोष्टींचा अंदाज आपल्याला आधीच मिळु शकतो. एखाद्या मोठ्या घटनेआधी आपलं शरीर नेहमीच आपल्याला सिग्नल देते आपण जर ह्या सिग्नल ना पकडू शकलो तर कदाचित हार्ट अटॅक सारख्या घटना टाळू शकतो.

आपल्या घरात असणाऱ्या अनेक गोष्टींच्या सुरक्षा निकषांबाबत आपण हेळसांड करतो. ही हेळसांड जेव्हा आपल्या जिवावर बेतते तेव्हा आपण खडबडून जागे होतो. नुकतीच गॅस गिझर च्या बाबतीत अश्या एका घटनेत जीव गेल्यावर गॅस गिझर वापरू नका अश्या आशयाच्या पोस्ट फिरत आहेत. पण खरच ग्यास गिझर दोषी आहे का? गेली जवळपास २० वर्ष मुंबईतील अनेक घरात ह्याचा वापर केला जातो. इलेक्ट्रिक गिझर पेक्षा स्वस्त आणि सुरक्षित म्हणुन हे गिझर सगळीकडे लोकप्रिय झाले. त्यामुळे त्यांच्या वापरा संदर्भात असणाऱ्या सुरक्षा निकषांचा विचार न करता त्यांचा वापर केल्यावर अपघात घडणार हे ओघाने आलं. आता ह्यात गॅस गिझर चुकीचा की त्याच्या सुरक्षा निकषांचे पालन न करणारे आपण ह्याचा विचार प्रत्येकाने करावा.

गॅस गिझर लावताना काही गोष्टी नेहमीच लक्षात ठेवायला हव्यात त्या म्हणजे आपल्या बाथरूम मध्ये वायुविजन (ventilation) अतिशय महत्वाचे आहे. बाथरूम हे मुंबई सारख्या ठिकाणी नेहमीच लहान असते. त्यासाठीच त्याच्या खिडक्या तिरप्या पद्धतीने असतात की ज्यामुळे हवा येतं जातं रहावी. पण प्रायव्हसी ते सुशोभीकरणाच्या नादात अनेकदा तिकडे स्लायडिंग विंडो बसवून त्या पुर्ण बंद ठेवल्या जातात. मग वायुविजन च्या नावाने बोंबला. मग ह्या अश्या ठिकाणी गॅस गिझर चा वापर केला तर ऑक्सीजन कमी होणार नाहीतर काय होणार?  ह्या शिवाय जिकडे गॅस गिझर लावला आहे त्या ठिकाणी शक्यतो हवा बाहेर फेकणारा पंखा बसवल्यास वायुविजन योग्य तऱ्हेने होण्यास मदत होते. ते शक्य नसेल तर निदान गॅस गिझर चा वापर बाथरूम चा दरवाजा उघडा ठेवून करावा. ह्या साध्या गोष्टी गॅस गिझर च्या सुरक्षित वापरासाठी गरजेच्या आहेत. सुरक्षा निकषांना आपण जर आपण पाळत नसु तर घरातील प्रत्येक साधन आपला जीव घेण्याची ताकद बाळगून आहे. ह्याची जाणीव आपल्याला हवी.

काय घडलं, कसं घडलं, कोणाच्या बाबतीत घडलं ह्या पेक्षा आपण त्यातुन काय शिकलो ह्याचा विचार आपल्यापैकी प्रत्येकाने करायला हवा. धोका सगळीकडेच आहे. आनंदासाठी थोडा धोका पत्कारणं ह्यात चुकीचं काही नाही पण ते करताना आपण जर सुरक्षितेचे सगळे निकष बाजुला टाकले तर जिव जाण्यासाठी एक क्षण पुरेसा आहे. 

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

एलियन चा सांगाडा... विनीत वर्तक © (Re-Posted)

एलियन चा सांगाडा... विनीत वर्तक © (Re-Posted)

१५ वर्षापूर्वी चिली च्या अटकामा वाळवंटात एका व्यक्तीला पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ठेवलेली एक वस्तू भटकंती करत असताना आढळून आली. हि वस्तू चामड्याच्या ब्यागेत व्यवस्थित गुंडाळून ठेवण्यात आली होती. काहीतरी वेगळ ह्यात असेल ह्या आशेने त्याने जेव्हा उघडून बघितल तेव्हा तो स्तब्धच झाला. खरे तर घाबरून गेला. त्या पांढऱ्या कपड्यात त्याला एक ६ इंच लांबीचा सांगाडा आढळून आला. १२ हाडांच्या जोडी मानवात असताना ह्या सांगाड्याला फक्त १० जोड्या होत्या. डोळ्यांची खोबणी सांगाड्याच्या मानाने खूप मोठ्या होत्या. डोक्याची कवटी लंब आकारात असून ती निमुळती होत गेली होती. लांबून अगदी माणसासारखा वाटणारा सांगाडा पण आपल्या आकारामुळे आणि इतर गुणांनमुळे अगदी एलियन चा असावा असा कयास बांधला गेला.

अता अस त्याच नामकरण केल गेल व पूर्ण जगात अता हा चर्चेचा विषय बनला. ह्या सांगाड्यात अगदी डात सुद्धा स्पष्ट दिसत होते. तसेच पूर्ण रचना हि मानवासारखीच होती. हा सांगाडा “सिरीयस” ह्या एका टी व्ही शो मध्ये पण आला. ह्यावर अनेक बाह्य जगावर जीवन आहे अस मानणाऱ्या अनेक लोकांनी अता कुठून येऊ शकतो ह्यावर आपले अनेक तर्क मांडले. अनेक लोकांनी ह्यावर विश्वास हि ठेवला पण काही वैज्ञानिकांना हे कुठेतरी पटत नव्हत.

काही वैज्ञानिकांनी अता च विश्लेषण करण्याची परवानगी मागितली. डॉक्टर नोलन नी ह्या सांगाड्याचे डी.एन.ए. चा अभ्यास केला. छातीच्या पिंजऱ्यातील तसेच उजव्या बाजूच्या हाडा मधील स्याम्पल तपासले गेले. भारतासाठी एक अभिमानाची गोष्ट अशी कि ह्या डॉक्टर नोलन च्या टीम मध्ये अमेरिकन भारतीय डॉक्टर अतुल बुत्ते ह्यांचा समावेश होता. डॉक्टर बुत्ते हे कॉम्प्यूटेशनल बायोलॉजीस्ट असून युनवरसिटी ऑफ क्यालिफोर्निया इकडे कार्यरत आहेत. त्यांनी ह्या संशोधनात महत्वाच योगदान दिल असून ह्या संशोधनाने हे सिद्ध झाल आहे कि अता चा सांगाडा एलियन नसून मानवाचा आहे.

अती च्या डी.एन.ए. नमुन्याचा अभ्यास केल्यावर अस लक्षात आल कि नुसता हा माणसाचा नसून तिथल्याच एका पिढीच प्रतिनिधित्व करत आहे जिकडे तो सापडला म्हणजे चिली चा. ह्या डी.एन.ए. मध्ये जे बदल झाले त्यामुळे ह्या सांगाड्याच्या आकारात बदल झाले. ह्या बदल झालेल्या डी.एन.ए. ना शोधण्यात यश आल आहे. तसेच हा सांगाडा एका मुलीचा असून हि बदल झालेली रचना वंशपरंपरेने झालेली असावी असा कयास मांडण्यात आलेला आहे.

अता चा पूर्ण सांगाडा हा फक्त ६ इंचाचा असला तरी हाडांच्या रचनेवरून ती साधारण ६ वर्षाच्या मुलाइतकी वाढलेली आहेत. संचिता भट्टाचार्य ह्या डॉक्टर भूत्ते च्या ल्याब मध्ये काम करणाऱ्या वैज्ञानिकेच्या मते अता च्या जीनोम मधील अनेक रचना ह्या वेगळ्या असून अभ्यासपूर्ण आहेत. जीनोम च्या अश्या वेगळ्या रचनेमुळे अता फक्त जन्म व्हायच्या आधीच्या सांगाड्याप्रमाणे भासत आहे.

गेले अनेक वर्ष एलियन बनून राहिलेला हा सांगाडा शेवटी माणसाचा आहे ह्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. ह्यात अमेरिकन भारतीय डॉक्टर अतुल बुत्ते सोबत संचिता भट्टाचार्य ह्याचं योगदान आहे. डी.एन.ए. सोबत जीनोम ची रचना समजण्यात अजूनही आपण मागे आहोत. अता सारख्या सांगाड्याचा अभ्यास करून त्यांच्या रचनेत होणारे बदल किती मोठा परिणाम एका जिवामध्ये करू शकतात ह्यातून त्यांची शक्ती पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. ह्या सगळ्या प्रयोगामध्ये योगदान देणाऱ्या वैज्ञानिकांच अभिनंदन.

फोटो स्त्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Sunday, 19 January 2020

जेम्स बॉंड ऑफ इंडिया... विनीत वर्तक ©

जेम्स बॉंड ऑफ इंडिया... विनीत वर्तक ©

पाकिस्तान हा ज्याला भारताचा जेम्स बॉंड असं म्हणतो. ज्यांच्या नुसत्या नावाने शत्रूच्या गोटात खळबळ माजते असे भारताचे जेम्स बॉंड अर्थात भारताच्या पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार अजित धोवाल ह्यांचा आज जन्मदिवस. त्यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांना असं का म्हंटल जाते हे खूप कमी भारतीयांना माहित आहे. अजित धोवाल ह्याचं कार्य किती महत्वाच आहे हे त्यांची कामगिरीच सांगते. सगळीच युद्ध सैन्याने जिंकता येतं नाही. पडद्यामागची मुत्सुद्देगिरी हि तितकीच महत्वाची असते. शत्रूची बलस्थान, त्याची कमजोरी, कुठे काय बोलायचं? कुठे तोंडाची भाषा वापरायची तर कुठे हत्यारांची ह्या सर्व गोष्टीची पुरेपूर जाण असलेलं व्यक्तिमत्व आपल्या देशाचे सुरक्षा सल्लागार आहेत हे भारताच सुदैव आहे. आज ज्या सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट हल्ला  ने पाकिस्तान हादरला त्या सर्जिकल स्ट्राईकची आणि बालाकोट हवाई हल्याची रणनिती अजित धोवाल ह्यांची होती.

असं काय आहे कि त्यांच्या नावाने शत्रूच्या गोटात चिंता होते. अजित धोवाल ह्याचं पूर्ण करियर म्हणजे एक गाथा आहे. युद्ध न लढता पण त्यांनी अशी कामगिरी केली आहे कि शत्रूला पळता भुई थोडी झाली आहे. हे शत्रू भारताच्या आतले पण आहेत आणि बाहेरचे पण आहेत. प्रत्येकांना त्यांच्या शब्दात उत्तर देण्याची पद्धत अजित धोवाल ह्यांना भारताचा जेम्स बॉंड बनवते.

१) अजित धोवाल पहिले पोलीस अधिकारी आहेत ज्यांना अतुलनीय शौर्यासाठी भारताच्या शांतीकाळात देण्यात येणाऱ्या दुसऱ्या सर्वोत्तम शौर्य पुरस्कार किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलं आहे (१९८८). ह्या आधी हा पुरस्कार फक्त भारतीय सेनेतील अधिकाऱ्यांना दिला जात होता.

२) अजित धोवाल ह्यांना भारताच्या आजवरच्या सगळ्या १५ विमान अपहरणाच्या घटना सोडवण्याचा अनुभव आहे. ह्या सगळ्या विमान अपहरण घटनांना योग्य रित्या सांभाळून भारतीय नागरिकांची सुटका करण्यात मोलाची भूमिका बजावलेली आहे.

३) भारताचे सिक्रेट एजंट म्हणून गुप्तपणे त्यांनी पाकिस्तानात ७ वर्ष वास्तव्य केलेलं आहे. पाकिस्तानात राहून त्यांच्या हालचालींची माहिती त्यांनी भारतीय सुरक्षा यंत्रणांना पुरवलेली आहे. ह्या काळात एका पाकिस्तानी व्यक्तीने त्यांना मुसलमान नसल्याच ओळखलं होतं. त्यांचे कान टोचलेले होते हे सूक्ष्म निरीक्षण त्या व्यक्तीच्या नजरेतून निसटलं नव्हतं. कारण मुसलमान लोकात कान टोचले जात नाहीत. तो स्वतः एक हिंदू होता. त्याने ओळखल्यावर अजित धोवाल ह्यांनी त्याने कसं ओळखलं हे विचारल्यावर त्याने ओळख दिली होती. आपल्या घरात त्यांना नेऊन कपाटात शंकराचा आणि दुर्गा मातेच्या लपवलेल्या प्रतिमा दाखवल्या होत्या.

४) जून २०१४ मध्ये इराक मध्ये ४६ भारतीय नर्स ची सुटका करण्यामागे अजित धोवाल ह्यांची मुत्सुद्देगिरी महत्वाची होती. जून २०१४ मधेच अजित धोवाल ह्यांच्याकडे अतिशय गुप्त मिशन (Top Secret Mission) ची जबाबदारी देण्यात आली होती. अजित धोवाल ह्यांनी इराक मध्ये गुप्तपणे जाऊन इराक सरकारच्या अतिशय वरच्या स्थानावर असणाऱ्या अधिकाऱ्यांशी बोलणी करून ह्या नर्स च्या सुटकेसाठी खुप प्रयत्न केले होते.

५) अजित धोवाल हे पोलीस मेडल सगळ्यात कमी कालावधीत मिळवणारे पोलीस अधिकारी आहेत. हा बहुमान त्यांना त्यांच्या कामगिरीसाठी अवघ्या ६ वर्षात देण्यात आला जेव्हा कि ह्या पुरस्कारासाठी १७ वर्ष सेवेची अट असते.

६) नॉर्थ इस्ट मधे शांतता प्रस्थापित करण्यात फिल्ड एजंट म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. इथल्या लालडेंगा ह्या अतिरेकी संघटनेच्या ७ पेकी ६ कमांडर ना मारण्यात त्यांची मोलाची भूमिका होती. ह्या नंतर ह्या संघटनेच्या प्रमुखाने शांती करार केला होता.

७) सुवर्ण मंदिरात खलिस्तानी प्रमुख लपले असताना त्यांच्या प्रमुखाला एक रिक्षावाला आपल्या परिसरात नवीन वाटला. अनेक दिवस त्याच्यावर पाळत ठेवल्यावर त्याला चौकशीसाठी पकडण्यात आलं. पकडल्यावर त्याने आपण पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आय.एस.आय. चे एजंट असल्याच सांगितल. आपल्याला पाकिस्तानी संघटनेच्या बॉस ने खलिस्तान ची मदत करण्यासाठी पाठवलं असल्याच त्यांने सांगितलं आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यात तो यशस्वी झाला. ऑपरेशन ब्ल्याक थंडर च्या दोन दिवस आधी तो रिक्षा चालक सुवर्ण मंदिरात जाऊन आतमध्ये असलेल्या अतिरेक्यांची खडानखडा माहिती घेऊन आला ज्यामुळे हे ऑपरेशन यशस्वी झालं. तो रिक्षा चालक म्हणजेच अजित धोवाल.

८) म्यानमार इकडे आर्मी चीफ सोबत सैनिकी ऑपरेशन करताना त्यांनी ५० पेक्षा जास्ती अतिरेक्यांना कंठस्थान घातलं होतं. सप्टेंबर २०१६ च्या भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईक मागे अजित धोवाल ह्याचं डोक होतं. डोकलाम विवादात चीन च्या सैन्याला संयमी पण त्याच वेळी ताकदीने उत्तर देऊन हा प्रश्न चर्चेने सोडवण्यात त्यांची भूमिका महत्वाची होती.

९) १९९६ मध्ये जम्मु काश्मीर मध्ये शांततेने निवडणुक पार पाडण्यात त्यांची मोलाची भुमिका होती.

१०) ५ ऑगस्ट २०१९ ला जम्मु काश्मीर चा विशेष दर्जा काढुन त्याला भारताचं अविभाज्य भाग बनवण्याच्या ऐतिहासिक निर्णयात मोलाची भुमिका अजित धोवाल ह्यांची आहे. पडद्यामागुन ह्या निर्णया नंतर तिथली परीस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या मागे अजित धोवाल ह्यांच डोकं आहे.

११) पाकीस्तान ने पकडलेल्या भारताच्या वायु दलाचा पराक्रमी पायलट अभिमन्यु वर्धमान ह्याला कोणत्याही अटीसह सोडवुन आणण्यात अजित धोवाल ह्यांचा हात आहे. सतत अणुबॉम्ब ची धमकी देणाऱ्या पाकीस्तान वर भारताने ब्राह्मोस रोखताना आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरीकेचे सुरक्षा सल्लागार, सेक्रेटरी ऑफ स्टेट, भारताचे इतर मित्र देश ज्यात ब्रिटन, रशिया, इस्राईल, फ्रांस ह्या सह आखाती देश ज्यात सौदी अरेबिया, यु.ए.ई. ह्यांना भारताची आक्रमक भुमिका विशद करून होणाऱ्या परीणामांची जबाबदारी पाकीस्तान वर असेल हे भारताने ठणकावून सांगितल्यावर अमेरीकेच्या आणि इतर देशांच्या दबावाखाली पाकीस्तान ला अभिमन्यु वर्धमान ह्याला सोडण्याशिवाय कोणता पर्याय शिल्लक राहीलेला नव्हता. आंतरराष्ट्रीय मुसुद्देगिरीत भारताचं नाणं खणखणीत ठेवण्यात अजित धोवाल ह्यांचा मोलाचा वाटा होता. 

अजित धोवाल ह्यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगताना सांगितलेलं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे.

“ तुम्ही परत एकदा मुंबईसारखा हल्ला केलात तर बलुचीस्तान तुमच्या हातातून गेलचं म्हणून समजा”

“You do one more Mumbai, You lose Balochistan”

हे वाक्य बोलण्याची हिंमत आणि त्या शब्दांमध्ये असलेला सूचक इशारा हा पाकिस्तान सारख्या मुर्दाड देशाला आणि तिथल्या अतिरेक्यांना दोन वेळा विचार करण्यास अजून पर्यंत भाग पाडत आहे ह्यात सगळं आलं.

आज भारताच्या ह्या जेम्स बॉंड चा जन्मदिवस आहे. त्यांच्या कार्यापुढे एक भारतीय म्हणून नतमस्तक आणि त्यांची अशीच सेवा भारताला ह्या पुढे सुरक्षित ठेवेल ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही.

फोटो स्त्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Saturday, 18 January 2020

एका गुन्हेगारासाठी... विनीत वर्तक ©

एका गुन्हेगारासाठी... विनीत वर्तक ©

गुन्हा करणारा नेहमीच कायद्याचा आधार घेऊन आपल्या शिक्षेपासुन वाचत आल्याच्या घटना आपण नेहमीच वाचत असतो. कधी कायद्याचा तर कधी दोन देशांच्या गुन्हेगार हस्तांतरण पद्धती मधील त्रुटींचा आधार घेऊन अनेक गुन्हे केले जातात. स्त्रियांच्यावर होणाऱ्या अत्याचारात तर अजुन अनेक गोष्टी गुन्हेगारांना वाचवत असतात. बलात्कारा सारख्या गुन्ह्यात आजही आपला समाज त्या गुन्हाल्या बळी पडलेल्या स्त्रीकडे वेगळ्या नजरेने बघतो आणि त्यामुळेच समाजात होणारी नाचक्की, बदनामी ह्यापासुन वाचण्यासाठी स्त्री ह्या गुन्ह्यांना पाठीशी घालत रहाते. जोवर गुन्हा बाहेर येतो तोवर एकतर गुन्हा करणारा पळालेला असतो किंवा त्या गुन्ह्याचे साक्षीदार किंवा गुन्हा घडलेला आहे हे सिद्ध करणाऱ्या गोष्टी नाहीश्या झालेल्या असतात. त्यामुळेच गुन्हेगाराला हे चांगलच कळुन चुकलेलं असते की कायद्याचे हात त्याच्या पर्यंत पोहचु शकत नाही.

ह्याच पाळवाटेचा आधार घेऊन २०१७ मध्ये सुनील कुमार भद्रन (वय वर्ष ३८) ह्याने केरळ इकडे एका १३ वर्षाच्या मुलीचा गैरफायदा घेत तिच्यावर तिन महिने बलात्कार केला. सुनील हा ह्या पिडितेच्या वडिलांचा मित्र होता. कोवळ्या वयात ह्या पाशवी अत्याचाराला बळी पडलेली मुलगी कुठे काहीच बोलली नाही. काही दिवसांनी जेव्हा आपल्या काकांना झालेल्या अत्याचाराची गोष्ट सांगितली. काकांनी पोलिसांना ह्या गोष्टीची कल्पना दिली पण तोवर सुट्टीसाठी भारतात आलेला सुनील सौदी अरेबिया ला निघुन गेला होता. समाजात आपल्याकडे बघणाऱ्या नजरांना ती मुलगी झेलू शकली नाही. तिने आपल्या आयुष्याचा शेवट केला. तिच्या काकांना तिची आत्महत्या जिव्हारी लागली. आपणच ही गोष्ट उघड केल्याने तिच्यावर ही नामुष्की आली हा विचार करून त्यांनीपण आपलं आयुष्य संपवलं. ह्या दोन आत्महत्या आणि बलात्कारासाठी कारणीभूत असलेला सुनील मात्र सौदी अरेबियात मोकळं आयुष्य जगत होता.

केरळ पोलीसांच्या सांगण्या वरून इंटरपोल ने सुनील कुमार च्या विरुद्ध नोटीस काढली पण गुन्हेगार प्रत्यर्पणासाठी लागणाऱ्या कागदांची आणि प्रक्रियेची कल्पना नसल्याने ही केस पोलीसांच्या फायलीत लुप्त झाली. दोन वर्ष फायलीत अडकलेल्या ह्या केसला नव्याने पदभार स्विकारलेल्या आय.पी.एस. ऑफिसर मरीन जोसेफ ह्यांनी सोडवायचा विडा उचलला. इंटरपोल च्या नोटिसी नंतर सौदी अरेबिया च्या पोलिसांनी सुनील कुमार ला बेड्या ठोकुन त्याची तुरुंगात रवानगी केली होती पण गोष्ट तिकडेच अडकुन होती. भारत आणि सौदीअरेबिया ह्या दोन्ही देशांमध्ये २०१३ एक ट्रीटी झालेली आहे त्यानुसार हे दोन्ही देश गुन्हेगारांना आपआपल्या देशात कायद्याच्या प्रक्रियेने शिक्षा देऊ शकतात. पण ही प्रक्रिया इतकी सोप्पी नाही. भारतातील सि.बी.आय., इंटरपोल तसेच सौदी अरेबिया च्या यंत्रणा ह्यांना लागणारी सगळी कागदपत्र सुपुर्द केल्यावर गुन्हेगाराच प्रत्यार्पण होऊ शकते.

 आय.पी.एस. ऑफिसर मरीन जोसेफ ह्यांनी त्या कोवळ्या मुलीला न्याय देण्यासाठी ह्या केसची सगळी सुत्र आपल्या हातात घेतली. सगळ्या कागद पत्रांची पुर्तता करताना सुनील कुमार भद्रन ला ताब्यात घेण्यासाठी आय.पी.एस. ऑफिसर मरीन जोसेफ ह्यांनी सौदी अरेबिया गाठलं. सौदी अरेबिया च्या कायद्यानुसार त्यांनी अगदी बुरखा घालुन प्रत्येक प्रक्रीयेत स्वतः जातीने लक्ष घालताना सुनील कुमार भद्रन ला त्याच्या गुन्ह्यासाठी भारतात आणलं. आय.पी.एस. ऑफिसर मरीन जोसेफ ह्यांचा हा लढा सगळ्याच गुन्हेगारांना एक वॉर्निंग देणारा ठरला आहे. तुम्ही कुठेही पळून गेलात तरी कायद्याच्या कचाट्यातुन सुटणं आता तितकं सोप्प नाही हे त्यांनी दाखवुन दिलं आहे.

लहानपणापासुन पोलिसात जाण्याची इच्छा असणाऱ्या मरीन जोसेफ ह्यांनी आपल्या पहील्याच प्रयत्नात लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करताना आय.पी.एस. बनण्याचं आपलं स्वप्न साकार केलं आहे. आय.पी.एस. ऑफिसर मरीन जोसेफ दिसायला सुंदर असल्याने अनेक सोशल मिडियावर त्यांच्या कामापेक्षा दिसण्याची चर्चा जास्त झाली. ह्यावर मत मांडताना त्या म्हणतात,

“People focusing on a particular aspect and airing sexist comments have never affected my work. I have no problem with complimenting my looks, but unnecessary glamorization of a very serious job is something I don’t agree with. Does anyone talk about the good looks of a male officer? It’s not fair to judge a person based on the looks, which has never been an advantage to be in this profession which is serious in nature. All these deviate attention from the good work we do. But I have never let it affect me or my work. I believe over a period of time, people’s thoughts will evolve and after a few years, no one will talk like this.”     

आपलं काम असच धडाडीने सुरु राहील हे सांगताना स्री वर होणाऱ्या अत्याचारासाठी मी नेहमीच लढेन असा विश्वास त्यांनी सर्वच स्त्रियांना दिला आहे. एका गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी देशांच्या सिमा ओलांडून त्याच्या मुसक्या आवळणाऱ्या ह्या पराक्रमी आय.पी.एस. ऑफिसर मरीन जोसेफ ह्यांना माझा सॅल्यूट.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Thursday, 16 January 2020

पृथ्वी सारखाच... विनीत वर्तक ©

पृथ्वी सारखाच... विनीत वर्तक ©

गेल्या आठवड्यातील एका बातमीने जगभरातील संशोधकात आनंदाचे वातावरण आहे. अवकाशात पृथ्वी सदृश्य ग्रह शोधण्यासाठी पाठवलेल्या नासा च्या टेस (Transiting Exoplanet Survey Satellite) ने पृथ्वी सारख्याच एका ग्रहाचा शोध लावल्याची वर्दी दिली आहे. एप्रिल २०१८ ला अथांग अवकाशात अजुन कुठे पृथ्वी सदृश्य ग्रह आहेत का हे शोधण्यासाठी नासा ने टेस ला अवकाशात प्रक्षेपित केलं होतं. टेस एखाद्या ताऱ्याच्या भोवती परीक्रमा करत असलेल्या ग्रहांचा शोध ट्रांझिट पद्धतीने घेते. ट्रांझिट पद्धतीत जेव्हा एखादा ग्रह ताऱ्याभोवती परीक्रमा करतो तेव्हा त्या ताऱ्याच्या प्रकाशाच्या तिव्रतेत घट होते. जशी आपल्याकडे ग्रहणात होते. अशी घट किती वेळा आणि किती प्रमाणात होते ह्याचा अभ्यास करून आपण गणिताने सिद्ध करू शकतो की एखादा ग्रह त्या ताऱ्याभोवती किती वेळात प्रदक्षिणा करतो. त्या ग्रहाची त्या ताऱ्यापासून कक्षा किती लांब आहे. एकदा कक्षा समजली की ताऱ्याच्या प्रखरते वरून तो ग्रह ह्याबीटायटल झोन मध्ये आहे का नाही ह्याच गणित मांडू शकतो.

आपली पृथ्वी ह्या अवकाशात एकच का? तर ह्याच उत्तर दडलं आहे पृथ्वीची सुर्याभोवती फिरण्याची कक्षा. पृथ्वी सुर्याच्या ह्याबीटायटल झोनमध्ये परीक्रमा करते व ह्यामुळेच पाणी हे द्रवस्वरूपात आढळुन येते. पृथ्वीच तपमान हे सजीवांच्या वाढीसाठी अतिशय योग्य असल्याने आज पृथ्वीवर सजीवांची उत्क्रांती झाली आहे. त्यामुळेच टेस चं प्रमुख काम अश्याच ग्रहांचा शोध घेणं जे ग्रह त्याच्या ताऱ्याच्या ह्याबीटायटल झोन मध्ये येतात. नुकतेच टेस ने TOI 700 d ह्या ग्रहाचा शोध लावला आहे. हा ग्रह TOI 700 ह्या ताऱ्याभोवती परीक्रमा करत आहे. TOI 700 हा तारा पृथ्वीपासुन साधारण १०१.४ प्रकाशवर्ष दुर आहे. TOI 700 हा एक रेड डवार्फ तारा आहे. ह्याच वस्तुमान सुर्याच्या ४०% आहे आणि ह्याच तपमान सुर्याच्या तपमानाच्या अर्धे आहे.

TOI 700 भोवती तीन ग्रह परीक्रमा करत असुन TOI-700 b हा पृथ्वीच्या आकाराचा ग्रह सगळ्यात जवळ असुन १० दिवसात ह्या ताऱ्याभोवती परीक्रमा करतो. ह्याचा पृष्ठभाग खडकाळ आहे.  तर TOI-700 c हा दुसरा ग्रह ग्यास जायंट (आपल्या गुरु ग्रहासारखा) असुन प्रत्येक १६ दिवसात एक परीक्रमा करतो. संशोधकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेला TOI 700 d ग्रह हा सगळ्यात लांबुन  ह्या ताऱ्या भोवती ३८ दिवसात एक परीक्रमा पुर्ण करतो. TOI 700 d चा आकार पृथ्वीच्या १.१ पट आहे. सगळ्यात महत्वाचं आहे ते हा ग्रह आपल्या ताऱ्याच्या ह्याबीटायटल झोन मध्ये परीक्रमा करत आहे. ( अगदी पृथ्वी प्रमाणे) त्यामुळे ह्यावर द्रव रूपात पाणी असण्याची दाट शक्यता आहे. ह्या ग्रहावर असलेलं तपमान उणे २ ते ३ डिग्री सेल्सियस च्या आसपास असण्याचं अनुमान आहे. ह्यामुळेच सजीव सृष्टी ला पोषक अश्या दोन्ही गोष्टी ह्या ग्रहाच्या केलेल्या अभ्यासात आढळुन आल्या आहेत.

पण हे सगळे ग्रह आपल्या ताऱ्याभोवती फक्त परीक्रमा करतात स्वतःभोवती नाही. ह्यामुळे ह्यांची एक बाजु ताऱ्याकडे तर एक बाजु नेहमीच अंधारात असते. तरी सुद्धा ह्याच्या कक्षेमुळे TOI 700 d अगदी पृथ्वीसारखाच असल्याचं संशोधकांचं मत आहे. TOI 700 d वर असलेलं वातावरण, इथली ढगांची निर्मिती हे पृथ्वीपेक्षा अतिशय वेगळं असु शकेल. ह्या ग्रहा बद्दल असलेली माहिती सध्यातरी त्याच्या निरीक्षणातुन कॉम्प्युटर मॉडेल नी दिली आहे. अजुन बराच अभ्यास बाकी आहे. पण काही झालं तरी पृथ्वी सारखाच ग्रह शोधुन टेस ने आपल्या माहितीत खुप भर घातली आहे. टेस ह्या जानेवारीत आपला कार्यकाळ पुर्ण करेल. पण त्या आधी टेस ने आपल्या पृथ्वी सारखा ग्रह ह्या विश्वात आहे ह्यावर प्रकाश टाकलेला आहे.

टेस ची संशोधक टीम चे मानवांच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या ह्या संशोधनासाठी खुप कौतुक. आपण नक्कीच येत्या शतकात पृथ्वी सारखाच ग्रह शोधण्यात आणि त्याचा अभ्यास करण्यात यशस्वी होऊ.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Tuesday, 14 January 2020

चेवांग रिंचेन ब्रिज एका पराक्रमी सैनिकाला दिलेली मानवंदना... विनीत वर्तक ©

चेवांग रिंचेन ब्रिज एका पराक्रमी सैनिकाला दिलेली मानवंदना... विनीत वर्तक ©

ऑक्टोबर २०१९ ला भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग ह्यांनी भारत- चीन सिमेजवळ लडाख मधल्या एका ब्रिजला राष्ट्राला अर्पण केलं. तैमुर च्या उठण्या बसण्याची नोंद ठेवणाऱ्या मिडियाला मात्र अश्या छोट्या मोठ्या उद्धघाटनाच्या बातम्यातुन टी.आर.पी. मिळत नसल्याने त्यांनी ह्या बातमीकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचसोबत आपल्या सुजाण नागरीकांनी. अवघी १४०० फुट लांबी असणाऱ्या ब्रिज मध्ये असं काय विशेष की खुद्द देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी, लष्कर प्रमुखांनी  जातीने जाऊन त्याच उदघाटन करावं? ह्या ब्रिज ला ज्यांच नावं दिलं गेलं ज्यांना 'लायन ऑफ लडाख' म्हणुन ओळखलं जाते ते कर्नल चेवांग रिंचेन. खेदाची गोष्ट अशी की कर्नल चेवांग रिंचेन कोण? हेच माहीत नसल्याने त्यांच नाव, त्यांचा पराक्रम ह्या बद्दल भारतीय अनभिज्ञ आहेत.

चेवांग रिंचेन ब्रिज श्योक नदीच्या पात्रावर बांधण्यात आला असुन समुद्र सपाटी पासुन ह्याची उंची जवळपास १४,६५० फुट आहे. चेवांग रिंचेन ब्रिज भारतातील सर्वात उंचीवर बांधलेला ब्रिज असुन अवघ्या १५ महीन्यात तो बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ने बांधला आहे. ज्या उंचीवर श्वास घेताना पण धाप लागते त्या उंचीवर अति उंचीवरील सर्व प्रकारच्या तपमानाला तोंड देण्यास सक्षम असलेला ९०-१०० टन वजनाचे रणगाडे, तोफा, दारुगोळा ह्यांचं वजन पेलणारा ब्रिज बांधणं तो ही अवघ्या १५ महीन्यात हे खुप मोठं कठीण काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अगदी सहजतेने पुर्ण केलं त्यासाठी त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे.

चेवांग रिंचेन ब्रिज हा फक्त उंचीसाठी महत्वाचा नाही तर तो ज्या ठिकाणी बनवला ते महत्वाचे आहे. चेवांग रिंचेन ब्रिजपासुन भारत- चीन सीमा फक्त ४५ किलोमीटर वर आहे. ह्या ब्रिजमुळे आता सरहद्दीवर रसद आधी लागणाऱ्या वेळेपेक्षा अर्ध्या वेळेत पोहचवता येणार आहे. लेह आणि काराकोरम ह्यांना जोडणाऱ्या ह्या ब्रिजचं सामरिक महत्व खुप आहे. ह्या ब्रिज ला ज्यांचं नाव दिलं गेलं त्या कर्नल चेवांग रिंचेन ह्यांची मुलगी ह्या उद्घटनाला उपस्थित होती.
कर्नल चेवांग रिंचेन ह्यांचा  जन्म सुमूर, नुब्रा इकडे १९३१ ला झाला. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी लडाख गार्ड्स मध्ये प्रवेश केला. १९४८ मध्ये नुब्रा व्हॅली इकडे १७,००० फुटावर असणाऱ्या लामा हाऊस वर तिरंगा फडकवण्यात महत्वाची भुमिका बजावली. त्यानंतर २१,००० फुटावर असणाऱ्या टुक्कार हिल वर त्यांनी तिरंगा फडकावला. ह्यासाठी सतत ३ दिवस त्यांची टीम बर्फातुन चालत होती. अश्या परीस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या पराक्रमाने तिरंगा फडकावला. त्यांच्या ह्या पराक्रमा बद्दल त्यांना भारत सरकारने महावीर चक्र देऊन त्यांच सन्मान केला. हा पुरस्कार १७ व्या वर्षी मिळवणारे ते सर्वात कमी वयाचे मानकरी आहेत.

१९७१ च्या युद्धात मेजर असणाऱ्या चेवांग रिंचेन ह्यांनी लिडिंग फ्रॉम द फ्रंट ह्या उक्तीला सार्थ करत त्यांच्यावर दिलेल्या जबाबदारी ला आपल्या पराक्रमाने पुर्ण केलं. प्रतापपूर सेक्टर मध्ये चालुंक कॉम्प्लेक्स ला ताब्यात घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी ह्यावर तिरंगा फडकवताना आपल्या पराक्रमाची शर्थ केली. त्यांच्या ह्या पराक्रमासाठी त्यांना पुन्हा महावीर चक्राने सन्मानित करण्यात आलं. दोन वेळा महावीर चक्र मिळवणाऱ्या मोजक्या ६ सैनिकात कर्नल चेवांग रिंचेन ह्यांचा समावेश आहे. अश्या ह्या पराक्रमी सैनिकाची आठवण ठेवताना ह्या ब्रिज चं नाव कर्नल चेवांग रिंचेन ब्रिज असं करण्यात आलं. लेह शहरात त्यांचा पुतळा उभारला आहे. अश्या लायन ऑफ लडाख असणाऱ्या सैनिकाचं नावं देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असणाऱ्या ब्रिज ला देणं ही खरी त्या सैनिकाला मानवंदना होती.

अश्या पराक्रमाची गाथा न आमच्या पुस्तकात येतं न आम्हाला काही देणंघेणं असते अश्या गोष्टींचं. आम्हाला पुस्तकातले शिवाजी महाराज माहीत असल्याने आमची मजल जय हो बोलण्यात आणि आमची ऊर्जा त्यांचे वारस आणि त्यांच्या नावाचा थप्पा एकमेकांवर मारण्यात जाते. कोणी कोणता चित्रपट बघावा अथवा बघु नये ह्यासाठी आम्ही जिवाचं रान करतो. पण ज्यांनी आमच्यासाठी रक्त सांडल त्यांच्या नावाकडे आश्चर्याने बघतो. कर्नल चेवांग रिंचेन आणि अनेक पराक्रमी सैनिकांच्या पराक्रमामुळे आज लोकशाही बद्दल बोलणारे आम्ही आणि आमचा मिडिया त्यांना किती मान देतो ते आपल्या प्रत्येकाला चांगलं माहित आहे.

कर्नल चेवांग रिंचेन ह्यांच्या पराक्रमाला सॅल्यूट आणि  चेवांग रिंचेन ब्रिज भारताच्या सीमांना सुरक्षित ठेवण्यात नक्कीच मोलाची भुमिका बजावेल ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

फोटो स्रोत:- गुगल

Monday, 13 January 2020

एका भारतीयाच्या फायबर ऑप्टिक्स ची गोष्ट... विनीत वर्तक ©

एका भारतीयाच्या फायबर ऑप्टिक्स ची गोष्ट... विनीत वर्तक ©

फायबर ऑप्टिक्स हे नावं आज घरोघरी पोचलेलं आहे. मुंबई, पुणे किंवा इतर शहरात रस्त्याच्या बाजुने निळ्या, शेंदरी रंगाचे प्लास्टिक पाईप टाकण्याचं काम अनेकांनी पाहिलं असेल. हे प्लास्टिक चे पाईप चौकशी केल्यावर फायबर ऑप्टिक्स चे असल्याचं सांगितलं असेल. फायबर ऑप्टिक्स म्हणजे नक्की काय? आणि ह्या फायबर ऑप्टिक्स ची जनक एक भारतीय व्यक्ती आहे हे खुप कमी जणांना ठाऊक असेल.

फायबर ऑप्टिक्स म्हणजे नक्की काय? हे समजुन घ्यायला आपल्याला थोडं माहितीचं हस्तांतरण कसं होते हे समजुन घ्यावं लागेल. टेलिफोन मधुन होणारं माहितीचं हस्तांतरण हे केबल मधुन होतं तर आपला मोबाईल हीच माहिती आपल्याला न दिसणाऱ्या रेडीओ वेव्हस च्या स्वरूपात पाठवते. पण ह्या सर्वांवर काही  मर्यादा येतात. प्रकाश अशी एक गोष्ट आहे जी माणसाला नेहमीच काहीतरी शिकवत आली आहे. जर आपण प्रकाशा सोबत माहिती पाठवली तर? असा विचार एका भारतीय संशोधकाने केला. प्रकाशाला आपण वळवू शकतो हे १९ व्या शतकाच्या सुरवातीला संशोधकांनी दाखवुन दिलं. पण त्यातुन माहिती पाठवणं शक्य होईल हे पहिल्यांदा सर्वप्रथम एका भारतीय  संशोधकाने जगाला दाखवलं. त्यांचं नाव आहे नरिंदर सिंग कापनी. १९५० ला लंडन इकडे हजारो ग्लास फायबर नी बनवलेल्या पाईप मधुन एक चित्र त्यांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवलं आणि एका जागतिक क्रांतीची सुरवात केली. त्यालाच आज आपण 'फायबर ऑप्टिक्स' असं म्हणतो.

फायबर ऑप्टिक्स चा वापर सर्वप्रथम एन्डोस्कोप मध्ये केला गेला. शरीराचा भाग न कापता त्याच्या आत बघण्यासाठी प्रकाशाचा वापर केला गेला. वैज्ञानिकांनी ह्यावर संशोधन करून ह्याचा वापर टेलिफोन कॉल ला एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी केला. वैज्ञानिकांनी हा प्रयोग जेव्हा केला तेव्हा माहितीच वहन हे निर्वात पोकळीत प्रकाशाच्या वेगाने झालं म्हणजेच जवळपास ३ लाख किलोमीटर/ सेकंद. हा वेग पुर्ण जगाच्या माहितीच्या देवाण घेवाणीचे पुर्ण संदर्भच बदलवुन टाकु शकतो हे त्यांना स्पष्ट झालं. प्रत्यक्षात आज माहितीची देवाणघेवाण फायबर ऑप्टिक्स मधुन ह्या वेगाच्या २/३ वेगाने होते. फायबर ऑप्टिक्स मध्ये काचेचे अथवा प्लास्टिक चे खुप पातळ धागे असतात. प्रत्येक धागा आपल्या केसाच्या १/१० इतका जाड असतो. (अंदाज येईल की किती पातळ धागे असतात). एक धागा जवळपास २५,००० पेक्षा जास्ती टेलिफोन कॉल्स च्या माहितीच देवाणघेवाण एका वेळी करू शकतो. एका फायबर ऑप्टिक्स केबल मध्ये एक, दोन किंवा काही शेकडो असे धागे असतात. एक फायबर ऑप्टिक्स केबल एका वेळेला कित्येक मिलियन टेलिफोन कॉल्स च्या माहितीची देवाणघेवाण करण्यास सक्षम असते. ह्यामुळेच माहितीच्या महाजालाचा पाठीचा कणा म्हणजेच 'फायबर ऑप्टिक्स'.

फायबर ऑप्टिक्स मध्ये प्रकाश प्रवास करताना ह्या केबल च्या भिंतीवरून सतत परावर्तित होतं राहतो. प्रकाश समजा काचेवर पडला तर तो काचेच्या आरपार जातो. प्रकाश जर का काचेवर खुप कमी अंशात पडला ( ४२ डिग्री पेक्षा कमी अंशात) तर तो पुर्णपणे परावर्तित होतो. ती काच एका आरश्या सारखं काम करते. ह्याच तत्वाचा वापर फायबर ऑप्टिक्स केबल मध्ये केला जातो. प्रकाश सतत केबल च्या भिंतीवरून परावर्तित होतं राहतो. त्यामुळे आपल्या सोबत असलेली माहिती पुढे नेत रहातो. फायबर ऑप्टिक्सच्या केबल मध्ये प्रामुख्याने दोन भाग असतात एक असते 'कोअर' ज्यातुन प्रकाश प्रवास करतो तर दुसरं म्हणजे भिंत ज्यावरून तो पुन्हा पुन्हा परावर्तित होतं रहातो ज्याला 'कॅल्याडींग' असं म्हणतात. ज्या तऱ्हेने इलेक्ट्रिकल ऊर्जा अनेक पद्धतीने वापरली जाऊ शकते त्याच प्रमाणे प्रकाशातुन आपण अनेक प्रकारच्या माहितीचं वहन करू शकतो.

आज पुर्ण जगाच्या संपुर्ण माहितीच्या देवाणघेवाणीतला फायबर ऑप्टिक्स चा वाटा ९९% इतका प्रचंड आहे तर जगातील इंटरनेट अथवा माहितीच्या जगातील कोणताही संदेश आणि माहिती आपलं ९९% अंतर फायबर ऑप्टिक्स मधुन कापत असते. ह्या दोन गोष्टी 'फायबर ऑप्टिक्स' चं महत्व दाखवुन देण्यास पुरेश्या आहेत. फायबर ऑप्टिक्स का? ह्याच उत्तर दडलेलं आहे ह्या केबल च्या वापरामुळे होणाऱ्या फायद्यात.

१) फायबर ऑप्टिक्स मध्ये संदेश हरवत नाही. इतर कोणत्याही संदेश वहनाच्या तुलनेत ह्यातील संदेश १० पट जास्त अंतर कापतो जोवर त्याला पुन्हा एम्प्लिफाय करण्याची  गरज पडते. ह्याचा अर्थ फायबर ऑप्टिक्स अतिशय स्वस्त, किफायतशीर सेवा देणारी प्रणाली आहे.

२) ह्यात वहन होणारी माहिती एकमेकात मिसळत नाही. एखाद्या तांब्यांच्या तारेतुन होणाऱ्या वहनात 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफिअरंस' होण्याची शक्यता असते. जे फायबर ऑप्टिक्स मध्ये होतं नाही. ह्यामुळे संदेश अतिशय स्पष्ट आणि चांगल्या पद्धतीने एका ठिकाणाहून दुसरीकडे नेला जातो.

३) फायबर ऑप्टिक्स आधी सांगितलं तसं एकाच वेळेस मिलियन कॉल्स अथवा माहितीची देवाणघेवाण करू शकते. त्यामुळे हाय बॅण्डविड्थ ही फायबर ऑप्टिक्समुळे शक्य झाली आहे.

मेडिकल, मिलिट्री, इंटरनेट, कॉम्प्युटर ते अगदी साधं कोणत्याही संदेश वहनात पाठीचा कणा असलेल्या फायबर ऑप्टिक्स चे वडील म्हणुन पुर्ण जगात ज्यांची ओळख आहे ते नरिंदर सिंग कापनी ह्यांना आपलेच भारतीय लोकं ओळखत नाहीत ही शोकांतिका आहे. आजवर १०० पेक्षा जास्ती प्रबंध त्यांनी ह्यावर लिहले असुन १९६० साली अमेरीकन सायंटीफीक मध्ये त्यांनी प्रकाशातुन माहितीच्या देवाणघेवाणी च्या ह्या पद्धतीला 'फायबर ऑप्टिक्स' म्हणुन नावं दिलं. आज प्रत्येक घराघरात फायबर ऑप्टिक्स हा शब्द रोज उच्चारला जातो मात्र त्या शब्दाचा जनक मात्र आज वयाच्या ९३ वर्षी आपल्याच लोकांच्या विस्मरणात गेला आहे. फायबर ऑप्टिक्स चा शोध लावुन पुर्ण जगाला माहितीच्या संदेश वहनाने जवळ आणणाऱ्या ह्या भारतीयांस माझा कडक सॅल्युट....

फोटो स्रोत :- गुगल 
 
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

ब्राह्मोस चं ब्रह्मास्त्र... विनीत वर्तक ©

ब्राह्मोस चं ब्रह्मास्त्र... विनीत वर्तक ©

ब्राह्मोस क्षेपणास्त्र सध्या चर्चेत आहे ते त्याला विकत घेण्यासाठी लागलेल्या जगातील इतर देशांच्या रांगांवरून. जवळपास डझनभर देश सध्या ब्राह्मोस विकत घेण्यासाठी इच्छुक आहेत. ह्यातील प्रामुख्याने देश हे साऊथ इस्ट आशिया मधले आहेत. चीन च्या वाढत्या नौदल ताकदीला जश्यास तसं उत्तर देण्याची ताकत सध्या फक्त ब्राह्मोस क्षेपणास्त्राकडे आहे. ह्या क्षेपणास्त्र मध्ये असं काय आहे की अमेरीका सारख्या देशाकडे ही ह्याच्या पासुन बचाव करण्याची यंत्रणा नाही. ब्राह्मोस हे भारत आणि रशिया ह्यांची संयुक्त निर्मिती आहे. खाली ह्या क्षेपणास्त्रची काही वैशिष्ठ,

१)  ह्या क्षेपणास्त्र चं वजन ३००० किलोग्रॅम असुन ८.४ मीटर लांब आहे.

२)  हे क्षेपणास्त्र 'युनिवर्सल लाँच' तंत्रज्ञान असलेलं आहे. जमीन, हवा, पाणी तसेच पाण्याखालुन ही डागता येते.

३)  ह्याचा वेग माख ३ इतका आहे. १ किलोमीटर च अंतर कापायला फक्त १ सेकंदाचा कालावधी ब्राह्मोस घेते. बंदुकीतुन निघालेल्या गोळी पेक्षा अधिक वेगाने आपल्या लक्ष्याचा वेध घेते. ब्राह्मोस च्या स्वनातीत वेगामुळे त्याला रोखण्यासाठी मिळणारा वेळ अतिशय कमी मिळतो.

४) ब्राह्मोस आपल्या सोबत फक्त २०० -३०० किलोग्रॅम ची स्फोटके घेऊन जाते. पण ब्राह्मोस चा वेग त्याला प्रचंड घातक बनवतो. ही ३०० किलोग्रॅम ची स्फोटके सर्वसाधारण क्षेपणास्त्रपेक्षा ९ पट अधिक नुकसान करतात. ( ब्राह्मोस ची कायनेटिक ऊर्जा बाकी क्षेपणास्त्रांपेक्षा ९ पट जास्त असल्याने होणाऱ्या विध्वंसाची तिव्रता तितकीच जास्ती आहे.)

५) ब्राह्मोस च्या केलेल्या चाचण्यांमध्ये असं दिसुन आलं आहे की ब्राह्मोस एका घावात भल्या मोठ्या युद्ध नौकांचे अक्षरशः दोन तुकडे करण्यात सक्षम आहे. ह्या चाचण्यांत दिसलेल्या ब्राह्मोस च्या क्षमतेने जगातील भल्या भल्या राष्ट्रांची झोप उडाली आहे.

६) ब्राह्मोस हवेतुन प्रवास करताना एका सरळ रेषेत प्रवास करत नाही. आपल्या शेवटच्या टप्प्यात इंग्रजी एस ह्या या अक्षराप्रमाणे ते हवेतुन वळण घेतं असल्याने त्याला निष्प्रभ करणे जवळपास अशक्य आहे.

७) ब्राह्मोस आपल्या लक्ष्याचा वेध घेण्यासाठी भारत आणि रशियाच्या दोन्ही संपर्क प्रणाली चा वापर करते. आय.एन.एस., ग्लोनास, गगन आणि जी.पी.एस. त्यामुळे कोणत्याही एका प्रणाली ला जॅम केलं तरी ब्राह्मोस ला रोखणं अशक्य आहे.

८) ब्राह्मोस ची अचुकता १ स्केवर मीटर इतकी अचुक आहे. (३०० किलोमीटर वरून १ स्केवर मीटर च्या आत ठरलेल्या लक्ष्यावर अचुकतेने मारा करू शकते.)

९) भारत आधी एम.टी.सी.आर. ग्रुप चा सदस्य नसल्याने ब्राह्मोस ची क्षमता ३०० किमी ठेवण्यात आली होती. पण आता भारत ह्या ग्रुप चा सदस्य झाल्याने आता ६०० किमी लांब मारा करू शकणाऱ्या ब्राह्मोस ची निर्मिती सुरु आहे. ह्या क्षमतेमुळे अगदी लांबुनपण ब्राह्मोस डागता येऊ शकणार आहे.

भारत आणि रशिया ब्राह्मोस च्या हायपर सॉनिक व्हर्जन वर काम करत आहे. हे क्षेपणास्त्र हवेतुन माख ७- माख ८ वेगाने जाण्यास सक्षम असणारं आहे. त्यामुळे ब्राह्मोस ब्रँड जगात अनेक देशांच्या पसंतीस उतरत आहे. भारत आणि रशिया हे तंत्रज्ञान मित्र राष्ट्र, त्यातलं अर्थाजन, त्याचा सामरिक परीणाम ह्याचा विचार करून विकणार आहे. ह्याची सुरवात ह्याच वर्षी होतं असुन भारत ब्राह्मोस मिसाईल फिलिपाइन्स ह्या देशाला विकण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या येत्या काही महिन्यात करेल.

फोटो स्रोत :- गुगल 

Thursday, 9 January 2020

व्हिक्टोरिया क्रॉस विजेते 'नायक यशवंत घाडगे' इतिहासातील एक सोनेरी पान... विनीत वर्तक ©

व्हिक्टोरिया क्रॉस विजेते 'नायक यशवंत घाडगे' इतिहासातील एक सोनेरी पान... विनीत वर्तक ©

ए मेरी ज़मीं अफसोस नहीं
जो तेरे लिए सौ दर्द सहे
महफूज रहे तेरी आन सदा
चाहे जान ये मेरी रहे न रहे....

काळाच्या ओघात लुप्त झालेल्या इतिहासात काही भारतीय सैनिक ह्या ओळी अक्षरशः खऱ्या आयुष्यात जगले होते. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी शत्रुशी लढा दिला. आपला मृत्यू साक्षात समोर असताना सुद्धा त्यांनी पराक्रमाची शर्थ केली आणि शत्रुच्या गोटात खळबळ माजवली. महाराष्ट्रातील मर्द मराठ्यांचा इतिहास हा अश्याच पराक्रमांनी लिहिला गेला आहे. अवघ्या ७ साथीदारांसह शत्रुवर चाल करून जाणाऱ्या प्रतापराव गुर्जरांचा पराक्रम हा त्यातलाच..

म्यानातुनि उसळे तरवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात!

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात!

खालून आग, वर आग, आग बाजूंनी,
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात!

ह्याच पराक्रमाची गाथा अश्याच एका पराक्रमी मराठी सैनिकाने साता समुद्रापार लिहली. त्यांच्या पराक्रमाने जर्मन शत्रु सेना आणि ज्यांच्या साथीने ते लढले त्या ब्रिटिश सेना दोन्ही निशब्द झाल्या. ह्या पराक्रमी मराठी सैनिकांच नाव होतं नायक 'यशवंत घाडगे'.

यशवंत घाडगे ह्यांच्या जन्म १६ नोव्हेंबर १९२१ ला झाला. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी सिपोई म्हणुन ब्रिटिश सेनेमध्ये प्रवेश घेतला. त्यांची नियुक्ती आखाती देशात करण्यात आली. त्यांनी दाखवलेल्या निष्ठा आणि पराक्रमामुळे त्यांची बढती 'नायक' म्हणुन करण्यात आली. १९४४ साली ५ मराठा इन्फ्रंटरी चा भाग म्हणुन दुसऱ्या महायुद्धात जर्मन सेनेशी लढण्यात इटली ला पाठवण्यात आलं. १० जुलै १९४४ ला अप्पर तिबेर व्हॅली ला नायक यशवंत घाडगे ह्यांच्या नेतृत्ताखाली असलेल्या तुकडीला जर्मन सेनेकडुन होणाऱ्या प्रचंड गोळीबाराला सामोरं जावं लागलं. ह्या गोळीबारात नायक यशवंत घाडगे ह्यांना सोडुन जवळपास सगळे सैनिक मृत्यूमुखी अथवा जखमी झाले. आपल्यासोबत अजुन कोणी नाही ह्याची जाणिव असताना पण मागचा पुढचा विचार न करता त्यांनी मशिनगन असलेल्या पोस्ट वर आपल्या टॉमी गन आणि ग्रेनेडसह हल्ला केला.

आपल्या ग्रेनेड ने त्यांनी मशिनगन आणि ती चालवणाऱ्या जर्मन सैनिकाला त्यांनी निष्प्रभ केलं. आपल्या टॉमीगन सह त्यांनी मशिनगन पोस्ट वर हमला केला. त्यांच्या बंदुकी मधील गोळ्या संपल्या आणि त्याच वेळी ती पोस्ट सांभाळणाऱ्या दोन जर्मन सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. गोळ्यांची मॅगझीन बदलायला वेळ लागेल लक्षात येताच त्यांनी गोळ्या संपलेल्या बंदुकीसह त्या दोन सैनिकांवर हल्ला केला. त्या दोन्ही सैनिकांचा त्यांनी आपल्या हातांनी खात्मा केला. त्याचवेळी मागे लपलेल्या एका स्नायपर च्या गोळीने त्यांचा वेध घेतला. नायक यशवंत घाडगे ह्यांनी एकट्याने जर्मन पोस्ट हस्तगत केली होती. पण हा सिंह शत्रुच्या गोळीमुळे धारातीर्थी पडला. ब्रिटिश सेनेने पोस्ट जिंकल्यावर त्यांच्या मृतदेहाचा शोध घेतला परंतु त्यांचा मृतदेह सापडला नाही.

त्यांच्या ह्या बहादुरी आणि पराक्रमाबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांच्या सर्वोच्च सैनिकी पुरस्कार 'व्हिक्टोरिया क्रॉस' ने सन्मानित केलं.

The KING has been graciously pleased to approve the posthumous award of the VICTORIA CROSS to:—

No. 9192 Naik Yeshwant Ghadge, 5th Mahratta Light Infantry, Indian Army.

In Italy, on 10th July, 1944, a Company of the 5th Mahratta Light Infantry attacked a position strongly defended by the enemy.

The courage, determination, and devotion to duty of this Indian N.C.O. in a situation where he knew the odds against him gave little hope of survival, were outstanding.

— London Gazette, 2 November 1944.

त्यांच्या ह्या अभुतपुर्व पराक्रमाची नोंद भारत सरकारने घेताना तहसिलदार ऑफिस, माणगाव, रायगड इकडे त्यांच्या स्मारक उभारलं. वयाच्या अवघ्या २२ वर्षी नायक यंशवंत घाडगे ह्यांनी हा भिमपराक्रमाची नोंद इतिहासात सोनेरी अक्षरांनी केली. आपल्या एकटाच्या बळावर एक पुर्ण पोस्ट त्यांनी शत्रु कडुन हस्तगत केली होती. आपल्या जिवाची पर्वा न करता ते शत्रुवर चालुन गेले. त्यांचा हा पराक्रम ब्रिटिश आणि जर्मन सेनेसाठी अनपेक्षित असा होता कारण असे पराक्रम शिकवले जात नाहीत तर ते रक्तात असावं लागते. मर्द मराठी इतिहासाचा सोनेरी वारसा आपल्या रक्तात असणाऱ्या नायक यशवंत घाडगे ह्यांनी साता समुद्रापार पुर्ण जगाला ह्याची ओळख करून दिली. त्यांच्या ह्या पराक्रमापुढे माझा सॅल्युट आणि साष्टांग नमस्कार.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Wednesday, 8 January 2020

एका शेवटच्या प्रवासात... विनीत वर्तक ©

एका शेवटच्या प्रवासात... विनीत वर्तक ©

ओरायन (मृग ) नक्षत्रातला एक तारा सध्या जगभरातील संशोधकांच्या रडार वर आला आहे. ह्या ताऱ्याचे नाव आहे 'बेट्लज्यूस'. बेटलज्यूस हा रेड सुपर जायंट तारा आहे. आपल्या आकाशातील ९ वा सगळ्यात तेजस्वी तारा आणि ओरायन तारकासमूहातील दुसऱ्या नंबरचा तेजस्वी तारा आहे. सूर्यापेक्षा जवळपास २० पट हा तारा मोठा आहे. ह्याचा व्यास जवळपास १२०० मिलियन किलोमिटर इतका प्रचंड आहे. जर हा तारा सूर्याच्या जागी ठेवला तर हा गुरु च्या कक्षेपर्यंतची जागा व्यापेल इतका अवाढव्य आहे. इतका अवाढव्य असल्याने हा सुर्यापेक्षा अधिक वेगाने आपलं थर्मोन्यूक्लिअर इंधन संपवत आहे. आपल्या सूर्याचे वय साधारण ४.५ बिलियन वर्ष आहे तरीपण अजुन त्याच अर्ध आयुष्य बाकी आहे. पण बेटलज्यूस चं वय फक्त १० मिलियन वर्ष असुन तो शेवटच्या घटका मोजत आहे. आपल्या आतल्या भागात हेलियम चं न्युक्लीयर फ्युजन करत ऑक्सिजन आणि कार्बन तयार आहे. एका क्षणाला ह्या आतल्या भागाला तो सांभाळू शकणार नाही. मग जे होईल ती आकाशातली दिवाळी असेल. बेटलज्यूस एखाद्या बॉम्ब प्रमाणे फुटेल.

बेटलज्यूस हा टायमर लावलेला बॉम्ब आहे. तो कधी फुटेल ह्या बद्दल सध्यातरी कोणीच काही सांगु शकत नाही. कारण मानवी इतिहासात अश्या घटना अतिशय दुर्मिळ असुन आत्तापर्यंत खुप कमी घटनांची नोंद आहे पण त्याही खुप दशके आधी घडलेल्या आहेत. त्यामुळे एखाद्या रेड अथवा ब्लु सुपर जायंट ताऱ्याचा अंत कसा होतो ह्याबद्दल आपलं ज्ञान खुप कमी आहे. जे काही आहे तो अंदाज आहेत. ह्यामुळेच आपल्या सौरमालेपासुन ६४२ प्रकाशवर्ष लांब असलेला बेटलज्यूस वैज्ञानिकांसाठी अतिशय महत्वाचा आहे. बेटलज्यूस चा बॉम्ब जेव्हा फुटेल तेव्हा होणाऱ्या स्फोटाला 'सुपरनोव्हा' म्हंटल जाईल. पृथ्वीपासून अवकाश अंतराच्या मानाने बेटलज्यूस जवळ असल्याने ही दिवाळी उघड्या डोळ्याने दिवसा ढवळ्यापण आकाशात काही काळ दिसेल. पण तरीही ह्याचा कोणताही परीणाम पृथ्वीवर होणार नाही. ही दिवाळी आकाशात सुरु असेल तेव्हा बेटलज्यूस चंद्रापेक्षा ही तेजस्वी असेल. ह्यामुळे बेटलज्यूस चा शेवटचा प्रवास वैज्ञानिकांसाठी अतिशय महत्वाचा आहे.

ऑक्टोबर २०१९ पासुन बेटलज्यूस ने आपले रंग बदलायला सुरवात केली. आकाशात ९ वा सगळ्यात तेजस्वी असणारा तारा हळूहळू अतिशय मंद होतो आहे. गेल्या ३ महिन्यात त्याने ६०% तेजस्विता गमावली आहे. पहिल्या १० मधे असणारा बेटलज्यूस तेजस्वितेच्या बाबतीत २५ पलीकडे गेला आहे. बेटलज्यूस हा व्हेरिबल पद्धतीचा तारा असल्याने त्याच्या आकारात आणि तेजस्वितेत फरक होतं असतो. साधारण ५.९ वर्षाच त्याच एक सायकल आहे. ह्यातही ४२५ दिवसांनी ह्याच्या तेजस्वितेत घट होतं असते. पण सध्या झालेली घट ही अनपेक्षित आहे. तसेच त्याचा फुटण्याचा (सुपरनोव्हा होण्याचा) काळ हा आजपासुन १,००,००० वर्षात कधीही असल्याने बेटलज्यूस फुटण्याआधी अनपेक्षितरीत्या मंद झाला तर नाही न असा एक कयास जगभरातील वैज्ञानिक व्यक्त करत आहेत. पण सुपरनोव्हा होताना बेटलज्यूस सारखा तारा कोणत्या स्थितांतरातून जातो ह्याची माहिती पुरेशी नसल्याने वेगवेगळे तर्क वितर्क मांडले जात आहेत.

इकडे सामान्य माणसांनी हे लक्षात घ्यायला हवं आता जो बेटलज्यूस दिसतो आहे तो ६४२ वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे १४ व्या शतकातल्या बेटलज्यूस ला आपण आत्ता बघत आहोत. आज तो आहे की नाही हे कळायला आपल्या पुढल्या ६-७ पिढयांना वाट बघावी लागेल. म्हणजे आज जरी सुपरनोव्हा आपल्याला दिसला तरी विश्वाच्या पोकळीत त्याच अस्तित्व संपलेलं असेल फक्त आपण आज भुतकाळात बघत असु. बेटलज्यूस पुन्हा एकदा तेजस्वी होईल असं अनेक शास्त्रज्ञांचं मत आहे कारण सुपरनोव्हा चा कालावधी खुप प्रचंड आहे त्यामानाने आपल्या जीवनाचा कालावधी खुप कमी असल्याने सुपरनोव्हा दिसण्याची शक्यता धुसर आहे. काही झालं तरी बेटलज्यूस चा शेवटचा प्रवास मानवी अवकाश इतिहासातला एक अदभुत प्रवास असणार आहे ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.