Friday, 26 May 2017

WALL इ... विनीत वर्तक

माझ्या सगळ्यात आवडत्या चित्रपटानंपैकी एक म्हणजेच WALL इ. हा एक मानव निर्मित रोबोट असतो. त्याच्या पूर्ण प्रवासावर हा चित्रपट बेतलेला आहे. ह्याच नाव मुद्दामून इंग्रजी आणि मराठी अस लिहील कारण त्याच्या नावामध्ये खूप काही आहे. जश्या दोन वेगळ्या भाषा एक होऊन एक मूर्त स्वरूप होऊ शकते. तर दोन वेगळ्या काळातील, ग्रहावरील रोबोट मध्ये का नाही? WALL इ आणि इवा दोघे वेगळ्या कालखंड आणि वेगळ्या रुपात बनलेले रोबोट यांत्रिक शक्तीपलीकडे जेव्हा भावना समजतात. तेव्हा ते समजण किती सुंदर असू शकते ह्याच उत्तम आणि सुंदर सादरीकरण म्हणजे हा चित्रपट.
हा चित्रपट प्रेमाच भावविश्व अगदी अलगद मांडताना अनेक विषयांना साद घालतो. कोर्पोरेट क्षेत्र, माणसाचे निसर्गावरील अत्याचार आणि त्याचे परिणाम, कचऱ्याची व्हीलेवाट, वैश्विक संकट ते अगदी लठ्ठपणा अश्या सगळ्याच विषयांवर येणाऱ्या काळातील परिस्थिती विषद करतो. चित्रपटाची सुरवातच मुळी कचऱ्याची व्हीलेवाट लावणाऱ्या रोबोट पासून होते. त्यातील एक रोबोट मात्र काळाच्या कसोटीवर टिकून रहातो. तो म्हणजेच WALL इ.
त्याचा प्रवास पृथ्वीवरून कसा वेगळ्या स्पेस शटल मध्ये होतो. त्याची आणि इवा ची भेट. ते त्यांच्या भेटीतून एकमेकांना समजून जाण्याचा प्रवास बघण म्हणजे प्रेमाला अनुभवण. हा चित्रपट बघताना आपण त्यांची जागा कधी घेतो कळतच नाही. निदान मी तरी नेहमीच त्याच्या भूमिकेत स्वतःला बघत आलो. रोबोट असून सुद्धा अंकुरलेल्या एका पालवी साठी जीवाच्या पलीकडे संरक्षण करणारे ते दोघेही आपल्याला पुढे येणाऱ्या कठीण काळाची एक झलक दाखवून देतात. वृक्षसंवर्धन किती महत्वाचे आहे. हा साधा पण एक प्रचंड महत्वाचा संदेश आपल्याला पूर्ण चित्रपटातून मिळतो.
हा चित्रपट मला अनेक कारणांसाठी खूप आवडतो. एकतर रोबोट ना दिलेली भावनांची जोड आणि त्या भावनांची उकल करताना यंत्रांची होणारा गोंधळ आणि शेवटी समजल्यावर त्यांची व्यक्त होण्याची पद्धत ज्या तर्हेने दाखवली आहे. त्याला तोड नाही. दोन रोबोट मधील प्रेम, राग, भांडण आणि सगळ्याच व्यक्त अव्यक्त भावना दाखवताना प्रत्येक क्षणाक्षणाला हा चित्रपट हळूच चिमटे पण काढतो. आवाज, एनिमेशन ह्याचा अतिसुंदर मिलाफ, भावनांची परिपूर्ण गुंफण, त्या जोडीला अनेक संदेश देणारा हा चित्रपट मला नेहमीच खूप वेगळा वाटतो.
पिक्सार ह्या एनिमेटेड चित्रपट बनवणाऱ्या कंपनी चा हा पहिलाच चित्रपट होता. १८० मिलियन अमेरिकन डॉलर नि बनलेल्या ह्या चित्रपटाने ५३३ मिलियन डॉलर ची तुफानी कमाई केली. एनिमेशन चित्रपटाला ह्या चित्रपटाने एका वेगळ्याच उंचीवर नेल. टाईम च्या नुसार ह्या शतकातील सर्वोत्तम चित्रपट, ऑस्कर पुरस्कार बेस्ट एनिमेशन साठी तर इतर भागात ५ नामांकन, गोल्डन ग्लोब पुरस्कार. असे अनेक पुरस्कार पटकावणारा हा चित्रपट मनात कायम रुंजी घालत रहातो त्या WALL इ आणि इवा साठी. इंग्रजी चित्रपट न बघणाऱ्यानी सुद्धा अगदी वेळात वेळ काढून हा चित्रपट बघावा. २००८ साली जरी हा चित्रपट आला असला तरी त्याच एनिमेशन आत्ताच्या बाहुबली पेक्षा प्रचंड उच्च गुणवत्तेच आहे. कितीही वेळा बघितला तरी प्रत्येक वेळी प्रेमात पाडणारा त्याच वेळी भावनांची गुंफण सांगणारा हा नितांत सुंदर चित्रपट नक्की बघाच.

No comments:

Post a Comment