Friday, 26 May 2017

हिडन फिगर्स... विनीत वर्तक

हिडन फिगर्स हा आत्ताच आलेला एक अप्रतिम चित्रपट पाहिला. प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन घेऊनच हॉलीवूड मधील चित्रपट समोर येतात. कोणाच्या तरी आयुष्यावर बेतलेला असून सुद्धा चित्रपट अनेक कंगोरे समोर मांडतो. चित्रपटाच्या नावाने असलेल्या मार्गोट ली शेटरली ह्या लेखिकेच्या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. नासा म्हणजेच न्याशनल एरोनोटीक्स एंड स्पेस अड्मीनीस्ट्रेशन मध्ये काम करणाऱ्या आफ्रिकन अमेरिकन महिलां म्हणजेच क्याथरीन जॉन्सन, डोरोथी वॉगन आणि मेरी ज्याक्सन अश्या तीन कर्मचाऱ्यानवर हा चित्रपट भाष्य करतो.
लहानपणापासून गणितात हुशार असणारी क्याथरीन हि नासा मध्ये गणित तज्ञ म्हणून कामाला असते. गणितातील अनेक प्रमेय, कोडी चुटकीसरशी सोडवणारी व त्याच वेळी अंकांवर प्रेम असलेली क्याथरीन उपग्रहांच्या कक्षा तसेच त्याच्या उड्डाणाच्या रस्त्याच गणित सोडवण्याच काम करत असते. इकडे एक लक्षात घ्यायला हव कि हा सर्व काळ कॉम्प्युटर तयार होण्यापूर्वीचा आहे. ज्यावेळी किचकट अशी गणितातील प्रमेय आणि आकडेमोड करण्यासाठी अश्या हुशार व्यक्तींची खास गरज असायची.
क्याथरीन सोबत तिच्या दोन मैत्रिणी म्हणजेच डोरोथी आणि मेरी ह्या पण नासा च्या वेगळ्या विभागात काम करत असतात. डोरोथी नासा मध्ये सुपरवायजर तर मेरी इंजिनियर म्हणून कार्यरत असते. नासा सारख्या स्वप्नवत ठिकाणी काम करत असताना सुद्धा त्या काळी महिलांना स्पेशली आफ्रिकन- अमेरिकन महिलांना कशी दुय्यम वागणूक दिली जायची व एक स्त्री आणि पुरुष ह्यातील भेदभाव कसा केला जायचा ह्याच चित्रच ह्या चित्रपटाने मांडल आहे.
रशियाने अमेरीकेआधी उपग्रह सोडल्याने नासा वर ह्या शर्यतीत पुढे जाण्याच आव्हान उभ रहाते. त्याच वेळेस चुटकीसरशी आकडेमोड करणाऱ्या क्याथरीन ला सेप्स टास्क ग्रुप मध्ये कार्यरत होण्याची संधी मिळते. ह्या बिल्डींग मध्ये काम करणारी पहिली आफ्रिकन-अमेरिकन महिला म्हणून तिला अनेक आव्हानांना, नजरांना आणि अनेक संकटाना सामोरे जावे लागते. ह्यातून तिचा प्रवास म्हणजे एक स्त्री आणि एक आफ्रिकन- अमेरिकन स्त्री जी दोन्ही स्तरावर म्हणजे पहिल्यांदा स्त्री म्हणून तर नंतर रंगामुळे तिच्या क्षमतांवर संशय घेतला जातो. तेव्हा ती स्वतःला कस सिद्ध करते ते चित्रपटात बघण चांगल.
एकीकडे क्याथरीन आपल्या नवीन जबाबदारी वर लढत असताना डोरोथी पुढे अडचणी वाढत जातात. आय.बी.एम. च्या नवीन कॉम्प्युटर मुळे आपला जॉब जाणार अस दिसत असताना व सतत काळ्या रंगाने रंगभेद अनुभवताना डोरेथी कशी आपल्या हुशारीने गोष्टी वळवते ते बघण म्हणजे एका स्त्री चा लढा बघण. आपल्याकडे बुद्धी असूनही फक्त रंगामुळे अमेरिकेन कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी मेरी ला पण अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. ती त्यात यशस्वी होते का? ह्या तिघींचा प्रवास कसा होतो? त्यात त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात काय उलथापालथी होतात? हे सर्व अनुभवयाच असेल तर बघयला हवा हिडन फिगर्स.
ह्या तिन्ही व्यक्तिरेखा खऱ्या असून अमेरिकेत त्यांनी दिलेल्या नासाच्या योगदानात किंबहुना अमेरिकेला अवकाशात नंबर एक वर पोचवण्यात ह्या तिन्ही स्त्रियांचं खूप वाटा आहे. क्याथरीन जॉन्सन आता ९८ वर्षाच्या आहेत. १९५३ ते १९८६ त्यांनी नासा मध्ये काम केल. त्यांनी नासा ला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना २०१५ साली प्रेसिडेंशीयल मेडल ऑफ फ्रीडम देण्यात आल. अमेरिकेतील हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. तसेच नासाने ल्यान्गली रिसर्च सेंटर च्या बिल्डींग ला क्याथरीन जॉन्सन ह्याचं नाव दिल आहे. अश्या आपल्या प्रतिभेने अमेरीकेच नाव अवकाश क्षेत्रात उज्ज्वल करताना ह्या सर्वांनी एक स्त्री म्हणून आपली छाप पडताना खरोखरीच हिडन फिगर्स ह्या चित्रपटाच नाव सार्थक केल आहे. अवकाश तंत्रज्ञानात आपल्या प्रतिभेने स्त्री ला सन्मान देणाऱ्या ह्या तिघीसाठी तरी हा चित्रपट बघयला हवाच.

No comments:

Post a Comment