Friday 26 May 2017

निर्णायक दिवस... विनीत वर्तक

१९९२ च वर्ष होत. अमेरिकेचे त्या वेळेचे अध्यक्ष सिनियर बुश नी अध्यादेश काढत रशियाला क्रायोजेनिक इंजिनच अत्याधुनिक तंत्रज्ञान भारताला देण्यापासून परावृत्त केल. अगदी जवळचा आणि भरवशाचा मित्र असलेल्या रशियाने त्यावेळी अंतरराष्ट्रीय दबावाखाली भारताला हे तंत्रज्ञान देण्यापासून नकार दिला. १९९२ ते आज २०१७ खूप पाणी पुलाखालून वाहून गेल. आज त्याच अमेरिकेच्या नासा ने भारताच्या इस्रो सोबत सहकार्य करार केला. आता त्या करारानुसार २०२१ ला निसार ह्या मोहिमेची आखणी झाली. २०१६-१०१७ सालच इस्रो ची वार्षिक उलाढाल १.४ बिलियन अमेरिकन डॉलर ची आहे. तर नुसत्या निसार मोहिमेची किमंत तब्बल १.५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे. म्हणजे आपल्या एका वर्षाच्या जमा खर्चा पेक्षा जास्त किंमत असणाऱ्या मोहिमेसाठी व जगातील सगळ्यात महाग अर्थ इमेजिंग उपग्रहासाठी नासा ने इस्रो ची निवड करावी हा काळाचा महिमा म्हणा किंवा भारतीय वैज्ञानिकांचे अथक परिश्रम. हा उपग्रह ज्या रॉकेट मधून प्रक्षेपित होईल ज्या जी.एस.एल.व्ही. रॉकेट साठी १९९२ साली अमेरिकेने भारताचे सगळे दरवाजे बंद केले होते.
जी.एस.एल.व्ही. मार्क २ हे रॉकेट २ टना पर्यंत जी.टीओ. म्हणजेच भूस्थिर अश्या कक्षेत प्रक्षेपित करू शकतो कि जिथून पृथ्वीचा परिवलनाचा वेग आणि उपग्रहाचा वेग सारखा असतो. सोप्प्या शब्दात सांगायचं झाल तर हा उपग्रह ध्रुव ताऱ्या सारखा स्थिर एकाच ठिकाणी पृथ्वीवरून दिसू शकेल. हि कक्षा पृथ्वीच्या विषुववृत्तापासून सुमारे ३५,७८६ किलोमीटर उंचीवर आहे. ह्याचा अर्थ तुम्हाला कोणताही उपग्रह जर ह्या कक्षेत स्थापन करायचा असेल तर रॉकेट ला उपग्रहाला घेऊन हि उंची गाठता यायला हवी. आजवर भारत मार्क २ च्या द्वारे २ टन वजना पर्यंतचे उपग्रह इथवर घेऊन जाऊ शकत होता. पण कम्युनिकेशन आणि ब्रोडकास्ट साठी लागणाऱ्या उपग्रहांच वजन ४ ते ५ टन इतक असते. आजवर भारत असे उपग्रह पाठवण्यासाठी एरियन ह्या युरोपियन संस्थेची मदत घेत होता. त्यासाठी भारताला ४०० कोटी रुपये किंवा ६० मिलियन अमेरिकन डॉलर प्रत्येक उपग्रहामागे मोजावे लागत होते.
येत्या ५ जून २०१७ ला भारत त्याच सगळ्यात मोठ रॉकेट म्हणजे जी.एस.एल.व्ही मार्क ३ प्रक्षेपित करत आहे. ४ टना हून अधिक भार भूस्थिर कक्षेत नेण्याची ह्याची क्षमता आहे. ह्या रॉकेट च्या सफल प्रक्षेपणामुळे भारताची दुसऱ्या देशांवर असलेल परावलंबित्व तर संपुष्टात येईलच पण जवळपास निम्म्या खर्चात आपण हे उपग्रह स्वबळावर प्रक्षेपित करू शकणार आहोत. ह्या रॉकेट मध्ये पहिल्या भागात किंवा स्टेज मध्ये एस २०० सॉलिड रॉकेट बुस्टर असतात. जे १३० सेकंद जळून ५०० टन इतक बल निर्माण करतात. हि स्टेज संपण्याआधीच दुसरी स्टेजच प्रज्वलन होते ह्यात एल ११० लिक्विड स्टेज विकास इंजिन प्रणाली वापरली जातात. ह्यामुळे ११० टन बल निर्माण होते. ११३ सेकंदानंतर हि स्टेज सुरु होऊन २०० सेकंद चालते. तिसरी व सगळ्यात महत्वाची स्टेज म्हणजे क्रायोजेनिक अप्पर स्टेज. ह्याच स्टेज साठी लागणार तंत्रज्ञान आजवर भारताला देण्यात आल नव्हत. पण स्वतःच्या हिमतीवर भारतीय व स्पेशली इस्रो च्या अभियंत्यांनी हे इंजिन बनवून यशस्वी करून दाखवलं. ह्यात सी ई २० क्रायोजेनिक इंजिनांचा वापर केला जातो. २० टन वजनाच इंधन ह्या प्रक्रियेत जाळून उपग्रहाला योग्य कक्षेत नेल जाते.
जी.एस.एल.व्ही मार्क ३ ची सध्या जरी ४ टन वाहून नेण्याची क्षमता असली तरी ह्याच्या पुढील विकसित भागात ७-८ टन वजन भूस्थिर कक्षेत वाहून नेण्याची क्षमता असणार आहे. मार्क ३ च प्रक्षेपणाचा दिवस ह्या साठी निर्णायक ठरणार आहे कि ह्याच रॉकेट मधून एक दिवस भारतीय अंतराळवीर अवकाशात प्रवेश करणार आहे. त्याच सोबत चांद्रयान-२ सारख्या मोहिमेत ह्याच रॉकेट चा वापर होणार आहे. ह्याच शक्तिशाली रॉकेट चा वापर करून आपण मंगळावर किंवा इंटर प्लानेटरी प्रवास करू शकणार आहोत. ह्या रॉकेट मुळे भारतच परकीय चलन वाचणार तर आहेच पण येत्या काळात इस्रो आणि भारतासाठी पी.एस.एल.व्ही प्रमाणे परीकीय चलन निर्माण करण्याची ताकद ह्या रॉकेट मध्ये आहे. पुढील काळात अनेक कम्युनिकेशन उपग्रहांची गरज भासणार आहे. अश्या वेळेस कमीत कमी किमतीत सेवा उपलब्ध करून देणारा किंग मेकर ठरणार आहे. पी.एस.एल.व्ही ने जो दबदबा कमी आणि हलक्या वजनाच्या उपग्रह प्रक्षेपणात केला आहे. तसाच लौकिक जर मार्क ३ ने घडवला तर येणाऱ्या काळात भारतात उपग्रह प्रक्षेपणासाठी वेटिंग लिस्ट लागल्यास आश्चर्य वाटणार नाही.
१९९२ ते ५ जून २०१७ हा खूप मोठा प्रवास आहे. ह्या सगळ्या प्रवासात अनेक कटू अनुभव इस्रो च्या अभियंता आणि वैज्ञानिकांनी पचवले आहेत. आपला वरचष्मा कायम राखण्यासाठी जेव्हा मानवी कल्याणाच्या दृष्ट्रीने उपयोगी असणार तंत्रज्ञान जेव्हा नाकारलं जाते. तेव्हा ते निर्माण करताना अनेक अपयशांची चव आणि अनेक अडथळे पार करावे लागतात. हे सर्व करत सगळ्या चाचण्या यशस्वी करत खऱ्या परीक्षेची तारीख जवळ येऊन ठेपली आहे. अर्थात यशस्वी होण्याची खात्री भारताला आहेच. ह्या पूर्ण कालावधीत भारताला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी मेहनत घेतलेल्या इस्रो च्या आजी- माजी अभियंते आणि वैज्ञानिक ह्यांना सलाम.

No comments:

Post a Comment