Friday 26 May 2017

२१ व्या शतकातील देवस्थान शेगाव... विनीत वर्तक

गेले अनेक दिवस मनात असलेली इच्छा पूर्ण झाली. भारतातील सर्वात सुंदर देवस्थान निदान माझ्या दृष्टीने तरी असलेल अस शेगाव बघण्याचा योग जुळून आला. मुंबई वरून शेगाव जवळपास ५६० किमी अंतर त्यामुळे इतक्या लोंग ड्राईव चा योग कोण सोडणार. मग काय मुंबई वरून ५:३० ला निघून नाशिक नंतर तिकडून येवला मार्गे औरंगाबाद गाठलं. औरंगाबाद ते जालना आणि मग तिकडून सिंदखेड राजा- खामगाव असा प्रवास करत संध्याकाळी ६:३० ला शेगाव मध्ये पोचलो. निवासाची व्यवस्था आधीच झाली असल्याने गाडी आनंद विहार इकडे वळवली.
आनंद विहार खरोखर आनंदायी होत. गाडी आत वळवताक्षणी आपण दुसरीकडे कुठे नाही न आलो? असच वाटू लागल. विदर्भात असूनही सगळीकडे हिरवीगार झाड. ज्यासाठी शेगाव प्रसिद्ध आहे ती स्वच्छता सगळीकडेच दिसत होती. आनंद विहार मध्ये आल्यापासून सगळीकडे दिशादर्शक फलक. पार्किंग ची उत्कृष्ठ व्यवस्था हे पाहून सुखावतो नाही तोच समोर समान नेण्यासाठी ट्रोली बघून नक्कीच आपण २१ व्या शतकातील एका देवस्थानाला भेट देत आहोत ह्याचा पदोपदी अनुभव येत होता. चौकशी च्या ठिकाणी अगदी ५ मिनिटांत रूम च्या चाव्या सुपूर्द. सगळी यंत्रणा अगदी चोख. कुठेही उर्मटपणा, कंटाळा ह्याचा लवलेश हि चेहऱ्यावर नाही. सेवाभाव हेच ब्रीदवाक्य ठेवत अगदी चोख व्यवस्था.
आनंद विहार मधील रूम बघून जागीच थबकलो. उत्कृष्ठ हि शब्द कमी पडतील अशी रूम. वातानुकुलीत व्यवस्थेपासून ते अगदी रूम मधील साबणाच्या वडीपर्यंत सर्वच एका फाईस्टार हॉटेल ला लाजवेल अशी व्यवस्था. गेल्या १३ तासापासून ड्राईव केल्याने आलेला शीण अगदी २ मिनिटात पळाला. चौकशी करताच असलेली चहा कॉफी ची व्यवस्था, बिस्किटा पासून ते औषधापर्यंत सगळ काही तिकडे अगदी बिग बझार च्या सेल पेक्षा कमी भावात. २४ तास तयार असणारी रुग्णवाहिका, आपत्कालीन स्थितीत जाण्याची व्यवस्था, आपण कुठे आहोत ते पूर्ण परिसराचा नकाशा, नियम सगळच क्लास. देवस्थानाला जाण्यासाठी बसेस च्या वेळा, त्या थांब्यावर बसण्यासाठी केलेली व्यवस्था सगळच आपण एखाद्या परक्या देशात आहोत असाच भास व्हावा. पूर्ण परिसरात झाडाच एक पान मला शोधून सापडल नाही जिकडे आक्खा परिसर झाडांनी वेढलेला आहे इतकी स्वच्छता.
महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश घेताच मेटल डिटेक्टर तसेच सुरक्षा रक्षक ह्यांनी केलेली तपासणी. करायची म्हणून नाही तर सगळ्या मशीन योग्य कार्यरत. माझ्या वडिलांच्या ब्याग मध्ये चुकून राहिलेली कात्री अगदी नम्रपणे बाजूला काढून ठेवून दर्शन झाल्यावर परत मिळण्यासाठीची व्यवस्था ह्याच मार्गदर्शन. पादत्राणे ठेवण्यापासून ते उष्णतेने पाय भाजू नये म्हणून पूर्ण चालण्याच्या मार्गावर गालिचे तसेच स्पेशल रंगाचा लेप त्यामुळे बाजूची लादी प्रचंड गरम असताना सुद्धा ह्या लेपामुळे पायाला अजिबात चटका बसत नाही. रांगेत उभ राहण्याआधी दर्शनाला लागणारा कालावधी मिनटामिनटाला भल्यामोठ्या एल.ई.डी. स्क्रीन वर अपडेटेड. रांगेत पदोपदी सेवेकरी, कुठेही गडबड गोंधळ नाही. न बोलता फक्त दिशा सांगत योग्य रीतीने पुढे जाणारी रांग. रांगेत सगळीकडे कुलर, पंखा तसेच पाणी, चहा ह्याची विनामूल्य व्यवस्था. जेष्ठांना बसण्यासाठी तसेच लहान मुलांना दुध पाजण्यासाठी मातृरूम ची व्यवस्था. डॉक्टर व वैद्यकीय व्यवस्था पण रांगेत कार्यरत.
स्तिमित होत जस समाधी च्या जवळ आलो तशी वातानुकुलीत व्यवस्था. कुठेही झुंबड नाही. महाराजांच्या समाधीच दर्शन घेताना कुठेही सुरक्षा रक्षक किंवा तिकडे असलेल्या ब्राह्मण आणि पंडिताकडून पैश्याचा व्यवहार नाही. अतिशय हसत, नम्रतेने पुढे जाण्याची विनंती. दर्शन घेऊन मंदिरात काही क्षण विसवताना सेवेकर्यांची सेवा बघून थक्क झालो. शांतता राखा अस सांगण्याची पद्धत म्हणजे बोलणाऱ्याला लाज वाटावी. समोर येऊन एकही शब्द न बोलता समोर धरलेल्या पाटीवरील सूचना वाचण्यासाठी केलेली मूक विनंती कि समोरचा वाचताक्षणी शांत. म्हणूनच इथल वेगळेपण टिकून आहे.
महराजांचा सहवास इकडे पदोपदी जाणवतो. एक असीम शांतता मनाला मिळते. इतक्या लांबून इथे येण्याच सार्थक त्या दोन क्षणात पुर्णत्वाला जाते. शेगाव देवस्थानात दान केलेल्या प्रत्येक पैश्याचा उपयोग इकडे भक्तांच्या सोयीसाठी केलेला पदोपदी जाणवतो. म्हणूनच इकडे दान करण मी तरी माझ भाग्य समजतो. ४२ कार्यानपेकी कोणत्याही कार्याला दान करताना मनात एकदा पण किंतु येत नाही. मी दिलेल्या रकमेनंतर देवस्थानांनी मला एक महाराजांची मोठी थ्री डी प्रतिमा दिली. (२१ व्या शतकात असलेला अजून एक अनुभव जिकडे थ्री डी सारखे शब्द आपल्याला त्याची जाणीव करून देतात.) त्या सोबत कापडाचा प्रसाद ( कापड हि साधसुध नाही तर रेमंड च ) देताना पण दोन्ही हात जोडून सेवेसाठी मदत केल्याच धन्यवाद जेणेकरून देण्यार्याला पण त्या देण्याच समाधान मिळाव.
आनंदसागर हा वेगळाच विषय आहे. त्यावर वेगळ लिहेन पण अध्यात्माचा, महाराजांच्या वास्तव्याचा स्पर्श अबाधित ठेवून सुद्धा २१ व्या शतकातील सुविधांनी परिपूर्ण असलेल अस शेगाव देवस्थान भारताच्या काय जगाच्या कोणत्याच कोपऱ्यात मला तरी आढळल नाही. आनंद विहार असो वा आनंद सागर किंवा देवस्थान सगळ्याच ठिकाणी नाव ठेवाव अस काहीच नाही. जेवण, राहण सगळ्याच बाबतीत अगदी कमीत कमी पैश्यात अप्रतिम व्यवस्था देण्यासाठी शेगाव ला तोड नाही.
चंद्रावर पण डाग असतात त्या प्रमाणे आपण हि डाग लावतोच. अभिप्रायाच्या वहीत लिहलेले अभिप्राय वाचत असताना काही गोष्टी अश्याच होत्या. चपाती निट नाही, चहा मशीन चा आहे अश्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या ठरतात. जिकडे हे सर्व सेवेकरी कोणत्याही वेतनाशिवाय महाराजांच्या सेवेसाठी सतत कार्यरत असतात. ते काही वेटर आणि आपले नोकर नाही. आनंद विहार हे काही हॉटेल नाही न आपण रिसोर्ट मध्ये आलो आहोत ह्याची काळजी प्रत्येक भक्तांनी घ्यायलाच हवी. कोणत्याही वेतनाशिवाय महिन्याचे सात दिवस सेवा देत ह्या २१ व्या शतकातील देवस्थानाला वेगळ्याच उंचीवर नेणाऱ्या सर्वच सेवेकर्यांना साष्टांग दंडवत. सेवा म्हणजे काय हे आम्ही तुमच्याकडून शिकायला हव. मोठे मोठे म्यानेजमेंट चे धडे देणाऱ्या सर्वच विद्यापीठांनी शेगाव चा अनुभव एकदा घ्यावाच. इकडे मिळालेली सर्विस हि मनाच समाधान तर देतेच पण आपल्यात तो भाव जागृत करते. माझ्यामते हे कुठेच पाहयला मिळत नाही. म्हणूनच २१ व्या शतकातील शेगाव देवस्थानाच्या सर्व अधिकारी, सेवेकरी ह्यांना सलाम.

No comments:

Post a Comment