Friday 26 May 2017

विदर्भाचा स्वर्ग “आनंद सागर”... विनीत वर्तक

शेगाव म्हंटल कि आनंद सागर च नाव समोर आल्यावाचून राहवत नाही. गेल्या आठवड्यात शेगाव वर लिहिताना आनंद सागर बद्दल मुद्दामून लिहण्याच टाळल कारण हा एक वेगळाच विषय आहे. आनंद सागर हे शेगाव मंदिराच्या २ किलोमीटर अंतरावर वसवण्यात आल आहे. संत गजानन महाराज शेगाव ह्या संस्थानाने ह्याची निर्मिती केली आहे. विदर्भा सारख्या पाऊस कमी पडणाऱ्या आणि पाणाच्या समस्येने नेहमीच ग्रासलेल्या भागात एका उद्यान, अध्यात्मिक केंद्र तसेच ध्यान केंद्राची रचना करून शेगाव संस्थेने विदर्भात स्वर्गाची रचना केली आहे अस म्हंटल्यास वावग ठरणार नाही.
३२५ एकर इतक्या प्रचंड जागेवर वसलेले आनंद सागर मध्ये तब्बल ५०,००० हून जास्त वृक्ष संपदा आहे. हजारो वेल हि ह्या जागेमध्ये वसवून त्याचं संवर्धन करण्यात आलेल आहे. विदर्भा सारख्या पाउस कमी पडणाऱ्या जमिनीत सुद्धा इतकी वृक्षसंपंदा निर्माण करणे किती जिकरीच असेल हे नेहमीच छोट झाड लावून त्याकडे दोन दिवसांनी न बघणारे अनेक महाभाग सांगू शकतील. झाड लावण सोप्प पण त्याचं जतन करून वृक्ष वेलींची सुबत्ता निर्माण करण हिमालय चढण्याइतकच कठीण काम आहे. पाण्याचं दुर्भिक्ष तसेच उन्हाळ्यातील तापमान अश्या दोन्ही टोकांच्या गोष्टीत वृक्ष संपंदा आजही आनंद सागर मध्ये वर्षाचे सगळे दिवस आपल लक्ष वेधून घेते. ह्या मागे मेहनत आहे ती संत गजानन महाराज संस्थांनाची.
इतक मोठ उद्यान व्यवस्थित ठेवण्यासाठी तितकीच पाण्याची गरज होती. ह्यासाठीच शेगाव संस्थानाने ९ किमी लांब असलेल्या मन नदीतून पाण्याची व्यवस्था केली. ह्यासाठी दर महिन्याला ५० लाख रुपयांचा खर्च संस्थानाला उचलावा लागणार होता. तरीसुद्धा शेगाव मध्ये स्वर्ग बनवण्यासाठी हा उचलण्याची तयारी संस्थानाने दाखवली. त्यातून जे निर्माण झाल ते समोर आहेच. ५० एकर जागेवर एक कृत्रिम तलाव निर्माण झाला. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या ठिकाणी सुद्धा वर्षभर ह्या तलावामुळे जमिनीत पाणी मुरत असते. ह्या तलावामुळे इथल्या भागातील पाण्याची पातळी कमालीची वाढली आहे.
अध्यात्म आणि नाविन्य ह्यांचा संगम टिकवून ठेवताना उद्यानांच प्रचंड मोठ प्रवेशद्वार हे राजस्थान च्या कारागिरांनी आपल्या कुशल कौशल्याने घडवल आहे. आत शिरताच भारतातील १८ राज्यांच प्रतिनिधित्व करणाऱ्या १८ संतांच्या प्रतिमा गोलाकार रचनेत आहेत. मध्यभागी संत श्री गजानन महाराज ह्यांची प्रतिमा असून एक विलोभनीय दृश्य बघणाऱ्याच्या नजरेत भरते. आत समोर जाताच भव्य तलाव आपली नजर खिळवून ठेवतो. त्यावरील झुलता पुलावर जाणे म्हणजे वेगळीच जाणीव आहे. पूर्ण तलाव इतका मोठा आहे. कि त्याच्या भोवती जायला १-२ तासाचा अवधी लागतो. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी ह्याच प्रतिरूप असलेल ध्यानमंदिर म्हणजे स्वर्गीय अनुभव. “Divine progress through Meditation” ह्या तत्वाला जागून इथला मेडीटेशन चा अनुभव घेतल्यावर असीम शांतता आणि समाधान मिळते.
नुसत हिंदू धर्माच प्रतिनिधित्व न करता इकडे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दोन्ही टोकांचा अनुभव मिळावा म्हणून मुलांना खेळण्यासाठी पार्क, ट्रेन, म्युजीकल कारंजे, मत्स्य संग्रहालय, अनेक लहान- मोठी मंदिरे आहेत. प्रत्येक ठिकाणी सेवेकरी आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत. प्रत्येक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वृद्धांसाठी व्हील चेअर, लहान मुलांसाठी बाबा गाडी पासून अगदी छत्री पर्यंत भाविकांच्या सुविधेसाठी व्यवस्था केली आहे. इतक प्रचंड मोठ उद्यान अतिशय स्वच्छ आणि टापटीप आहे. पूर्ण उद्यान फिरायला तब्बल ५-६ तासांचा अवधी लागतो. चालत किंवा बोटीने पण आपण ह्या उद्यानाचा आनंद घेऊ शकतो.
इतक मोठ प्रोजेक्ट पहिल्यांदा मनात येण. त्याचा प्लान तयार करण आणि प्रचंड आर्थिक गुंतवणूक असलेला असा भव्यदिव्य प्रकल्प वेळेत पूर्ण करून आजहि त्याची अध्यात्मिक आणि त्यातल नाविन्य टिकवून ठेवण हे नक्कीच अदभूत अस आहे. महाराजांचा आशीर्वाद आणि प्रामाणिक नेतृत्व ह्या शिवाय हे अशक्य आहे. सेवाभाव मनात ठेवून रोज तब्बल ३० हजार भाविकांची व्यवस्था, त्यांना अध्यात्मिक आनंदाबरोबर नाविन्याचा अनुभव देताना महाराजांचं अस्तित्व जपण हे शब्दानपलीकडे आहे. विदर्भासारख्या ठिकाणी आनंद सागर सारखा स्वर्ग बघण त्याचा आनंद घेण हा नक्कीच वेगळा अनुभव आहे. हा स्वर्ग घडवणाऱ्या सर्वच सेवेकरी आणि संस्थानाला माझा नमस्कार.

No comments:

Post a Comment