Friday 26 May 2017

गोळावाला कम सरबतवाला... विनीत वर्तक

गोळावाला कम सरबतवाला नावातच जादू आहे नाही का? त्याच नाव ऐकल कि तोंडाला पाणी सुटते अजूनही. मला आठवते लहानपणी मे महिना म्हंटला कि मामाकडची सुट्टी, तिथला धुडगूस, धमाल आणि त्या सगळ्या मधला एक कॉमन माणूस म्हणजे तो गोळावाला कम सरबतवाला काही म्हणा त्याला. दुपारी जेवण झाली आणि सगळे दुपारच्या वामकुक्षी साठी पहुडले कि आमची स्वारी ह्याच्या गाडीसमोर हजर.
एका विहारीच्या बाजूला रस्त्याच्या कोपऱ्यात दुपारी ह्याची गाडी लागायची. तिकडे २-३ रस्ते मिळत असल्याने तसेच गाडी थांबवण्यासाठी जागा असल्याने त्याने आपल बस्तान योग्य जागी बसवलं होत. मग काय रोज दुपारी आम्ही सायकल वर तर कधी चालत शतपावली करत तिथवर जायचो. मग एक तास तिकडे कसा जायचा कळायचा नाही. १ रुपयाच सरबत साध वाल, २ रुपयाच कलर वाल, ३ रुपये स्पेशल असलेल दोन कलर मिक्स सरबत आणि २ रुपयाचा गोळा त्यात, ५ रुपयाचा स्पेशल काला कट्टा आणि सप्तरंगी गोळा. अश्या सगळ्या वेगळ्या मेनू कार्ड वर आम्ही हक्क सांगायचो.
बर रोजच गिऱ्हाईक असल्याने मग आमचा रोख “इसके साथ वो भी” असा व्हायचा मग ते कलर असो व थोडा जास्ती मोठा गोळा. बर एका सरबत किंवा गोळ्याने आमच कधीच आटपायच नाही. त्यामुळे ते चक्र सुरूच राहीच. अगदी जिभेवर आणि ओठांवर सप्तरंग दिसेपर्यंत. कधी अगदीच पैसे जास्ती असतील तर मग ५ आणि १० रुपये वाली लस्सी. त्यातला सबजा चे गोळे असे तोंडात गुदगुल्या करायचे कि त्याची सर कोणत्या फालुद्यात पण येणार नाही. वर्षोन मागे वर्ष गेली तरी हा गोळेवाला प्रत्येक मे महिन्यात माझ तरी हक्काच ठिकाण होता. मे महिन्यात घरी फक्त दोन वेळा जाण होत असे. एक म्हणजे दुपारच्या जेवणाच्या वेळी किंवा पैसे संपले तर. बाकीच्या वेळेत कुठे पडलेलो असायचो ते घरच्यांना पण माहित नसायचं.
सरबत किंवा गोळा खाऊन झाल्यावर खांद्याला तोंड पुसायची सवय आमच्या दुपारच्या कृत्यांची सबूत त्या कपड्यांवर सोडून जायची. पण तेव्हा कोणाला कुठल भान होत? तो भैया सरबत बनवायला बिसलरी पाणी वापरतो का विहारीच? बर्फाच पाणी कुठल असते? रंग फूड असोसिएशन ने सर्टिफाईड केलेले असतात कि नाही? हे असले प्रश्न अगदी स्वप्नात पण माझ्याच काय आमच्या आख्या २५-३० जणांना किंवा त्यांच्या पालकांना किंवा त्या भैया ला पण पडले नाहीत. घसा बसेल, ताप येईल, काळ्या मातीच्या हातांनी सरबत पितांना किंवा गोळा खाताना जंतू तोंडात, पोटात जातील किंवा उष्ट प्यायल्याने त्रास होईल असले फालतू विचार आम्हा मित्रांच्या चांडाळ चौकडी ला कधीच शिवले नाहीत. एक सरबत १० लोकात नाही पिणार तर मग त्या सरबताची मज्जा काय? असा प्रश्न मात्र आमच्या मनाला शिवून जायचा.
खिशात १० रुपयांची नोट असलेला राजा असायचा. कारण जो पैसे भरेल त्याला सरबताचा पहिला घोट तर ज्याला मीठ आवडेल त्याला शेवटचा. अश्या रीतीने तो ग्लास किती लोकांच्या तोंडाची चव घ्यायचा त्याच त्याला माहित. आज ऐकायला कसतरी वाटल तरी ते असे बिनधास्त दिवस होते. जातीची , धर्माची आणि आजारांची वेस मैत्रीच्या आड कधीच आली नाही. तेव्हा एका कामगाराचा मुलगा ते ज्याच्या घरी काम करत त्याचा मुलगा एकाच ग्लास मधून सरबत प्यायचो. तो सरबतवाला म्हणजे माझ्या तहानलेल्या जीवाला अमृत पाजून तृप्त करणारा एक भैया होता.
आज ते सरबत आणि गोळेवाले कुठे हरवून गेले. बिसलरीच्या युगात त्या सरबत आणि गोळेवाल्याला हरवून बसलो. त्या निंबूझ आणि सेवन अप, थम्स अप ला कुठली येणार त्या सरबताची टेस्ट? न्याचरल च्या आणि म्याग्नस च्या आईस्क्रीम ला कुठे आहे त्या बर्फाच्या गोळ्यांची चव. दुपारच्या त्या रणरणत्या उन्हातून तहान भागवणाऱ्या सरबताला कोणीच रिप्लेस करू शकत नाही. तो आनंद, ते क्षण वेगळेच होते. आजही तिकडून गेली कधी तर नजर तिकडेच जाते पटकन त्याच विहारीच्या बाजूला. आठवतात ते क्षण जेव्हा २०-३० मुलांचा घोळका त्या भैयाच्या गाडीला सर्व बाजूंनी लुप्त करायचा आणि त्याच मित्रांच्या मैत्रीला जे गळ्यात गळे घालून चिअर्स करायचे मैत्रीचे ते क्षण. जे आज त्या गोळेवाल्या आणि सरबताच्या गाडी प्रमाणे लुप्त झाले आहेत.

No comments:

Post a Comment