पुत्र व्हावा ऐसा ह्या लोकमान्य सेवा संघ च्या विलेपार्ले येथील कार्यक्रमाला काल आवर्जून उपस्थिती लावली. असही खूप कमी वेळ मुंबईत असल्याने अनेकदा चांगल्या कार्यक्रमाचा अनुभव घेता येत नाही. चांगल म्हणजे तरी काय? ह्याची व्याख्या लोक आपल्याला हवी तशी लावतात. त्यामुळे सगळेच कार्यक्रम चांगल्याच्या नावाखाली येतात. मग तो अगदी जस्टीन बिबर असेल अथवा एखाद लग्न, मुंज सुद्धा. माझ्यासाठी तरी चांगल ह्या शब्दाचा अर्थ अश्याच कार्यक्रमासाठी लागतो कि जिकडे आपण घड्याळ बघतो ते अजून किती वेळ बाकी आहे त्यासाठी नाही तर इतका वेळ पटकन कसा गेला हे बघण्यासाठी. काल पुन्हा तोच अनुभव आला. घडाळ्याच्या काट्यांनी ८ ला इतक्या लवकर का स्पर्श केल हाच विचार मनात आला. इतक भरभरून मिळत होत कि तो काळ इकडेच थांबवा अस वाटला. सैनिकी भाषेत हाच तो आत्ताचा क्षण पूर्ण जागून घ्यावा असा.
सैनिकी पालकांचे अनुभव, त्यांना आपल्या मुलांविषयी वाटणाऱ्या भावना, त्यांचा प्रवास, त्यांची जडणघडण अस एक,दोन नाही तर दहापेक्षा जास्ती पालकांकडून त्यांच्याच शब्दात ऐकण म्हणजे स्वर्गीय अनुभव. एकतर आपल्या मुलांविषयी असलेला ज्वाज्वल्य अभिमान, त्याच वेळी समाज आणि कुटुंब ह्यांची नव्याचे नऊ दिवस असणारी आस्था, मुलांपासून लांब राहताना त्यांचा प्रवास बघताना जो कि पूर्णतः त्यांच्यासाठी अनभिज्ञ असतो. अश्यावेळी मनात असलेला अभिमान पण क्षणोक्षणी आपल्या मुलांच्या जीवाची असलेली भीती अश्या विचित्र परिस्थतीत पालकांचा प्रवास उलगडताना अनु मावशीने म्हणजेच अनुराधा प्रभुदेसाई नी त्यांच्या अंतरंगाचे अनेक पदर प्रश्नोत्तरातून प्रेक्षकांसमोर उलगडत नेले. सैनिकी नोकरी हि नोकरी असली तरी तो एक धर्म आहे. म्हणूनच त्या धर्माची पूजा हे समजण्याची मानसिकता आपल्या समाजाची अजून झालेली नाही. हि दरी कमी करण्याचा एक प्रयत्न म्हणजेच लक्ष फौंडेशन किंवा कालचा आयोजित कार्यक्रम.
सैनिक म्हंटल कि आपल्या समोर पुरुषच येतात. पण ह्या क्षेत्रात स्त्रियांना हि खूप संधी आहेत. आपल्या सैन्यात गेलेल्या मुलीचा अनुभव एका आईकडून ऐकण म्हणजे वेगळाच अनुभव होता. हातावर शहारे तर डोळ्यांच्या कडा ओल्या अश्या विचित्र परिस्थितीमध्ये सगळेच श्रोते होते. अभिमानाने उर भरून तर येत होताच पण एक सातव्या महिन्यांची गरोदर असलेली स्त्री अधिकारी २५० सैनिकांचं नेतृत्व करते ते ऐकताना हात मात्र सलाम ठोकण्यासाठी आपोआप कपाळाकडे जात होता. गरोदर आहे हे कळताच बेड रेस्ट च्या मागे धावणाऱ्या स्त्रिया तर सातव्या महिन्यात पूर्ण गणवेशात सैनिकी शिस्तीने २५० सैनिकांचं नेतृत्व करणारी स्त्री. हे सगळ सांगताना त्या मातेच्या बोलण्यात कुठेच अभिमान आणि गर्व नाही तर हे माझ्या मुलीसाठी एक रोजचा दिनचर्य आहे असच सगळ्या प्रेक्षकांना जाणवत होत. कडक सलाम त्या स्त्री अधिकारी, तिचे कुटुंब आणि भारतीय सेना जे इतक्या प्रचंड जोशाने भरलेले अधिकारी घडवते.
ह्या सगळ्यातून सावरतो न सावरतो तोच अगदी पुढच्या रांगेतून एक सैनिकी अधिकारी उभा राहतो. आपल्याच आईला स्वतःविषयी बोलताना एक सामान्य व्यक्ती म्हणून श्रोत्यांमध्ये बसून ऐकताना स्वतःला इतक जमिनीवर ठेवण खूप कठीण आहे. तो अधिकारी म्हणजे मेजर केदार दळवी. त्याचा प्रवास आईच्या शब्दातून ऐकताना तो सगळ्यांना स्फूर्तीदायक असेल असाच होता. इतके वर्ष भारताच्या सीमांच रक्षण डोळ्यात तेल घालून करताना अश्या एका अधिकाऱ्याला प्रत्यक्ष समोर बसून त्याचे अनुभव ऐकण म्हणजे कालच्या कार्यक्रमाचा परमोच्च क्षण होता अस मला वाटते. सैनिक म्हंटला कि त्यालाच देशप्रेम असते का? त्याला काही भावना नसतात का? त्याला कधी दुखं, आनंद, एकटेपणा जाणवत नसेल का? असे सर्व प्रश्न समोर होते. समाज आणि आपण मात्र देशावर लढताना गोळी लागली कि शहीद म्हणून आपण बोलणार. आर.आई.पी. म्हणून पुढे जाणार आहोत. लंगड देशप्रेम आणि त्याच राजकारण करणारे खालच्या बुद्धीचे राजकारणी, समाज ह्यांच्या पाशातून मुक्त होऊन समाज आणि आपण एका सैनिकाला कधी समजून घेणार आहोत? मेजर केदार च्या शब्दात माझी नोकरी माझा धर्म आहे. धर्मासाठी किंतु वाटण म्हणजेच त्याचा अपमान त्यामुळे वाढदिवस, नवीन वर्ष, दिवाळी हे नंतर आहे. देश हा माझा धर्म आणि तो सगळ्यात आधी.
अरे कुठल्या हाडामांसाची हि माणस बनलेली आहेत? इतक देशप्रेम, इतकी निष्ठा, इतका आदर. धन्य तो अधिकारी, त्याच कुटुंब आणि त्याला घडवणारी भारतीय सेना. मला काल अनेकदा वाटत होत कि मी खरच लायक आहे का? त्याच्या देशप्रेमाला? त्याच्या शौर्याला? एक सामान्य नागरिक म्हणून मी काय करतो? तर आम्ही कर भरतो. आम्ही आरक्षण मागतो, आम्ही मनाला येईल तस बिनदिक्कतपणे बोलतो, फेसबुक, व्हात्स अप वर देश आणि त्यांच्या सीमा, सैनिक ह्यांच्यावर लिहितो. राजकारण करतो. आम्ही जस्टीन बिबर, सलमान खान किंवा बाहुबली साठी वेळ काढतो. कारण आम्हाला स्वातंत्र्य आहे. पण जे ह्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देतात त्या सैनिकाला समजून घ्यायला आम्हाला वेळ नाही. हीच खरी शोकांतिका आहे. आमचे अभिमान हे दीड लाखाच तिकीट काढून शो बघितला हे सांगण्यात किंवा बाहुबली चा फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला हे सांगण्यात आहे. आम्ही खूप छोटे आहोत किडे मुंगीपेक्षा लहान निदान अगदी अभिमानाच्या बाबतीत तरी.
काल मेजर केदार दळवीनां आधी एक कडक सलाम ठोकून त्यांना म्हंटल आज मला स्वतःचा खूप अभिमान वाटतो. एका शूरवीर सैनिकी अधिकाऱ्याशी हस्तालोन्दन करत आहे. तो क्षण माझ्यासाठी एक संस्मरणीय असाच क्षण होता. उद्या कोणी मला विचारल तर मी नक्की सांगेन कि मी एका भारतीय सेनेच्या अधिकाऱ्याशी हस्तालोन्दन केल आणि हि माझ्यासाठी खूप खूप गर्व आणि अभिमानाची गोष्ट आहे. भारतीय सेनेच्या एका जाहिरातीत एक वाक्य आहे “Did you have it in you?” काल मला ते जाणवल ते आत असावं लागते. कदाचित त्याची जाणीव मला उशिरा झाली असेल पण निदान समाजामध्ये ती आधीच निर्माण आणि दाखवून देण्यासाठी माझ्यापरीने जे काही होईल ते नक्कीच करेन.
एक अवर्णनीय असा कालचा कार्यक्रम खूप काही शिकवून गेला. अनु मावशी तू बोलतेस न तेव्हा तू मनाला हात घालतेस. तुझ भारतीय सेनेवरच प्रेम, त्यांची काळजी आणि झोपलेल्या समाजाची चीड अगदी सगळच भिडते. त्यामुळेच हा कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर गेला. आलेले सगळेच सैनिकी पालक, त्यांचे कुटुंबीय, लोकमान्य सेवा संघ, लक्ष्य फौंडेशन आणि मेजर केदार दळवी तुम्हा सर्वाना कडक सलाम. तुमच्यामुळे आम्ही आहोत. निदान हे समाजाला ह्या लेखातून पटवून देऊ शकलो तरी ह्या शब्दांचे सार्थक झाले अस मी मानीन. शेवटी ह्या चार ओळी भारतीय सेनेसाठी.
कंधो से मिलते हे कंधे, कदमो से कदम मिलते हे,
हम चलते हे जब ऐसें, तो दिल दुश्मन के हिलते हे.
हम चलते हे जब ऐसें, तो दिल दुश्मन के हिलते हे.
वंदे मातरम...
No comments:
Post a Comment