आज संध्याकाळी अपेक्षेनुसार इस्रो च्या जी.एस.एल.व्ही ने उड्डाण भरल. आपल्या सोबत २२३० किलोग्राम वजनाचा साउथ एशियन उपग्रह घेत त्याला त्याच्या निश्चित कक्षेत स्थापन केल. २३५ कोटी रुपयांचा हा उपग्रह भारताने आपल्या शेजारील राष्ट्रांना भेट म्हणून दिला आहे. तब्बल ४५० कोटी रुपये खर्चाची हि मोहीम सबका साथ सबका विकास ह्या तत्वाला जागत भारताने हि फत्ते केली आहे.
चीन च्या वाढत्या वर्चस्वाला कुठेतरी शह देण्याची गरज होती. म्हणूनच भारताने आपल्या शेजारील राष्ट्रांना आपल्याकडे वळवण्यासाठी साउथ एशियन उपग्रहाच प्याद पुढे केल. एकाच दगडात दोन पक्षी मारण्याची भारताची व्युव्हरचना प्रचंड यशस्वी ठरली. पहिला पक्षी म्हणजे चीन च्या वर्चस्वाला कुठेतरी भारताने मोडीत काढल. भारतासारखा शेजारी आपला खरा मित्र आहे हा संदेश पोचवण्यात भारत यशस्वी ठरला. दुसरा पक्षी म्हणजे पाकिस्तान सोडून सार्क मधील ७ देशांना भारताने ह्यात सामील करून घेतल.
प्रक्षेपणानंतर लगेच सातही देशांच्या राष्ट्रप्रमुख व राष्ट्राध्यक्ष ह्यांनी भारताच्या त्या योगे इस्रो च प्रचंड कौतुक केल. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भारत जागतिक पातळीवर आपल वर्चस्व वाढवण्यात यशस्वी झाला. सगळ्यात महत्वाच म्हणजे कुत्र्याच कापलेल शेपूट व त्याच्या नाकावर टिच्चून लगावलेली सणसणीत थोबाडीत. पाकिस्तान नेहमी प्रमाणे खो घालणार हे भारताला माहित होतच. ह्या जाळ्यात पाकिस्तान अलगद अडकला. पाकिस्तान सोडून सगळ्याच सार्क देशांनी ह्या मोहिमेत भाग घेतला. एकीकडे इराण, सौदी अरेबिया ह्या सारखे मित्र गमावले असताना पाकिस्तान साउथ एशियन देश म्हणजेच सार्क मध्ये हि एकटा पडला. भारताने एकाच वेळी चीन व पाकिस्तान दोन्ही राष्ट्रांना त्यांच्याच जाळ्यात अडकवत डिप्लोमसी चा मास्टर स्ट्रोक खेळला ह्यात शंका नाही.
आजच उड्डाण महत्वाच होते ते इस्रो च्या नॉटी बॉय म्हणजेच जी.एस.एल.व्ही. मार्क २ साठी. ह्या प्रक्षेपण यानात तीन स्टेज असतात. पहिली स्टेज सॉलिड रॉकेट बुस्टर जसे त्याच्या भावामध्ये म्हणजेच पी.एस.एल.व्ही मध्ये वापरले जातात. दुसरी स्टेज आहे ती लिक्विड प्रोपेलंट. तिसरी महत्वाची स्टेज आहे ज्यामुळे ह्या यानाला इतकी वर्ष लागली तयार होण्यासाठी ती म्हणजे क्रायोजेनिक स्टेज. क्रायोजेनिक म्हणजे काय? तर अतिशीत तपमानात हायड्रोजन व ऑक्सिजन स्टोअर करून त्यांचा इंधन म्हणून वापर केला जातो. ऑक्सिजन -१९६ डिग्री सेल्सियस तर हायड्रोजन -२५३ डिग्री सेल्सियस ला द्रवरुपात येतो. मग उड्डाणाच्या वेळी पहिल्या दोन स्टेज संपेपर्यंत हे तापमान असच ठेवणे अत्यावश्यक असते. एकतर ह्या दोन स्टेज मधील इंधांच्या ज्वलनातून निर्माण होणारी उर्जा त्यात रॉकेट च्या वेगामुळे उत्पन होणारे घर्षण ह्या सर्वांवर मात करून ह्या दोन्ही टाक्यांमधील तापमान अतिशीत ठेवावे लागते.
एकाच वेळी दोन वेगळ्या टाक्यांमध्ये वेगवेगळे अतिशीत तापमान टिकवायचे तसेच हि दोन्ही इंधन अत्यंत ज्वालाग्रही असल्याने त्यांना वेगळ ठेवून योग्य तितकच आणि योग्य त्या वेळीच त्याचं मिश्रण करण अत्यंत गरजेच असते. सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत तस कवच ह्या दोन्ही टाक्यांना देण. हे मिश्रण योग्य त्या वेळेत प्रज्वलित करून उपग्रहाला योग्य त्या कक्षेत पोचवणे हे अत्यंत किचकट आणि कठीण अभियांत्रिकी विज्ञान आहे. म्हणूनच खूप कमी देश अस इंजिन बनवू शकले आहेत. अशीच इंजिन का? तर हि इंजिने कमीत कमी इंधनात जास्तीत जास्त उर्जा वा बल उत्पन्न करतात. कोणत्याही रॉकेट उड्डाणात वजन खूप महत्वाचे असते. जितक रॉकेट व इंधनाच वजन कमी तितका जास्ती पे लोड तुम्ही घेऊन जाऊ शकाल अस साध गणित आहे. म्हणूनच क्रायोजेनिक इंजिन हा उपग्रह प्रक्षेपणांचा आत्मा आहे.
आजच्या उड्डाणाने पूर्णतः भारतीय बनवटीने बनवलेल्या क्रायोजेनिक इंजिनावर शिक्कामोर्तब झाल आहे. इस्रो च्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सार्क देश असो वा साउथ एशियन देश क्रायोजेनिक इंजिन बनवू शकणारा ह्या भूभागात भारत एकमेव देश आहे. अश्या प्रचंड किचकट आणि अभियांत्रिकीच्या दृष्ट्रीने एक मैलाचा दगड असणारी इंजिन भारत आपल्या शेजारील देशांसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या लोकहितासाठी फुकटात उपलब्ध करून देऊ शकतो. अस दिलदार मन ठेवणारा जगातील एकमेव देश असाच संदेश ह्या उड्डाणाच्या माध्यमातून जगात गेला आहे. म्हणूनच क्रायोजेनिक ची हि साउथ एशियन उडी भारताला प्रचंड पुढे घेऊन गेली आहे. ह्या सर्व योजेनेचे शिल्पकार इस्रो चे सगळे अभियंते, वैज्ञानिक आणि ज्यांच्या कल्पनेतून हे साकार झाल ते भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नक्कीच कौतुकास पात्र आहेत. इस्रो च्या सर्वच टीम ला नेहमीप्रमाणे सलाम.
No comments:
Post a Comment