कोणत्याही ध्येया पर्यंत पोचण्याची सुरवात अनेक वर्ष आधी होते. ऑलम्पिक मधल एक मेडल मिळवण्यासाठी ४ वर्ष अथक मेहनत घ्यावी लागते. तेव्हा कुठे आपण तिथवर पोहचतो. बघताना एका रात्रीतल यश वाटल तरी त्या साठी अनेक रात्रींची झोप उडालेली असते हे ज्याच त्यालाच माहित. माणसाला निर्वात पोकळीत पाठवणे हे असेच एक स्वप्न. राकेश शर्मा नी जो “सारे जहा से अच्छा” भारत बघितला. तो आपल्याच यानाने बघण्याच भाग्य अजूनही आपल्या वाटेला आलेल नाही.
माणसाला निर्वात पोकळीत पाठवणे तितकस सोप्प नाही. एकतर माणूस हा एक चालता बोलता सजीव आहे. अवकाशाच्या निर्वात पोकळीत ऑक्सिजन तसेच इतर अनेक गोष्टी प्रतिकूल असताना त्याला ह्या सगळ्या अवस्थेत जिवंत ठेवण व त्याच वेळी अश्या वातावरणाशी एकरूप होणारा माणूस घडवणे हे खूप खर्चिक तर आहेच पण त्या शिवाय खूप धोके त्यात आहेत. अमेरिकेने चंद्रावर माणूस पाठवून अनेक काळ झाला. पण त्याच अमेरिकेने डिस्कव्हरी, च्यालेंजर सारख्या दुखद घटना हि पचवल्या आहेत. जी कामे माणूस अंतराळात राहून करू शकतो ती जवळपास सर्वच रोबोट हि करू शकतो. म्हणूनच मानवी मोहिमान पेक्षा अश्या रोबोटिक मोहिमांवर सगळ्याच राष्ट्रांनी लक्ष केंद्रित केल आहे.
पण अस असूनही काही बाबतीत रोबोट माणसाला रिप्लेस करू शकत नाही हे वास्तव आहे. म्हणूनच पृथ्वीशिवाय मानवी वस्ती तसेच काही प्रोयोगांसाठी मानवाची अंतराळ सफर अतिशय गरजेची आहे. येत्या काळात उर्जेची गरज, पृथ्वीशिवाय एक घर असण्याची गरज मानवाला खुणावते आहे. इंटरन्याशनल स्पेस स्टेशन हि त्याचीच एक पायरी आहे. भारत अजूनही ह्या स्पेस स्टेशन चा भागीदार नाही आहे. ह्याला अनेक कारणे आहेत. अंतराळ क्षेत्र हे फक्त श्रीमंत आणि प्रगत देशांची मक्तेदारी आहे असा एक समज जगातील प्रगत देशांमध्ये आहे. भारत ज्यावेळी अवकाश क्षेत्रात धडपडत होता तेव्हा प्रगत राष्ट्रांना भारताला बरोबर घेण्याची गरज वाटली नाही. आज स्थिती वेगळी आहे. भारत ह्या क्षेत्रातील अनेक शिखरे पादाक्रांत करतो आहे. भारताचा दबदबा हळूहळू का होईना ह्या क्षेत्रात वाढतो आहे म्हणून अमेरिकेसह अनेक राष्ट्र भारताला मेंबर करून घेण्यास आग्रही आहेत. पण इथेच खरी मेख आहे. ह्या स्पेस स्टेशन चा आर्थिक डोलारा सांभाळताना सगळ्यांची दमछाक होते आहे. त्यातून भारता सारख्या आर्थिक घोडदौड करणाऱ्या राष्ट्राला बरोबर घेऊन खर्चाची माळ भारताच्या गळ्यात उतरवायची असा सगळा खेळ आहे.
म्हणूनच भारताने आपल्या परीने छोटी पावले टाकायला सुरवात केली आहे. इस्रो ला आत्ताच अश्या एका प्रोजेक्ट ची मंजुरी मिळाली आहे. ह्या प्रोजेक्ट नुसार इस्रो अस तंत्रज्ञान विकसित करेल कि ज्यामुळे दोन स्पेस वेह्कल एकमेकांना अवकाशात जोडता येतील व त्याच्यात आपापसात साधन सामुग्री आणि इतर गोष्टींची देवाणघेवाण होऊ शकेल. ह्या गोष्टी अगदी सोप्प्या वाटल्या तरी ते तितकस सोप्प नाही. अवकाशात दोन्ही गोष्टी प्रचंड वेगाने एखाद्या कक्षेत फिरत असतात. अश्या वेळी दोन्ही गोष्टींचा वेग व कक्षा एकच असणे गरजेचे आहे. त्याच वेळी जवळ आल्यावर त्यांच्यातील वेग व इतर गोष्टींचा समन्वय अतिशय अचूक असणे गरजेचे आहे. हे कोणत्याही मानवी हस्तक्षेपा शिवाय पृथ्वीवरून नियंत्रित करणे बरेच कठीण आणि जिकरीच आहे. एकदा का हे तंत्रज्ञान आपण मिळवलं कि आधीच अवकाशात असलेल्या उपग्रहाना इंधन तसेच इतर गोष्टींचा पुरवठा आपण करू शकू व त्याच वेळी अवकाशातील स्पेस डेब्रिस कमी होण्यास खूप मदत होईल.
हेच छोट पाउल उद्याच्या मानवी उड्डाणासाठी क्रांतिकारक ठरणार आहे. जर आपण अतिशय सुरक्षिततेने ह्या गोष्टींची देवाण घेवाण करू शकलो तर ह्याच्या पुढली पायरी मानवाच्या देवाणघेवाणीची असणार आहे. अर्थात त्यासाठी खूप मोठा पल्ला अजून बाकी आहे. पण मोठी स्वप्नच तर एक दिवस छोट्या पावलातून सत्यात उतरतात. इस्रो ला त्यांच्या ह्या छोट्या पावलासाठी खूप शुभेछ्या.
“If you want to shine like a sun. First burn like a sun.” – Dr.A.P.J Abdul Kalam
No comments:
Post a Comment