Saturday 29 October 2022

ट्विटर च ट्विट... विनीत वर्तक ©

 ट्विटर च ट्विट... विनीत वर्तक ©


तुम्ही त्याचा द्वेष करा, तुम्ही त्याच्याबद्दल असूया बाळगा किंवा तुम्ही त्याच्यावर प्रेम करा आणि त्याच्या श्रीमंतीने अवाक व्हा, एलोन मस्क नेहमीच एक पक्का व्यापारी राहिलेला आहे! आता त्याने आपला मोर्चा ट्विटरच्या ट्विटकडे वळवला आहे. जगातील सगळ्यांत श्रीमंत व्यक्ती (संपत्ती सुमारे २२० बिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच २२,००० कोटी अमेरिकन डॉलर) असणाऱ्या एलोन मस्कने ४४ बिलियन अमेरिकन डॉलरच्या मोबल्यात ट्विटरच्या ट्विटची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून एलोन मस्क ट्विटर विकत घेण्यासाठी प्रयत्नशील होताच. पण ही सगळी प्रक्रिया कायदेशीर वादात अडकलेली होती. ट्विटर ज्या पद्धतीने आत्तापर्यंत चालवली जात होती, त्यालाच मस्कने आक्षेप घेतला होता. मस्क-ला ट्विटरच्या ट्विटला एक वेगळा आवाज द्यायचा होता म्हणून आपण ते विकत घेत असल्याचं मस्क-ने उघडपणे ट्विट करून जाहीर केलं होतं. पण खरंच तसं आहे का? ट्विटरचं ट्विट मस्कसाठी फायद्याचं आहे का? नक्की ट्विटर घेण्याची धडपड कश्यासाठी? नक्की एलोन मस्कच्या डोक्यात काय आहे? हे आपण समजून घेतलं तर आपल्याला अशी एक बाजू दिसेल ज्याचा विचार केला तर सगळं राजकारण, अर्थकारण लक्षात येईल.

एलोन मस्क-चा इतिहास बघितला तर असं लक्षात येईल की त्याने काळाच्या पुढचा विचार आजवर केलेला आहे. एक काळ असा होता जेव्हा जग त्याच्या विचारांना हसत होतं. जगाने त्याला मुर्खात काढलं. त्याचा बिझनेस संपेल. तो रस्त्यावर येईल किंवा त्याला बिझनेसमधलं कळत नाही अशी मतं अनेक अर्थकारण्यांनी मांडली. ते खरं पण वाटत होतं कारण जे अर्थकारण त्यावेळेला दिसत होतं त्यावरून कोणीही असाच विचार केला असता. पण एलोन मस्क हा वेगळा व्यापारी आहे. त्याने येणाऱ्या काळाची पावलं उचलून धंद्यात पैसे लावले होते. जसा काळ बदलला तसं त्याने गुंतवलेल्या पैश्याने परतावा द्यायला सुरूवात केली. आज एलोन मस्क जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. त्याच्या आसपासही येत्या काळात कोणी पोहोचू शकेल की नाही अशी शंका आहे. त्याने ज्या
दोन व्यापारात पैसे लावले, ते होते इलेक्ट्रिक कार आणि रॉकेट. आज टेस्ला आणि स्पेस एक्स या त्याच्या दोन्ही कंपन्या जगात नावाजलेल्या आहेत. ज्यांची ब्रँड व्हॅल्यू खूप मोठी झाली आहे. त्यामुळेच एलोन मस्क आज इतक्या उंचीवर आहे.

एलोन मस्क बद्दल इतकं सांगण्याचं कारण हे की जेव्हा त्याने टेस्ला किंवा स्पेस एक्स ची स्वप्नं बघितली होती, तेव्हा संपूर्ण जगाने त्याला वेड्यात काढलं होतं पण आज त्याचे निर्णय किती बरोबर होते हे जग अनुभवते आहे. ट्विटरवर ताबा मिळवण्यासाठी जेव्हा एलोन मस्क-ने ४४ बिलियन अमेरिकन डॉलरची बोली लावली तेव्हा ट्विटर पुढे त्याने ही ऑफर नाकारण्याचा पर्यायच काढून घेतला होता. ट्विटरच्या अधिग्रहणासाठी जेवढे पैसे तो लावत होता, तितकं ट्विटरचं बाजारमूल्य पण नव्हतं. ट्विटरचं उत्पन्न हे ट्विटर वापरणारे देत नाहीत तर ट्विटरचं ९०% उत्पन्न हे जाहिरातींतून येते. गेल्या काही वर्षांत ट्विटर मॅनेज करणारी टीम ही एका विशिष्ट वर्गाला झुकतं माप देत असल्याचं दिसत होतं. डाव्या कडवट विचारांचे ट्विट करून समाजात फूट पाडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या ट्विटर अकाउंटवर कोणतीही कारवाई केली जात नव्हती. त्याच वेळेस उजव्या विचारांच्या लोकांवर सूडबुद्धीने कारवाई होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यावर एलोन मस्कसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच ट्विटर खरेदी केल्यावर एलोन मस्क-ने ताबडतोब ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल, मुख्य आर्थिक अधिकारी नेड सेगल आणि कायदेशीर धोरण, ट्रस्ट आणि सुरक्षा प्रमुख विजया गड्डे यांची हकालपट्टी केली. ट्विटर विकत घेतल्यावर एलोन मस्क म्हणाला,

“मी ट्विटर विकत घेण्याचे कारण म्हणजे सभ्यतेच्या भविष्यासाठी एक सामान्य डिजिटल टाउन स्क्वेअर असणे महत्त्वाचे आहे, जिथे हिंसाचाराचा अवलंब न करता, विश्वासांच्या विस्तृत श्रेणीवर निरोगी पद्धतीने चर्चा केली जाऊ शकते".

एलोन मस्क जरी व्यक्तिस्वातंत्र्याचा ढोल पिटत असला तरी तो मुरलेला व्यापारी आहे. सध्या ट्विटर आर्थिक पातळीवर तोट्यात आहे. ट्विटरवर जवळपास १२ बिलियन अमेरिकन डॉलरचं कर्ज आहे. ट्विटरचं ताळेबंद पत्रक तोट्यात आहे. गेल्या आर्थिक सत्रात ट्विटरने १२४ मिलियन अमेरिकन डॉलर नकारात्मक रोख प्रवाह निर्माण केला आहे. याचा अर्थ ट्विटरला व्यवसाय चालवण्यासाठी व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी १२४ मिलियन अमेरिकन डॉलर स्वतःकडचे घालावे लागले आहेत. अश्या स्थितीत एलोन मस्कला ट्विटरचा आर्थिक डोलारा सांभाळणं जड जाणार आहे. त्याने ट्विटरच्या ७५०० कर्मचाऱ्यांपैकी जवळपास ७५% कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा मनसुबा बोलून दाखवला आहे. दुसरीकडे ट्विटरला जे लोक जाहिरात देतात त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्याने कंबर कसली आहे. पण हा सगळा डोलारा जर चुकीच्या मार्गाने गेला तर तो एलोन मस्कला पण डुबवणार हे उघड आहे. कारण ट्विटरला सांभाळण्यासाठी एलोन मस्क ला पैसे उभे करावे लागतील. त्यासाठी त्याला टेस्लामधले आपले शेअर विकावे लागतील. टेस्ला हाच ब्रँड त्याला सगळ्यांत जास्ती पैसे मिळवून देतो आहे. त्याचे शेअर आणि त्याचा मालकी हक्क जाणं एलोन मस्क ला परवडणारं नाही.

आता कोणाच्याही मनात विचार येईल की इतकी सगळी भानगड आणि तोट्यात असलेल्या ट्विटर साठी एलोन मस्क ने ४४ बिलियन अमेरिकन डॉलर काय माणुसकी साठी मोजले का? तसं असेल तर एलोन मस्क सारखा मूर्ख व्यापारी कोणी नाही. पण जर तसं नसेल तर त्याच्यासारखा काळाच्या पुढची पावलं उचलणारा व्यापारी दुसरा कोणी नाही. ट्विटर डील सुरू असताना मस्क ने एक ट्विट ४ ऑक्टोबरला केलं होतं. ज्यात त्याने लिहीलं होतं,

“an accelerant to creating X, the everything app”.

हा एक्स म्हणजे त्याच्या डोक्यात सुरू असलेलं बाजार बदलवणारं नवीन ऍप. एलोन मस्क असं ऍप उतरवत आहे की जे तुमच्या सगळ्या गोष्टी करेल. उदाहरण म्हणून इन्स्टंट मेसेजसाठी आपण आज व्हाट्स अप किंवा टेलिग्राम वापरतो. सोशल मिडियासाठी फेसबुक, इन्स्टा आणि ट्विटर आहे. तुम्हाला आर्थिक व्यवहार करायचे असतात तेव्हा फोन पे, गुगल पे आहेत. पण हेच आपण सगळं एकाच ऍप मधून करू शकलो तर! एकच ऍप तुमची इन्स्टंट मेसेज, सोशल मिडिया आणि आर्थिक व्यवहार या सगळ्याची काळजी घेईल. तुम्हाला दहा ठिकाणी दहा अकाउंट काढण्याची गरज भासणार नाही. त्यासोबत ते तुम्हाला अगदी पॅसिफिक महासागराच्या मध्यभागी पण उपलब्ध असेल. विचार केला तर एलोन मस्क-च्या डोक्यात काय सुरू आहे, याचा अंदाज येईल. जर तो हे यशस्वी करू शकला तर एलोन मस्कच्या आसपासही कोणी जाणार नाही. एकाचवेळी टेस्ला, स्पेस एक्स आणि एक्स अश्या तिन्ही क्षेत्रांत त्याची मक्तेदारी स्थापन झालेली असेल. ही सर्व क्षेत्रं माणसाच्या संवाद आणि दळणवळणाशी संबंधित आहेत, ज्यांवर एलोन मस्कचा एकछत्री अंमल असेल.

एलोन मस्क ही अशी व्यक्ती आहे, आपण जिकडे विचार थांबवतो तिकडून त्याचे विचार सुरू होतात. आज जरी ट्विटरचं ट्विट हे एलोन मस्कचा मूर्खपणा वाटतं असलं तरी त्याच्या व्यापारी डोक्यातून पडणाऱ्या पावलांचा अंदाज घेतला तर भविष्यातील एका वेगळ्या बदलाकडे तो आपल्याला घेऊन जातो आहे याची चाहूल लागेल. बाकी यात तो किती यशस्वी होतो अथवा अयशस्वी होतो हे येणार काळ ठरवेल, पण ट्विटरचं ट्विट येणाऱ्या काळात काहीतरी वेगळं घडवणार हे निश्चित आहे.

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment