Saturday 15 October 2022

आण्विक युद्धासाठी सज्ज भारत... विनीत वर्तक ©

 आण्विक युद्धासाठी सज्ज भारत... विनीत वर्तक © 

रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगात पुन्हा एकदा आण्विक युद्धाच्या गोष्टी बोलल्या जात आहेत. दुसऱ्या महायुद्धातील झालेल्या अणुबॉम्ब च्या हल्याने झालेल्या विनाशानंतर पुन्हा एकदा जग आण्विक युद्धाच्या दिशेने वाटचाल करते आहे. अश्या वेळेस चीन आणि पाकिस्तान सारखे अणवस्त्रधारी देश शत्रू म्हणून लाभले असताना भारताला ही अश्या प्रकारच्या आण्विक युद्धासाठी सज्ज राहण्याची गरज आहे. त्याचाच भाग म्हणून भारताने आपली न्यूक्लिअर ट्रायड सज्ज असल्याची चाचणी नुकतीच घेतली आहे. तर नक्की काय होती ही चाचणी? न्यूक्लिअर ट्रायड म्हणजे काय? ही चाचणी घेऊन भारताने काय सिद्ध केलं आहे? याचे कोणते दूरगामी परिणाम होणार आहेत हे आपण जाणून घेतलं पाहिजे. 

भारताने १४ ऑक्टोबर २०२२ रोजी आपल्या आय.एन.एस. अरिहंत या आण्विक शक्तीने चालणाऱ्या पाणबुडी वरून एका Submarine Launched Ballistic Missile (SLBM) ची यशस्वी चाचणी घेतली आहे. आय.एन.एस. अरिहंत ही भारताची पहिली nuclear-powered ballistic missile submarines (SSBN) आहे. १९९० च्या काळात भारताने Advanced Technology Vessel (ATV) हा प्रोग्रॅम सुरु केला होता. या प्रोग्रॅम च्या अंतर्गत ११ बिलियन अमेरिकन डॉलर खर्च करून आय.एन.एस.अरिहंत या पाणबुडी ची निर्मिती करण्यात आली. यात ८३ मेगावॉट ऊर्जेची निर्मिती लाईट वॉटर रिऍक्टर ने केली जाते. ज्यात इंधन म्हणून एनरिच युरेनियम वापरण्यात येते. २००९ मधे ही पाणबुडी लॉंच करण्यात आली. सगळ्या चाचण्या पार पडल्यानंतर २०१६ साली ती नौदलाच्या सेवेत समाविष्ट करण्यात आली. याच पाणबुडी वरून ही चाचणी घेण्यात आली. 

याच आण्विक पाणबुडी वरून बॅलेस्टिक मिसाईल ची चाचणी भारताने घेतली. बॅलेस्टिक मिसाईल म्हणजे अशी मिसाईल जी सुरुवातीला रॉकेटने किंवा रॉकेटच्या टप्प्याटप्प्याने चालविली जातात, नंतर त्याच्या इच्छित लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी ग्लाइड करून गुरुत्वाकर्षणाची मदत घेत हल्ला करतात. भारताची अग्नी मिसाईल सिरीज ही याच पद्धतीने काम करते. आजवर भारताकडे जमीन, हवा आणि पाण्याच्या पृष्ठभागावरून आण्विक हल्ला करण्याची क्षमता होती. पण पाण्याखालून आण्विक मिसाईल डागण्याची क्षमता नव्हती. पाण्याखालून अशी सिद्धता असण्याची नितांत गरज भारताला होती. याच कारण असं की भारताने स्वतःहून पहिल्यांदा कोणत्याच देशावर आण्विक हल्ला करण्याचं बंधन घालून घेतलं आहे. भारताने आण्विक हल्ला केला तर ते भारताच्या सैनिकांवर, प्रदेशावर, भारताच्या कोणत्याही भागावर झालेल्या आण्विक हल्याच प्रतिउत्तर असेल असं भारताने स्पष्ट केलं आहे. समजा भारताच्या भूमीवर आण्विक हल्ला झाला त्याला जर प्रतिउत्तर देण्याची गरज असेल तर जमिनीवर हाहाकार माजला असताना भारताकडे त्या आण्विक हल्ल्यातुन वाचून प्रतिउत्तर देण्याची यंत्रणा असण्याची गरज आहे. 

समुद्राच्या पाण्याखालील आण्विक क्षमतेमुळे दुसर्‍या स्ट्राइक म्हणजेच प्रतिहल्ला करण्याची क्षमता भारताकडे आली आहे. या पाणबुड्या आणि आण्विक मिसाईल केवळ शत्रूच्या पहिल्या आण्विक हल्ल्यात टिकू शकता, प्रत्युत्तरादाखल आण्विक हल्ला देखील करू शकतात, अशा प्रकारे भारताकडे ज्याला विश्वासार्ह आण्विक हल्ला करण्याची क्षमता म्हणतात ती क्षमता या चाचणीमुळे आलेली आहे. भारताने चाचणी केलेलं मिसाईल कोणतं होत? त्यांची क्षमता किती? कश्या प्रकारे त्याने टार्गेट ला लक्ष्य केलं या गोष्टी सध्यातरी क्लासिफाईड ठेवण्यात आल्या आहेत. अनेक रक्षा तज्ञांच्या मते ही चाचणी 'के' घराण्यातील मिसाईल ची होती. भारताचे मिसाईल मॅन आदरणीय डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ या मिसाईल ला के नावानं ओळखलं जाते. (आपल्या कडील काही स्वयंघोषित विद्वान जेव्हा त्यांच्या याच कार्यक्षमतेवर संशय घेतात तेव्हा त्यांची कीव येते.) (डॉक्टर अब्दुल कलाम यांचा वाढदिवस १५ ऑक्टोबर ला होता. त्याच तारखेच्या एक दिवस आधी भारताने ही चाचणी केली आहे.) भारताने चाचणी केलेलं मिसाईल हे के १५ हे सागरिका असण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. या मिसाईल ची क्षमता ७५० किलोमीटर अंतरावर लक्ष्याचा वेध घेण्याची आहे. भारताकडे याच फॅमिली मधलं के ४ मिसाईल आहे. जे ३५०० किलोमीटर पर्यंत जाऊ शकते. तसेच के ५ (५००० किलोमीटर), के ६ (६००० किलोमीटर) पर्यंत मारा करणाऱ्या मिसाईल वर काम सुरु आहे. 

या यशस्वी चाचणीने भारत अनेक प्रगत राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे ज्यांच्याकडे अश्या पद्धतीचं तंत्रज्ञान आहे. भारताच्या अजून दोन आण्विक पाणबुड्यांच्या चाचण्या सुरु असून त्याही लवकरच भारताच्या संरक्षणात दाखल होती. त्या शिवाय के सिरीज मधील मिसाईल ही त्यांच्या जोडीला येत आहेत. या संपूर्ण आण्विक पाणबुडीचं नियंत्रण, आणीबाणीच्या काळात आण्विक मिसाईल डागण्याची व्यवस्था, त्यांची हाताळणी, त्याचे प्रोटोकॉल या सगळ्याची या चाचणी च्या निमित्ताने एक प्रकारे सराव झाला आहे. या सगळ्या पातळीवर भारताने आपलं लक्ष्य मिळवल्याचे स्पष्ट केलं आहे. आत्मनिर्भर भारत आता आण्विक युद्धासाठी सज्ज असल्याचा एक संदेश या निमित्ताने जगात गेला आहे.   

जय हिंद!!!  

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment