Saturday 22 October 2022

'ठेहराव आना चाहिए'... विनीत वर्तक ©

 'ठेहराव आना चाहिए'... विनीत वर्तक  © 

आयुष्याच्या रस्त्यावरून जाताना आपण अनेक नात्यांच्या मधून प्रवास करत असतो. काही जन्मापासून मिळालेली, काही असलेली, काही जुळवलेली तर काही अचानक जुळलेली. नातं कोणतंही असो पण त्याला निभाभावं लागते. काळाच्या कसोटीवर ते टिकवावं लागते. आयुष्याच्या प्रवासात अनेक चांगले - वाईट प्रसंग येतात. त्याचा परिणाम आपल्यावर होतो आणि तसाच तो साहजिक आपल्या नातेसंबांधांवर पण होतो. त्यात ते उसवतात, फाटतात, तुटतात आणि काही उसवून तशीच राहतात. काही पुन्हा शिवली जातात. तर काही शिवण्याचा नादात अजून फाटत जातात. नातेसंबंधांच्या अश्या सगळ्या अवस्थेतून आपण सर्वच जात असताना कुठेतरी एक स्टेशन असं असावं की जिकडे आपण थांबावं. त्या पुढला प्रवास आपल्याला गरजेचं वाटणार नाही. त्यावेळी आपल्याला आपण आयुष्यात जे ठरवलं होतं किंवा हवं होतं ते सापडल्याचा अनुभव यावा. तेव्हाच आपल्याला एक असा अनुभव येतो जो आपल्याला सगळ्याच बाबतीत समृद्ध करतो. म्हणूनच म्हणतात 'ठेहराव आना चाहिए'... 

स्वप्नवत नातं किंवा स्वप्नवत जोडीदार मग तो मित्र, मैत्रीण, सखा, नवरा, बायको किंवा नात्यांच्या विविध स्वरूपात असो असं कोणी खरचं असते का? या प्रश्नाचं उत्तर कदाचित हो किंवा नाही असेल. कारण एखाद्या व्यक्तीकडून अथवा नात्यातून आपल्या अपेक्षा आणि प्राप्ती यात थोडं अंतर हे राहतेच. आपण कितीही कोन जुळवायचा प्रयत्न केला तरी काही न जुळलेले कोन राहतात. कारण कोणीच संपूर्ण नसते. कोणीच आय.एस.ओ. ९००० किंवा १४००० सर्टिफिकेट घेऊन येत नाही. जिकडे सर्व बाबी परिपूर्ण झाल्यावर आपण त्याला नात्यात जागा देतो. त्यामुळे कोणतं नातं हे कधीच परिपूर्ण नसते असं मला व्यक्तिशः वाटते. नात्यात  तडजोड असते आणि ती हवीच, नात्यात जुळवाजुळव करावीच लागते. परिस्थितीच्या आणि काळाच्या कसोटीवर टिकून राहायला तुम्हाला त्यात बदल करावेच लागतात. कधी दोन पावलं मागे यावं लागते तर कधी कोणासाठी दोन पावलं जास्ती चालावं लागते. त्यामुळे परिपूर्ण नातं हे एखाद्या मृगजळाप्रमाणे आहे. जे दूरवर दिसतं तर खरं पण जेव्हा त्याच्या जवळ जातो तेव्हा ते अजून दूरवर गेलेलं असते. 

पण असा सगळा प्रवास करत असताना एखाद्या अवचित वाटेवर कोणीतरी असं आपल्या आयुष्यात येते की जिकडे आपल्याला त्या परिपूर्णतेचा भास होतो. अपूर्णतेतील पूर्णता अनुभवयाला मिळते. आपल्या आयुष्यात आलेली ती व्यक्ती कितीही अपूर्ण आणि कितीही स्वप्नांच्या देशातली नसली तरी तिचं असणं आपल्याला समृद्ध करते आणि आपण तिकडेच थांबतो. घड्याळाच्या काट्यावर सतत पुढे चाललेल्या आयुष्याला एक ब्रेक लागतो. तोच तो क्षण जेव्हा आयुष्यात एक 'ठेहराव' येतो. परिपूर्णतेचा एक अविष्कार आपण अनुभवतो. त्यापुढे किंवा त्यामागे असलेलं आपण सगळं विसरून फक्त तिकडे स्थिरावतो. हेच ते स्टेशन ज्या नंतर कोणताच प्रवास करण्याची इच्छा आपली होत नाही. आपल्यासाठी ती व्यक्ती, ते नातं आपलं गंतव्य स्थान असते. त्या नंतर आपल्या स्टेशन वरून कितीही गाड्या गेल्या तरी त्याने पुढचा प्रवास करण्याची इच्छा होत नाही. कारण त्या मुक्कामाच्या ठिकाणी जाणिवेतून आपल्याला सर्व मिळालेलं असते. हाच तो   'ठेहराव' आणि हेच ते नात्यातलं स्थान जे प्रत्येकाच्या आयुष्यात यायला हवं...  

नात्यांच्या प्रवासात आपल्या आयुष्यात असलेल्या लोकांसोबत आपण कधी मन मारून, कधी आनंदाने तर कधी समाधानाने प्रवास करत असतोच. पण असं असं एखादं स्टेशन येते म्हणजेच अशी एखादी व्यक्ती ज्याच्या नंतर नात्यातल्या त्या साच्याचा आपला प्रवास संपतो. तो प्रवास त्या व्यक्तीने आपल्यासोबत काही क्षण केला तरी ते क्षण आपल्यासाठी पुरेसे असतात. त्या प्रवासाच्या आठवणी सोबत आपण संपूर्ण आयुष्य काढू शकतो. पण परत पुन्हा पुढच्या प्रवासाला जाण्याची इच्छा मात्र कधीच होत नाही. असं कोणीतरी आपल्या आयुष्यात असावं. त्याच वेळेला आपण नात्यातील त्या परिपूर्णतेचा आनंद घेऊ शकतो. त्या समाधानातून अश्या एका पातळीवर पोहचू शकतो. जिकडे असा ठेहराव आपल्या आयुष्यात आला हेच आपल्यासाठी पुरेस असते. 

अमेरिकेत असताना न्यूयॉर्क च्या म्युझिअम मधे गौतम बुद्धांच्या चेहऱ्यावर असणाऱ्या त्या स्मित हास्याने मी तोच ठेहराव अनुभवला होता. त्यांच्या त्या ध्यानमुद्रेत आणि चेहऱ्यावरच्या त्या स्मित हास्यात तो ठेहराव मला दिसला. आयुष्याकडून काहीच मागणं नसणं आणि भौतिक सुखाच्या पलीकडे जाऊन जेव्हा समर्पणाच्या भावनेने तुम्ही अध्यात्मिक पातळीवर जोडले जातात तेव्हाच ती परिपूर्णता दिसून येते. समर्पणाच्या बाबतीत त्यांच्या इतकं आपण जाऊ शकत नसलो तरी नात्यांच्या बाबतीत तो ठेहराव मला गरजेचा वाटला. कुठेतरी आपण थांबायला हवं. कुठेतरी अशी एक व्यक्ती आपल्या आयुष्यात हवी की ज्या नंतर इतर कोणाची गरज किंवा इतर कोणाचा शोध घ्यायची गरज वाटणार नाही. त्या स्टेशनवर आपला प्रवास संपवायला हवा. ती व्यक्ती किती काळ आपल्या सोबत राहील हा प्रश्न सुद्धा गरजेचा वाटू नये. तीच असणं किंवा तीच नसणं या पलीकडे आपण तिकडे थांबणं हीच तर परिपूर्णता आहे.

तुमच्या आयुष्यात बघा ठेहराव आला आहे का? कारण तो जर आला असेल तर तुम्ही नातेसंबंधांच्या अत्युच्य पातळीवर आहात. जिकडे मिळणारी अनुभूती, प्रेम, सोबत ही काळाच्या पलीकडे आहे. जी तुमच्या आयुष्याच्या प्रवासानंतर पण तुमच्यासोबत राहणार आहे. जी तुमच्या आयुष्याला एक नवीन आयाम जोडणार आहे. जर तो ठेहराव अजून यायचा असेल तर अजूनही आपण नात्यांच्या गुंतागुंतीत गुरफटलेलो आहोत जिकडे आपल्याला मिळणारं समाधान, आनंद किंवा होणारी अनुभूती अजूनही अर्धवट आहे. त्यासाठीच असं म्हणतात की, 'ठेहराव आना चाहिए'...    

तळटीप:- वर लिहलेल्या गोष्टी माझे विचार आहेत. त्यांचा संबंध माझ्या व्यक्तिगत आयुष्याशी जोडू नका ही विनंती. माझ्या व्यक्तिगत आयुष्यातील गोष्टी आणि फेसबुक पोस्ट यांचा कोणताही संबंध येणार नाही याची काळजी मी घेतो.  

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment