Tuesday 18 October 2022

एका झूम ची गोष्ट... विनीत वर्तक ©

 एका झूम ची गोष्ट... विनीत वर्तक ©

ऐ मेरे वतन के लोगों, ज़रा आँख में भर लो पानी

जो शहीद हुए हैं उनकी, ज़रा याद करो कुर्बानी

जब घायल हुआ हिमालय, ख़तरे में पड़ी आज़ादी

जब तक थी साँस लडे वो, फिर अपनी लाश बिछा दी 

संगीन पे धर कर माथा, सो गये अमर बलिदानी


जो शहीद हुए हैं उनकी, ज़रा याद करो कुर्बानी

जब देश में थी दीवाली, वो खेल रहे थे होली

जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली

थे धन्य जवान वो अपने, थी धन्य वो उनकी जवानी

जो शहीद हुए हैं उनकी, ज़रा याद करो कुर्बानी.... 

कवी प्रदीप यांनी लिहलेल्या आणि आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने स्वर्गीय लता मंगेशकरांनी या शब्दांना अजरामर केलं आहे. आजही हे शब्द कधी वाचले, ऐकले तरी डोळ्यांच्या कडा ओल्या होतात, अंगावर शहारे येतात, हात सॅल्यूट करायला जातो आणि आपसूक मनातल्या मनात त्या अनाम वीरांची आठवण होते. हे शब्द फक्त भारताच्या सैनिकांपुरती मर्यादित नाहीत याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा आला. पुन्हा एकदा हे शब्द ओठांवर आले आणि आपसूक हाताने सॅल्यूट केला तो एका शूरवीर, पराक्रमी भारतीय सेनेच्या कुत्र्यासाठी. ज्याने आपल्या जीवाची पर्वा न करता भारताच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. ही गोष्ट आहे त्याच पराक्रमी 'झूम' ची. 

९ ऑक्टोबर २०२२ चा दिवस होता. ज्यावेळी भारतीय सेनेला काश्मीर मधल्या अनंतनाग भागात दोन लष्कर ए तोयब्बा चे अतिरेकी दबा धरून लपल्याची माहिती मिळाली. भारतीय सेनेने या अतिरेक्यांना एका कोपऱ्यात अडकवलं आणि त्यांना जेरीस आणण्यासाठी ऑपरेशन तंगपावा हाती घेण्यात आलं. सगळ्या बाजूने भारतीय सेनेने घेतल्याचं लक्षात आल्यावर आणि सुटकेचा कोणताही मार्ग समोर दिसत नसल्यावर अतिरेक्यांनी सामान्य नागरिकांवर मशिनगन ने गोळ्या बरसवायला सुरवात केली. भारतीय सेनेच्या १५ एसॅल्ट चिनार कॉर्प्स ला त्यांना नेस्तनाबूत करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्याच टीम चा भाग होता 'झूम'. झूम हा एक काळ्या-आणि-टॅन कोटसह बेल्जियन मालिनॉइस जातीचा लढाई करणारा कुत्रा होता. अडीच वर्षाचा असणारा झूम भारतीय सेनेचा एक अविभाज्य अंग होता. लढाईच उच्च प्रशिक्षण असणाऱ्या झूम ने याआधी पण भारतीय सेनेच्या अनेक ऑपरेशन मधे भाग घेतला होता. 

झूम कडे मुख्य जबाबदारी ही अतिरेक्यांचा वेध घेऊन त्यांच योग्य ते स्थान आणि त्यांच्याकडील माहिती भारतीय सेनेला देणं तसेच शत्रूला अचानक हल्याने नेस्तनाबूत करणं ही होती. झूम हा इतका खतरनाक होता की त्याला प्रशिक्षण देणाऱ्या सैनिकाने ऑर्डर दिल्याशिवाय समोरच्या शत्रूचा लचका आपल्या जबड्यातून अगदी जीव गेला तरी सुटणार नाही इतका आज्ञाधारी होता. भारतीय सेनेचा भाग असलेले हे प्रशिक्षित कुत्रे अनेक कारवाईसाठी वापरले जातात. मुख्यत्वे त्यांच्यावर कॅमेरे बसवलेले असतात. ज्यामुळे हे कुत्रे अतिशय चपळतेने आणि बेसावध असताना शत्रूवर दबा धरून हल्ला करतात. त्यांच्यावर असणाऱ्या कॅमेरामुळे अतिरेकी अथवा शत्रू जिकडे लपला असेल त्या जागेची त्यांच्याकडे असणाऱ्या दारुगोळ्याची खडानखडा माहिती भारतीय सेनेच्या सैनिकांना मिळते. त्या नंतर पुढची कारवाई फत्ते केली जाते. 

९ ऑक्टोबर २०२२ ला पण घरात लपून बसलेल्या अतिरेक्यांचा अंदाज भारतीय सैनिकांना येत नव्हता. तो अंदाज न आल्यामुळे त्यांचा प्रतिकार करण्यात अडचणी येत होत्या. ज्या वेळेस त्यांनी सामान्य नागरिकांना लक्ष बनवायला सुरवात केली तेव्हा भारतीय सेनेकडे वेळ कमी उरला होता. या अतिरेक्यांना हुडकून त्यांना नेस्तनाबूत करण्याची जबाबदारी झूम ला देण्यात आली. झूम ने क्षणाचा विलंब न करता त्या घरात प्रवेश केला. आपल्याला दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्याने एका खोलीतून दुसऱ्या खोलीत अतिशय शांतपणे आणि त्या अतिरेक्यांना कसलाही अंदाज येणार नाही अश्या पद्धतीने त्यांचा मागोवा घ्यायला सुरवात केली. अतिरेकी कोणत्या खोलीत लपलेले आहेत हे कळल्यानंतर त्याने क्षणाचाही विलंब न त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्याने त्या दोन्ही अतिरेकी बिथरले. झूम ने एका अतिरेक्याचा लचका तोडताना त्याला अक्षरशः नेस्तनाबूत केलं. पण हे करत असताना दुसऱ्याने त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या.अंगातून रक्ताची धार वाहत असताना पण झूम ने आपल्या तोंडातून त्या अतिरेक्याला सोडलं नाही. झूम च्या त्या हल्यापुढे अतिरेकी अक्षरशः गडबडून गेले. त्यांच्या या गडबडीमुळे भारतीय सैन्याला त्यांच ठिकाण सापडलं. भारतीय सेनेच्या सैनिकांनी एका क्षणात त्यांचा वेध घेतला. समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दोन अतिरेकी संपूर्णतः मारले गेले आहेत याची खात्री झाल्यावर आणि आपलं दिलेलं मिशन संपूर्ण झाल्यावर झूम ने त्या अतिरेक्याला सोडलं आणि तो जखमी अवस्थेत त्या घरातून बाहेर आला. या सगळ्यात त्याच्या शरीरातून खूप रक्त वाहून गेलं आणि रस्त्यात तो बेशुद्ध पडला. 

झूम ला तात्काळ श्रीनगरमधील लष्कराच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण १३ ऑक्टोबर २०२२ ला सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी देशासाठी लढताना झूम ने सर्वोच्च बलिदान दिलं. त्याच्या एकट्यामुळे भारतीय सेनेला लष्कर ए तोयब्बाच्या दोन खतरनाक अतिरेक्यांना कंठस्थान घालण्यात यश आलं. झूम च्या सर्वोच्च बलिदानाची जाणीव ठेवताना भारतीय सेनेने लष्करी सन्मानात त्याला शेवटचा निरोप दिला. ज्या पद्धतीने अमर जवान ज्योतीवर किंवा आता वॉर मेमोरियल वर श्रद्धांजली वाहण्यात येते. त्या पद्धतीने भारतीय सेनेने आपल्या लढवय्या झूम ला श्रद्धांजली वाहिली. त्याचा एक व्हिडीओ ट्विटर वर त्यांनी शेअर केला आहे. तो प्रत्येक भारतीयांनी बघायला हवा असं मला मनापासून वाटते. 

भारताच्या रक्षणासाठी आपलं सर्वोच्च बलिदान देणाऱ्या झूम ला माझा कडक सॅल्यूट. प्रत्येक भारतीय तुझ्या या बलिदानासाठी ऋणी असेल. 

जय हिंद!!!  

तळटीप :- ट्विटर च्या काही लिंक इकडे देतो आहे ज्यात झूम कसा होता आणि त्याने कश्या पद्धतीने अतिरेक्यांना कंठस्थान घातलं याचा अंदाज लावता येईल. माझी सर्व वाचकांना विनंती आहे की त्यांनी हे व्हिडीओ आणि ट्विट नक्की बघावे. 

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




2 comments: