Sunday, 2 October 2022

#दुर्गाशक्ती_२०२२_आठवं_पान... विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती_२०२२_आठवं_पान... विनीत वर्तक © 

"To be nobody but yourself in a world 

which is doing it's best day and night to make you like

everybody else means to fight the hardest battle

which any human being can fight and never stop fighting.”... E.E. Cummings

भारतासारख्या देशात जिकडे आधुनिक स्त्रीला सुद्धा स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी रोज दिवस रात्र लढा द्यायला लागतो, तिकडे तृतीयपंथी लोकांच्या संघर्षाबद्दल तर आपण विचारही करू शकत नाही. साधं सार्वजनिक ठिकाणी पैसे मागायला आपल्या जवळपास जरी तृतीयपंथी आले तरी पांढरपेशा समाजाला त्याने अस्वस्थ झाल्यासारखं होतं. त्यामुळे त्यांना समाजाच्या प्रवाहात स्थान देण्याच्या गोष्टी किंवा एकूणच त्यांच्याविषयी माणूस म्हणून विचार करणं हे पण आज समाजाकडून कोसो लांब आहे, त्या काळात एक तृतीयपंथी म्हणून जन्माला येणं ही एक प्रकारे आयुष्यभर भोगायला लागणारी काळ्या पाण्याची शिक्षाच! पण त्यातून स्वतःला सावरत स्वतःचं अस्तित्व समाजाच्या पटलावर सिद्ध करणं आणि समाजाला आपली दखल घ्यायला लावणं हा लढा एक दुर्गाशक्तीचं प्रतिक आहे. जिकडे पुरुष म्हणून जन्माला आलेली एक स्त्री स्वतःचं अस्तित्व शोधून आपल्यासोबत समाजातील आपल्यासारख्या स्त्रियांच्या आयुष्याला एक अर्थ प्राप्त करून देते, ती दुर्गाशक्तीचं एक प्रतिक आहे. भारताच्या इतिहासात हा लढा देणारी स्त्री आहे "जोयिता मोंडल". 

जोयोंतो नावाचा मुलगा म्हणून जन्माला आलेल्या जोयिताचं पुढलं आयुष्य तृतीयपंथी असणार हे जेव्हा स्पष्ट झालं, तेव्हा तिची काळ्या पाण्याची शिक्षा सुरू झाली. समाजाने नाकारण्याआधीच जन्मदात्यांकडून आणि आपल्याच कुटुंबाकडून तिला तृतीयपंथी असण्यासाठी अवहेलना सोसावी लागली. शाळेत जायला लागल्यावर समाजाकडून तिची अवहेलना सुरू झाली. मग ते समवयस्क तिच्या शाळेतील विद्यार्थी असोत वा गल्लीमध्ये राहणारे शेजारी असोत. प्रत्येक दिवशी तिच्या तृतीयपंथी असण्यावरून तिला ऐकावं लागत होतं. अनेकदा असं वाटायचं की आपण जन्माला तरी का आलो? तृतीयपंथी असलो म्हणून माणूस म्हणून जगण्याचा आपला अधिकारही आपल्याला नाही का? १० वी झाल्यावर जोयिताने तिच्यावर होणाऱ्या टीकेला कंटाळून शाळा सोडली. २००९ साली एका दिवशी आपल्या पालकांना आपल्याला दुसऱ्या शहरात काम मिळालं असं सांगून घर सोडलं ते कायमचं. 

घर सोडून दिंजापूर इकडे आल्यावरही तिचं आयुष्य अजून कठीण झालं. पैसे असतानाही तृतीयपंथी असल्यामुळे कोणत्याच हॉटेलने राहायला जागा दिली नाही. तिला उपाशी पोटी रस्त्यावर रात्री काढाव्या लागत होत्या. एक तृतीयपंथी म्हणून पैसे असतानाही समाज अन्न आणि पाणी द्यायलाही कचरत होता. एकवेळ कुत्र्याला देऊ पण तुला नाही अश्या पद्धतीची वागणूक जोयिताला दिली गेली. खचलेल्या जोयिताला दिंजापूर इथल्या तृतीय पंथाच्या लोकांनी स्वीकारलं आणि राहायला जागा दिली. पण त्या बदल्यात रस्त्यावर भीक मागायचं काम करायची वेळ तिच्यावर आली. पण जोयिताला अश्या आयुष्यात जगायचं नव्हतं. समाजाने देऊ केलेली कुत्र्यापेक्षाही हीन दर्जाची वागणूक तिला नको होती. जगातील सगळ्यांत मोठ्या लोकशाही असलेल्या देशात एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हवा होता. २०१० साली तिने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि आपल्यासारख्या स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी "नयी रोशनी फॉर दिंजापूर" नावाची एक गैर-सरकारी संस्था (NGO) स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून तिने एक लढा उभारला. तिच्या या लढ्यात अनेक तृतीयपंथी लोक जोडत गेले आणि बघता बघता तिच्या संस्थेचं कार्य विस्तारू लागलं. २०१० साली व्होटर आय डी कार्ड मिळवणारी जोयिता भारतातील पहिली तृतीयपंथी महिला होती.   

२०१४ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने असा न्याय दिला की ट्रान्सजेंडरला (तृतीयपंथी) लोकांना अधिकृतपणे मान्यता दिली जाईल. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भारतात गोष्टी बदलल्या आहेत. रोजगाराचे नवे मार्ग तृतीयपंथी लोकांसाठी खुले झाले आहेत आणि त्यांना समाजात समान व्यासपीठावर आणण्यासाठी स्वातंत्र्य प्रदान केलं जात आहे. या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असताना, जोयिताची ओळख इस्लामपूरचे उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी, थंडुक शेर्पा यांच्याशी झाली. या ओळखीतून तिने सुब्रत पोळे नावाच्या माजी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांशी संपर्क साधला. तिच्या सामाजिक कार्याची दखल पोळे यांनी घेताना आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा मान ठेवताना त्यांनी इस्लामपूरच्या लोक अदालतीमध्ये तिच्या नावाचा विचार न्यायाधीश म्हणून करण्यासाठी शिफारस केली. लोक अदालतीमध्ये तीन लोकांचे ज्युडिशियल पॅनल असते. ज्यात एक सिनियर न्यायाधीश, एक वकील आणि एक सामाजिक क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारी व्यक्ती असते. जोयिताला तिने केलेल्या सामाजिक कार्याची दखल म्हणून या पॅनल मध्ये सहभागी करून घेण्याची शिफारस केली गेली होती. 

एका तृतीयपंथी स्त्रीला न्यायव्यवस्थेत निवाडा करण्यासाठी आमंत्रण मिळणं हा एक क्रांतिकारी क्षण होता. गेली २९ वर्षं तिने जो संघर्ष केला होता, वेदना सहन केल्या होत्या, ते करत असताना आपल्यासारख्या समदुःखी लोकांच्या आयुष्यात एक आशेचा किरण दाखवण्याची संधी तिच्याकडे चालून आली होती. अर्थातच तिने ही संधी स्वीकारली. ८ जुलै २०१७ रोजी २९ वर्षांची जोयिता मंडल लोक अदालतीमधली भारतातील पहिली तृतीयपंथी न्यायाधीश बनली. न्यायदेवता आंधळी असते कारण तिने न्याय करताना कोणताही पक्षपात करू नये असं अभिप्रेत आहे. जोयिताच्या मते, 

“मला सामाजिक कार्यकर्त्याचे स्थान देण्यात आले आहे आणि ते मला माझ्या योग्यतेप्रमाणे वागतात. मी तिथे ट्रान्सजेंडर (तृतीयपंथी) म्हणून नाही… तर मी तिथे एक निष्पक्ष न्यायाधीश म्हणून आहे.”

जोयिता मंडलच्या लढ्याचा विजय हा फक्त तिच्यापुरता मर्यादित नाही तर याचे व्यापक परिणाम समाजाच्या पटलावर होणार आहेत. हे केवळ समाजाच्या विचारधारणेत आणि सक्षमीकरणापुरतेच मर्यादित नाही, तर हा विजय सिस्टीममध्ये प्रवेश करण्याबद्दल आणि सिस्टिम मध्ये बदल घडवण्याचा अधिकार मिळवण्याबद्दल आहे. त्यासाठीच जोयिता मंडल आधुनिक दुर्गाशक्तीचं अनोखं रूप आहे. जिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजाच्या प्रत्येक नजरेला, टीकेला, अन्यायाला सामोरे जात आपल्यासोबत आपल्यासारख्या असंख्य तृतीयपंथी लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, हे पांढरपेशा समजाला दाखवून दिलेलं आहे. त्यासाठीच तिचा हा लढा येणाऱ्या काळात निर्णायक भूमिका बजावेल असे मला मनापासून वाटते. जोयिता मंडलचे यश हे भारतापुरते मर्यादित नाही तर भारतीय लोकशाही, भारतीय संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा तो आदर आहे, ज्याचे पडसाद जगाच्या पातळीवर उमटल्याशिवाय राहणार नाहीत. 

एकीकडे बुरखा घालण्यासाठी आणि स्त्रीच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी आंदोलन होत असताना आणि तरुण पिढी मागचा पुढचा विचार न करता असल्या आंदोलनाला मूक पाठिंबा देत असताना स्वतःच्या हक्कासाठी आणि स्वातंत्र्यासाठी लोकशाहीच्या माध्यमातून सिस्टीमचा भाग बनून तृतीयपंथी लोकांना मुख्य प्रवाहात आणणारा जोयिताचा लढा मला दुर्गेचे अनोखे रूप वाटते. जोयिता मंडलला माझा कडक सॅल्यूट. तिच्या पुढच्या प्रवासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



1 comment:

  1. अभिनंदन. जनहिताचा मावेत "दुर्गाशक्ती" मध्ये केल्याबद्दल.

    ReplyDelete