'प्रचंड'... विनीत वर्तक ©
भारताला लाभलेल्या सीमा या नेहमीच अतिशय खडतर भागात आहेत. त्यात दोन्ही बाजूने सतत कुरापती करणारे शत्रू असल्यावर भारताच्या सीमांच्या रक्षण करणं हे एक मोठं शिवधनुष्य भारताला गेल्या ७५ वर्षांपासून पेलावं लागत आहे. त्यासाठी आपली संरक्षण यंत्रणा सतत अद्यावत ठेवण्याचा खर्च ही भारताला मोठ्या प्रमाणावर करावा लागलेला आहे. संरक्षण उत्पादनांची आयात म्हणजे सगळ्यात मोठा भ्रष्टाचार करण्याचा मार्ग राजकीय नेत्यांना आणि पक्षांना गेल्या कित्येक वर्षात मिळालेला होता. अब्जोवधी रुपयांच्या करारात दलालांचा सगळीकडे झालेला फैलाव. दस का बीस करत होणारं लॉबिंग आणि त्यात मिळणारी मलई या सर्वावर कुठेतरी अंकुश ठेवण्यासाठी काही पावलं टाकणं गरजेचं होतं. या सगळ्यावर एकच उत्तर ते म्हणजे भारताच्या संरक्षण सज्जतेत कुठेही कमी न करता स्वबळावर संरक्षण आयुधांची निर्मिती करणं. 'न रहेगा बास न बजेगी बासुरी' या उक्तीप्रमाणे भ्रष्टाचाराच्या किडीच्या मुळावर घाव घालण्यासाठी एकच उत्तर होत ते म्हणजे भारताला संरक्षण उतपादनांच्या बाबतीत आत्मनिर्भर करणं. २०१४ साली झालेल्या सत्ताबदलानंतर आत्मनिर्भरतेवर विशेष लक्ष देऊन आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने प्रभावी पावलं टाकली गेली. त्याच पावलांचे एक फळ म्हणजेच 'प्रचंड'.
१९९९ सालच्या कारगिल युद्धात भारताच्या संरक्षण सिद्धतेतील अनेक बाजू उघड्या पडल्या. भारताने जरी हे युद्ध जिंकलं तरी अनेक ठिकाणी भारताचे ढासळलेले बुरुज आपण कुठे कमी पडत आहोत याच आपल्याला ज्ञान करून गेले. कारगिल युद्धात उंच डोंगर माथ्यांवर लपलेल्या शत्रूला नामोहरण करण्यासाठी किंवा तिथवर आपल्या सैनिकांना अथवा दारुगोळा, बचाव कार्य करण्यात भारतीय सैन्याच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर च्या मर्यादा उघड्या पडल्या. रशियन आणि फ्रांस निर्मित भारताकडे असणारी हेलिकॉप्टर ही १५००० - १६००० फूट उंचीवर उड्डाण करण्यास सक्षम नव्हती. भारताची सीमा हिमालयाच्या उत्तुंग पर्वतराजींनी वेढलेली आहे. जगातील सर्वात उंच युद्धभूमी भारताकडे आहे. ज्याची उंची तब्बल २१०००- २४००० फुटावर आहे. मग अश्या स्थितीत शत्रूवर वचक ठेवण्यासाठी भारताला उंच ठिकाणी उड्डाण भरू शकतील अश्या हेलिकॉप्टर ची गरज भासली. त्यातून मग भारताच्या डी.आर.डी.ओ. कडे अश्या उंचावर उड्डाण भरता येऊ शकेल अश्या हेलिकॉप्टर च संशोधन करण्याची जबाबदारी देण्यात आली.
डी.आर.डी.ओ. आणि एच.ए.एल. ने तब्बल दोन दशकांच्या संशोधनानंतर 'प्रचंड' म्हणजेच Light Combat Helicopter (LCH) ची निर्मिती केली आहे. प्रचंड या हेलिकॉप्टरमध्ये अनेक स्टेल्थ वैशिष्ट्ये, आर्मर्ड-प्रोटेक्शन सिस्टीम, रात्री हल्ला करण्याची क्षमता आणि क्रॅश-योग्य लँडिंग गियर आहेत. याचा वापर कॉम्बॅट सर्च अँड रेस्क्यू (CSAR) ऑपरेशन्स, डिस्ट्रक्शन ऑफ शत्रू एअर डिफेन्स (DEAD) आणि बंडखोरी विरोधी ऑपरेशन्समध्ये केला जाऊ शकतो. प्रचंड हेलिकॉप्टर जमिनीवरील सैन्यासाठी सहाय्यक भूमिका बजावण्याव्यतिरिक्त उंच-उंचीवरील बंकर-बस्टिंग ऑपरेशन्स, जंगल आणि शहरी वातावरणात बंडविरोधी ऑपरेशनमध्ये तैनात केले जाऊ शकते. त्याशिवाय संथ गतीने चालणारे विमान आणि शत्रूंच्या दूरस्थपणे चालविलेल्या विमानांवर देखील वापरले जाऊ शकते.
‘प्रचंड’ हेलिकॉप्टर हेलिना किंवा नाग अँटी-टँक गाईडेड क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे, जे हवेतून रणगाडे आणि चिलखती वाहने नष्ट करू शकतात. ते स्टेल्थ तंत्रज्ञान वापरून शत्रूच्या रडारपासून दूर जाऊ शकते. प्रचंड हे लेझर तंत्राने सुसज्ज आहे आणि 8 किमी अंतरावरील कोणतेही लक्ष्य नष्ट करू शकते. याच वेगळेपण म्हणजे ‘प्रचंड’ एका उड्डाणात ५५० किलोमीटरपर्यंतचा पल्ला गाठू शकते. प्रचंड हेलिकॉप्टर क्रॅशप्रूफ मटेरियलपासून बनवण्यात आले आहे. त्याची केबिन कोणत्याही आण्विक, जैविक किंवा रासायनिक शस्त्रांच्या हल्ल्याला तोंड देऊ शकते. हे हेलिकॉप्टर दोन शक्ती इंजिनांनी सुसज्ज आहे, जे फ्रेंच सरकारच्या सहकार्याने बनवले गेले आहे.
‘प्रचंड’ हे जगातील एकमेव लाइट अटॅक हेलिकॉप्टर आहे, जे ५००० मीटर उंचीवर उडू शकते आणि त्या उंचीवर देखील उतरू शकते. चीन किंवा पाकिस्तान यांच्याकडे हलकी हल्ला करणारे हेलिकॉप्टर नाहीत जी उंचावर उडू शकतात. त्यांची हेलिकॉप्टर केवळ १२००० फुटांपर्यंतच उडू शकतात, परंतु 'प्रचंड' हलिकॉप्टर २१,००० फूट उंचीपर्यंत सहज उडू शकते. त्यामुळेच चीन आणि पाकिस्तान वर भारताने एक प्रकारे अंकुश ठेवला आहे. भारत सरकारने नुकतीच ३८८७ कोटी रुपये खर्चून १५ स्वदेशी विकसित लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर ची ऑर्डर दिली आहे. यातील दहा हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलासाठी असतील, तर पाच हेलिकॉप्टर भारतीय लष्करासाठी असतील.
कोणत्याही तंत्रज्ञानात संशोधन करणाऱ्या संस्थेला आर्थिक पाठबळ लागते. आपण तयार केलेलं संशोधन जर वापरलं जाणार असेल तर त्यावर त्या जोमाने काम केलं जाऊ शकते. भारतात गेल्या ७० वर्षात भारतीय संरक्षण उत्पादनांना एक प्रकारे बाजूला काढलं जात होतं. त्यात प्रमुख कारण होतं हीच उपकरणं जर परदेशातून मागवली तर त्याच्या करारामध्ये मिळणारी कमाई. त्यामुळेच अगदी वर पासून खाल पर्यंत पद्धशीरपणे डी.आर.डी.ओ. सारख्या संस्थेतून तयार होणारी उत्पादन एक- दोन अपवाद वगळता बाजूला टाकली गेली. पण जेव्हा राजकीय इच्छा आणि पाठबळ स्वयंसिद्धतेकडे दिलं जाते तेव्हा आपण काय करू शकतो हे डी.आर.डी.ओ. सारख्या संस्थांनी दाखवून दिलं आहे. ध्रुव, रुद्र सारखी हेलिकॉप्टर, ब्राह्मोस, तेजस चा जागतिक बाजारपेठेत वाढलेला दबदबा, पिनाका रॉकेट सिस्टीम, अस्त्र, अग्नी प्राईम मिसाईल अशी अनेक उदाहरणं आज समोर आहेत. त्यामुळेच भारत आज संरक्षण क्षेत्रात स्वबळावर उभा राहतो आहे. आज युक्रेन- रशिया युद्ध पार्श्वभूमीवर सुद्धा भारताला त्याचे चटके बसलेले नाहीत. भारताने जे काही करार इतर देशांशी केले आहेत जसा राफेल करार हे करार गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट डील अश्या पद्धतीने झाले आहेत. ज्यातून दलालांना एक प्रकारे डच्चू मिळालेला आहे.
प्रचंड च्या येण्याने भारतीय सेना आणि भारतीय वायू दलाच्या ताकदीत निश्चित पणाने खूप मोठी भर पडली आहे. सगळ्यात महत्वाचं की आपण आत्मनिर्भरतेकडे अजून एक पाऊल पुढे टाकलं आहे. या हेलिकॉप्टर च्या स्पेअर पार्ट पासून निर्मिती पर्यंत जास्तीत जास्त गोष्टी स्वदेशी असतील यावर भर देण्यात आला आहे. प्रचंड च्या निर्मितीत आपलं योगदान देणाऱ्या अनाम अभियंते, संशोधक, कामगार, व्यावसायिक आणि छोट्या उत्पादन संस्था यांना माझा कडक सॅल्यूट. प्रचंड भारताच्या सीमांच संरक्षण करण्यात आपलं बहुमूल्य योगदान देईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
जय हिंद!!!
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment