Saturday 1 October 2022

#दुर्गाशक्ती_२०२२_सातवं_पान... विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती_२०२२_सातवं_पान... विनीत वर्तक © 

समाजाच्या चौकटीत राहून प्रत्येकजण आयुष्य जगत असतो, पण त्या चौकटीपलीकडे एक विश्व आहे, ज्यात मुशाफिरी करण्याची हिंमत फार थोडेच लोक करतात. भारतीय स्त्रियांच्या बाबतीत तर या गोष्टी वर्ज्य आहेत. कोणत्या स्त्रीने प्रयत्न केले तरी तिला आधार देण्यापेक्षा तिच्या त्या पावलांवर बोट ठेवण्याचं काम समाज करत असतो हे अनेकदा दिसून येते. त्यात जर ती गोष्ट साहसी क्षेत्राशी निगडीत असेल तर त्या भुवया अजून जास्तीच उभ्या राहतात. स्त्रीने मातृत्वाची जबाबदारी घेतली की घराचा उंबरठा ओलांडून साहसी क्षेत्राशी निगडीत आपल्या आवडीनिवडी जपणं ही तर अशक्य कोटीतील गोष्ट. पण असं असताना आपल्या मुलींसोबत आपल्या आवडीची ती साहसी स्वप्नं साकारणाऱ्या दोन आई मुलीच्या जोड्या आजच्या दुर्गाशक्तीच्या मानकरी आहेत. कारण त्यांनी समाजाची बंधनं झुगारून साहसी क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवताना जुन्या आणि नव्या दोन्ही पिढयांना भारतीय स्त्री काय करू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण समोर ठेवलं आहे. 

यातील पहिली गोष्ट आहे शिवानी पृथ्वी आणि दीप्ती पृथ्वी या आई-मुलीची. गोष्ट सुरू होते शिवानी पृथ्वी ५ वर्षाची असताना, वडिलांकडून रेसिंगचा वारसा तिला मिळालेला होता. तिचे वडील ९० च्या दशकात स्पोर्ट रेसिंगचे ड्रायव्हर म्हणून प्रसिद्ध होते. वयाच्या ५ व्या वर्षीच शिवानीने रोलर स्केटिंग स्पर्धेत भाग घेऊन आपल्या या खेळातील पकड स्पष्ट केली होती. विविध रेसिंग स्पर्धेत भाग घेऊन शिवानीने राज्यस्तरीय स्पर्धेत अनेक मेडल मिळवले. शालेय जीवनानंतर तिने डॉक्टर बनण्याचं लक्ष समोर ठेवलं. डॉक्टरकीचा अभ्यास करतानाही तिच्यातील रेसिंगचं वेड तिला स्वस्थ बसून देत नव्हतं. एम.बी.बी.एस. च्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा दिल्यानंतर मिळालेल्या सुट्टीत तिने आपल्या वडिलांकडे आपली इच्छा बोलून दाखवली. आपल्याला रॅली कार रेसिंगसाठी गरजेचं असणारं ड्रायव्हिंग स्किल हे वेगळं असते याची जाणीव तिच्या वडिलांनी करून दिली. आपल्या वडिलांनी घेतलेल्या परीक्षेत शिवानी सहजरित्या पास झाली. तिच्यामध्ये असणारे अंगभूत गुण हे एका रेसिंग ड्रायव्हरसारखे होते. पण खरी अडचण पुढे होती. तिला एका सहकारी ड्रायव्हरची गरज होती. एक असा सहकारी तिला पुढे येणाऱ्या वळण आणि योग्य रस्त्याची दिशा योग्य तऱ्हेने दाखवेल. कोणत्याही रेसिंगमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर सहकारी ड्रायव्हरचा वाटा खूप मोठा असतो. शिवानी नवीन असल्याने कोणीही तिचा सहकारी बनण्यास नकार दिला. 

पेशाने डॉक्टर असलेल्या तिच्या आईने म्हणजेच दीप्ती पृथ्वी यांनी तिची अडचण ओळखली. ऑपरेशन रूम मध्ये माणसाच्या शरीरावर सफाईने ऑपरेशन करणारे हात आणि नजर दीप्तीकडे होतीच. प्रत्येक सेकंदाचं महत्व तिला होतं. पण वयाच्या पन्नाशीमध्ये रेसिंग कारमधून स्पर्धेत भाग घ्यायचा हा विचार क्रांतिकारी होता. पण आपल्या मुलीला आपल्यापेक्षा चांगला सहायक ड्रायव्हर मिळणार नाही हे एक आई म्हणून ती ओळखून होती. कारण सहायक ड्रायव्हर कडून एक चूक आणि गाडीचा अपघात हे समीकरण पक्के होते. तिकडून सुरू झाला स्टिअरिंग व्हील मागचा एक वेगळा प्रवास. रोज ७ थर असलेला सेफ्टी पोषाख आणि हेल्मेट घालून तासनतास अवघड वळणं घेत शिवानी आणि दीप्ती या दोन रेसर स्पर्धेसाठी तयार होत होत्या. त्यांच्या या पावलांवर समाजाने टीका केली नसती तर नवलच. आता या वयात हे नखरे? अश्या टिप्पण्यांपासून ते मुलीचं आयुष्य बरबाद केलं, रेसिंग करून पोट भरते का? असे आणि विविध सल्ले सुरू झाले. पण त्या सर्वांना न जुमानता दोघींनी आपला सराव सुरू ठेवला. २०१८ मध्ये शिवानी आणि दीप्ती यांनी ऑटोक्रॉस स्पर्धेत भाग घेतला, जिकडे दुसरं स्थान त्यांना मिळालं. तर फोक्सवॅगन इंडिया अमेओ कप स्पर्धेत बाकीच्या रेसरला मागे सोडत त्यांनी पोल पोझिशन गाठली. लोकांच्या टीकेला उत्तर देताना शिवानीने डॉक्टरकीची पदवी मिळवली आणि आपलं पदतव्युत्तर शिक्षण सुरू ठेवलं. 

दुसरी गोष्ट आहे म्हैसूर मधल्या ऑड्रे माबेन आणि एमी मेहता या आई-मुलगी जोडीची. गोष्ट सुरू होते जेव्हा नाशिकमध्ये ६ वर्षाची ऑड्रे माबेन आपल्या डोक्यावरून क्षणात फायटर जेट जाताना बघते. डोक्यावरून एका क्षणात गायब होणारं ते जेट ६ वर्षांच्या ऑड्रे माबेनच्या मनात घर करून जाते ते कायमचं. आकाशाची ओढ तिथून सुरू होते. वयाच्या १५ व्या वर्षी एन.सी.सी.ची कॅडेट म्हणून ती पहिल्यांदा ग्लायडरच्या मदतीने हवेशी आपलं नातं जोडते ते कायमचं. तिकडून सुरू होतो अश्या एका रस्त्यावरचा प्रवास ज्याचा विचार आजवर कोणत्याही स्त्रीने केला नव्हता. भारतातील पहिली मायक्रोलाइट एअरक्राफ्ट इन्स्ट्रक्टर म्हणून ऑड्रे माबेनने आपलं नाव इतिहासाच्या पानात कोरलं आहे. 

स्त्री जेव्हा गरोदर असते तेव्हा आजकाल अनेकदा तिला बेड रेस्ट सांगण्यात येते. पण ऑड्रे माबेन या तत्त्वात बसणारी नव्हतीच. ८.५ महिन्याची गरोदर असताना आपल्या पोटातील बाळासोबत तिने तब्बल ४ तास क्रॉस कंट्री फ्लाईट फ्लाय केलं. पुरुषांचं डायपर लावून त्यावर पुढे आलेल्या आपल्या पोटाला सांभाळत तिने हा पराक्रम केला. कदाचित अभिमन्यूप्रमाणे तिच्या पोटात त्यावेळी असणाऱ्या एमीने आपल्या आईकडून आकाशाशी नातं जोडलं ते कायमचं. पुढे जाऊन आई आणि मुलीने मिळून एका प्रवासाचा श्रीगणेशा केला ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही, तो प्रवास म्हणजे, ८० दिवसात २१ देशातून ३७,००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापण्याचं. ऑड्रे माबेन देशातील पहिली मोटार ग्लायडिंग लायसन्स मिळवणारी पहिली भारतीय स्त्री आहे. आपल्या आईच्या पावलांवर पाऊल ठेवत एमीनेही आपल नातं उडण्याशी बांधून घेतलं आहे. 

ऑड्रे माबेन आणि एमी मेहता आणि शिवानी पृथ्वी आणि दीप्ती पृथ्वी या आई-मुलीच्या जोडीने दुर्गाशक्तीचं एक वेगळं उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे. एकीकडे मुलगी आपल्या आईच्या आवडीला आपली आवड बनवते तर दुसरीकडे एक आई आपल्या मुलीच्या आवडीला आपली आवड बनवून त्यात दोघीही एकमेकींना प्रोत्साहन देत यशाची शिखरं पादाक्रांत करत भारतीय स्त्रीचं एक वेगळं रूप जगापुढे मांडतात. मोटार रेसिंग किंवा अल्ट्रालाईट पायलट ही क्षेत्रं भारतीय स्त्रीपासून आजवर अलिप्त राहिलेली होती. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रातसुद्धा स्त्री आपल्या कर्तृत्वाने अटकेपार झेंडे रोवू शकते हेच या दोन आई-मुलीच्या जोड्यांनी दाखवून दिलं आहे. दुर्गाशक्तीचं एक वेगळं स्वरूप समोर ठेवणाऱ्या या सर्वांना माझा कडक सॅल्यूट आणि त्यांच्या पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा...

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 






No comments:

Post a Comment