Saturday 8 October 2022

#खारे_वारे_मतलई_वारे ( भाग २६)... विनीत वर्तक ©

 #खारे_वारे_मतलई_वारे ( भाग २६)... विनीत वर्तक ©

जगाच्या बुद्धिबळाच्या पटावर सध्या शह-काटशहाच्या चाली खेळल्या जात आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी प्रत्येकजण आपल्या समोरच्याला कात्रीत पकडण्यासाठी प्रयत्न करतो आहे. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे या उक्तीप्रमाणे या प्रत्येक चालीची जी कारणे दाखवण्यात येत आहेत ती जगाचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आहेत. पण खरा गेम तर पडद्यापाठी सुरू आहे. हा गेम समजून घेण्यासाठी आपल्याला पडद्यामागचं राजकारण, सूत्रधार समजून घ्यावे लागणार आहेत. त्याशिवाय या सगळ्या चालींचा येत्या काळात आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होणार आहे? हे पण समजून घेण्याची गरज आहे. कारण या चालींचा नकळत प्रभाव तुमच्या आमच्या आयुष्याशी निगडीत आहे. तर नक्की काय आहेत या चाली त्या आपण समजावून घेऊ. 

जागतिक पटलावर अनेक गोष्टी सध्या घडत आहेत त्यांचा संबंध एकमेकांशी जुळलेला आहे पण सर्वच गोष्टी एका भागात लिहीता येणार नाहीत. त्यासाठी टप्प्याटप्प्याने आपण त्या समजून घेऊ. 

ओपेक म्हणजेच The Organization of the Petroleum Exporting Countries (OPEC) आणि त्यांचे साथीदार देश जे की ऑइल आणि गॅस म्हणजेच क्रूड तेलाचं उत्पादन करतात त्यांनी नुकताच एकमुखाने एक निर्णय घेतला आहे. यात एकमुखाने हा महत्वाचा भाग आहे ते का? ते पुढे स्पष्ट होईल. या ओपेक देश आणि त्यांचे साथीदार देश यांनी १ नोव्हेंबरपासून क्रूड तेलाच्या निर्मितीत तब्बल २ लाख बॅरल/प्रति दिवस घट करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑइल आणि गॅसच्या घसरलेल्या किंमती स्थिर करण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याचं या देशांनी स्पष्ट केलं आहे. पण खरंच असं आहे का? तर यामागचं मोठं राजकारण आपण समजून घेऊ. 

जानेवारी २०२२ च्या सुरवातीला क्रूड ऑइलच्या किमती साधारण ७९ $ प्रति बॅरल इतक्या होत्या. आज हाच भाव साधारण ८८ $ प्रति बॅरल इतका व्यवस्थित स्थिर आहे. मार्च २०२२ मध्ये रशियाने युक्रेन युद्धाला सुरूवात झाल्यावर हाच भाव १४ वर्षांच्या उच्चांकाला म्हणजेच १२७ $ प्रति बॅरल इतका जाऊन पोहोचला होता. पण जसे युद्धाचे काळे ढग कमी झाले तसे किंमती स्थिर झाल्या. मग आता सगळं नीट असताना ओपेक देशांनी अचानक क्रूड तेलाचं उत्पादन कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा नक्कीच खनिज तेलाच्या किमती पुन्हा १०० $ प्रति बॅरल पलीकडे घेऊन जाणार हे निश्चित आहे. नोव्हेंबरमध्ये असं काय आहे ज्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे. त्यासाठीच म्हणालो की बुद्धिबळाच्या चाली या ओळखता येणं गरजेचं आहे. 

ओपेक देशात सगळ्यात दादा देश आहे सौदी अरेबिया. जगात दररोज २९.७ मिलियन बॅरल तेलाचं उत्पादन होते, ज्यातलं जवळपास १०.९ मिलियन बॅरल तेलाचं उत्पादन एकटा सौदी अरेबिया करतो. सौदी अरेबियाचे राजे सलमान आता म्हातारे झाले आहेत. त्यांचं वय आता ८६ वर्षे इतकं आहे. साहजिक राजकीय आणि तेलाच्या अर्थकारणातून त्यांनी एक प्रकारे निवृत्ती घेतली आहे. आता ही धुरा क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याकडे आली आहे. गेले काही वर्षं सत्तेचं आणि तेलाच्या अर्थकारणाचे केंद्र त्यांच्याकडे आहे असं बोललं जात होतं. २७ सप्टेंबर २०२२ ला त्यांची नियुक्ती सौदी अरेबियाचे पंतप्रधान म्हणून किंग सलमान यांनी केली आहे. याचा अर्थ आता उघडपणे सत्तेच्या चाव्या MBS म्हणजेच क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याकडे आल्या आहेत. त्यांनी पद स्वीकारल्यावर लगेच ओपेक देशांनी निर्णय घेतला आहे. यात याच प्रिन्सला आपल्या बदनामीची परतफेड अमेरिकेला करायची आहे. 

वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खशोग्गी यांची २०१८ मध्ये हत्या याच मोहम्मद बिन सलमान यांनी घडवून आणली असा फक्त आरोपच नाही तर उघड निष्कर्ष अमेरिकेने काढला होता. यात सगळ्यांत पुढे होते अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन. बायडेन यांनी आपल्या निवडणूक प्रचारात उघडपणे सलमान यांना आरोपी घोषित केलं तसेच सौदी अरेबियाला मारेकऱ्यांचा एक प्रकारे पाठीराखा म्हटलं. आपण राष्ट्राध्यक्ष झाल्यावर या सौदी प्रिन्सला आपण याची किंमत मोजायला लावू अश्या वल्गना त्यांनी उघडपणे आपल्या भाषणात केल्या होत्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर सौदी प्रिन्सला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न अमेरिका करत होती. प्रिन्स सलमान आणि बायडेन यांच्यामधे निर्माण झालेल्या वितुष्टाचे परिणाम अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्यामधील संबंधावर पडले. राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून बायडेन आणि प्रिन्स सलमान यांच्यात एकदाही भेट झालेली नाही यावरून आपण संबंध किती खराब झाले आहेत याचा अंदाज बंधू शकतो. एकीकडे गेली ४ वर्षं प्रिन्स सलमान अमेरिकेला आणि विशेष करून बायडेन यांना धडा शिकवण्यासाठी संधीची वाट बघत होते. सप्टेंबरमध्ये औपचारिकरित्या सौदीचे पंतप्रधान म्हणून सुत्रे हातात घेतल्यावर त्यांनी बुद्धिबळाच्या पटलावर आपली चाल खेळायला सुरूवात केली. 

८ नोव्हेंबर २०२२ रोजी अमेरिकेत निवडणुका होत आहेत. यामध्ये House of Representatives ( ज्याला आपल्या लोकशाहीत आपण लोकसभा म्हणतो) त्याच्या सर्वच्या सर्व ४३५ जागांवर मतदान होणार आहे. तर Senate ( ज्याला आपण भारतीय लोकशाहीत राज्यसभा म्हणतो) त्याच्या १०० पैकी ३५ जागांवर मतदान होते आहे. बरोबर १ नोव्हेंबर पासून सौदी अरेबियाने तेलाच्या पुरवठ्यात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साहजिक तेलाच्या किमती भडकणार आहेत. याशिवाय सौदी अरेबियावर बायडेन यांच्या नेतृत्वात अमेरिकेचं नियंत्रण कमी झाल्याचा संदेश या निमित्ताने ठळकपणे अमेरिकन जनतेसमोर जाणार आहे. अमेरिकेने प्रचंड विरोध केला असतानाही सौदीच्या हाताखाली ओपेकने हा निर्णय घेतला आहे. याचा प्रचंड फटका बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाला बसणार हे उघड आहे. आधीच अमेरिकन जनता बायडेन यांच्यावर अनेक कारणांसाठी नाराज आहे. त्यात तात्या ट्रम्प यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे त्यात अजून भर पडली आहे. युक्रेन युद्धात अमेरिका रशियाचं काही बिघडवू शकली नाही याचा डागही बायडेन यांच्यावर लागलेला आहे. त्यात प्रिन्स सलमान यांनी आपली चाल खेळून बायडेन यांना प्रचंड अडचणीत टाकलेलं आहे. या निवडणुकीत बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाची धूळधाण उडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तात्या ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणार आहेत. या सर्वाचा परिणाम म्हणजे ५ नोव्हेंबर २०२४ च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा तात्या ट्रम्प हुकूमाचा एक्का असणार आहेत. 

ओपेकच्या निर्णयामागे प्रिन्स सलमान यांच्यावर बायडेन यांनी केलेल्या आरोपांची पार्श्वभूमी आहे. येत्या काळात यामुळे अमेरिका आणि सौदी अरेबिया यांचे संबंध अधिक खराब होत जाणार आहेत. तर दुसरीकडे सौदी अरेबिया चीन, रशिया आणि भारत यांच्या जवळ येतो आहे. अमेरिकेची जागतिक अर्थकारणावर असलेली पकड आता सुटत असल्याचे स्पष्ट होते आहे. प्रिन्स सलमान यांनी एका मुलाखतीत उघडपणे सांगितलेलं आहे, 

“Simply, I do not care” if Biden misunderstands him, adding, “It’s up to him to think about the interests of America." & “I believe other people in the East are going to be super happy” if the U.S.-Saudi relationship continues to devolve.

याचा अर्थ स्पष्ट आहे. आम्ही अमेरिकेला भीक घालत नाही खरे तर आम्हाला अमेरिका काय करते याबद्दल काही देणंघेणं नाही. हे जागतिक स्तरावर बदलणारे संदर्भ खूप मोठे परिणाम घडवून आणणार आहेत. या सगळ्यांत भारत कुठे? सर्व सामान्य लोकांच्या आयुष्यात याने काय फरक पडणार याविषयी 

पुढच्या भागात. 

क्रमशः 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment