Wednesday 5 October 2022

एका मिशन ची सांगता... विनीत वर्तक ©

 एका मिशन ची सांगता... विनीत वर्तक ©

२४ सप्टेंबर २०१४ चा तो दिवस होता जेव्हा भारतातील इसरो च्या केंद्रात लगबग सुरु होती. नुसत्या भारतासाठी नाही तर संपूर्ण मानवाच्या तांत्रिक क्षमतांना एक एक नवीन आयाम देणारा हा दिवस असेल याची कल्पना तिकडे उपस्थित असलेल्या कोणाच्या मनात नव्हती. त्याला कारण ही तसेच होते. ५ नोव्हेंबर २०१३ रोजी भारताने मंगळाकडे उड्डाण केलं तेव्हा जगातील सर्व वैज्ञानिक, संशोधक आणि स्पेस एजन्सी यांनी या मिशनला इतकं सिरीयसली घेतलं नव्हतं. कारण आजवर झालेल्या ४१ पैकी २३ मिशन हे मंगळावर स्वारी करण्यात अयशस्वी ठरले होते. त्यात कोणत्याही देशाला आपल्या पहिल्या प्रयत्नात मंगळावर जाणं जमलेलं नव्हतं. पण म्हणतात न इतिहास घडत असतो आणि त्याचे संदर्भ बदलत असतात. असच इतिहासाचं एक सोनेरी पान त्या दिवशी भारतात लिहिलं गेलं. भारताने पाहिल्याच प्रयत्नात मंगळावर यशस्वी स्वारी करून संपूर्ण जगाला एक धक्का दिला होता. 

साडी नेसून गजरा माळलेल्या भारतीय स्त्री वैज्ञानिकांचा आणि संशोधकांचा तो फोटो काही वेळातच जगाची भारताबद्दल असलेली धारणा बदलण्यात यशस्वी ठरला. त्या फोटोने नुसत्या भारतीय स्त्री ची प्रतिमा बदलली नाही तर अवकाश मोहिमांचा येणाऱ्या काळातील प्रवासाला एक वेगळ्याच उंचीवर नेलं. अवघ्या ७५ मिलियन अमेरिकन डॉलर मधे भारताने मंगळावर केलेली स्वारी हा अनेकांसाठी अभ्यासाचा विषय ठरला. भारताच्या मंगळ यानाने म्हणजेच मॉम ने अवकाश संशोधनाचे संदर्भ बदलवून टाकले. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर स्वारी करणारा भारत पहिला देश ठरला. इतक्या कमी पैश्यात अवकाश स्वारी करता येऊ शकते हे भारताने जगाला दाखवून दिलं. 

६ महिन्यांच आयुष्य घेऊन मंगळावर दाखल झालेल्या मॉम ने गेल्या ८ वर्षाच्या आपल्या आयुष्यात मंगळाबद्दल आपल्याला असलेल्या माहितीत अभूतपूर्व अशी भर टाकली आहे. मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाची वैशिष्ट्ये, आकारविज्ञान, वातावरण आणि बाह्यमंडल या सर्वान बद्दलची माहिती भारताचं मंगळयान गेली ८ वर्ष न थकता इसरो कडे पाठवत होतं. आता याच माहितीच्या आधारे मंगळाबद्दल अनेक वैज्ञानिक संशोधन करत आहेत. जगभरातून ७२०० पेक्षा जास्त संशोधकांनी या माहितीच्या वापरासाठी इसरो कडे अर्ज केला आहे. ज्यातील ४०० पेक्षा जास्ती जण हे जगाच्या ५० पेक्षा जास्त देशातून असलेले संशोधक आहेत. मॉम ने मंगळ ग्रहावरील धूळ समजून घेण्यास मदत केली. मंगळ यानाने प्रथमच मंगळाच्या नैसर्गिक उपग्रहांपैकी एक असलेल्या डेमोसच्या दूरच्या बाजूचे छायाचित्रण केले. आणि त्यामुळे शास्त्रज्ञांना मंगळावरील भूस्खलनाचा अभ्यास करण्यात मदत झाली. अश्या विविध संशोधनांना हातभार लावणाऱ्या मॉम मिशन चा अंत झाल्याचं इसरो ने नुकतच जाहीर केलं. 

इसरो ने मंगळयाना सोबतचा आपला संपर्क संपुष्टात आल्याचं स्पष्ट केलं आहे. गेली ८ वर्ष संपर्कात असणाऱ्या मॉम वरील इंधन संपल्यामुळे कदाचित स्वतःला मंगळाच्या ग्रहण स्थितीनंतर स्वतःला सावरू शकलं नसल्याचा प्राथमिक अंदाज इसरो ने व्यक्त केला आहे. मंगळाच्या ग्रहणात सौर पॅनल मधून ऊर्जा मिळत नसताना त्यात असलेल्या इंधनाच प्रज्वलन करून ग्रहण काळानंतर पुन्हा पृथ्वीच्या दिशेने एन्टिना वळवण्याच तंत्रज्ञान मंगळयाना मधे होतं. हे सगळे सोपस्कार कोणत्याही मदतीशिवाय मंगळयान करण्यासाठी स्वायत्त होतं. पण इसरो च्या मते एप्रिल २०२२ मधे आलेल्या ग्रहण स्थिती नंतर कदाचित मंगळयानावर असलेलं इंधन संपुष्टात आल्याने मंगळयानाला आपली एन्टिना पृथ्वीच्या दिशेने वळवण्यात अपयश आलं असावं आणि त्यामुळे यानाचा संपर्क तुटल्याचा इसरो ने स्पष्ट केलं आहे. 

मंगळयानाला आता कोणत्याही स्थितीत पुन्हा जिवंत करणं शक्य नसल्याने इसरो ने भारताच्या मंगळयान मिशन ची सांगता झाल्याचं जाहीर केलं आहे. नुसत्या भारताच्या नाहीतर संपूर्ण जगाच्या अवकाश प्रवासात भारताचं मंगळयान मिशन एक मैलाचा दगड होता हे इतिहासाच्या पानात सोनेरी अक्षराने लिहिलं गेलं आहे भारताच्या चलनातील सगळ्यात मोठ्या २००० रुपयांच्या नोटेवरही ते कायमचं कोरलं गेलं आहे. पण भारतीय मात्र या सोनेरी क्षणाला विसरून गेले आहेत असं कुठेतरी जाणवलं. ज्या दुर्गशक्तींनी भारताच्या मंगळयान मिशनला मंगळावर पोहचवण्यात सिंहाचा वाटा उचलला त्याच दुर्गाशक्तीच्या उत्सवात मंगळयान मिशन ची सांगता व्हावी हा ही एक योगायोग. 

मंगळयान मिशन मधे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या अभियंते, वैज्ञानिक आणि संशोधक तसेच कामगार, कॉन्ट्रॅक्टर आणि इतर संस्था यांना माझा कडक सॅल्यूट. भारताचा तिरंगा अटकेपार नाही तर पृथ्वीपलीकडे फडकवणाऱ्या त्या सर्व अनाम भारतीयांचा मला अभिमान आणि आदर आहे. मंगळयान मिशांनी सुद्धा प्रत्येक दिवस जगलो होतो. यातील प्रत्येक अपडेट दिवस-रात्र असताना जागून ऐकली आणि बघितलेली आहे. माझ्या अवकाश लेखनाचा श्रीगणेशा सुद्धा २०१३ साली याच मिशन च्या उड्डाणातून झाला होता. त्या सर्व आठवणींना आज उजाळा मिळाला. 

थँक यु इसरो. यु डिड इट.... 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :-  इसरो , गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.





1 comment:

  1. Unimaginable And unparallel success. Of ISRO.

    ReplyDelete