Monday, 3 October 2022

#दुर्गाशक्ती_२०२२_नववं_पान... विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती_२०२२_नववं_पान... विनीत वर्तक © 

पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत अशी काही क्षेत्रं आहेत ज्यात अजूनही स्त्रीला प्रवेश नाही. जरी कोणत्याही स्त्रीने त्यात प्रवेश केला तरी तिच्याकडे वेगळ्या नजरेने समाजात बघितले जाते. भारतासारख्या पितृसत्ताक समाज व्यवस्था असलेल्या देशात हा फरक अजून जास्ती प्रकर्षाने समोर बघायला मिळतो. स्त्रीने घराकडे लक्ष द्यावं तर पुरूषाने बाहेरची म्हणजेच अंगमेहनतीची कामं करावीत असा प्रघात कित्येक शतके भारतात होता. चूल आणि मूल यात रमलेली स्त्री जेव्हा आधुनिक भारतात घराच्या चौकटीपलीकडे जायला लागली तेव्हाच भारताच्या पितृसत्ताक समाजव्यवस्थेला एक प्रकारे हादरे बसले होते. त्या सर्वाला तोंड देत स्त्रीने आपलं कर्तृत्व सगळ्या क्षेत्रात सिद्ध केल्यावर त्याला स्वीकारण्याशिवाय पर्याय समाज व्यवस्थेला नव्हता. पण गेल्या काही वर्षांत जेव्हा भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करतो आहे, तेव्हा स्त्रीपासून आजवर अलिप्त राहिलेली क्षेत्रंसुद्धा तिला खुणावत होती. त्याच क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाने आपणही कोणापेक्षा कमी नाही हे आत्मनिर्भर भारताच्या दुर्गाशक्तींनी आज दाखवून दिलं आहे. 

क्रिकेटच्या खेळात भारतात 'मेन इन ब्ल्यू' खूप प्रसिद्ध आहेत. पण आता एका वेगळ्या क्षेत्रात 'वूमन इन ब्ल्यू'नी एका क्रांतीची सुरूवात केली आहे, ते क्षेत्र आहे गाड्यांच्या निर्मितीचं. यात सगळ्यात पुढे आहे ती भारतातील सगळ्यात मोठी ऑटो मेकर कंपनी म्हणजेच 'टाटा मोटर्स'. टाटा मोटर्स मध्ये शॉप फ्लोअरवर स्त्रियांना संधी देण्याची सुरूवात केली ते आजपासून ४८ वर्षांपूर्वी म्हणजेच १९७४ साली. तत्कालीन टाटा ग्रुपचे चेअरमन जे.आर.डी. टाटा यांनी आपल्या पुण्यातील कारखान्यासाठी पहिल्यांदा एका स्त्री इंजिनिअरची निवड केली. त्या इंजिनिअर म्हणजेच 'सुधा मूर्ती'. समाज व्यवस्थेत स्त्रियांना सारखं स्थान दिलं पाहिजे या विचाराने टाटा ग्रुपने टाकलेलं पहिलं पाऊल हे क्रांतिकारी होतं हे आजचा इतिहास सांगतो. इंजिनियर ते कार बनवण्याची संपूर्ण असेम्ब्ली लाईन हा प्रवास टाटांसाठी आणि त्यात काम करणाऱ्या दुर्गाशक्तींसाठीही सोप्पा नव्हता. पण जेव्हा दुर्गाशक्ती ठरवते तेव्हा ती काहीही करू शकते हे आत्मनिर्भर भारताच्या दुर्गाशक्तींनी दाखवून दिलेलं आहे. 

एक कामगार म्हणून स्त्रियांना असेम्ब्ली लाईनमध्ये काम देताना अनेक गोष्टी वेगवेगळ्या स्तरावर बदलाव्या लागल्या. सगळ्यांत मोठी अडचण होती ती मानसिकतेची. एखादी कार बनवण्याच्या कामात स्त्रिया कामगार म्हणून काम करणार ही गोष्ट 'मेन इन ब्लु' ना पचनी पडणारी नव्हतीच, त्यामुळे विरोध झालाच. कोणत्याही उद्योगात वेळ आणि गुणवत्ता यांना खूप महत्व असते. कमीत कमी वेळात गुणवत्तेचा दर्जा राखून गाड्यांची निर्मिती करणं हे जमवून आणणं हे त्या स्त्री कामगारांसाठी सगळ्यांत मोठं शिवधनुष्य होतं. पुरूषांच्या तोडीने त्याच वेळेत गुणवत्तांचे निकष पार करून स्त्रिया गाड्यांची निर्मिती करू शकतात हा बदल करण्यासाठी एका संपूर्ण सिस्टीम बदलाची गरज होती. सगळ्यांत पहिला मुद्दा होता 'स्किल डेव्हलपमेंट'. दुसरा महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे सुरक्षितता. अगदी रेस्टरूम, टॉयलेट, लॉकर रूम ते रात्री, अपरात्री २४ तास काम करताना स्त्रियांची कंपनीच्या आतमध्ये असताना ते घरी जाईपर्यंत सुरक्षा, सेक्सुअल हॅरॅसमेंट, हेल्थकेअर अश्या अनेक विविध बाबींवर काम करण्याची गरज होती.

जे काम आजवर स्त्रीने कधी केलंंच नाही ते तिला करण्यासाठी योग्य ते पाठबळ, आत्मविश्वास, सोबत या सर्व गोष्टींची गरज होती. भारत सरकारच्या National Employability Enhancement Mission (NEEM) सारख्या योजनांची मदत घेऊन टाटा ग्रुपने आपल्या पुणे इथल्या कारखान्यात स्त्रियांची पहिली बॅच सुरू केली. 'वूमन इन ब्ल्यू' जेव्हा पुरुषांच्या तोडीस तोड उत्पादन करू लागल्या तेव्हा या दुर्गाशक्तींवर अजून मोठ्या कामाची जबाबदारी टप्प्याटप्प्याने सोपवली गेली. आज टाटा मोटर्सच्या दोन प्रसिद्ध गाडयांची निर्मिती 'वूमन इन ब्ल्यू' करत आहेत. टाटा सफारी आणि टाटा हॅरिअर सारख्या अतिशय उच्च दर्जाच्या, गुणवत्तेच्या गाड्यांची निर्मिती तब्बल १५०० पेक्षा जास्ती दुर्गाशक्ती करत आहेत. प्रत्येक महिन्याला प्रत्येक मॉडेलच्या २००० पेक्षा जास्त गाड्यांची निर्मिती वूमन इन ब्ल्यू करत आहेत. ही गोष्ट इकडे संपत नाही तर इकडे सुरू होते. येत्या ४-५ वर्षात टाटा ग्रुपमधील स्त्रियांचा सहभाग हा तब्बल २५% इतका करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. वूमन इन ब्ल्यू ची उत्पादकता बघून एम.जी. (मॉरीस गॅरेज) या कार उत्पादक कंपनीने आपल्या कारखान्यात संपूर्ण स्त्रियांची असेम्ब्लीलाईन सुरू केली आहे. एम.जी. हेक्टर या भारतातील प्रसिद्ध कार मॉडेलची ५०,००० कार ही सर्व स्त्रियांनी बनवली असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. सी.ए.ट. (CEAT) या टायर बनवणाऱ्या कंपनीने संपूर्ण भारतात ऑल वुमन शॉप उघडली आहेत. ज्यात टायरसंबंधी सर्व कामं ही स्त्रियांकडून केली जातात. अगदी चाकं बदलणं, चाकं बॅलेन्स करणं ते अगदी त्याला लागणारी मशिनरी ऑपरेट करणं. 

आज आत्मनिर्भर भारतात स्त्री तिला निषिद्ध असणाऱ्या किंवा अंगमेहनतीची कामं झेपणार नाहीत असं सांगितल्या गेलेल्या क्षेत्रातही आपली स्वतःची ओळख बनवत आहेत. माझ्या मते 'वुमन इन ब्ल्यू' एका नव्या क्रांतीची सुरूवात आहे. त्या क्रांतीचा भाग असणाऱ्या सर्वच स्त्रिया या दुर्गाशक्तीचं एक स्वरूप आहेत. हा प्रवास वाटतो तितका सोप्पा नाही. आपलं घर-दार, शिक्षण, या शिवाय प्रत्येक महिन्याला येणारे पाळीचे दिवस सांभाळून पुरुषी नजरांना तोंड देत समाजाच्या व्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवून आणणाऱ्या या सर्वच दुर्गाशक्तींना माझा कडक सॅल्यूट. आज नवरात्रीचा शेवटचा दिवस आणि उद्या विजयादशमीचा सण साजरा होईल. या निमित्ताने आपण या सर्व दुर्गाशक्तींच्या प्रयत्नांचं, जिद्दीचं, विचारांचं, त्यांच्या प्रवासाचं सोनं लुटुया. या सर्व द्यात, अज्ञात दुर्गाशक्तींच्या पुढल्या प्रवासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




No comments:

Post a Comment