भारतीयत्वाचं मृगजळ... विनीत वर्तक ©
ऋषी सुनक यांनी पंतप्रधान पदाची सूत्र स्विकारली नाहीत तोवर भारतात त्यांच्या बाजूने आणि त्यांच्या विरुद्ध बोलणाऱ्या बातम्यांचे पीक आलं. एका बाजूने ते कसे हिंदू आहेत हे दाखवण्याचा अट्टाहास तर दुसरीकडे त्यांच्या जाती वरून, त्यांच्या बायकोचा भारताशी असलेल्या संबंधांवरून रणकंदन सुरु झालं. एकीकडे त्यांच्या हाताला बांधलेला दोरा, त्यांनी गाईंना भरवलेला चारा यावरून त्यांच्या हिंदू असण्याचे आणि हिंदू धर्माला मानत असल्याचे पुरावे सगळीकडे फिरत होते. दुसरीकडे त्यांच्या आडनावाचा इतिहास आणि त्यांच्या कुटुंबाचा प्रवास उकरून काढून अनेकांनी ते पाकिस्तानी तसेच आफ्रिकन असल्याचे पुरावे समोर ठेवले. हे सगळं बघून मला हसावं का रडावं हेच कळत नव्हतं. कारण या सगळ्याचा ते ब्रिटन चे पंतप्रधान होण्याशी काहीच संबंध नाही. ते पंतप्रधान झाले म्हणून तुमच्या, आमच्या आयुष्यात काडीचा फरक पडणार नाही. यापेक्षा आंतरराष्ट्रीय राजकारणात ही काही फरक पडणार नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे.
कमला हॅरीस असो वा ऋषी सुनक इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की ते मुळात भारतीय नाहीत. त्यांचा भारताशी दुरान्वये संबंध नाही. त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी हा देश भारत नाही. मग त्यांचा संबंध भारताशी कसा काय जोडला जाऊ शकतो? ऋषी सुनक पंतप्रधान झाले म्हणून भारताला झुकतं माप का मिळेल? ब्रिटिशांच्या राजकारणात एका हिंदू माणसाचा उदय वगरे या सगळ्या तकलादू गोष्टी आहेत. ज्याचा संबंध कुठेही प्रत्यक्षात येणं शक्य नाही. ऋषी सुनक एकवेळ धर्माने हिंदू असतील. हिंदू चालीरीती आपल्या जीवनात मानत असतील पण ते कधीच भारतीय नव्हते आणि होऊ शकत नाहीत. ते ब्रिटिश आहेत आणि ब्रिटिश राहणार. हिंदू म्हणून जन्माला येण्याचा संबंध आपण भारतीय म्हणून जोडतो तिकडेच आपण खूप मोठी गल्लत करतो असं मला मनापासून वाटते.
जगात फिरताना प्रत्येक देशात मला हिंदू धर्माचे लोकं भेटत असतात. म्यानमार, सिंगापूर, थायलंड, मलेशिया, अमेरिका, जर्मनी, यु.ए.इ. असे कितीतरी देश आहेत. हिंदू धर्माचा प्रसार हा जगाच्या कानाकोपऱ्यात झालेला आहे. अनेक हिंदू लोकं कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशात स्थायिक झाली आणि तिथल्या संस्कृतीशी त्यांनी जुळवून घेतलं आहे किंवा त्या संस्कृतीशी त्यांची नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे ते धर्माने हिंदू असले तरी कर्माने त्या देशाचे असतात. संधी दिल्यावर कोणत्या देशाकडून युद्धात समाविष्ट व्हायला आवडेल असा प्रश्न विचारला तर त्यांच उत्तर हे त्यांचा कर्मभूमी असलेला देश असतो. ते हिंदू असतील पण भारतीय नसतात. आपण हेच समजून न घेता त्यांचा उदोउदो करत बसतो.
भारतातील अनेक जण इकडे भारतीय नाहीत तर दुसऱ्या देशात जन्मलेले आणि वाढलेले हिंदू धर्मीय कसे काय भारतीय असू शकतील? अमेरिकेत आता उच्च शिक्षणासाठी गेलेल्या आणि तिकडेच स्थायिक झालेल्या लोकांच्या पुढल्या पिढीतील किती लोकं स्वतःला भारतीय मानतात? उत्तर आपल्याच घरात मिळेल. पण ते समजून घेण्याची मानसिकता किती लोकांची आहे? जे ऋषी सुनक भारतात जन्मले नाहीत, ज्यांचा वास्तविक भारताशी कोणता संबंध नाही ते कसा काय भारताच्या फायद्याचा विचार करतील? भारताच्या प्रगतीसाठी ब्रिटन मधे चळवळ उभी करतील? तसं जर होणार नसेल तर ते पंतप्रधान बनले काय आणि नाही बनले काय? याचा आपल्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? जर या सगळ्यांची उत्तर नाही असतील तर त्या गोष्टीला एवढं महत्व देण्याची गरज आपल्याला का वाटते?
ऋषी सुनक यांनी पदभार स्विकारताना घेतलेला निर्णय भारताविरोधी आहे. ज्या सुएला ब्रेव्हरमन विरोधात भारताने नापसंती व्यक्त केली होती. त्यांनाच ऋषी सुनक यांनी गृहमंत्री केलं आहे. त्यामुळे ते पंतप्रधान झाल्यामुळे भारताचं भलं वगरे होईल अश्या भ्रमात कोणी राहू नये किंवा इन्फोसिस ला चांगले दिवस वगरे येतील अशी स्वप्न बघू नये. ते ब्रिटन चे प्रधानमंत्री आहेत. त्यामुळे त्या देशाला योग्य आणि त्यांच्या नागरिकांच्या दृष्टीने ते निर्णय घेतील न की भारताच्या दृष्टीने. ते हिंदू आहेत याचा नक्की आनंद आहे. पण त्याचवेळी ते भारतीय हिंदू नाहीत किंवा हिंदू आहेत म्हणून भारतीय नाहीत हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.
एकूणच काय की मागचा पुढचा विचार न करता कोणाच्या तरी नावावरून त्याच्या देशप्रेमाची तुलना करू नये. इकडे काही भारतीयांनी देश विकायला काढला आहे. तिकडे एखादा विदेशी व्यक्ती भारतीय होऊ शकेल अशी आशा बाळगणं मूर्खपणाचं आहे. अर्थात याला अपवाद असतील आणि आहेत पण तो नियम ठरू शकत नाही. सरसकट सगळे हिंदू भारतीय नसतात आणि भारतीय म्हणजे फक्त हिंदूच नाही. भारत या देशाबद्दलचा देशाभिमान हा धर्मापलीकडे आहे. सरसकट त्याला आडनावाच्या किंवा धर्माच्या चष्म्यातून बघणे योग्य नाही. ऋषी सुनक पंतप्रधान झाले म्हणून भारताला आणि भारतीयांना काडीचा फरक पडणार नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
जय हिंद!!!
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
'इकडे काही भारतीयांनी देश विकायला काढला आहे' हे वाक्य कोणत्या संदर्भात आहे हे समजले नाही.. त्याचा सध्याचा भारतातील राजकारणाचा संबंध असेल तर तो ब्रिटिश राजकारणात कसा जोडता आहात?
ReplyDeleteबाकी लेख उत्तम आहे. नेहमीप्रमाणे स्वच्छ आणि अभ्यासू मांडणी आहे.