पुढलं लक्ष्य - मित्र तारा (अल्फा सेंटौरी) (भाग ३)... विनीत वर्तक ©
आधीच्या भागात आपण बघितलं की अल्फा सेंटौरी सिस्टीम आपल्यासाठी का महत्वाची आहे? त्यातील प्रॉक्सिमा सेंटौरी बी हा ग्रह आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. पण प्रश्न असा येतो की आपण तिथवर जाणार कसं? सध्या उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा विचार केला तर आपण खूप मागे आहोत. मानवाने सोडलेलं व्हॉयेजर १ हे यान सध्या १७ किलोमीटर/ सेकंद वेगाने दूर जाते आहे तर व्हॉयेजर २ हे यान सध्या १५ किलोमीटर/ सेकंद वेगाने दूर जाते आहे. साधारण एवढा वेग आपल्याला डीप स्पेस मिशन १ मधे यानाला देता आलेला आहे. जो जवळपास ५६,००० किलोमीटर/ तास इतका आहे. जर ह्या वेगाने आपण अल्फा सेंटौरी वर गेलो तर आपल्याला तिथवर पोहचायला जवळपास ८१,००० वर्ष लागतील म्हणजेच मानवाच्या २७०० पिढ्या झाल्यानंतर आपण तिकडे पोहचू जे आपल्या काही कामाचं नाही. याचा सरळ अर्थ आहे की उपलब्ध तंत्रज्ञानापेक्षा एखादं नवीन तंत्रज्ञान जर आपण मिळवलं तरच हा प्रवास शक्य आहे.
गेली कित्येक वर्ष संशोधक प्रकाशाच्या वेगाच्या निदान २०% वेगाने जाणार तंत्रज्ञान निर्माण करता येईल का याचा शोध घेत आहेत. आपण जर इतका वेग गाठला तर कदाचित १०० वर्षापेक्षा किंवा अगदी ५० वर्षात आपण अल्फा सेंटौरी च अंतर पार करू शकू. सध्या उपलब्ध असलेल्या रॉकेट तत्रंज्ञान किंवा इंधनाचे प्रज्वलन करून हा वेग गाठता येणं अशक्य आहे. तेव्हा प्रकाशाच्या वेगाचा आणि त्याच्या बलाचा आपण वापर करून एखादं यान अंतराळात पाठवलं तर हे शक्य आहे. प्रकाश हे सर्वकाळ मिळणार इंधन आणि त्याचा वापर करून गाठलेला वेग याच गणित आपण सोडवू शकू. अंतराळात गेलेल्या कोणत्याही यानाला सौर दाबाचा प्रभाव सहन करायला लागतो. तब्बल ३ लाख किलोमीटर / सेकंद वेगाने वाहणारे प्रकाशकण हे कोणत्याही वस्तूवर एक दाब निर्माण करतात. एखाद्या ८०० मीटर X ८०० मीटर सौर पॅनल वर पडणारा दाब ५ न्यूटन किंवा १.१ पाउंड फूट असतो. आता वाचताना हा दाब सूक्ष्म वाटेल पण एखाद्या मंगळाकडे निघालेल्या यान या दाबामुळे तब्बल १००० किलोमीटर पेक्षा जास्त अंतराने आपलं लक्ष्य चुकू शकते. त्यामुळे या दाबाचा विचार कोणत्याही अंतराळ मोहिमेत केला जातो.
आता समजा आपण या दाबाचा वापर एखाद्या यानाला हाकण्यासाठी केला तर? जसं शिडांचं जहाज वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या दाबाचा वापर करत वेग घेतं तसंच एखादं शिड यानाभोवती उभारलं तर त्या शिडाच्या पृष्ठभागावर पडणारे प्रकाशाचे किरण ऊर्जेसोबत आपली गती त्याला देतील. ही गती प्रकाशाच्या वेगाच्या जवळपास १५%-२०% झाली (साधारण ६०,००० किलोमीटर / सेकंद ) तर आपण अल्फा सेंटौरी वर अवघ्या २० वर्षात दाखल होऊ शकू. याच तंत्रज्ञानाला सोलार सेल्स / लेझर सेल्स असं म्हणतात. वर सांगितलं तस गणिताने हे शक्य आहे पण प्रत्यक्षात उतरवणं प्रचंड कठीण काम आहे. कारण वर सांगितलं तसं सौर दाब हा खूप सूक्ष्म असतो त्यामुळे २०% प्रकाशाचा वेग गाठण्यासाठी आपल यान किंवा उपग्रह अतिशय हलकं असलं पाहिजे. अवघ्या काही ग्रॅम मधे जर आपण नॅनोटेक्नोलॉजी चा वापर करून उपग्रह बनवला तर हे शक्य आहे. याच कल्पनेला पंख देण्यासाठी २०१६ मधे युरी मिलर, स्टीफन हॉकिंग आणि फेसबुक चा सर्वसेवा मार्क झुकेरबर्ग यांनी ब्रेकथ्रू स्टारशॉट ची घोषणा केली. ब्रेकथ्रू स्टारशॉट या मोहिमेतील तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी या तिघांनी मिळून १०० मिलियन डॉलर देण्याचं कबूल केलेल आहे.
ब्रेकथ्रू स्टारशॉट मधे ४ मीटर X ४ मीटर आकाराचा सौर आरसा आणि काही सेंटीमीटर आकार असणारे तसेच अवघ्या काही ग्राम च वजन असणारे जवळपास १००० उपग्रह अंतराळात सोडण्यात येतील. अंतराळात गेल्यावर त्यांना पृथ्वीवरून लेझर ने वेग देण्यात येईल. यासाठी तब्बल १०० गिगावॅट एकत्रित शक्तीचा वापर करण्यात येईल. इतकी शक्ती निर्माण करण्यासाठी लेझर च जाळ पृथ्वीवर निर्माण करण्यात येईल. या लेझर ने प्रकाशाच्या वेगाच्या १५%-२०% वेग प्रत्येक उपग्रहाला दिल्यानंतर अल्फा सेंटौरीकडे हे १००० उपग्रह झेपावतील. जवळपास २० वर्ष याच वेगाने प्रवास करून प्रॉक्सिमा सेंटौरी बी ग्रहाच्या जवळून प्रवास करतील. त्यावेळी यावर असलेले कॅमेरे या ग्रहाचा वेध घेऊन ते संदेश पृथ्वीवर पाठवतील. हे संदेश पृथ्वीवर पोचायला जवळपास ४ वर्षाचा कालावधी लागेल.
हे वाचायला उत्कंठा वाढवणारं वाटलं तरी प्रत्यक्ष अश्या पद्धतीचे सौर आरसे, नॅनो उपग्रह आणि लेझर हे सगळं तयार करणं एक मोठं आव्हान आहे. त्या पलीकडे वेगाने जाणाऱ्या या उपग्रहांच्या रस्त्यात येणारे अंतराळातील विविध घटक, गुरुत्वीय बल तसेच विश्वाच्या पोकळीत रेडिएशन चा होणारा मारा, अतिशय थंड तपमान या सगळ्या मधे यावरील कम्प्युटर आणि तंत्रज्ञान टिकणं गरजेचं आहे. यात न्यूक्लिअर पॉवर सेल चा ही वापर केला जाणार आहे. त्यामुळे अतिशय किचकट आणि गुंतागुंतीचं असणारं हे तंत्रज्ञान प्रथम तर निर्माण करणं हेच एव्हरेस्ट इतकं मोठं आव्हान आहे. हे सगळं केल्यावर लेझर ने तेवढा वेग गाठून देणं गरजेचं आहे. यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानावर संशोधक काम करत आहेत. २०३६ पर्यंत हे सगळं तंत्रज्ञान मिळवून हे नॅनो उपग्रह प्रॉक्सिमा सेंटौरी बी या ग्रहावर पाठवण्याची ही मोहीम आहे. ज्याला तब्बल ५ ते १० बिलियन अमेरिकन डॉलर चा खर्च अपेक्षित आहे.
ब्रेकथ्रू स्टारशॉट यशस्वी होईल का? याच उत्तर आत्ता देणं शक्य नाही. पण जर ते यशस्वी झालं तर मानवाने अंतराळातील एका मोठ्या अडचणीवर मात केली असच म्हणावं लागेल. इतके पैसे खर्च करून नक्की काय मिळणार असे बाळबोध प्रश्न अनेकांना पडू शकतील. पण सगळ्याच खर्च झालेल्या पैश्यांचा हिशोब जमा खर्चात मांडता येत नाही. या सगळ्यातून जे तंत्रज्ञान निर्माण होईल ते मानवाच्या प्रगती मधला एक मैलाचा दगड असेल हे नक्की आहे. त्यामुळेच येत्या काळात अल्फा सेंटौरीकडे ब्रेकथ्रू स्टारशॉट चा होणारा प्रवास बघणं रोमांचित करणार असणार आहे.
समाप्त.
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment