चुकवू नये असं काही!... इटेवन क्लास... विनीत वर्तक ©
आपण नेहमीच खूप साऱ्या मालिका, चित्रपट किंवा नाटक बघत असतो, पण काही असे कार्यक्रम असतात जे आपल्यावर खूप प्रभाव पाडून जातात. हा प्रभाव कधी कधी आयुष्याला कलाटणी देणारा ठरतो. असे जे कार्यक्रम असतात, त्यातलीच एक न चुकवण्यासारखी सिरीज म्हणजे 'इटेवन क्लास'. साऊथ कोरियन असलेली ही सिरीज नेटफ्लिक्सवर बघण्यासाठी उपलब्ध आहे. अनेकदा कोरियन सिरीज या प्रेमाच्या किंवा त्याभोवती फिरणाऱ्या असतात. अर्थात त्यातील नात्यांचे उलगडलेले पदर हे खूप सुंदर आणि अप्रतिम असतात. पण 'इटेवन क्लास' या पलीकडे जाते आणि असा एक अनुभव देते जो येणारे अनेक दिवस आपल्यासोबत तर राहतोच पण आपल्या विचारांनाही समृद्ध करतो.
तत्वं ही प्रत्येकासाठी गरजेची असतात. कारण प्रत्येक व्यक्तीचा आत्मसन्मान तत्वांशी जोडलेला असतो. आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात, जिकडे आपल्याला तत्वांशी तडजोड करण्याची गरज पडते किंवा आपण नाईलाजाने करतो. पण काही तत्वं अशी असतात, की आपण त्यांच्याशी तडजोड करू शकत नाही. जगातली कोणतीही शक्ती, मग ती पैश्याची असो वा परिस्थितीची, आपल्याला त्या तत्वांपासून तोडू शकत नाही. अनेकवेळा काळ किंवा माणसं आपल्यासमोर अशी परिस्थिती उभी करतात, तेव्हा वाटतं की आयुष्यात संपलं सगळं! पण त्याचवेळी आपल्या स्वप्नांना जिवंत ठेवणं खरंच सोप्पं असतं का? आपण परिस्थितीसमोर नमते घेतो, की त्याचा प्रतिकार करतो यावर बरंच काही अवलंबून असतं. शेवटी आपणही माणूस आहोत. एखाद्या क्षणी आपण पण तुटतो आणि आपल्या तत्वांना बाजूला ठेवण्याचा विचार करून एक पायरी खाली येण्याचा विचार करतो, पण काहीतरी असतं, की जे आपल्याला ते करण्यापासून परावृत्त करतं मग ती व्यक्ती असते किंवा एखादी घटना!
आपण आपल्या तत्वांना तिलांजली न देताही आपल्या अपमानाचा बदला घेऊ शकतो आणि तो जर घ्यायचा असेल तर विचारपूर्वक पावलं टाकावी लागतात. आपलं डोकं शांत ठेवून आपल्या स्वप्नांसोबत त्या क्षणाची वाट बघायची असते. जेव्हा तो क्षण येतो, तेव्हा आपली पायरी न सोडता आपण आपल्या अपमानाचा बदला घेणंही आपल्याला शिकावं लागतं. हा सर्व प्रवास करताना आपल्यासोबत आपल्या लोकांचा उत्कर्ष आपण कसा घडवू शकतो हे बघणं म्हणजे 'इटेवन क्लास' अनुभवणं.
'इटेवन क्लास' मध्ये शिकण्यासाठी खूप काही आहे. व्यवसायाची तत्वं, त्याची उभारणी या पलीकडे एल.जी.बी.टी. आणि वर्णद्वेष अश्या समाजात पडद्यामागून बोलल्या जाणाऱ्या विषयांनाही इटेवन क्लास स्पर्श करतो. नुसता स्पर्श करून थांबत नाही, तर अश्या लोकांना आपण त्यांचा योग्य तो मान सन्मान कसा मिळवून देऊ शकतो, याचं उदाहरणही समोर ठेवतो. त्यामुळेच 'इटेवन क्लास'ची गोष्ट एखाद्या रेस्टॉरंट किंवा बिझनेस आणि प्रेमापुरती मर्यादित रहात नाही, तर ती आतवर झिरपते. 'इटेवन क्लास' मध्ये खूप काही आहे, जे एखाद्या सिरीजला अप्रतिम बनवते. प्रेम, रोमान्स, ड्रामा, ऍक्शन ते अनिश्चितता सगळंच अवघ्या १६ भागात सामावलेलं आहे. त्याही पलीकडे त्यातील कलाकारांचा अभिनय, जो सगळ्या पात्रांना जिवंत करतो.
'इटेवन क्लास' नेहमीच्या धाटणीतली कोरियन सिरीज नाही. त्यामुळेच तिचं वेगळेपण लगेच लक्षात येतं. वर्षानुवर्षे चालणाऱ्या रटाळ बबड्या, सासू - सुना आणि घरातील काळ्यागोऱ्यांचे कपट यापेक्षा वेगळं काही अनुभवायचं असेल तर 'इटेवन क्लास' नक्कीच टॉप क्लास आहे. सिरीज कोरीयन असली तरी सबटायटल इंग्रजी मधून आहेत. त्यामुळे सिरीज समजायला सोप्पी आहे. नेटफ्लिक्सवर सोडू नये असं काही असेल तर ती म्हणजे 'इटेवन क्लास'. याच संगीतसुद्धा खूप सुंदर आहे. अर्थात त्याचे उच्चार कोरियन भाषेत आहेत पण ऐकायला ट्यून नक्कीच चांगली वाटते. त्यातील एका गाण्याचे बोल इंग्रजी मधून..
New beginnings Are always exciting
Like I can overcome everything I want to keep going forward
Like a clock needle Chasing time
Beyond the lines drawn Each one of us facing life
You might blame it at times Saying not to cross that line yet I can fly the sky
Never gonna stay Until I’m exhausted
Whatever the reason Whatever the excuse
What I need now is courage...
कुठे बघाल :- नेटफ्लिक्स
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment