Monday 22 March 2021

खारे वारे मतलई वारे (भाग ७)... विनीत वर्तक ©

 खारे वारे मतलई वारे (भाग ७)... विनीत वर्तक ©

गेल्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळेच वारे वाहू लागलेले आहेत. अर्थात या वाऱ्यांची चाहूल चाणाक्ष लोकांना आधीच लागली होती पण ते इतक्या वेगाने वाहतील अशी अपेक्षा नव्हती. सध्या ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय राजकारण सुरु आहे ते बघता भारताच्या सिंहाने एकाचवेळी ड्रॅगन आणि भिकारी यांना त्यांची जागा दाखवली आहेच पण त्या पलीकडे भारत हा ज्या पद्धतीने नवीन संबंधांना दिशा देतो आहे ते येणाऱ्या काळात निर्णायक ठरणार आहे. 

गेल्या आठवड्यात भारत आणि पाकिस्तान च्या सैन्य प्रमुखांनी अचानक २००३ साली झालेल्या कराराचा मान ठेवत एकमेकांच्या सिमेवर गोळीबार बंद (युद्धबंदी) करण्यासाठी समर्पित असल्याचं नमूद केलं. खरे तर या कायद्याचं उल्लंघन पाकिस्तान कडून होत होतं. भारतीय सेना फक्त उत्तरासाठी गोळीबार करत होती. एकट्या २०२० वर्षात ५१०० वेळा युद्धबंदी कराराचे पाकिस्तान कडून उल्लंघन केलं गेलं आहे. त्यात ३६ लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे आणि १३० लोक जखमी झाले आहेत. पुलवामा इथल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने बालाकोट इकडे हवाई हल्ला केला होता. त्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधात कटुता आली होती. त्यानंतर पाकिस्तान सातत्याने सिमेवर कुरापती करतो आहे. त्यातच भारताने कलम ३७० रद्द करताना जम्मू-काश्मीर ची स्वायत्तता काढून घेतली आणि भारताचा एक केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता दिल्यावर पाकिस्तान च्या पायाखालची वाळू सरकली. 

पाकिस्तान ने आंतरराष्ट्रीय मंचावर जिवाच्या आकांताने काश्मीर प्रश्न आणि कलम ३७० वरून प्रचंड आकांडतांडव केलं पण आंतरराष्ट्रीय मंचावर युरोपियन देश किंवा अमेरीका तर सोडाच पण आपल्या भाऊ बंधू असलेल्या मुस्लिम राष्ट्रांकडून या गोष्टींची साधी दखल घेण्यात आली नाही. आधीच्या भागात लिहिलं होत त्या प्रमाणे पाकिस्तान ने सौदी अरेबिया विरुद्ध मुस्लिम राष्ट्रात उघडलेल्या आघाडीचं समर्थन उघडपणे केलं आणि सौदीसह अनेक मुस्लिम राष्ट्रांचा रोष ओढवून घेतला. त्यातच भारताने आपल्या चाली खेळताना अरब राष्ट्रांशी आपले संबंध कमालीचे मजबूत केले. इकडे एक लक्षात ठेवलं पाहिजे की भारताने अरब राष्ट्रांशी आपले संबंध मजबूत केले तरी त्याचवेळी इस्राईल सारख्या कट्टर विरोधी देशाशी आपले संबंध मजबूत केले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोरोना च आगमन झालं. कोरोना सोबत लढण्यात भारत व्यस्त आहे असं समजून चीन ने १९६२ सालची चाल पुन्हा एकदा खेळली. पण या वेळेस पट वेगळा होता आणि त्याचा राजा वेगळा होता हे समजायला तो चुकला. 

चीन च्या आक्रमणामुळे पाकिस्तान ला आपण आता भारताला दोन्ही बाजूने खिंडीत पकडून झुकवू शकतो असा आत्मविश्वास वाटायला लागला. पाकिस्तान चीन ने इशारा आणि एक पाऊल पुढे टाकण्याची वाट बघत होता. पण भारताने वेगळी चाल खेळली. तू माझा घोडा खायला येशील तर तुझा हत्ती गेला म्हणून समज. हा हत्ती म्हणजे साऊथ चायना सी. भारताने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे चीन च्या दुखऱ्या नसेवर पाय ठेवला. क्वाड ग्रुप म्हणजेच (Quadrilateral Security Dialogue) च्या नावाखाली अमेरीका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे चार मजबूत देश एकत्र आले. या चार देशांचे हितसंबंध आणि वाटचाल किंवा एकूणच या ग्रुप मधून फायदे तोटे वेगळे आहेत. पण चीन ला रोखण्यासाठी या चारही देशांनी एकत्र लढण्याचं ठरवलं. अर्थात या गोष्टी पडद्यामागून सुरु होत्या. त्यामुळेच चीन जेव्हा लडाख मधे भारताशी दोन हात करायला उभा होता तेव्हा जुलै २०२० मधे अमेरीकेच्या दोन बलाढ्य विमानवाहू नौका साऊथ चायना सी मधे  डेरेदाखल झाल्या होत्या. नक्कीच यात अमेरीकेचा स्वतःचा फायदा होता पण याची वेळ जी होती ती चीन च्या हत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी होती. 

१९६२ चा भारत आणि २०२० मधील भारत वेगळा असल्याची जाणीव चीन ला झाली कारण जर युद्धाचे पडघम वाजले तर अमेरीका एकटी नाही तर भारताची मित्र राष्ट्रे यात कोणत्यातरी कारणाने उडी घेणार हे उघड होत. त्यात कोरोनामुळे चीन ची प्रत कमी झाली होती आणि आर्थिक व्यवहार कमालीचे घटले होते.भारताने चीन वेळकाढूपणा करतो आहे हे लक्षात आल्यावर महत्वाची ठिकाणे युद्धभूमीवर ताब्यात घेऊन १:१ या गुणोत्तरात सैनिक तैनात करून चीन पुढे खूप मोठं आव्हान उभं केलं. युद्ध हा उपाय नाही हे चीन च्या लक्षात यायला सुरवात झाली होती. पण मागे येणं म्हणजे आपल्या प्रतिष्ठेला ठेच लागण हे तो जाणून होता म्हणून अनेक महिने परिस्थिती जैसे थे अशी ठेवून चीन ने काही महिन्यांनी गुपचूप माघार घेतलेली आहे. हा भारताचा राजनैतिकदृष्ट्या खूप मोठा विजय आहे. पण नक्कीच आपण गाफील राहून चालणार नाही याची पुरेपूर कल्पना निदान सध्यातरी भारताला आहे. 

हे सगळं सांगण्या मागचं कारण म्हणजे या सगळ्यात पाकिस्तान ची मोठी गोची झाली. जो ठिणगी पडते आणि मी उडी मारतो यासाठी टपून बसला होता त्याला खूप मोठा धक्का बसला. गेल्या काही महिन्यातील पाकिस्तानी टी.व्ही. वरील बातम्या बघितल्या तर एक लक्षात येईल की त्यांचे सगळे कायदेपंडित एकच सांगतात 'जिकडे चीन मागे आला तिकडे पाकिस्तान भारतासाठी किस झड की पत्ती आहे'.  याचवेळी पाकिस्तान ला त्याची औकात कळाली. त्यात पाकिस्तान ची आर्थिक स्थिती कमालीची नाजूक झाली आहे. २०२० मधे पाकिस्तानी जी.डी.पी. उणे -०.४ टक्के राहिला आहे. जी.डी.पी. च्या ८७% पेक्षा जास्ती हिस्सा हा कर्जात बुडालेला आहे. इन्फ्लानेशन रेट १०% पेक्षा जास्ती आहे. लोकांना अन्न , वस्त्र, निवारा या साध्या गोष्टी सरकार देऊ शकत नाही आहे आणि त्यात कोरोना ची दुसरी व्हेव पाकिस्तानात लवकर अपेक्षित आहे. 

पाकिस्तान ला ही कळून चुकलं की आत्ताच्या परिस्थितीत भारताशी भांडण उकरून काढणं म्हणजे आपल्याच पायावर धोंडा मारून घेणं ज्यातून सावरणं आपल्याला शक्य होणार नाही. आर्थिक,सैनिकी आणि जागतिक मुत्सद्देगिरीच्या बाबतीत भारत आपला बाप झाला आहे. खरं तर तो आधीपण होता पण आता बाप असल्याची जाणीव त्याला झाली आहे ही पाकिस्तान ची दुखरी नस आहे. पण आपल्याच देशातल्या मूर्ख असणाऱ्या धर्मांध लोकांच्या गळी ही गोष्ट कशी उतरवायची ही अजून एक अडचण आहे. आधी भारत चर्चेसाठी एक पाऊल पुढे टाकायचा आणि पाकिस्तान आधी हे करा आम्ही चर्चा करू अश्या अटी घालायचा. आज स्थिती उलट आहे. काश्मीर मधे पुन्हा कलम ३७० लावावं आणि काश्मीर प्रश्न घेऊन मगच चर्चा करावी यावर आपण अडलो तर भारत त्याला काडीचीही किंमत देणार नाही हे त्याला चांगल माहित आहे. कारण भारताने आधीच सांगितलं आहे की आधी तुम्ही तुमची घाण साफ करा मग चर्चेच बघू. या सगळ्यात पाकिस्तान ने मागच्या दरवाजाने चर्चेचे प्रयत्न सुरु केले आहेत. 

क्रमशः  

पुढल्या भागात पाकिस्तान आणि भारत यांचे तसेच भारत आणि अमेरीका यांचे संबंध तसेच या सगळ्यात मध्यस्थीची भूमिका करणारे यु.ए.इ. आणि हे सगळं राजकारण कुठे जाते आहे त्याचा लेखाजोखा. 

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.    




No comments:

Post a Comment