Saturday, 20 March 2021

पुढलं लक्ष्य - मित्र तारा (अल्फा सेंटौरी) (भाग २)... विनीत वर्तक ©

 पुढलं लक्ष्य - मित्र तारा (अल्फा सेंटौरी) (भाग २)... विनीत वर्तक ©

पहिल्या भागात आपण मित्र ताऱ्या बद्दल जाणून घेतलं की कश्या पद्धतीने मित्र तारा एक नसून तीन ताऱ्यांचे कुटुंब आहे. यातील प्रत्येक ताऱ्याच स्वतःच एक अस्तित्व आहे. या तिघांपैकी वैज्ञानिकांच्या रडार वर जो तारा आहे तो म्हणजे प्रॉक्सिमा सेंटौरी. आधी सांगितलं तसं या तिघांमधे प्रॉक्सिमा सेंटौरी आपल्याला सगळ्यात जवळ आहेच पण त्या पलीकडे याच वय ही ४.८५ बिलियन वर्ष आहे जे की आपल्या सूर्याच्या वयाच्या आसपास आहे. (सूर्याचे  वय ४.६० बिलियन वर्ष आहे.) तसेच या ताऱ्याच्या भोवती परिक्रमा करणारे दोन ग्रह आढळून आले आहेत. प्रॉक्सिमा सेंटौरी बी आणि प्रॉक्सिमा सेंटौरी सी त्यातील एक ज्याला प्रॉक्सिमा सेंटौरी बी असं म्हंटल जाते तो हॅबिटायटल झोन मधे आहे. त्यामुळेच इकडे सजीव सृष्टी निर्माण होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी अस्तित्वात आहेत. ( हॅबिटायटल झोन म्हणजे एखाद्या ग्रहाचे आपल्या ताऱ्यापासून इतकं अंतर की ज्या अंतरावर पाणी द्रव स्वरूपात आढळू शकेल, तिथलं तपमान हे सजीव सृष्टीसाठी पोषक असेल. आपली पृथ्वी सूर्यापासून अश्या हॅबिटायटल झोन मधे येते त्यामुळेच पृथ्वीवर आज सजीव सृष्टी आहे. त्याचवेळी मंगळ ग्रह हॅबिटायटल झोन च्या बाहेर फेकला गेल्यामुळे त्यावरील एकेकाळी असणार पाण्याच आणि कदाचित सजीवसृष्टी च अस्तित्व नष्ट झालं.) 

प्रॉक्सिमा सेंटौरी च्या भोवती जर ग्रह परीक्रमा करतात तर अल्फा सेंटौरी ए आणि बी या ताऱ्यांना ग्रह नाहीत का? असा प्रश्न मनात येणं साहजिक आहे. तर सध्या तरी या प्रश्नाचं उत्तर हो आणि नाही असं आहे. याला कारण म्हणजे अल्फा सेंटौरी ए आणि बी या ताऱ्यांचे एकमेकांपासून असलेलं अंतर. आपण ज्या पद्धतीने ग्रहांचा इतक्या लांबून शोध घेतो त्या पद्धतीमुळे ह्या प्रश्नाचं नक्की उत्तर आज सांगता येत नाही. ताऱ्यांकडून येणाऱ्या प्रकाशात, त्याच्या तरंगलांबीत पडणाऱ्या फरकावरून आपण ग्रहांचे अस्तित्व ओळखू शकतो. पण हे दोन्ही तारे अवकाश अंतराच्या मानाने अतिशय जवळ आहेत. त्यामुळे साधारण ४.३ प्रकाशवर्ष अंतरावरून दोन्ही ताऱ्यांकडून येणारा प्रकाश एकमेकात मिसळून जातो. ह्या मिसळण्यामुळे कोणत्याही ग्रहाचे अस्तित्व शोधणं जवळपास अशक्य आहे. तसेच आधी सांगितलं तसं प्रत्येक ८० वर्षात ते एकमेकांच्या अतिशय जवळ येतात आणि नंतर लांब जातात. २०१६ साली ते एकमेकांच्या एकदम जवळ होते आणि सध्या एकमेकांपासून लांब जात आहेत. तंत्रज्ञान आणि टेलिस्कोप मधे जशी प्रगती होत जाईल तसं या ताऱ्यांभोवती ग्रह मिळतील अशी शक्यता वैज्ञानिक व्यक्त करत आहेत. 

प्रॉक्सिमा सेंटौरी या ताऱ्याभोवती जे दोन ग्रह परीक्रमा करत आहेत त्यापैकी एक म्हणजे,  

प्रॉक्सिमा सेंटौरी सी :- हा ग्रह प्रॉक्सिमा सेंटौरी या आपल्या ताऱ्यापासून २२३,०००,००० किलोमीटर अंतरावरून १९२८ दिवसात परीक्रमा करतो. हा ग्रह नेपच्यून च्या आकाराएवढा आहे. प्रॉक्सिमा सेंटौरी पासून इतक्या दूर आहे की इथलं इक्विलिब्रियम तपमान उणे -२३४ डिग्री सेल्सिअस च्या आसपास आहे. त्यामुळे इथे कोणती जीवसृष्टी असणं अशक्य आहे. 

प्रॉक्सिमा सेंटौरी बी:- हा ग्रह साधारण पृथ्वी च्या आकाराचा आहे. (१.१७३ पृथ्वी च्या वस्तुमानाच्या तुलनेत) या ग्रहाचा शोध ऑगस्ट २०१६ मधे  लागला. हा ग्रह प्रॉक्सिमा सेंटौरी ताऱ्यापासून साधारण ७,५००,००० किलोमीटर अंतरावर आहे. हे अंतर त्या ताऱ्याच्या हॅबिटायटल झोन मधे येते. पृथ्वी सूर्यापासून साधारण १४९,५९७,८७० किलोमीटर अंतरावर आहे आणि ती सुर्याच्या हॅबिटायटल झोन मधे येते. अंतरातील ह्या फरकाचे उत्तर ताऱ्याच्या तेजस्वितेत आहे. मागच्या भागात सांगितलं होत की प्रॉक्सिमा सेंटौरी हा थंड तारा आहे त्यामुळे त्याचा हॅबिटायटल झोन हा त्याच्या खूप जवळ आहे. त्यामुळे प्रॉक्सिमा सेंटौरी बी जरी हॅबिटायटल झोन मधे असला तरी स्टेलर विंडमुळे त्याच्या वातावरणावर पडणारा दाब हा पृथ्वीपेक्षा २००० पट जास्ती आहे. (स्टेलर विंड म्हणजे एखाद्या ताऱ्याच्या पृष्ठभागावरून अवकाशात अणू - मिलन प्रक्रियेत गॅस फेकले जातात त्याला स्टेलर विंड म्हणतात.) या स्टेलर विंड च्या दाबामुळे इथलं वातावरण हे अवकाशात वाहून गेलं असेल असा अंदाज आहे. पण या ग्रहाचे इक्विलिब्रियम तपमान हे उणे -३९ डिग्री सेल्सिअस च्या आसपास आहे. (पृथ्वीचं इक्विलिब्रियम तपमान उणे -१८ डिग्री सेल्सिअस च्या आसपास आहे.) त्यामुळे जमीनीखाली सजीव सृष्टी असण्याची शक्यता वैज्ञानिक वर्तवत आहेत. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळे अंदाज पृथ्वीवरून केलेले आहेत त्यामुळे त्यात प्रत्यक्षात खूप सारे बदल अपेक्षित आहेत. 

पृथ्वी सारखी जीवसृष्टी विश्वात कुठे आहे का? या प्रश्नाचं उत्तर मानव खूप काळापासून शोधतो आहे. या शोधात जीवसृष्टी असू शकेल अशी परिस्थिती असणारे अनेक ग्रह सापडले आहेत. पण यापैकी एकावर ही आपण जाऊ शकू असं तंत्रज्ञान आजतरी उपलब्ध नाही. त्यामुळे जर आपण येत्या काळात कोणत्या ग्रहाकडे किंवा आपल्या सौरमाले सारख्या अजून कोणत्या सौरमालेचा विचार करणार असू तर जी आपल्याला सगळ्यात जवळ आहे तिचा नंबर पहिला लागतो. त्यामुळेच अल्फा सेंटौरी हे ताऱ्यांचे कुटुंब आणि प्रॉक्सिमा सेंटौरी बी हा ग्रह शास्त्रज्ञांच्या रडारवर सगळ्यात पुढे आहे. त्यासाठीच मानवाने आपलं लक्ष्य नक्की केलं आहे ते म्हणजे मित्र तारा (अल्फा सेंटौरी). 

पुढल्या भागात मित्र तारा (अल्फा सेंटौरी) वर कश्या पद्धतीने आपण जाणार आहोत? कोणतं तंत्रज्ञान वापरणार आहोत? प्रत्यक्षात ते शक्य होईल का? त्यातून आपल्याला काय मिळणार? हे जाणून घेऊ. 

क्रमशः 

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



No comments:

Post a Comment