Thursday, 4 March 2021

आत्मनिर्भर भारत (ब्राह्मोस क्षेपणास्त्र)... विनीत वर्तक ©

 आत्मनिर्भर भारत (ब्राह्मोस क्षेपणास्त्र)... विनीत वर्तक ©

२ मार्च २०२१ रोजी भारत आणि फिलिपाईन्स ह्या देशात एक करार झाला. ह्या कराराने दोन्ही देशांनी सरकारी पातळीवर संरक्षण सामुग्री खरेदी- विक्री आणि हस्तांतरण करण्यासाठी स्वाक्षरी केल्या आहेत. ह्या कराराचा अर्थ होतो की दोन्ही देश आता कोणत्याही अडथळ्याशिवाय एकमेकांशी संरक्षण करार करू शकणार आहेत. दोन्ही देश एकमेकांचे मित्र असून अतिशय अद्यावत तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यास दोन्ही देशांनी एकप्रकारे मान्यता दिली आहे. ह्या करारात असणाऱ्या अटी दोन्ही देशांनी सशर्त मान्य केल्या आहेत. हा करार झाल्या झाल्या फिलिपाईन्स चे संरक्षण सचिव डेल्फीन लोरेंझन ज्यांच्या समोर हा करार झाला त्यांनी अतिशय आनंदाने आणि अभिमानाने एक वक्तव्य केलं आहे. जे खूप सूचक आहे. ते म्हणाले, 

"आम्ही ब्राह्मोस खरेदी करत आहोत." 

ह्या वाक्यामागचा अर्थ असा होता की, आम्ही कोणाला घाबरत नाही. कोणाला न जुमानता आम्ही कोणत्याही परिस्थितीत आणि भारत सांगेल त्या किमतीला जगातील सगळ्यात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र 'ब्राह्मोस' खरेदी करणार आहोत. 

गेली काही वर्ष फिलिपाईन्स ब्राह्मोससाठी भारताच्या एक प्रकारे मागे लागलेला होता. साऊथ चायना सी मधील चीन च्या दादागिरीला उत्तर जर सरळ मार्गाने आणि शक्तीने देता येत नसेल तर वाकड्यातला मार्ग म्हणजे 'ब्राह्मोस' हे त्यांनी जाणलं होत. त्यामुळेच ब्राह्मोस च्या विक्रीसाठी गेली अनेक वर्ष ते प्रयत्न करत होते. भारत आणि रशिया ह्यांनी संयुक्तपणे निर्माण केलेल्या ब्राह्मोस च्या विक्रीसाठी रशिया ची परवानगी गरजेची आहे. भारत आणि रशिया ह्या दोन्ही देशांचे मित्र देश हे क्षेपणास्त्र विकत घेऊ शकणार आहेत. २ मार्च रोजी झालेल्या कराराने ब्राह्मोस कराराचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच भारत आणि फिलिपाईन्स ह्या विक्री कराराची घोषणा करतील. भारताने फिलिपाईन्स ला १०० मिलियन अमेरिकन डॉलर पेक्षा जास्ती क्रेडिट लाईन दिली आहे. ह्याचा अर्थ वस्तू आत्ता घ्या आणि पैसे हफ्त्याने द्या. फिलिपाईन्स सारखे छोटे देश खूप जास्ती पैसे एकाच क्षेपणास्त्रावर एका वर्षात खर्च करू शकत नाहीत. त्यामुळे भारताने आपल्या मित्र देशाची अडचण ओळखून त्यांना हे क्रेडिट दिलं आहे. पण ह्या एका निशाण्यात भारताने अनेक गोष्टींचा वेध घेतला आहे. हे छोटे देश अश्या करारामुळे भारताच्या छत्रछायेखाली आपोआप येणार आहेत. 'दुश्मन का दुश्मन दोस्त होता हैं' त्याप्रमाणे अश्या सर्व राष्टांची एकजूट चीन ला डोईजड होणार आहे. 

फिलिपाईन्स पाठोपाठ थायलंड, इजिप्त, सिंगापूर, साऊथ कोरिया, अल्जेरिया, ग्रीस, साऊथ आफ्रिका, बल्गेरिया, मलेशिया, ब्राझील, चिली सारखे अनेक देश ह्या क्षेपणास्त्रासाठी रांगेत उभे आहेत. अर्थात ह्या सगळ्यांना भारत क्षेपणास्त्र विकेल असं नाही. त्या शिवाय कोणत्या किमतीला विकायचं ह्याचा निर्णय ही भारत घेणार आहे. ब्राह्मोस च सध्याचं व्हर्जन आणि ब्राह्मोस च एन. जी. व्हर्जन ह्या दोघांसाठी हे सगळे देश उत्सुक आहेत. ध्वनीपेक्षा ३.५ पट स्वनातीत वेगाने जाणाऱ्या ब्राह्मोस ला रोखण्याची ताकद सध्या तरी जगातील कोणत्याच प्रणाली कडे नाही. त्याशिवाय ब्राह्मोस ची अचुकता सर्वोत्तम आहे. भारताने आत्तापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या चाचण्यांमधून आलेल्या निकषांमधून 'ब्राह्मोस' प्रणाली सर्वोत्तम असल्याच शिक्कामोर्तब झालं आहे. 

भारत सध्या ब्राह्मोस २ (के) (ह्यातील के हा भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांच्या स्मरणार्थ आहे.) हे हायपर सॉनिक क्षेपणास्त्र तयार करत असून तब्बल १००० किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा ९८०० किलोमीटर / तास (मॅक ८) ह्या वेगाने खात्मा करण्यास सक्षम असणार आहे. २०२५ पर्यंत मॅक ४ ते ५ आणि २०२८ पर्यंत मॅक ८ ते ९ वेगाने जाणार ब्राह्मोस तयार होणार आहे. भारताकडे तब्बल १४,००० पेक्षा जास्ती ब्राह्मोस क्षेपणास्त्र तयार असून कोणत्याही क्षणी शत्रूचा वेध घेण्यास ती सक्षम आहेत. ब्राह्मोस एरोस्पेस कडे सध्या १ बिलियन अमेरिकन डॉलर च्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या ऑर्डर आहेत. ह्याच्यापेक्षा जवळपास ३ पट ऑर्डर एकदा भारताने मित्र राष्ट्रांना ब्राह्मोस देण्यास सुरवात केल्यावर येणार आहेत. त्यामुळे प्रचंड प्रमाणात परकीय चलन भारताला मिळणार आहे. ह्या शिवाय एकेकाळी दुसऱ्या देशांकडून विकत घेणारा भारत आता दुसऱ्या देशांना क्षेपणास्त्र विकणार आहे. 

नुकतेच पाकिस्तानी राष्ट्रपती अरिफ अल्वी ह्यांनी उघडपणे आपले ब्राह्मोस २ मुळे धाबे दणाणल्याच कबूल केलं आहे. ९८०० किलोमीटर/ तास ह्या वेगाने भारतातून येणाऱ्या ब्राह्मोस २ च्या अवाक्यात संपूर्ण पाकिस्तान अवघ्या काही सेकंदात नष्ट करण्याची क्षमता आहे. उदाहरण द्यायचं झालं तर पंजाब पासून १०२ किलोमीटर वर असलेल्या लाहोर मध्ये असलेल्या लक्ष्याला ब्राह्मोस ०.६ सेकंदात नष्ट करू शकते (प्रत्यक्ष मॅक ८ वेग गाठायला वेळ लागला तरीसुद्धा २ ते ३ सेकंदात लाहोर पर्यंत जाण्यास ते सक्षम असेल.) म्हणजे पापणी उघडत नाही तोवर गेम ओव्हर. पाकड्याना दुवा करायला पण वेळ मिळणार नाही इतकं घातक ब्राह्मोस आहे. जमीन, हवा, पाणी, पाण्याखालून कुठूनही ते डागता येऊ शकल्याने पाकिस्तान सकट चीन सुद्धा दबावाखाली आहे. 

ब्राह्मोस सह भारताने तेजस, आर्टिलरी गन, ग्रेनेड, के ९ व्रज सारख्या तोफा, आकाश क्षेपणास्त्र सारखी १५२ प्रकारची वेगवेगळी संरक्षण सामुग्री विक्रीसाठी ठेवली आहे. २०२५ पर्यंत यातून जवळपास ५ बिलियन अमेरिकन डॉलर च परकीय चलन भारताला मिळणं अपेक्षित आहे. ह्या सगळ्यातून भारताची वाटचाल अतिशय वेगाने आत्मनिर्भरतेकडे होताना दिसत आहे. 

जय हिंद !!!

फोटो स्रोत :- गुगल (फोटोत भारताचे फिलिपाईन्स मधील राजदूत आणि फिलिपाईन्स च्या संरक्षण सचिवांचे अधिकारी कराराची देवाणघेवाण करताना)

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.    




No comments:

Post a Comment