आत्मनिर्भर भारत (एस.एफ़्.डी.आर. तंत्रज्ञान)... विनीत वर्तक ©
5 मार्च, 2021 रोजी डी.आर. डी.ओ. ने ओरिसाच्या Integrated Test Range (ITR) चांदीपूर इकडे एस.एफ़्.डी.आर. या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी केली. या चाचणीमुळे भारताने एका कठीण तंत्रज्ञानाला आपलंसं केलं आहे, त्याचसोबत आत्मनिर्भरतेकडे पाऊल पुढे टाकलं आहे. जगातील मोजक्या देशांकडे असणाऱ्या या तंत्रज्ञानाला भारताने रशियासोबत विकसित केलं आहे. तर नक्की काय आहे हे एस.एफ़्.डी.आर. तंत्रज्ञान, आणि ते आत्मसात केल्यामुळे जागतिक संदर्भ कसे बदलणार आहेत हे आपण जाणून घेतलं पाहिजे. एस.एफ़्.डी.आर. चं पूर्ण नाव Solid Fuel Ducted Ramjet technology असं आहे. नावातून अनेक गोष्टी समजून आल्या असतील. त्यातील सगळ्यात महत्वाचं म्हणजे रॅमजेट तंत्रज्ञान.
कोणत्याही क्षेपणास्त्राला जर हवेत गती द्यायची असेल तर महत्वाचा असतो, तो म्हणजे थ्रस्ट (जोर). शाळेत विज्ञानात आपण जो न्यूटनचा तिसरा नियम शिकलो, तो म्हणजे प्रत्येक क्रियेला एक प्रतिक्रिया असते आणि ती विरुद्ध असते. या नियमाला धरूनच कोणतंही क्षेपणास्त्र हवेतून उड्डाण करत असते. क्षेपणास्त्राच्या इंजिनात वेगाने इंधन जाळले जाते आणि ज्या वेगाने वायू त्यातून बाहेर पडतात त्यावर थ्रस्ट (जोर) अवलंबून असतो. त्या जोरावर क्षेपणास्त्र किती वेगाने पुढे जाणार हे अवलंबून असते. हा जोर निर्माण करण्यासाठी इंधनाचे प्रज्वलन नोझलमधून केले जाते. नोझलमुळे वेग वाढल्याने साहजिक थ्रस्ट वाढतो. पण इकडे एक लक्षात ठेवावे लागते, की इंधनाच्या प्रज्वलनाचा दाब हा बाहेर पडणाऱ्या गॅसपेक्षा अधिक असावा लागतो. आता हा दाब अधिक ठेवण्यासाठी सामान्य इंजिनात हवेला कंप्रेस केले जाते. कंप्रेस केल्यामुळे इंजिनाचा प्रज्वलन दाब हा अधिक रहातो.
सर्वसाधारण क्षेपणास्त्रात इंधनासोबत अजून एका गोष्टीची गरज लागते, ती म्हणजे ऑक्सिडायझर. सर्वसाधारण प्रज्वलनात 20% इंधन असते तर 80% ऑक्सिडायझर यांचे मिश्रण असते. याचा अर्थ इंधनासोबत ऑक्सिडायझरही बरोबर नेणे गरजेचे आहे. क्षेपणास्त्राचा बराचसा भाग या गोष्टींमध्ये व्यापून जातो. त्यामुळे दारुगोळा नेण्यासाठी खूप कमी जागा शिल्लक राहते. त्याशिवाय या इंधन आणि ऑक्सिडायझरचे वजन त्याच्या वेगाला नियंत्रित करते. आता समजा आपण अश्या पद्धतीचं तंत्रज्ञान विकसित केलं, ज्यात हवेतला ऑक्सिजन ऑक्सिडायझर म्हणून काम करेल आणि हवेचा वेग हा हवेत इतका दाब निर्माण करेल की हवेला कंप्रेस करण्याची गरज राहणार नाही. हे तंत्रज्ञान म्हणजेच रॅमजेट तंत्रज्ञान.
रॅमजेट तंत्रज्ञानामध्ये प्रथमतः क्षेपणास्त्राला सुपरसॉनिक वेग दिला जातो. इतक्या प्रचंड वेगात हवेतून जाताना आत येणारी हवाच ऑक्सिडायझरचं काम करून इंधनाचे प्रज्वलन करते. त्यामुळे अजून थ्रस्ट निर्माण होऊन क्षेपणास्त्र ध्वनीपेक्षा 4 ते 5 पट वेगाने हवेतून प्रवास करते. रॅमजेट तंत्रज्ञान एक विशिष्ट गती मिळाल्याशिवाय काम करू शकत नाही, त्यासाठी क्षेपणास्त्राला एक विशिष्ट गती म्हणजेच सुपरसॉनिक वेग देण्यासाठी बूस्टरची गरज लागते. याच बूस्टर आणि रॅमजेट तंत्रज्ञानाला एकत्र करून एस.एफ़्.डी.आर. असे म्हटले जाते.
हे तंत्रज्ञान जमिनीवरून हवेत आणि हवेतून हवेत डागता येणाऱ्या क्षेपणास्त्रात वापरले जाऊ शकते. राफेलवर असणाऱ्या मेटॉर क्षेपणास्त्रात याच तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. बी.व्ही.आर.एम. ( beyond-visual-range air-to-air missile) क्षेपणास्त्रात हे तंत्रज्ञान अतिशय उपयोगी पडते. मेटॉरच्या एका क्षेपणास्त्राची किंमत 2.3 मिलियन अमेरिकन डॉलर आहे. आत्तापर्यंत आपल्याला ते आयात करावे लागत होते, पण आता एस.एफ़्.डी.आर. तंत्रज्ञानामुळे अश्या पद्धतीचे क्षेपणास्त्र आपल्याला भारतात बनवता येणार आहे. भारताने विकसित केलेल्या अस्त्र क्षेपणास्त्राच्या एम.के. 3 व्हर्जनमध्ये याचा उपयोग केला जाणार आहे. हे क्षेपणास्त्र तब्बल 350 किलोमीटरवरील कोणतंही लक्ष्य 4.5 मॅक वेगाने भेदण्यास सक्षम असणार आहे. याची क्षमता मेटॉरपेक्षा जास्ती असणार आहे. त्यामुळेच युरोपातील अनेक देशांना भारताच्या यशस्वी चाचणीमुळे धक्का बसला आहे.
ज्या तंत्रज्ञानावर युरोपियन देश उड्या मारत होते, त्यापेक्षा चांगले तंत्रज्ञान भारताने विकसित केले आहे. कालच्या चाचणीमुळे भारताने आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने एक मोठा पल्ला पार केला आहे. या तंत्रज्ञानाच्या विकासात संलग्न असलेल्या सर्व वैज्ञानिक आणि अभियंत्यांचे शिवाय भारताला आत्मनिर्भर करणाऱ्या डी.आर.डी.ओ. चे विशेष अभिनंदन.
जय हिंद!!!
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment