Friday 5 March 2021

७ मिनिटांचा थरार... विनीत वर्तक ©

 ७ मिनिटांचा थरार... विनीत वर्तक ©

१८ फेब्रुवारी २०२१ रोजी नासाच्या पेर्सेव्हरन्स रोव्हर ने मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या लँडिंग केलं. नासा च्या ह्या कामगिरीची नोंद मानवाच्या तंत्रज्ञान प्रगती मधील एक महत्वाचा टप्पा म्हणून केली गेली. अनेकांनी हा क्षण 'याची देही याची डोळा' अनुभवला असेल. ह्या अतिशय कठीण मोहिमेचं नेतृत्व एका अमेरिकन - भारतीय संशोधिकेने केलं त्याचा काकणभर जास्त अभिमान भारतीयांना नक्कीच झाला असेल. २०१२ ला क्युरॅसिटी रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर उतरल्या नंतर वैज्ञानिक समूहाने नासाने मंगळावरील मातीचे नमुने अभ्यासासाठी पृथ्वीवर आणण्यासाठी नासाने एखादी मोहीम हाती घ्यावी असं सुचवलं. त्यानुसार नासाने पेर्सेव्हरन्स रोव्हर च्या मिशन घोषणा केली. २०१३ ला ह्या मिशन च्या टीम मध्ये भारतीय वंशाच्या डॉक्टर स्वाती मोहन ह्यांची निवड झाली. त्यांना नासाच्या मिशन मार्स २०२० मधे गायडन्स एन्ड कंट्रोल ऑपरेशन लीड ही जबाबदारी देण्यात आली. मंगळाचे वातावरण पृथ्वीच्या वातावरणापेक्षा खूप विरळ आहे. जवळपास १०० पट विरळ असणाऱ्या वातावरणातून एखादी गोष्ट अलगदपणे मंगळाच्या पृष्ठभागावर उतरवणे खूप कठीण आहे. म्हणूनच नासाने पेर्सेव्हरन्स रोव्हर च्या त्या प्रवासाला '७ मिनिटांचा थरार' असं नाव दिलं. 

आधी सांगितलं त्या प्रमाणे १०० पट विरळ असणाऱ्या वातावरणात १ टन (१००० किलोग्रॅम ) वजन असणार पेर्सेव्हरन्स रोव्हर अलगदपणे, सुरक्षितरित्या उतरवण्यासाठी अनेक गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं होत. मंगळावर त्यावेळी असणारी वातावरणाची स्थिती, धुळीची वादळ, रोव्हर ज्या ठिकाणी उतरणार त्या ठिकाणाचा अभ्यास त्या शिवाय ह्या सगळ्या गोष्टी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय करण्याचं प्रभूत्व पेर्सेव्हरन्स रोव्हरला देणं अतिशय गरजेचं होतं. त्याचसाठी गेली ८-९ वर्ष नासाचे अभियंते ह्या मिशनवर दिवस रात्र काम करत होते. १८ फेब्रुवारीला मंगळाच्या वातावरणात पेर्सेव्हरन्स रोव्हर ने हायपर सॉनिक वेगाने प्रवेश केला. जवळपास २०,००० किलोमीटर प्रति तास ह्या वेगाने ते मंगळाच्या पृष्ठभागाकडे झेपावले. इतक्या प्रचंड वेगाने वातावरणात प्रवेश करताना रोव्हर च्या खालच्या बाजूला वातावरणाच्या घर्षणामुळे प्रचंड उष्णता निर्माण झाली. काही क्षणात तपमान १३०० डिग्री सेल्सिअस वर गेलं. अर्थात नासा च्या अभियंतांना  याची कल्पना असल्याने त्यांनी रोव्हर च्या खालच्या बाजूस हिट शिल्ड बसवलेली होती. 


पेर्सेव्हरन्स रोव्हर ची हिट शिल्ड ही कार्बन फायबर च्या रेझीन मटेरियल ने बनवलेली होती ज्याला Phenolic Impregnated Carbon Ablator (PICA) असं म्हणतात. हे मटेरियल सुद्धा नासाच्या अभियंत्यांनी निर्माण केलेलं होतं. यानाच्या बाहेर १३०० डिग्री सेल्सिअस तपमान असताना सुद्धा पेर्सेव्हरन्स रोव्हर च्या आजूबाजूला तपमान सामान्य होतं. वातावरणात रोव्हर चा वेग साधारण १६०० किलोमीटर / तास कमी झाल्यावर आणि जमिनीपासून साधारण ११ किलोमीटर उंचीवर २१ मीटर व्यासाचे पॅराशूट उघडलं. इकडे एक लक्षात घ्यायला हवं की जेव्हा पॅराशूट उघडलं तेव्हा पेर्सेव्हरन्स रोव्हर चा वेग सुपरसॉनिक होता. इतक्या प्रचंड वेगात यानाचा वेग नियंत्रण करून तो कमी करण्याची जबाबदारी पॅराशूट वर होती. हे पॅराशूट बनवताना काहीतरी वेगळं करण्यासाठी नासाच्या इयान क्लार्क यांनी एक वेगळी कल्पना मांडली. पॅराशूट च्या आत एक सिक्रेट मेसेज त्यांनी कोड केला. जर का आपण यानाचा उतारतानाचा व्हिडीओ पाहिला तर त्यात लाल- पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या दिसतील त्यात बार कोड स्वरूपात एक मेसेज त्यांनी कोड केला. ज्यात लिहिलं होत, 

“DARE MIGHTY THINGS.” (पराक्रमी गोष्टी करण्याचा ध्यास धरा) 

पॅराशूट उघडल्या नंतर २० सेकंदांनी हिट शिल्ड पेर्सेव्हरन्स रोव्हर पासून विलग झाली. त्याचवेळेस पेर्सेव्हरन्स रोव्हरने मंगळाच्या वातावरणाचा पहिल्यांदा अनुभव घेतला. पेर्सेव्हरन्स रोव्हर योग्य ठिकाणी उतरण्यासाठी त्यात  "Terrain Relative Navigation" (TRN) हे तंत्रज्ञान वापरलं गेलं होतं. या तंत्रज्ञानात रोव्हर वरील कॅमेरे आणि कॉम्प्युटर यांनी मंगळाच्या पृष्ठभागाचा आढावा घेऊन त्या प्रमाणे रोव्हर कुठे उतरणार ह्याची निश्चिती केली. पॅराशूट ने यानाचा वेग अलगद उतरता येईल इतका कमी करता येणं शक्य नव्हतं. जेव्हा यानाचा वेग ३०० किलोमीटर / तास इतका झाला तेव्हा पॅराशूट यानापासून विलग झालं आणि साधारण २१०० मीटर उंचीवर पेर्सेव्हरन्स रोव्हर वरील जेट पॅक प्रज्वलित होऊन त्यांनी रोव्हर ला बाजूला केलं. विलग झालेलं पॅराशूट यानाच्या आंगावर पडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अश्या पद्धतीने रोव्हर त्याच्या रस्त्यातून बाजूला झालं.   

मंगळाच्या पृष्ठभागा पासून २० मीटर उंचीवर जेट पॅक पासून पेर्सेव्हरन्स रोव्हर विलग होऊन ज्याला 'स्काय क्रेन' म्हणतात त्याचा आधार घेऊन रोव्हर ने मंगळाच्या भूमीला स्पर्श केला. जेट पॅक २० मीटर उंचीवर हवेत तरंगत राहिलं आणि लोखंडी दोरखंडाने रोव्हर जमिनीवर साधारण १.२ किलोमीटर/ तास इतक्या हळुवारपणे उतरलं. रोव्हर च्या चाकांवर रोव्हर च वजन येताच कॉम्प्युटर ने दोरखंड रोव्हर पासून विलग केले. वर तरंगणारे जेट पॅक दोरखंडांसकट दुसरीकडे जाऊन मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं. 

पेर्सेव्हरन्स रोव्हरचा हा सगळा प्रवास अवघ्या ७ मिनिटांचा होता पण तो घडवण्यासाठी नासाच्या अभियंतांनी तब्बल ७ वर्ष खर्च केली होती. आता आपण विचार  शकतो की अवघ्या ७ मिनिटांच्या ह्या प्रवासात कितीतरी किचकट तांत्रिक घडामोडी घडल्या. त्या सगळ्याच्या सगळ्या योग्य क्षणी घडून येणं गरजेचं होतं. यातील  अनेक तंत्रज्ञान हे पहिल्यांदा वापरलं गेलं आहे. त्यामुळे ह्या ७ मिनिटांच्या थरारावर तब्बल २.५ बिलियन अमेरिकन डॉलर खर्चाची मोहीम अवलंबून होती. ह्या सगळ्याच सारथ्य करण्याचा बहुमान एका अमेरिकन भारतीय स्री ला मिळाला ही एक भारतीय म्हणून आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण वयाच्या ९ व्या वर्षी स्टार ट्रेक बघून अवकाशाचे स्वप्न बघणाऱ्या स्वाती ला अमेरिकेत ते पूर्ण करण्याचं पाठबळ मिळालं पण तेच भारतात मिळालं असत का? ह्या प्रश्नाचं उत्तर पण एक भारतीय म्हणून आपण शोधायला हवं. जर ह्याच उत्तर नाही असेल तर ते हो कसं होईल ह्यासाठी प्रयत्न केले जातील तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने डॉक्टर स्वाती मोहन यांचा भारतीय म्हणून गौरव करण्याच्या पात्रतेचे होऊ. 

फोटो स्रोत :- गुगल, नासा 

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.   



6 comments:

  1. विनीत जी, फारच छान माहितीपूर्ण लेख झाला आहे. त्या सोबत त्याचा प्रत्यक्ष चित्रफीत दुवा किंवा चित्रफीत खाली जोडल्यास छान होईल असे माझं मत आहे.

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर वर्णन असलेला लेख आहे, भारतीय शास्त्रज्ञांनी यातून नक्कीच बोध घेतला असेलच, पुढील आपली चांद्रयान मोहीम अशीच चांगली यशस्वी होईल यात शंकाच नाही.

    ReplyDelete
  3. खुप छान लेख!

    ReplyDelete