आठवणीतले कणगे... विनीत वर्तक ©
गणपतीच्या सुट्टीत किंवा कधी काळी मे महिन्यात गावाला जाणं व्हायचं. मुंबईला अगदी खेटून असलं तरी गावाचा बाज मात्र टिकून होता. आजोबांसोबत बैलगाडी चालवण्याचे धडे पहिल्यांदा तिकडेच मिळाले. वेसण धरायची कशी, ते बैलांना हाकायचं कसं? ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बालमनावर कोरल्या गेल्या त्या कायमच्या! या सुट्टीच्या दिवसात साहजिकच आम्ही सगळी भावंडं एकाचवेळी गावाला अनेकदा असायचो. मग काय, आमच्या सगळ्या चुलत भावंडांसाठी हक्काची जागा म्हणजे माळा. त्या माळ्यावर असणारे ते कणगे.
शेणाने सारवलेला तो लाकडाचा माळा आणि त्यात शेणाने सारवलेले ते कणगे म्हणजे आमची लपाछपीच्या खेळातली हमखास लपण्याची जागा. गावाला माझ्या वडिलांची आणि सगळ्याच काकांची भाताची शेती होती. प्रत्येकाचा स्वतःचा एक कणगा होता आणि त्यात प्रत्येकाच्या शेतात तयार झालेले तांदूळ भरून ठेवलेले असायचे. माळ्यावर असे ८ ते ९ कणगे होते. प्रत्येक कणग्याचा आपलाच एक बाज होता. त्याला येणारा एक प्रकारचा गंध हा पण तसाच. कदाचित तो सारवलेल्या शेणामुळे असेल किंवा त्याच्या बांबूमुळे पण त्या प्रत्येकाची विशिष्ट अशी खासियत होती.
त्याकाळी माझी आणि आम्हा सगळ्या भावंडांची उंची तशी बेताची, त्यामुळे या कणग्यात आत शिरणं म्हणजे एक दिव्य असायचं. मला अनेकदा त्यावेळेला प्रश्न पडायचा, की आतमध्ये तांदूळ भरलेत तर खरे, पण ते बाहेर काढणार कसे? एखादा लपवलेला दरवाजा या कणग्यांना आहे का, या शोधात माझ्या या सगळ्या कणग्यांना अनेकदा प्रदक्षिणा घालून झाल्या होत्या. पण माझ्या बालमनाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मात्र मला अजून मला मिळायचं आहे. तर या कणग्यात लपाछपीच्या खेळात लपण्यासाठी खूप कष्ट करावे लागत. एकतर आपल्यापेक्षा उंच असलेल्या त्या कणग्यात चढायचं, चढताना हातापायाला बांबूंच्या त्या पात्यांनी ओरखडे उठायचे आणि या सगळ्या सर्कशीत कणगा मात्र माझ्या वजनाच्या ओझ्याने आपलं अंग वाकवायचा ते वेगळंच.
आता मधे तर घुसलो, पण बाहेर कसं पडायचं हा दुसरा प्रश्न समोर असायचा. तांदळाच्या त्या राशीमध्ये स्वतःला गुंडाळून घेताना अंगाला खाज सुटायची पण खेळाच्या नादात लक्ष तिकडे जायचेच नाही. बाहेर पडण्याची धडपड ही आत घुसण्यापेक्षा केविलवाणी असायची. कधी उडी मारून, तर कधी कणग्याच्या भिंतींना वाकवून पण! या सगळ्या माळ्यावर चालणाऱ्या लढाईचे आवाज जेव्हा खाली जायचे तेव्हा त्यापेक्षा दुप्पट आवाजाच्या तोफा खालून आमच्या नावाने शिमगा करायच्या आणि आम्ही मात्र हसत हसत अजून जास्ती त्या कणग्यांची वाट लावायचो.
आज ती भात शेती पण थांबली आणि तांदुळाने भरलेले कणगे पण माळ्यावरून हद्दपार झाले. आता सारवलेल्या माळ्याची जागा रंगांनी घेतली आणि कणग्यांची जागा आता मोकळी आहे. आता कधीही गावच्या घरी गेलो की पुन्हा एकदा माळ्यावर जातो. आजही ते क्षण आठवतो आणि आजही तो गंध माझ्या श्वासात भरून घेतो.
फोटो स्त्रोत :- प्राची चुरी पाटील
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
विनीत जी भूतकाळात घेऊन गेला हा लेख, आमच्याकडे बाजरी व ज्वारी ने भरलेल्या असायच्या कणगे/कणगी
ReplyDelete