पाण्यातला हेर - आय.एन.एस.ध्रुव... विनीत वर्तक ©
छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला दाखवून दिलं होतं की एखाद्या राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी आयुधांसोबत हेरगिरी किती महत्वाची असते. आजच्या काळात इस्राईल सारखा देश संपूर्ण अरब राष्ट्रांना पुरून उरतो तो त्यांच्या हेरगिरी करण्यात जगात सर्वोत्तम मानल्या गेलेल्या 'मोसाद' या संस्थेमुळे. भारताने आधीच्या काळात अश्या महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होतं ज्याचे परिणाम आणि किंमत आपण प्रचंड प्रमाणात मोजली आहे. मात्र गेल्या काही वर्षात भारताने तांत्रिक प्रगतीच्या जोरावर पुन्हा एकदा 'स्पाय' म्हणजेच हेरगिरीकडे लक्ष द्यायला सुरवात केली आहे. हेरगिरी चा उपयोग फक्त शत्रूच्या गोटात काय चालू आहे समजण्यासाठी केला जातो असं नाही तर शत्रूची शस्त्रसज्जता बघून आपल्याला त्याप्रमाणे प्रतिकार करण्याची तयारी करता येते. आपण जमीन, आकाशातून आणि अवकाशातून ती क्षमता गेल्या काही वर्षात मिळवलेली आहे. पण पाणी असं एक क्षेत्र होत की जिकडे आजवर आपण थोडे मागे राहिलो होतो. तीच कमतरता भरून काढण्यासाठी एका संशोधन जहाजाचं काम २०१४ साली अतिशय गुप्तपणे सुरु केलं गेलं होतं.
पाण्यातला हेर निर्माण करण्याचं काम हे अतिशय गुप्तपणे करायचं होतं तसेच त्यासाठी लागणारं तंत्रज्ञान भारतात विकसित करायचं होतं. त्यामुळे ह्या कामाची धुरा सर्वस्वी पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याकडे होती. नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनाझेशन (NTRO) (ही भारताची तांत्रिक गुप्तचर संस्था असून रॉ, इंटीलिजन्स ब्युरो अश्या भारताच्या गुप्तचर संस्थांप्रमाणे काम करते. या संस्थेची सगळी धुरा ही पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याकडे असते. भारताची तांत्रिक बाबतीत हेरगिरी करणारी ही सगळ्यात महत्वाची संस्था आहे.), डी.आर.डी.ओ., भारतीय नौदल, हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड अश्या सर्व संस्थांना एकत्र करून पाण्यातला हेर अतिशय गुप्तपणे निर्माण करण्याची जबाबदारी देण्यात आली. ३० जून २०१४ साली जहाज बांधणीला सुरवात झाली. ऑक्टोबर २०२० मध्ये सर्व चाचण्या पूर्ण करून आय.एन.एस. ध्रुव म्हणजेच VC 11184 ला भारतीय नौदलाकडे गुपचूप सुपूर्द करण्यात आलेलं आहे.
आय.एन.एस. ध्रुव हे १५,००० टन वजन विस्थापित करणार जहाज असून १७५ मीटर लांब आणि २२ मिटर रुंद आहे. यात ९००० किलोवॅट शक्तीची २ कोडॅक इंजिन असून प्रत्येक इंजिन तब्बल १२,००० हॉर्स पॉवर निर्माण करते. पाण्यातून हे जहाज ३९ किलोमीटर/ तास वेगाने जाण्यास सक्षम असून यावर एक हेलिकॉप्टर आणि हेलिपॅड आहे. तसेच ३०० जणांचा क्रू यावर काम करू शकतो. आधी सांगितलं तसं या जहाजाचा मुख्य उद्देश समुद्रात हेरगिरी तसेच भारताच्या भूमीवर येणाऱ्या कोणत्याही क्षेपणास्त्र मग ते सुपर सॉनिक असो वा इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईल किंवा multiple independently targetable reentry vehicle (MIRV) असो अश्या सगळ्या संकटांची सूचना भारताच्या सुरक्षा यंत्रणांना अद्यावत पुरवणे हा आहे. भारताच्या दिशेने येणाऱ्या कोणत्याही (nuclear missile) आण्विक क्षेपणास्त्राचा शोध घेण्याची क्षमता या जहाजाकडे आहे.
भारताकडे वाईट नजरेने बघणाऱ्या किंवा भारतावर चाल करून येणाऱ्या क्षेपणास्त्राचा वेध घेण्यासाठी यावर दोन प्रकारची रडार यंत्रणा बसवण्यात आली आहे. एक आहे एक्स बँड आणि दुसरं आहे ए.इ.एस.ए. म्हणजेच (S-Band active electronically scanned array (AESA) रडार. एक रडार एक्स बँड मधे काम करते तर दुसरं एस बँड मधे (सोप्प समजायचं असेल तर रेडिओ वर असणाऱ्या ए.एम.आणि एफ.एम. बँड प्रमाणे) यातील एस बँड चा उपयोग हा मोठ्या क्षेत्रातील आकाशाचा वेध घेण्यासाठी होतो. या क्षेत्रात उडत असलेल्या कोणत्याही क्षेपणास्त्राचा वेध घेऊन त्याच लक्ष्य कोणतं आहे याच आकलन केलं जाते. तर त्याचवेळी एक्स बँड हे हुडकून काढण्यात अतिशय कठीण असलेल्या वस्तूंचा शोध घेते. ज्यात अगदी उपग्रहापासून, MIRV, इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईल, आण्विक क्षेपणास्त्र यांचा समावेश होतो. या शिवाय अजून काही प्रगत यंत्रणा यावर बसवल्या गेल्या आहेत ज्या क्लासिफाईड आहेत.
आण्विक क्षेपणास्त्रांचा वेध घेणारी यंत्रणा स्वबळावर निर्माण करणारा भारत जगातील पाचवा देश आहे. अमेरिका, फ्रांस, रशिया आणि चीन नंतर अश्या पद्धतीचं जहाज आता भारताने विकसित केलं आहे. हे जहाज बांधताना शत्रूच्या नजरेत न येण्यासाठी सुक्या गोदीत याची निर्मिती केली गेली आहे, आय.एन.एस.ध्रुव चा उपयोग भारताच्या भविष्यातील क्षेपणास्त्र चाचण्यांसाठी पण केला जाणार आहे. या जहाजावर भारतीय नौदलासह, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनाझेशन, डी.आर.डी.ओ. चे वैज्ञानिक आणि संशोधक ही असणार आहेत. त्यामुळे आय.एन.एस.ध्रुव च्या सामाविष्ट होण्याने देशाच्या सुरक्षितेत खूप मोठी वाढ होणार आहे. भारत अश्या पद्धतीच्या दुसऱ्या जहाजाची निर्मिती आणि विकास गुप्तपणे करत असल्याची ही बातमी आहे.
तळटीप :- वर लिहलेली सर्व माहिती पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहे. लेखामध्ये कोणतीही गोपनीय माहिती उघड केलेली नाही.
जय हिंद!!!
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment