Monday 26 April 2021

एका 'ॐ' ची गोष्ट... विनीत वर्तक ©

 एका 'ॐ' ची गोष्ट... विनीत वर्तक ©

'ॐ' ह्या शब्दाला हिंदू धर्मात खूप महत्वाचं स्थान आहे हे आपल्यापैकी सगळ्यांना माहीत आहे. पण ते का? आणि त्या अक्षरातील प्रत्येक वळणाचं महत्व आहे, याबद्दल अनेकांना काहीच माहिती नाही. तसेच जपमाळेतील असलेले १०८ मणी किंवा १०८ वेळा 'ॐ' या शब्दाचा जप नक्की का करायचा, हे पण अनेकांना माहीत नसते. तर 'ॐ' या शब्दामध्ये उच्चार करताना तीन शब्दांचा भास होतो, ती तीन अक्षरे म्हणजे अ, उ आणि म. यातील 'अ' म्हणजे निर्मिती(सृष्टी), 'उ' म्हणजे प्रकटीकरण (चालू स्थिती), 'म' म्हणजे नाश(लय). जेव्हा आपण 'ॐ' चा उच्चार करतो, तेव्हा आपण विश्वातील तिन्ही स्थितींना एका शब्दात मांडतो. मानवी स्वरूपाशी याचं साधर्म्य म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचं एक स्वरूप म्हणजे 'ॐ'. 'ॐ' हे अक्षर ज्या पद्धतीने लिहीले जाते त्यालाही अर्थ आहेत. ह्यातील प्रत्येक वळण हे जाणिवेशी निगडीत आहे. खालचे डावीकडे जाणारे वळण म्हणजे आपली जागृतावस्थेतली जाणीव, वरून डावीकडे जाणारे वळण म्हणजे आपली सुप्तावस्थेतली (अचेतन अवस्थेतील) जाणीव, उजवीकडे जाणारे वळण म्हणजे अर्धजागृतावस्था (स्वप्नवत अवस्था) ज्यात आपण जागेपणाच्या आणि अचेतन होण्याच्यामध्ये असतो. वर असलेले अर्धचंद्र म्हणजे माया, भ्रामक कल्पना आणि त्यावर असणारे टिंब म्हणजे परिपूर्ण आनंद. तर अश्या सगळ्या जाणिवाना जोडून या अक्षराची निर्मिती झाली आहे. 'ॐ' या अक्षराचा उच्चार १०८ वेळा केला जावा असा संकेत आहे. तर या १०८ आकड्यामागे काय महत्व आहे, ते मी या आधीच्या लेखात लिहिलं होतं, ते इकडे देतो आहे. १०८ या आकड्याचा संबंध आपल्याशी निगडित असणाऱ्या पृथ्वी, चंद्र, सूर्य यांच्याशी आहे. पृथ्वीच्या व्यासाच्या १०८ पट सूर्याचा व्यास आहे, तर सूर्य आणि पृथ्वी ह्यामधील अंतर १०८ पट सूर्याच्या व्यासाइतके आहे. चंद्र आणि पृथ्वी ह्यामधील सरासरी अंतर हे चंद्राच्या व्यासाच्या १०८ पट आहे.(मी गणित करून बघितलं, तर सूर्याचा व्यास आहे १३,९१,००० किमी. ह्याला १०८ ने भागल्यास उत्तर येते १२,८७९ किमी. पृथ्वीचा व्यास आहे १२,७४२ किमी. सूर्य आणि पृथ्वी ह्यातील अंतर आहे १४९.६ मिलियन किलोमीटर. जर सूर्याच्या व्यासाला १०८ ने गुणले तर उत्तर येते १५० मिलियन किलोमीटर. चंद्राचा व्यास आहे ३४७४ किमी. त्याला १०८ ने गुणल्यास उत्तर येते ३ लाख ७६ हजार किलोमीटर. प्रत्यक्षात चंद्र आणि पृथ्वी ह्यामधील सरासरी अंतर आहे ३ लाख ८४ हजार किलोमीटर) ह्याशिवाय हिंदू धर्मात १०८ पुराणे आहेत तर १०८ उपनिषदे आहेत. संस्कृत भाषेत ५४ अक्षरे असून ती शिव आणि शक्ती रुपात लिहीता येतात. 'ॐ' हे अक्षर संपूर्ण विश्वाचं प्रतिनिधित्व करते, म्हणून संस्कृतमध्ये प्रत्येक श्लोक म्हणण्यापूर्वी त्याचा उच्चार केला जातो. तसेच हिंदू धर्माप्रमाणे सगळ्यात शक्तिशाली असणाऱ्या आणि विश्वाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या शंकरापुढे 'ॐ' हे लिहीले जाते. याच 'ॐ' च्या शक्तीचे प्रतिनिधित्व करणारे एक मंदिर राजस्थान मधील पाली जिल्ह्यात आकाराला येत आहे. २५० एकरात हे मंदिर वसलेलं आहे. शंकराला केंद्रस्थानी ठेवून या मंदिराचं निर्माण केलं गेलं आहे. ह्यात शंकराच्या १००८ वेगवेगळ्या स्वरूपातील मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. ह्यात १०८ खोल्या असून 'ॐ' या अक्षरातील बिंदू दर्शवण्यासाठी टॉवर उभारला जाणार आहे, ज्याची उंची १०८ फूट आहे. यात १२ देवळे बांधण्यात येणार आहेत. १९९३ पासून या मंदिराची निर्मिती केली जात असून आत्तापर्यंत त्याचे ९५% काम पूर्ण झालेले आहे. २०२१-२२ पर्यंत हे मंदिर सर्वांसाठी खुले केले जाणार आहे. मंदिर बांधणे किंवा त्यावर विश्वास ठेवणे आणि त्यातल्या प्रतिमांचे पूजन हा प्रत्येकाच्या आस्थेचा विषय आहे. ज्याची श्रद्धा आहे त्याने ते करावं, ज्याची नाही त्याने सोडून द्यावं. पण 'ॐ' या शब्दात असलेली शक्ती विज्ञानातही सिद्ध झालेली आहे. त्यातील काही फायदे इकडे देत आहे. Helps to Improve Concentration. Reduces Stress and Anxiety. Rejuvenating & Pacifying. Gives Strength to Spinal Cord. Detoxifies Body. Improves Functioning of Heart & Digestive System. Ensures Sound Sleep. Makes You Emotionally Stable. हिंदू धर्मासोबत जैन, शीख, बौद्ध या सगळ्या धर्मांतसुद्धा 'ॐ' ला सर्वोच्च स्थान दिलं गेलं आहे. योगासनात 'ॐ' चा उच्चार श्वास आणि शरीर आणि मनाच्या नियंत्रणासाठी केला गेला आहे. त्यामुळे या शब्दाला एक वेगळं वलय आहे. ज्याला पटेल त्या प्रत्येकाने याचा उच्चार केला तर नक्कीच काही चांगले बदल घडतील. फोटो स्त्रोत :- गुगल सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




1 comment:

  1. AUM - cha thoDasa artha gaNpati Atharvashirshaat aahe - 'A': akaar : brahms - U:ukaar : Vishnu - M: makaar : Mahesh.
    Like you mentioned utpatti, chalu sthiti anI lay

    ReplyDelete