एका इंजेक्शन ची गोष्ट... विनीत वर्तक ©
२०२० वर्षाने संपूर्ण जगाचे संदर्भच बदलवून टाकले. एकीकडे लॉकडाऊन, कोरोना विषाणू चा कहर यामुळे जिकडे उद्योगधंद्यांच कंबरड मोडलं तिकडे दुसरीकडे काही उद्योगांनी कात टाकली. स्वतःच्या वैद्यकीय अवस्थेबद्दल जागरूक नसलेले देश खडबडून जागे झाले. यात सगळ्यात अग्रक्रम लागतो तो भारताचा. भारतात वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अनेक उद्योगांनी कात टाकली. या विषाणूचा फैलाव जसा जगभर झाला तसं जगातील सर्व देशांना या उद्योगांकडून भरीव योगदानाची गरज भासू लागली. आता प्रश्न पैश्याचा नव्हता तर पुरवठ्याचा होता. इतके वर्ष संपूर्ण जगाला गपचूप निरोगी करणारे भारतीय उद्योग ज्यांची कल्पना भारतीयांना नव्हती अचानक त्यांचा उदय जागतिक पटलावर झाला. यातील एक नाव म्हणजे एच.एम.डी. हिंदुस्थान सिरींज एन्ड मेडिकल डिव्हाइसेस. ( Hindustan Syringes & Medical Devices (HMD).
एच.एम.डी. ची स्थापना २ ऑगस्ट १९५७ मधे नरेंदर नाथ यांनी केली. ते एक केमिस्ट होते. या क्षेत्रात काम करताना त्यांच्या चाणाक्ष नजरेला इंजेक्शन, सुया आणि इतर वैद्यकीय सामानाच्या बाबतीत भारतात खूप मोठी पोकळी जाणवली. त्याकाळी भारतात ही सगळी उत्पादन विदेशातून आयात केली जात होती. भारताला या बाबतीत स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी तसेच एका नव्या उद्योगात भारताचा तिरंगा रोवण्यासाठी त्यांनी एच.एम.डी. ची स्थापना केली. आपल्या ६५ वर्षाच्या इतिहासात ही कंपनी एका घराण्या पुरती मर्यादित राहिलेली आहे. नरेंदर नाथ नंतर त्यांच्या मुलाने म्हणजेच आजचे मॅनेजिंग डायरेक्टर राजीव नाथ यांनी कंपनीला एका वेगळ्या स्तरावर नेलं.
२०२० साल उजाडलं आणि कोरोनाचा वणवा संपूर्ण जगात पेटला. कोरोनावर अनेक कंपन्यांनी संशोधन करून लसीची निर्मिती केली. एका अंदाजाप्रमाणे जगात १० बिलियन लस जगातील संपूर्ण लोकसंख्येला कोरोनमुक्त करण्यासाठी लागणार आहेत पण ती लस माणसाच्या शरीरात टोचण्यासाठी लागणार इंजेक्शन कुठून आणणार? भारताच्या सिरम इन्स्टिट्यूट कडे आज संपूर्ण जगाच लक्ष लसीसाठी लागलं आहे. त्याचवेळी संपूर्ण जग इंजेक्शनसाठी पुन्हा एकदा भारताकडे आशेने बघत आहे. आशियातील सगळ्यात जास्ती इंजेक्शन बनवणारी कंपनी म्हणजेच एच.एम.डी. आज नरेंदर नाथ यांनी लावलेल्या छोट्या रोपट्याचा कल्पवृक्ष झाला आहे. फरिदाबाद इथल्या कंपनीच्या फॅक्टरी मधे मिनिटाला तब्बल ६२५० पेक्षा जास्ती इंजेक्शन बनवली जात आहेत. या वेगाने तब्बल ३ लाख ७५ हजार इंजेक्शन प्रत्येक तासाला तयार होत आहेत. जुलै २०२१ पर्यंत कंपनी प्रत्येक वर्षाला तब्बल ३ बिलियन इंजेक्शन बनवण्याची क्षमता निर्माण करेल.
आज एच.एम.डी. भारत सरकारला सप्टेंबर २०२१ पर्यंत ४४० मिलियन इंजेक्शन कोरोना लसी भारतीयांना देण्यासाठी पुरवत आहे. यातील १७७ मिलियन इंजेक्शन एकट्या एप्रिल महिन्यात भारत सरकारला कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की या प्रत्येक इंजेक्शन ची किंमत अवघी २ रुपये असणार आहे. भारतीयांसाठी अतिशय कमी किमतीत आणि जातीत जास्त पुरवढा करण्याचं कंपनीने ठरवलं आहे. या सोबत एच,एम.डी. २४० मिलियन कोजॅक इंजेक्शन कोवॅक्स मार्फत युनिसेफ ला देणार आहे. ७९ मिलियन इंजेक्शन ब्राझील या देशाला देणार आहे. १५ मिलियन इंजेक्शन जपान ला देणार आहे. याशिवाय तब्बल १२० देशांना इंजेक्शन देण्याच्या ऑर्डर एच,एम.डी.ला मिळालेल्या आहेत. हे फक्त कोरोना साठी झालं ह्याशिवाय इतर लसी आणि औषध देण्यासाठी अनेक प्रायव्हेट हॉस्पिटल आणि संस्था यांच्या ऑर्डर ही एच,एम.डी. वेळेत पूर्ण करणार आहे.
हे आकडे डोळे विस्फारणारे आहेत. जगाच्या पाठीवर एका भारतीय उद्योगाने विश्वासाने, सचोटीने आणि सर्वसामान्यांना परवडेल अश्या किमतीत इंजेक्शन उपलब्ध करून भारताची शान आज वाढवली तर आहेच पण त्याही पलीकडे एका नव्या आत्मनिर्भर भारताच्या उदयाची नांदी जगाच्या पाठीवर केली आहे. एकेकाळी जिकडे भारत या क्षेत्रात काही बनवू शकेल का अशी शंका होती तिकडे आज भारत नेतृत्व करत आहे. राजीव नाथ यांच्या दूरदृष्टी आणि अथक परिश्रम यामुळेच आज एच,एम.डी. या पातळीवर पोहचली आहे.
“India is our priority and comes first but we do have to honor our global commitments and play a balancing role. So, for now, we are allocating two-thirds capacity of KOJAK AD syringes to the government and one-third to our regular global UN clients. We are happy to complement Vaccines Diplomacy with Syringes Diplomacy and raise the Brand India flag in over 120 countries worldwide.”
Rajiv Nath.
मार्च २०२० मधे एच.एम.डी. ची क्षमता ८०० मिलियन कोजॅक इंजेक्शन बनवण्याची होती. भविष्यात काय होणार आहे याचा विचार करून राजीव नाथ यांनी कंपनीची क्षमता वाढवण्यासाठी १०० कोटीची गुंतवणूक केली. ज्यात इंजेक्शन बनवणाऱ्या मशीन, लोक, तंत्रज्ञान यांचा समावेश होता. त्याच दूरदृष्टीमुळे आज एच.एम.डी. जवळपास १.२ बिलियन कोजॅक इंजेक्शन वर्षाला बनवण्याच्या वेगाने काम करून अनेकांचे प्राण वाचवत आहे.
एका छोट्या उद्योगातून भारताचा तिरंगा अटकेपार नेणारे राजीव नाथ आणि संपूर्ण एच.एम.डी. ला माझा नमस्कार. तुमच्या पुढल्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
जय हिंद!!!
फोटो स्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment