Thursday 22 April 2021

एका हेलिकॉप्टर च उड्डाण... विनीत वर्तक ©

 एका हेलिकॉप्टर च उड्डाण... विनीत वर्तक ©

१९ एप्रिल २०२१ रोजी एका हेलिकॉप्टर ने एक उड्डाण केलं आणि मानवाच्या तांत्रिक प्रगतीने अजून एक मैलाचा दगड गाठला. कारण त्या दिवशी केलेलं उड्डाण हे पृथ्वीवर केलेलं उड्डाण नव्हतं तर पृथ्वीपासून लांब असणाऱ्या मंगळ ग्रहाच्या जमिनीवरून केलेलं उड्डाण होतं. नासाच्या मिशन मार्स २०२० या मोहिमेचा भाग असलेल्या इंजेनुइटी हेलिकॉप्टर ने मंगळाच्या पृष्ठभागावरून यशस्वी उड्डाण केलं आहे. १८ फेब्रुवारी २०२१ ला नासाच पेर्सेव्हरन्स रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरलं. याच रोव्हर च्या खालच्या भागात इंजेनुइटी हेलिकॉप्टर बसवलेलं होतं. ६० दिवस रोव्हर सोबत राहिल्यानंतर ३ एप्रिल २०२१ ला  इंजेनुइटी हेलिकॉप्टर ला मंगळाच्या पृष्ठभागावर उतरवण्यात आलं. त्याला उतरवल्या नंतर रोव्हर त्याला मागे सोडून १०० मिटर सुरक्षित अंतरावर गेल्यावर तो क्षण समीप आला ज्याची जगातील वैज्ञानिक आणि अभियंते वाट बघत होते. 

१९ एप्रिल २०२१ ला  इंजेनुइटी हेलिकॉप्टर ने मंगळाच्या वातावरणात उड्डाण केलं. जमिनीपासून ३ मीटर उंचीवर त्याने ३० सेकंद हॉवर केलं. (हॉवर म्हणजे जागी उड्डाण करत राहणं ). त्या नंतर पुन्हा ते मंगळाच्या पृष्ठभागावर सुखरूप उतरलं. २२ एप्रिल २०२१ ला पुन्हा एकदा  इंजेनुइटी हेलिकॉप्टर ने मंगळाच्या वातावरणात उड्डाण केलं आणि या वेळेस त्याने १६ फूट उंची गाठली. त्यानंतर ५ डिग्री एका बाजूला ते झुकलं आणि ७ फूट अंतर गाठलं. आपल्यावर असणाऱ्या रंगीत कॅमेराला चालू करून मंगळाच्या त्या विराण पृष्ठभागावर नजर टाकली. पुन्हा आपल्या मूळ जागेवर ते उतरलं. आपलं महत्वाचं मिशन सुरु करण्याआधी अश्या पाच चाचण्या  इंजेनुइटी हेलिकॉप्टरच्या होणार आहेत. त्या यशस्वी झाल्यावर  इंजेनुइटी हेलिकॉप्टर मंगळाच्या कधी काळी अस्तित्वात असलेल्या जीवनाच्या खुणा शोधण्यासाठी डेल्टा नदीच्या पात्रात उड्डाण भरेल. 

वाचायला हे सोप्प वाटलं तरी मंगळाच्या पृष्ठभागावर अश्या पद्धतीने हेलिकॉप्टर उडवणं हे अतिशय कठीण आहे. मंगळाच  वातावरण विरळ आहे. पृथ्वीपेक्षा मंगळवार १/१०० इतकी हवा आहे. त्यामुळे उड्डाणासाठी लागणार बल निर्माण करायला हेलिकॉप्टर च्या पात्यांचा वेग खूप जास्ती आणि त्याचवेळी हेलिकॉप्टर च वजन हे कमीत कमी असणं गरजेचं होतं. त्यात ह्यातल्या सगळ्या यंत्रणा या स्वयंचलित असणं गरजेचं होत. नासाने अश्या पद्धतीचं उच्च तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी तब्बल ८५ मिलियन अमेरीकन डॉलर मोजलेले आहेत. ज्यातील ८० मिलियन हे हेलिकॉप्टर च्या निर्मितीसाठी आणि ५ मिलियन हे उड्डाणासाठी मोजलेले आहेत.  इंजेनुइटी हेलिकॉप्टर ची पाती प्रत्येक मिनिटाला २४०० वेळा गोल फिरून त्याला उड्डाणासाठी लागणारं बल निर्माण करतात. (हे बल म्हणजे पृथ्वीवर ३०,००० मीटर उंचीवर उड्डाण भरण्यासाठी हेलिकॉप्टर ला सक्षम करणं जे आज जगातील कोणतंही हेलिकॉप्टर निर्माण करू शकत नाही.) यावरील कॉम्प्युटर याच्या उड्डाणाच्या सगळ्या यंत्रणा नियंत्रित करतो.याच संपूर्ण वजन अवघे १.८ किलोग्रॅम आहे. हे हेलिकॉप्टर ५० मीटर उंची पर्यंत उड्डाण भरण्यास सक्षम असून आपल्या रेडिओ केंद्रापासून १००० मीटर अंतरा पर्यंत उड्डाण भरू शकते. 

नासाचे हे उड्डाण अनेक अर्थाने महत्वाचं ठरलं आहे. आत्तापर्यंत मानवाच्या संशोधनाच्या मर्यादा या एखाद्या परग्रहावर रोव्हर पाठवून त्याच्या पृष्ठभागाचे  संशोधन आणि तिथल्या दगड मातीच संशोधन करण्यापर्यंत मर्यादित होत्या पण आता या संशोधनासाठी अजून एक मार्ग शक्य झाला आहे. रोव्हर च्या वेगामुळे त्याची मर्यादा ही काही क्षेत्रापर्यंत मर्यादित होती पण इंजेनुइटी सारख्या हेलिकॉप्टरच्या तंत्रज्ञान निर्मितीने वातावरणातून ग्रहाचा अभ्यास करण्याचा मार्ग खुला झाला आहे.  इंजेनुइटी हेलिकॉप्टर च्या पुढल्या ३ चाचण्या २६ एप्रिल, २९ एप्रिल आणि २ मे रोजी प्रस्तावित आहेत. या चाचण्यांना आपण घर बसल्या थेट मंगळावरून बघू शकतो. नासाने ती यंत्रणा सगळ्यांसाठी उपलब्ध केली आहे. मानवाच्या या एका अदभूत क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी न गमावता आपण त्याचा आनंद या लॉकडाऊन च्या काळात नक्कीच घ्यायला हवा. 

इंजेनुइटी हेलिकॉप्टर च्या निर्मितीमागे असणाऱ्या अभियंते आणि वैज्ञानिक यांच अभिनंदन आणि  इंजेनुइटी हेलिकॉप्टर च्या पुढल्या प्रवासासाठी शुभेच्छा. 

फोटो स्रोत :- गुगल     

 सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 





No comments:

Post a Comment