संकटातील मित्र... विनीत वर्तक ©
भारतात सध्या कोरोनारूपी त्सुनामी सुरु आहे. या त्सुनामी चा कहर अजून कमी झालेला नाही. अश्या कठीण परिस्थितीत भारताचे मित्र मदतीला उभे राहिले आहेत. त्याचवेळी आपल्या वंशाच्या म्हणून ज्यांची अनिवासी भारतीयांकडून वोट मिळवण्याकरिता प्रसिद्धी झाली त्यांनी आणि त्यांच्या सरकारने अश्या काळात भारताकडे पाठ फिरवून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. तात्या ट्रम्प यांच्या विरोधात उभे राहून भारतीय असल्याचा ढोल पिटणाऱ्या कमला हॅरिस आणि त्यांच्या सरकारने भारतासाठी सद्यस्थितीमधे अतिशय महत्वाच्या असणाऱ्या कोरोना लसीच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्चा मालाचा पुरवठा थांबवला आहे. जेव्हा अमेरिकेकडे त्यांच्या लोकसंख्येच्या तिप्पट लसी उपलब्ध असताना आठमुठे पणाचे धोरण सो कॉल्ड भारतीय वंशाच्या उपराष्ट्रपतीनी अंगिकारले आहे. भारत कधीच दुसऱ्या देशांच्या मदतीवर अवलंबून नव्हता पण संकटाच्या काळात भारतीय वंशज म्हणून निवडून येणाऱ्या आणि टांग देणाऱ्या या लोकांना भारतीय विसरणार नाहीत हे त्यांनी पण संपूर्ण लक्षात ठेवावं. त्यांची हुजरेगिरी भारतात करणाऱ्या लोकांचे डोळे निदान आतातरी उघडले असतील ही अपेक्षा आहे.
अमेरिकेच्या या पावलांची चाहूल आधीच लागल्याने भारत सरकारने भारतात लस बनवणाऱ्या दोन्ही कंपन्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांना पायाभूत सुविधा म्हणजेच कच्चा माल भारतात तयार करण्यासाठी गेल्या आठवड्यात तब्बल ४५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ज्यायोगे अमेरिकेच्या मदतीची कोणतीही गरज लागणार नाही. पण अश्या बेभरवशाच्या मित्रांसोबत भारताने जगात केलेल्या व्हॅक्सिन मैत्री ला जागून अनेक भरवशाचे मित्र मदतीला आले आहेत.
सिंगापूर ने ऑक्सिजन वाहून नेणारे टँकर उपलब्ध केले असून भारतीय वायू दलाच्या सी १७ विमानाने भारतात आणण्यात आले आहेत. भारतासोबत आम्ही या काळात खांद्याला खांदा लावून सोबत असल्याचं सिंगापूर एम्बसी ने ट्विट केलं आहे.
“We stand with India in its fight against Covid-19,” Singapore’s Embassy
सौदी अरेबिया ने तातडीने ८० मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध केला असून तो लवकरच भारतात आणण्यात येईल. जर्मनी ने २३ मोबाईल ऑक्सिजन प्लांट भारताला दिले असून ह्यातील प्रत्येक प्लांट २४०० लिटर ऑक्सिजन प्रत्येक तासाला उपलब्ध करून देण्यास सक्षम आहे. ज्यातून २०-२५ रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जाऊ शकतो. ह्याशिवाय लसी च्या निर्मितीसाठी लागणार सहाय्य देण्याचं स्पष्ट केलं आहे.
“We will continue working with German partners to resolve supply chain bottlenecks faced by companies manufacturing Covid vaccine and medicines. India’s uninterrupted vaccine production capacity is central to the success of global vaccination efforts and global economic recovery,”
German Embassy
त्याच सोबत भारताचा मित्र फ्रांस सगळ्या आघाड्यांवर भारता सोबत असल्याचं फ्रांस राष्ट्रपती नी स्पष्ट केलं आहे.
"I want to send a message of solidarity to the Indian people, facing a resurgence of COVID-19 cases. France is with you in this struggle, which spares no-one. We stand ready to provide our support,"
French President Emmanuel Macron
भारताचा सगळ्यात भरवश्याचा मित्र रशियाने सुद्धा सर्वोतोपरी मदत करण्याचं स्पष्ट केलं आहे. या सोबत युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम यांनी सुद्धा भारताला सर्वोतोपरी मदत करण्याचं स्पष्ट केलं आहे. यासोबत अनेक छोट्या राष्ट्रांनी भारताला त्यांच्या कुवतीप्रमाणे मदत देण्याचं स्पष्ट केलं आहे.
भारताच्या या मित्रांसोबत भारताच्या शत्रूंनी मदत करण्याची तयारी दाखवली आहे. चीन आणि पाकिस्तान दोन्ही राष्ट्रांनी भारताला कोरोना विरुद्ध च्या लढ्यात मदत करण्याचं स्पष्ट केलं आहे. पाकिस्तान मधील ऐदी फाउंडेशन च्या फैझल ऐदी यांनी भारताच्या पंतप्रधानांना पत्र लिहून ५० एम्बुलन्स ची मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारत ही मदत घेईल का नाही हा मुद्दा नंतरचा आहे. पण निदान मदत करण्याची दानत नक्कीच दिलासा देणारी आहे.
जिकडे भारताचे शत्रू भारताच्या मदतीसाठी उभे राहतात तिकडे भारतीय वंशंज म्हणून ढोल पिटणारी व्यक्ती भारताची मदत थांबवते हे कुठेतरी बोचणारे आहे. प्रश्न हा नाही की भारताला गरज आहे की नाही पण ज्या पद्धतीने अमेरिका मधील आत्ताच सरकार वागते आहे त्यांची दानत स्पष्ट करणारे आहे. आता सर्व कडून असंतोषाचा वणवा पेटल्यावर काही ट्विट केले जातील पण म्हणतात न, "बंद से जाती हैं वो हौद से नही आती". त्यामुळे आता अमेरिकेकडून झालेल्या आणि होणाऱ्या मलमपट्टीचा फायदा काहीच होणार नाही. तूर्तास भारताच्या मदतीला उभे राहिलेल्या सगळ्या राष्ट्रांचे आभार व्यक्त करतो.
जय हिंद!!!
फोटो स्रोत :- गुगल
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment