सामाजिक जबाबदारी... विनीत वर्तक ©
गेल्या काही दिवसात कोरोना आजाराचा वेग प्रचंड वाढला आहे. गेल्या २४ तासात भारतात १,३१,९६८ रुग्णसंख्येची भर पडली आहे. एकट्या महाराष्ट्रात २४ तासात ५६,२८६ नवीन रुग्ण नोंदले गेले आहेत. कोरोना फक्त महाराष्ट्रात नाही तर सगळीकडे हातपाय पसरतो आहे. नक्कीच महाराष्ट्रात त्याचा वेग प्रचंड आहे याबद्दल दुमत नाही. पण या सगळ्याला कारणीभूत कोण? या प्रश्नावर सोशल मिडिया किंवा कोणत्याही प्लॅटफॉर्म वर सर्वच जण आपल्या पक्षांचे झेंडे घेऊन उभे राहतील. राज्य आणि केंद्र सरकार यांच्यावर आरोपाची गरळ ओकली जाईल. लसी आणि त्यांच्या प्रत्येक राज्याला होणारा पुरवढा यांच्या आकड्यांच गणित मांडलं जाईल. त्यावरून एकमेकांची जात, धर्म ते शिवागीळ करण्यापर्यंत सगळ्यांची मजल जाईल. मला त्यात जायचं नाही.
मुळात यात दोष कोणाचा आहे? तर एक सशक्त समाज म्हणून आपण कमी पडलो आहोत. आज कोरोना ज्या वेगाने वाढतो आहे त्याला आपण समाजाचा भाग म्हणून कारणीभूत नाही का? गेले वर्षभर प्रत्येक माध्यमातून कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी कितीतरी सूचना केल्या गेल्या आहेत. आपण काय करायला हवं आणि काय करायला नको याचा उपापोह गेले वर्षभर आपण करत आलेले आहोत. आज प्रत्येक माणसाला कोरोना मधे आपण कोणती काळजी घ्यायला हवी याची माहिती आहे. पण ती घेण्याची जाणीव आणि जबाबदारी निर्माण करण्यात एक समाज म्हणून आपण सपशेल अयशस्वी राहिलेलो आहोत.
गेल्या वर्षी हा आजार नवीन होता त्यामुळे खूप सारे संभ्रम सगळ्यांच्या मनात होते पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज डॉक्टर पासून पेशंट पर्यंत लहान मुलापासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत, श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंत सगळ्यांना आपण काय केलं पाहिजे हे माहित आहे. पण आपण काय वागतो? आपण काळजी घेतो का? आपण योग्य रीतीने मास्क घालतो का? आपण सोशल डिस्टंसिंग च पालन करतो का? आपण आपल्या सोबत इतर लोकांना याच पालन करावयास भाग पाडतो का? कारण आपण कितीही काळजी घेतली तरी समोरचा एक जरी काळजी घेत नसेल तर तो काळजी घेणाऱ्या सगळ्यांना कोरोना आजाराचं संक्रमण करू शकतो हे आपण लक्षात कधी घेणार आहोत?
नाकाच्या खाली घातलेला मास्क, रस्त्यावर शिकणं, थुंकणे, एकमेकात योग्य ते अंतर न राखण यामुळे आजची स्थिती आलेली आहे. याला कोणतं सरकार जबाबदार नाही तर तुम्ही,आम्ही आणि आपण सर्वच जबाबदार आहोत. बेड वाढवा, व्हेंटिलेटर ची संख्या वाढवा, ऑक्सिजन वाढवा हे सगळे आजार झाल्यानंतरचे उपाय आहेत. पण आपण आजार टाळण्यासाठी काय करत आहोत? जगातील कोणतीही लस ही कोरोना होण्यापासून वाचवू शकत नाही. लस ही फक्त जीवन आणि मृत्यू यातील अंतर वाढवते. लस घेतल्यामुळे फारतर मृत्यू तुम्हाला कवटाळू शकणार नाही पण ती कोरोनाला रोखू शकत नाही. लस घेतल्यामुळे तुम्हाला जरी मृत्यूने हुलकावणी दिली तरी तुम्ही त्या काळात दुसऱ्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरणार आहात त्या पापाच शल्य आपल्याला आहे का?
सामाजिक जाणीव आणि जबाबदारी फक्त आणि फक्त कोरोनाला थोपवू शकते. लग्न, मुंज, वाढदिवस, पार्टी, सिनेमा, सभा, आंदोलन हे आपल्या जिवापेक्षा महत्वाचे आहेत का? त्याने केलं म्हणून मी पण करणार याच न्यायाने आपण पुढे जाणार आहोत का? जर जाणार असू तर ही सुरवात आहे येत्या काळात २-३ लाख / प्रति दिवस रुग्णसंख्येचा आकडा गाठायला फार वेळ लागणार नाही. आपण का म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पूर्ण करू शकत नाही? आज ठरवू की माझ्यासोबत मी प्रत्येकाला कोरोना संबंधीच्या काळजी घेण्याचं शिवधनुष्य उचलेन. ती व्यक्ती सांगून ऐकत नसेल तर योग्य त्या रीतीने पोलीस, नायायालयीन यंत्रणा किंवा राजकीय पद्धतीने किंवा इतर कोणत्याही मार्गाने त्या व्यक्तीला ती काळजी घेण्यास भाग पाडीन. कारण कोरोनाचा प्रसार मी एकटा थांबवू शकत नाही. मी एकटा अपुरा आहे. आम्ही, एक समाज म्हणून जेव्हा त्याच्या विरुद्ध उभे राहू तेव्हा आणि तेव्हाच कोरोना हा थांबेल.
बाकीच्यांच मला काय? हा आपला विचार जर आपण लवकरात लवकर बाजूला केला नाही तर आपलं आणि आपल्या लोकांचंही आयुष्य टांगणीला लागलेलं आहे. सरकारवर खापर फोडण्यात अर्थ नाही. आज तहान लागल्यावर सगळेजण लस घ्यायला धावत आहेत. इतके दिवस लस घ्या म्हणून आवाहन करावं लागत होतो तेव्हा आपण सोशल मीडिया वर राजकारणाचे आणि कोणती लस चांगली आणि वाईट याच बिगुल वाजवण्यात मग्न होतो. आता जेव्हा आपल्या दाराशी कोरोना आला तेव्हा सगळ्यांना लस घेण्याची घाई झाली आहे. एवढ्या लोकसंख्येला पुर पडण्याची क्षमता कोणत्याच देशाकडे अथवा सरकारकडे नाही. तेव्हा समाज म्हणून आपली जबाबदारी ओळखून कोरोनाला आपल्या वेशीवर थांबवायची गरज आहे. हे शक्य करायचं असेल तर आपण आपली सामाजिक जबाबदारी पूर्ण क्षमतेने पूर्ण केली पाहिजे.
तळटीप :- कोणतेही राजकीय मुद्दे या पोस्ट शी जोडू नयेत. कोणत्या राज्याला काय लस दिली? आणि कोणी काय केलं? या राजकीय गोष्टींचा संबंध पोस्ट शी नाही किंवा पोस्ट चा उद्देश तो नाही .
फोटो स्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment