Saturday, 24 April 2021

पुन्हा एकदा तुम्हाला साकडं... विनीत वर्तक ©

 पुन्हा एकदा तुम्हाला साकडं... विनीत वर्तक ©

आता पुन्हा एकदा तुम्हाला साकडं घालत आहोत कारण आम्ही हतबल झालो आहोत. कोरोना च्या त्सुनामी समोर सर्व यंत्रणा कमी पडताना दिसत आहेत. ज्यांनी सगळ्यात पुढे उभं राहून लढायचं असतं तेच सगळे बिळात लपून बसले आहेत. बोटं दाखवायला नाही म्हंटल तरी आम्ही समोर येतो. त्यांनी करायला हवं आणि आम्ही काय केलं याची उजळणी करण्यापलीकडे आम्ही काही करू शकत नाही. कारण लढण्याची मानसिकता आम्हाला परंपंरेने मिळालेली नाही. कोण गेलं? आणि कोण मेलं? या आकड्याना लपवण्यात आमचा वेळ जातो. जीवाची काळजी घेण्याची जबाबदारी आम्ही नाहीतरी प्रत्येकावर सोपवली आहे. आता सगळ्या गोंधळाला सांभाळायला पुन्हा तुम्हाला एकदा साकडं घालतो आहे. 

दररोज आकड्यांचे विक्रम आम्ही करतो आहोत. सगळीकडे सगळ्याचा बाजार उठला आहे. याला आम्ही सगळेच जबाबदार आहोत. लग्न, सभा, मतदान, मेळावे सगळच आमच्यासाठी महत्वाचं आहे. खुर्ची च्या खेळात लंगडी खुर्ची पण आम्हाला हवी आहे. तुम्ही त्यावर बसताना पडलात तरी चालेल पण आम्हाला खुर्ची मिळाली पाहिजे हा आमचा मंत्र आहे. देवाला प्रसन्न करण्यासाठी आम्ही कोरोनाच्या त्सुनामी मधे आंघोळ करू पण देव प्रसन्न झाला पाहिजे. भले त्यासाठी लाखांची कुर्बानी देऊ पण त्याच्या पर्यंत सकाळच्या बांगेचा आवाज मात्र पोहचला पाहिजे. देऊळ असो वा मशीद बंदीला जुगारून आम्ही धर्म रक्षण केलच पाहिजे. आता सगळं हाताबाहेर गेल्यावर आम्हाला तुमचाच आधार आणि आता तुम्हाला पुन्हा एकदा साकडं.

पक्षाचा झेंडा आणि पक्षाचं राजकारण या पलीकडे आम्हाला काहीच दिसत नाही कारण आम्ही सगळे एकाच माळेचे मणी. कोण चांगला आणि कोण वाईट  ठरवायला आमची हद्दच नाही. कारण शेकडो मेले आणि लाखो आजारी पडले तरी आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. पण चुकी आमचीच कारण आम्हीच तुम्हाला निवडून दिलं आणि छुपे खेळ करून तुम्ही आम्हाला पाणी पाजलं. चुकी आमचीच कारण कोरोना ला हलके आम्हीच घेतलं. घराबाहेर पडताना मास्क ला नाकाच्या खाली लावलं. आठवड्याचा बाजार, सकाळचे ताजे मासे आणि संध्यकाळची पाव शेर आम्हाला जास्ती महत्वाची होती. ट्रेन मधून प्रवास करण्याची खुमखुमी आम्हालाच स्वस्थ बसून देत नव्हती. 

लॉकडाऊन ला आम्ही हलकं घेतलं. नफातोट्याच्या बिझनेससाठी नियमांना दावणीला बांधल. चुकी कोणाची ह्याचा उपापोह करण्यात काहीच अर्थ नाही कारण भुकेल्या पोटाची आग विझवण्यासाठी दुसरा कोणता मार्ग नाही. आता सगळं चुकलंच. परिस्थिती गेली आहे हाताबाहेर. शेकडो श्वास अडखळले आहेत. ऑक्सिजनसाठी तडफडत आहेत. इंजेक्शन, लस आणि औषध सगळ्याचा तुटवडा आहे पण आमच्या नेत्यांना मात्र लंगड्या खुर्ची ची काळजी आहे. तेव्हा आता तुम्हाला पुन्हा एकदा साकडं घालतो या आम्हाला मदत करा. 

गेल्या काही दिवसात तुमच्या मदतीचे परीणाम  दिसायला लागले आहेत. ऑक्सिजन घेऊन ट्र्क आता आकाशातून पोहचत आहेत. पण खूप लांबचा पल्ला बाकी आहे. तुमच्या आधाराची आज खूप गरज आहे. सोशल मिडियावर बसून स्वतःला अतिशहाणे समजणारे अनेक आहेत. पैश्यासाठी तुम्ही नोकरी करता असा टॅग लावणारे पण तेच आहेत. आम्ही चुकलो की तुमची आठवण येते. बाकी कितीतरी वेळा आमच्या खिजगणतीत तुमचं योगदान नसते. पण तुम्ही नेहमीच राष्ट्रसर्वप्रथम ठेवता. देशाच्या एका हाकेवरती आपला प्राण तळहातावर घेऊन लढता. आता पुन्हा एकदा लढाई सुरु झाली आहे. कोरोनाला तुमच्याशिवाय हरवणं अशक्य आहे. तुम्ही यातून राष्ट्राला या संकटातून बाहेर काढतील याच आशेवर पुन्हा तुम्हाला एकदा साकडं घालतो. 

एका भारतीय नागरिकाकडून त्या अनाम सैनिकांना... 

जय हिंद!!!

तळटीप :- पोस्ट चा आशय भारतीय सैन्य दलाशी निगडित आहे. त्याला कोणत्याही राजकीय, पक्षीय आणि वयक्तिक चढाओढीसाठी वापरू नये ही विनंती. 

फोटो स्रोत :- गुगल   

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




No comments:

Post a Comment