Tuesday 6 April 2021

चिनाब आर्च ब्रिज... विनीत वर्तक ©

चिनाब आर्च ब्रिज... विनीत वर्तक ©

कमानीचा पूल बांधण्याची पद्धत खूप जुनी आहे. जगातील सगळ्यात जुना कमानीचा ब्रिज साधारण ३३०० वर्षांपूर्वी (Mycenaean Arkadiko Bridge) ग्रीस इकडे निर्माण केला गेला आहे, जो आजही आस्तित्वात आहे. जावळीच्या खोऱ्यात पार्वतीपूर इकडे बांधलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूल आजही जवळपास ३५० वर्षांनंतर मोठ्या दिमाखात उभा आहे. त्यामुळेच कमानी पद्धतीने एखादा पुलाचे निर्माण करणे, हे काळाच्या कसोटीवर उतरलेले तंत्रज्ञान आहे असे आपण म्हणू शकतो. कमानी पूल हा संकुचन (compression) पद्धतीने त्यावर पडणारा भार विस्थापित करतो. भारताच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांतील एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे जम्मू आणि काश्मीरला मुख्य भारताशी दळणळणाच्या सोयींनी संलग्न करणे. त्याचाच भाग म्हणजे उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्प (USBRL:- Udhampur-Srinagar-Baramulla rail link project)   

या प्रकल्पाचा हिस्सा म्हणून चिनाब या नदीवर एक आर्च ब्रिज म्हणजेच कमानीचा पूल बांधण्यात येतो आहे. हिमालयाच्या कुशीत साकार होणारा हा पूल स्थापत्यशास्त्राच्या आणि अभियांत्रिकीच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरणार आहे. हिमालयाचा हा भाग अतिशय उंच पर्वतरांगांनी वेढलेला आहे. त्यात इथली जी जमीन आहे ती अतिशय भुसभुशीत किंवा भूस्खलन होणारी आहे. इथलं हवामान, वारे आणि एकूणच सगळी भौगोलिक परिस्थिती अतिशय प्रतिकूल अशी आहे. त्यामुळेच अश्या परिस्थितीमध्ये रेल्वे मार्ग बांधणं हे खूप कठीण काम आहे. अश्या प्रतिकूल परिस्थितीमधे रेल्वे मार्ग बांधण्याचा अनुभव भारतातील कोकण रेल्वे महामंडळाला आहे. त्यामुळेच हे काम कोकण रेल्वे महामंडळाकडे सोपवण्यात आलं आहे. चिनाब नदीवर बांधण्यात आलेला चिनाब आर्च ब्रिज हा अनेक गोष्टींनी विशेष आहे. त्यातील काही विशेषता खालीलप्रमाणे,

१) चिनाब आर्च ब्रिज हा जगातील सगळ्यात उंचीवरचा रेल्वे ब्रिज आहे. चिनाब नदीच्या तळापासून या ब्रिजची उंची तब्बल ३५९ मीटर आहे. ही उंची जगप्रसिद्ध आयफेल टॉवर पेक्षा ३५ मीटरने जास्त उंच आहे.    

२) हा ब्रिज १३१५ मीटर लांब (१.३५ किलोमीटर)असून याच्या आर्चची लांबी तब्बल ४६७ मीटर आहे. हा ब्रिज १३.५ मीटर जाड असून यावर दोन रेल्वेमार्ग बसवता येणार आहेत.

३) हा ब्रिज तब्बल २६६ किलोमीटर/तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा सामना करण्यास समर्थ आहे. (इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की चेनाब नदीचं हे खोरं हे अतिशय लांब आणि ब्रिजची असलेली उंची यामुळे वाऱ्याचा ब्रिजवर पडणारा दबाव हा सगळ्यात कठीण भाग या ब्रिजच्या डिझाईनमध्ये महत्वाचा होता.)

४) या ब्रिजचं निर्माण करताना झोन ५ (साधारण ८ रिश्टर स्केल) मधल्या भूकंपाचा सामना करेल अश्या पद्धतीने त्याची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच हा भाग दशहतवादी कारवायांनी धुमसत असल्याने डी.आर.डी.ओ. च्या सहकार्याने याला ब्लास्ट प्रूफ बनवण्यात आलं आहे. जेणेकरून कोणत्याही साधारण बॉम्ब स्फोटात याच्या स्ट्रक्चरला इजा होणार नाही.

५) यावरून तब्बल १०० किलोमीटर/तास या वेगाने  पुढील १२० वर्षं रेल्वे धावू शकणार आहे. उणे १० डिग्री ते ४० डिग्री सेल्सिअस अश्या कोणत्याही तापमानात याच्या स्टीलच्या प्रॉपटीमध्ये फरक पडणार नाही.  

६)  या ब्रिजच्या निर्मितीमध्ये  २८,६६० मेट्रिक टन स्टील, ६००,००० नट- बोल्ट, ६६,००० क्युबिक मीटर काँक्रीटचा वापर केला गेला आहे. याच्या नुसत्या आर्चचं वजन तब्बल १०,६१९ मेट्रिक टन आहे. (१ टन = १००० किलोग्रॅम) 

या पुलाच्या निर्मितीमधील आकडे डोळ्याचं पारणं फिटवणारे आहेत पण त्याहीपलीकडे भारतीय अभियंत्यांनी, कामगारांनी स्वबळावर याचं निर्माण केलं आहे. या पुलाचं काम खरे तर २००९ मध्ये पूर्ण व्हायला हवं होतं, पण अनेक कारणांनी ते पुढे ढकललं गेलं. ५ एप्रिल २०२१ ला त्याच्या आर्चचं काम संपलेलं आहे. एकूणच सगळ्यात खडतर टप्पा याच्या निर्मितीमधला संपलेला आहे. अजून हा ब्रिज पूर्ण व्हायला अजून काही वर्षं लागणार आहेत. याच्या निर्मितीसाठी जवळपास १४८६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

हा ब्रिज झाल्यामुळे इतके वर्षं विकासापासून अलिप्त राहिलेल्या जम्मू आणि काश्मीर भागाचा विकास होणार आहे. याच्या निर्मितीमध्ये  योगदान देणाऱ्या सर्वच अभियंते, वैज्ञानिक, कामगार यांचं विशेष अभिनंदन. जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज उभारताना भारताने अजून एक पाऊल आत्मनिर्भरतेकडे टाकलेलं आहे.

जय हिंद!!!

व्हिडीओ स्त्रोत :- इंडिया टुडे न्यूज 

फोटो स्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.







No comments:

Post a Comment