'रेमडेसिव्हिर' लक्ष्य चुकलेला एक बाण... विनीत वर्तक ©
रेमडेसिव्हिर हे नाव सध्या घराघरात बोललं जाते आहे, अनेक बातम्यांच्या केंद्रस्थानी आहे. त्याशिवाय राज्य आणि केंद्र अश्या दोन्ही सरकारच्या रडार वर आहे. कोरोना चा उद्रेक जसा वाढतो आहे तसतसं रेमडेसिव्हिर या औषधाची मागणी झपाट्याने वाढली आहे. अनेक ठिकाणी त्याचा तुटवडा जाणवतो आहे. कित्येक ठिकाणी याचा काळा बाजार केला जातो आहे. याची मागणी गेल्या काही आठवड्यात इतकी वाढली आहे की केंद्र सरकारने या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. पण ज्या पद्धतीने लोक वेड्यासारखी या औषधासाठी धावता आहेत ते बघून अनेक प्रश्न मनात उभे राहिले आहेत. नक्की हे औषध काय आहे? कोरोनावर हे औषध लागू पडते का? याने जीव वाचतो का? कोणाला हे औषध देण्याची गरज आहे? अर्थात ह्या सगळ्या प्रश्नांवर निष्णात डॉक्टरी पेश्याशी निगडित लोक उत्तर देऊ शकतील. पण सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून यातील काही प्रश्नांची उत्तर आपण समजून घेतली तर खूप प्रमाणात होणाऱ्या हावरट वृत्तीला आपण आळा घालू.
रेमडेसिव्हिर या औषधाची निर्मिती २००९ साली केलिफोर्निया, अमेरीका इकडे स्थित गिलेड सायन्स ने केली. त्यावेळी हे औषध 'हेपॅटिटिस सी' या प्रकारच्या काविळीवर मात करण्यासाठी बनवलं गेलं. पण अपेक्षित परिणाम न दिसल्याने ह्या औषधाला मान्यता मिळाली नाही. पुन्हा ह्या औषधाच्या २०१४ साली इबोला या व्हायरस वर मात करण्यासाठी चाचण्या केल्या गेल्या. त्यावर काही चांगले परिणाम दिसल्याने हे औषध चर्चेत आलं. तेव्हापासून हे औषध Middle East Respiratory Syndrome (MERS) and Severe Acute Respiratory Syndrome (SARS) अश्या दोन प्रकारच्या व्हायरस ला मात देण्यासाठी वापरलं जाते आहे. आता कोरोना व्हायरस हा सुद्धा वर उल्लेख केलेल्या जातीतील असल्यामुळे रेमडेसिव्हिर हे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं आहे.
रेमडेसिव्हिर नक्की काय करते? तर कोणत्याही व्हायरस मधे DNA or RNA हे जेनेटिक मटेरियल असते. कोणताही व्हायरसला आपली संख्या वाढवण्यासाठी एंझाइम ची गरज लागते. आपल्या शरीरातील एंझाइम वापरून व्हायरस आपली संख्या वाढवत नेतात. कोरोना व्हायरस ला आपली आवृत्ती काढण्यासाठी RNA-dependent RNA polymerase (RdRp) हे एंझाइम लागते. जर हे मिळालं नाही तर कोरोना व्हायरस आपल्या आवृत्या निर्माण करू शकत नाही आणि त्याचवेळी शरीरातील त्याचा लोड कमी होतो आणि आपल्या शरीरातील इम्यून सिस्टीम त्याला लढा देऊ शकते. इकडेच रेमडेसिव्हिर कामाला येते. हे औषध हे एंझाइम कोरोना व्हायरस ला मिळू देत नाही आणि त्याचा प्रसार थांबतो. (कोणत्याही सैन्याला युद्ध करण्यासाठी रसद महत्वाची असते. रसद तोडलीत तर अर्ध युद्ध आपण जिंकल हा युद्धाचा नियम आहे. कोरोना च्या लढाईत रेमडेसिव्हिर नेमकी रसद तोडण्याची भूमिका बजावते.)
रेमडेसिव्हिर हे खरच तसं करते का? या प्रश्नाचं उत्तर मात्र गोंधळ उडवणार आहे. त्यामुळेच अनेक देशात याच्या उपयोगावर बंदी आणली गेली आहे. अमेरिकेच्या (Food and Drug Administration) ने २८ ऑक्टोबर २०२० ला रेमडेसिव्हिर चा वापर कोरोना रोगावर करण्यास मान्यता दिली. अमेरिकेत घेतलेल्या चाचण्यांमध्ये कोरोना रोग्यांना हे औषध दिल्यावर जवळपास ५ दिवस लवकर रोगी बरे झाले. त्यामुळे कुठेतरी हे औषध कोरोना विरुद्ध काम करते आहे असं दिसून आलं आणि याचा वापर जवळपास ५० देशात सुरु झाला. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने केलेल्या चाचण्यांमध्ये मात्र रेमडेसिव्हिर हे कोणत्याही प्रकारे कोरोनामुळे होणारे मृत्यू टाळण्यास अथवा रुग्णांना लवकर बर करण्यास यशस्वी ठरत नसल्याचं दिसून आलेलं आहे. त्यामुळे अनेक देशांनी याचा वापर संपूर्णपणे बंद केला आहे. रेमडेसिव्हिर खरच उपयोगी आहे का नाही? हा प्रश्न अनुत्तरित म्हणता येईल.
रेमडेसिव्हिर वापरल्याने शरीराला इजा पोहचू शकते. याचे काही साईड इफेक्ट आहेत. ज्यात लिव्हर खराब होऊ शकते, ब्लड प्रेशर, हार्ट रेट यावर त्याचा प्रभाव पडतो आणि इतर अनेक गोष्टी आहेत त्यामुळे कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय हे औषध खरेदी करणं तसेच ते शरीरात टोचणे जीवघेणं ठरू शकते. वर सांगितलं त्या प्रमाणे रेमडेसिव्हिर रसद तोडण्याचं काम करते पण त्या बदल्यात आपल्या शरीराला काहीतरी मोबदला मोजावा लागतो. जर रसद तोडण्याचं काम ते करू शकत नसेल तर ते घेऊन आपल्या शरीराचा मोबदला आपण का द्यायचा? त्यामुळे गुगल डॉक्टर न होता त्याच्या वापरासाठी योग्य तो वैद्यकीय सल्ला घेणं अपेक्षित आहे. रेमडेसिव्हिर हे कोरोना रोगामुळे अतिशय गंभीर असणाऱ्या रोग्याला देण्याची गरज असते. त्याचा निर्णय हे डॉक्टर घेतात. तेव्हा गरज नसेल तर उगाचच घरात साठवून ठेवण्यासाठी रेमडेसिव्हिर खरेदी करू नका. तुमच्या घाईमुळे एखाद्या रुग्णाचा जीव जाऊ शकतो.
"Remdesivir is to be used only in those who require hospitalization and are on oxygen support. There is no question of its use in the home setting and for mild cases, and it is not to be procured from chemist shops".
NITI Aayog member (Health) Dr VK Paul
रेमडेसिव्हिर हे औषध भारतात ७ औषधी कंपन्या बनवत असून ३९ लाख डोस प्रत्येक महिन्याला बनत आहेत. पण आता कोरोनाचा प्रसार बघता त्याची संख्या निश्चितपणे वाढली असेल.
रेमडेसिव्हिर चा इतिहास बघितला तर तो लक्ष्य चुकलेला बाण आहे. जे आधी वेगळ्या कारणासाठी बनवलं गेलं आणि आता वेगळ्याच कारणासाठी उपयोगात येत आहे. त्यामुळे हा बाण दुसऱ्या लक्ष्याचा भेद करतो की नाही याबद्दल संभ्रम आहे. अश्या सगळ्या परिस्थितीत आपलं डोकं न लावता योग्य त्या वैद्यकीय सल्याच पालन करणं हाच आपला योग्य बचाव आहे.
फोटो स्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment