Thursday 15 April 2021

'मायक्रो ॲग्रेशन' एक उघड गुपित... विनीत वर्तक ©

'मायक्रो ॲग्रेशन' एक उघड गुपित... विनीत वर्तक ©
काल
Sulakshana Varhadkar
सुलक्षणा वऱ्हाडकर यांचा मायक्रो ॲग्रेशनवर केलेला व्हीडिओ पाहिला, आणि अनेक दिवस मनात असलेल्या भावना समोर आल्या. "मायक्रो ॲग्रेशन"चा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीवर मोठ्या समुदायाकडून नकारात्मक टिप्पणी. ही टिप्पणी एखाद्या व्यक्तीला अथवा काही व्यक्तींना उद्देशून केलेली असते आणि जी मुद्दामहून किंवा नकळत केली जाते. 'मायक्रो ॲग्रेशन' हा एक प्रकारचा भेदभाव आहे, जो एखाद्या व्यक्तीच्या जाती, धर्म, रंग किंवा व्यक्तिमत्व ते त्याचा प्रांत, भाषा अनेक गोष्टींवरून केला जातो. याची झळ नकळत त्या व्यक्तीला लागते, ज्याच्यामुळे मानसिक स्ट्रेस होतो. 'मायक्रो ॲग्रेशन' चा परिणाम हा फक्त नकारात्मक भावनेपुरती उरत नाही तर तिचे दूरगामी परिणाम त्या व्यक्तीच्या मानसिक आणि कधी शारीरिक क्षमतेवर दिसून येतात ज्यातून ती व्यक्ती कधी संपूर्ण खचून जाऊ शकते किंवा कधी कधी आयुष्याचा शेवट करेपर्यंत या गोष्टी जाऊ शकतात.
फेसबुकसारख्या सोशल मिडीयावर तर 'मायक्रो ॲग्रेशन' अनेकदा अनुभवायला येतं. अनेकदा ते दिसतं अनेकदा पडद्यापाठी असतं. तुमचं आडनाव, शिक्षण, तुमच्याकडे असलेलं स्टेटस या सगळ्यावर ठरवून टार्गेट केलं जातं. यासाठी व्यूहरचनाही ठरवल्या जातात. अर्थात या सगळ्यासाठी लागणारा वेळ आणि शक्ती खर्च करण्याची कित्येक लोकांची मानसिकता असते. त्यासाठी मग एखाद्याच्या चारित्र्याचा बाजार उठवायलाही लोक मागे पुढे बघत नाहीत. झुंडशाही हाही 'मायक्रो ॲग्रेशन' चा एक भाग. झुंडीने आपली मतं म्हणजेच सर्वोपरी, आणि बाकी जणांच्या मतांना किंवा ते मांडणाऱ्या लोकांना तुम्ही आमच्यातले नाहीत, हे जाणूनबुजून दाखवून देणं हाही प्रकार इकडे अनेकांनी इकडे अनुभवला असेल. हो ला हो करत एखाद्याला वेगळं पाडून त्याला सर्व बाजूने घेराव टाकून त्याला एकतर मैदान सोडायला लावणं अथवा त्याला पूर्णपणे जमीनदोस्त करणं हे फेसबुकवर उघडपणे सुरू असतं.
कोणी याच्या विरोधात बोललं तर त्याला जातीच्या, धर्माच्या आणि रंग-रूपाच्या तराजूत तोलून आपण कसे बरोबर हे सिद्ध करण्याचा अट्टाहासही केला जातो. आपल्याच सारखे विचार, धर्म, जात आणि स्टेटस असणाऱ्या लोकांची वाहवा करून त्यापेक्षा कोणीतरी वेगळी प्रतिभा दाखवत असेल तर त्याला आपल्या पुढे जाऊ न देण्याची मांडणी म्हणजेच 'मायक्रो ॲग्रेशन'. एक तर नवीन केलेल्या एखाद्या गोष्टीवर अथवा लिहिलेल्या विषयावर आक्षेप नोंदवला जातो मग आक्षेप येतात त्यातल्या लिखाणावर वर मग त्यावरती आलेल्या कमेंट वर आणि मग आपण करत असलेल्या रिप्लायवर आक्षेप नोंदवले जातात. टीका केली जाते, ठरवून, झुंडीनं येऊन असं मायक्रो लेव्हलचं प्लॅनिंग करून हे लोक मैदानात उतरत असतात, जो कुणी यांच्यापेक्षा थोडासा वेगळं काही करत असेल, अथवा त्यांच्यापेक्षा पुढे जातो आहे, हे दिसलं की ही सगळी लॉबी ऍक्टिव्ह होते. एखाद्याला, जो कुणी वेगळी चुणूक दाखवेल त्याला संपवायला पद्धतशीर पणे ही लॉबी कार्यरत असते. हे सगळं इतक्या टोकाला जाऊ शकतं की माणूस आयुष्यातून उठू शकतो इतकं याचं भयावह स्वरूप आहे. आम्ही त्यातले नाहीच म्हणत आम्ही त्यातलेच हे दाखवून देणं म्हणजे पण 'मायक्रो ॲग्रेशन'. अर्थात हे सगळं फेसबुकपुरतं मर्यादीत नाही. प्रत्यक्ष आयुष्यातसुद्धा अश्या अनेक विविध पातळीवर आपल्यापैकी प्रत्येकाने ते अनुभवलं असेल.
कामाच्या ठिकाणी तर हे जास्ती प्रमाणात जाणवते. जेव्हा तुम्ही मल्टीनॅशनॅलिटीजच्या लोकांसोबत काम करत असता तेव्हा ह्याचं स्वरूप खूप प्रखरतेने समोर येतं. तुमच्या रंगावरून तुम्हाला मिळणाऱ्या वागणुकीत फरक पडतो. हा फरक फक्त चालण्या-बोलण्यात नाही तर अगदी आर्थिक पातळीवरही दिसून येतो. आता जिकडे मी काम करतो तिकडे सध्या १८ वेगवेगळ्या देशांची नागरिकता असलेले लोक एकत्र काम करत आहेत. प्रत्येक खंडाचे नेतृत्व करणारे लोक जेव्हा बरोबर काम करतात, तेव्हा या 'मायक्रो ॲग्रेशन'चा अनुभव मला पदोपदी येतो. एखादा व्यक्ती कुठून आला ह्यावर त्याची कार्यकुशलता ठरवली जाते. एखाद्या व्यक्तीच्या इंग्रजी भाषेवर असलेल्या प्रभुत्वावरून त्याच्याबद्दल मत बनवले जाते. एखाद्या व्यक्तीच्या खाण्याच्या सवयीवरून त्याची पत ठरवली जाते. हे सगळं एखादा विशिष्ट लोकांचा समूह कधी नकळत तर अनेकदा जाणूनबुजून करत असतो.
या सर्वाचा जी व्यक्ती याला बळी पडते, तिच्यावर खूप परिणाम होतो. माझ्या पाहण्यात कित्येक लोक असे आहेत, ज्यांचं आयुष्य फेसबुकवरच्या 'मायक्रो ॲग्रेशन' मुळे उध्वस्त झालेलं आहे किंवा होता होता वाचलेलं आहे. ती व्यक्ती ज्या पद्धतीने तुटून जाते, त्याला नकळत कुठेतरी भयावह किनार आहे. आपण समाज म्हणून कुठेतरी या सगळ्याला कारणीभूत आहोत. या घोळक्यांकडून अशी काही वातावरण निर्मिती होत असते की आपणही आपल्याच नकळतपणे कित्येकदा अश्या केल्या जाणाऱ्या छळाला छुपं समर्थन मायक्रो एग्रेशन करणाऱ्या घोळक्याला करत असतो. आपण अनेकदा इच्छा असूनही ग्रुप किंवा घोळक्यामुळे त्यात सापडलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी अथवा त्या व्यक्तीच्या बाजूने उभं राहण्यासाठी पुढे येत नाही. उलटपक्षी झालेल्या प्रकाराला अजून मीठ मसाला लावून त्याचं गॉसिप करण्यात धन्यता मानतो. हे सगळं करणारा तो घोळका सगळं करून सवरून नामानिराळा राहतो, आणि भोगणारा हे भोगत राहतो इतकं भोगतो की कधीकधी त्यातून बाहेरही निघू शकत नाही .
फेसबुक किंवा सोशल मिडीयावर 'मायक्रो ॲग्रेशन' करणाऱ्या अश्या ग्रुप आणि मनोवृत्तीच्या माणसांना आपल्या जवळ न येऊ देणं हा सगळ्यात सोप्पा उपाय आहे. अनेकदा आपण आपली प्रतिभा अश्या मानसिकतेच्या लोकांच्या प्रतिक्रियेवरून ठरवत असतो. त्यामुळे तेच आपलं जग अशी आपली अवस्था करून टाकतो. कारण झुंडीने फिरणारे हे लोक आपण कोणीतरी मोठे असा टॅग लावून फिरत असतात किंवा त्यांच्या प्रतिभेचा त्यांना माज असतो. त्यामुळेच याचा विरोध आणि प्रतिकारसुद्धा त्याच पद्धतीने पण आपली पत न घालवता केला जायला हवा. कारण अनेकदा आपण रागाच्या भरात एक पायरी खाली येतो आणि समोरच्याला अजून टार्गेट करण्यासाठी संधी देतो.
'मायक्रो ॲग्रेशन' हा मॅनेजमेन्टचा विषय आहे आणि तो खूप मोठा आहे. पण निदान सोशल मीडियाच्या बाबतीत एकतर अनुल्लेखाने टाळणं, योग्य शब्दात प्रतिकार करणं आणि आपल्या संवेदनाना त्यामुळे ठेच पोहचू न देणं आपल्याला शिकावं लागेल. आपण लोकांना किंवा 'मायक्रो ॲग्रेशन' करणाऱ्या ग्रुपना बदलू शकत नाही. कारण ते तुमच्या, आमच्या फ्रेंडलिस्ट,ग्रुपमध्ये सगळीकडे आहेत. समोर आपलं गुणगान करून आपल्यामागे आपल्याला बदनाम करण्यासाठी व्यूहरचना रचणारे आहेत त्यांना ओळखून त्यांना त्यांच्या शब्दात उत्तर द्यायला शिकणं हे आपण सोशल मिडिया वर असताना शिकायला हवं. स्वतःच्या प्रतिभेची जाण आणि आवाका स्वतःला माहीत असणे, कोणताच न्यूनगंड अथवा इन्फेरिओरिटी कॉम्प्लेक्स न बाळगता वावरायला शिकणे. कितीही वेळ आली तरी अश्या झुंडशाही ला सामोरे जाण्यासाठी आपलीही तितकीच तयारी असणे, आपलाही तेवढाच मोठा लोकसंग्रह वाढवणे, हे लोक त्यांच्या कुटनितीत यशस्वी होत राहतात कारण ते कळप बनवतात. त्याला संलग्न आपल्याशी आपल्या विचारांशी मिळताजुळता जमाव आपणही जमवला तर अश्यांची आपसूक नसबंदी आपण कायमस्वरूपी नक्कीच करू शकू आणि एका प्रगल्भ समाजाच्या जडणघडणीला हात भर लावू.
फोटो स्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment